चालू घडामोडी : ६ जुलै
इस्त्रोद्वारे ‘क्रू एस्केप सिस्टीम’ची यशस्वी चाचणी
- भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो)ने अंतराळ प्रवासात अंतराळवीरांची सुरक्षितपणे ने-आण करू शकणाऱ्या ‘क्रू एस्केप सिस्टीम’ (कॅप्सुल)ची यशस्वी चाचणी केली आहे.
- ही कॅप्सूल अंतराळवीर आपल्यासोबत अवकाशात नेऊ शकेल. तसेच अंतराळात आणीबाणीच्या प्रसंगी तिचा वापर करता येईल.
- मानवी अवकाश मोहिमेत प्रेक्षपणानंतर यानात काही बिघाड झाल्यास ही यंत्रणा कार्यान्वित होते व ही कॅप्सुल अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जाते.
- अंतराळ प्रवासादरम्यान झालेल्या कुठल्याही दुर्घटनेत या कॅप्सुलचा वापर करून अंतराळवीर आपले प्राण वाचवू शकतील.
- इस्रोचे चेअरमन : के. सिवान
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना
- पत्रकारांसाठी मासिक पेन्शन योजना सुरू करावी, या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.
- महाराष्ट्र सरकारद्वारे ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ या नावाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
- या योजनेनुसार वयाची ६० वर्षे पूर्ण केलेला व सलग २० वर्षे पत्रकार म्हणून सेवेत राहिलेला पत्रकार पेन्शनसाठी पात्र ठरणार आहे. या पत्रकाराला महिना १० हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
- नागपूर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकार सन्मान योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या निधीतून पेन्शन सुरु करण्यात येणार आहे.
- राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यांना आरोग्याच्या समस्याही भेडसावत आहेत.
- वयोवृद्ध व गरजू पत्रकारांना पेन्शन मिळावे, यासाठी पत्रकारांच्या सर्वच संघटनांनी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना १० वर्षांचा तुरुंगवास
- आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
- याचप्रकरणी शरीफ यांची कन्या मरियमला मुलीला ७ वर्षांची तर जावई निवृत्त कॅप्टन सफदरला १ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
- तसेच शरीफ यांना ८० लाख पाऊंड, तर मरियमला २० लाख पाऊंड दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
- नवाज शरीफ यांच्यावर पनामा पेपर्सप्रकरणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या तीनपैकी एका खटल्यात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला.
- लंडनमध्ये नवाज शरीफ यांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केली. एवनफिल्ड हाऊसमध्ये ४ घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे.
- नवाज शरीफ यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या लंडनमध्ये आहेत. न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तसेच मरियम शरीफ यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात आहे.
- पनामा पेपर्सप्रकरणी मागील वर्षी पाकिस्तानच्या न्यायालायाने दिलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले होते.
श्रीमंतांच्या यादीत मार्क झुकरबर्ग तिसऱ्या स्थानी
- फेसबुकचे संस्थापक ३४ वर्षीय मार्क झुकरबर्ग यांनी गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
- ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सने ही यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे दोघे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत.
- फेसबुकच्या शेअरमध्ये २.४ टक्के वाढ झाल्याने झुकरबर्गच्या संपत्तीत वाढ होऊन ती ८१.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. झुकरबर्गची संपत्ती बफे यांच्या संपत्तीपेक्षा ३७३ मिलियन डॉलर अधिक आहे.
- यावर्षी फेसबुकला डेटा लिक केल्याच्या आरोपाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मार्च २०१८मध्ये फेसबुकच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती.
- वॉरेन बफे यांनी बर्कशायर हाथवे कंपनीचे ब श्रेणीचे समभाग गेट्स फाउंडेशनला दान केले. त्यामुळे त्यांच्याकडील संपत्ती कमी झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा