महेंद्रसिंह धोनीच्या वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला.
जागतिक क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा धोनी चौथा भारतीय तर १२वा जागतिक फलंदाज ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो (श्रीलंकेच्या कुमार संगकारानंतर) केवळ दुसरा यष्टीरक्षक आहे.
धोनीव्यतिरीक्त भारताच्या सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. १० हजारांचा टप्पा गाठणारा धोनी पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे.
धोनीने आता ३२० सामन्यांमध्ये १०,००४ धावा केल्या असून, सर्वात कमी डावांत हा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये तो ५व्या क्रमांकावर आहे. त्याने २७३ डावांमध्ये ही कामगिरी केली.
जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला विम्बल्डनचे विजेतेपद
जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने विम्बल्डन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्सवर मात करत, तिचे पहिले विम्बल्डन विजेतेपद तर तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले.
अंतिम सामन्यात ११व्या मानांकित जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने २५व्या मानांकित सेरेना विल्यम्सला ६-३, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.
याआधी कर्बरने २०१६साली ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेचे प्रत्येकी १ विजेतेपद पटकावले होते.
२०१६च्या विम्बल्डनमध्ये सेरेनाकडून पराभव पत्करावा लागल्याने कर्बरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
१९९६नंतर जर्मनीकडून महिला एकेरीचे विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच महिला ठरली. १९९६साली स्टेफी ग्राफ यांनी जर्मनीला विम्बल्डन विजेतेपद मिळवून दिले होते.
फिफा विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमला तिसरे स्थान
फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात बेल्जियमने इंग्लंडला २-० असे पराभूत करत तिसरे स्थान पटकावले.
सामन्याच्या सुरुवातीपासून बेल्जियमने आक्रमक पवित्रा घेत पूर्वार्धात १ आणि उत्तरार्धात १ असे २ गोल केले.
एकतर्फी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा डिफेन्स आणि फॉरवर्ड पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
बेल्जियमसाठी थॉमम म्युनिएरने ४थ्या मिनिटाला तर एडन हॅजार्डने ८२व्या मिनिटाला प्रत्येकी १ गोल केला.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अटक
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांना लाहोर विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली आहे.
शरीफ यांच्या पत्नी कुलसूम या कर्करोगाने आजारी असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने ते आतापर्यंत लंडनमध्ये होते.
पाकिस्तानातील नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो (एएनबी)ने अटकेची ही कारवाई केली. या तपास संस्थेने त्यांचे पासपोर्टही जप्त केले आहेत.
पाकिस्तानमध्ये २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होत असून या प्रकरणाचे मोठे पडसाद निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत.
या सगळ्या घडामोडी तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख, माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पथ्यावर पडतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. शरीफ यांच्याविरुद्ध ज्या याचिका दाखल झाल्या त्यात एक याचिकाकर्ते इम्रान खानही होते.
शरीफ येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी शरीफ यांचे बंधू शाहबाज यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) पक्षाचे हजारो समर्थक लाहोर विमानतळाच्या परिसरात जमले होते.
शरीफ यांना इस्लामाबादला नेऊन तेथे त्यांना न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे. त्यापूर्वी त्यांना रावळीपिंडी येथील अडियाला तुरुंगात ठेवण्यात आले.
शरीफ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे एकूण ३ आरोप आहेत. त्यापैकी बेकायदा संपत्ती जमवून लंडनमध्ये मालमत्ता निर्माण केल्याबद्दल शरीफ यांना १० वर्षांची तर मरियम यांना ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
कोर्टाने नवाज शरीफ यांना ८ दशलक्ष पाऊंड आणि मरियमला २ दशलक्ष पाऊंड दंडदेखील ठोठावला आहे. शरीफ यांच्या जावयालाही याचप्रकरणात अटक झाली आहे.
२०१६मध्ये पनामा पेपर प्रकरणात नवाज शरीफ यांचे नाव आल्यानंतर जुलै २०१७मध्ये त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
चौकशीनंतर नवाज शरीफ आणि मरियम यांच्याविरुद्ध मनी लॉन्डरिंगचा खटला चालवण्यात आला होता.
मोहम्मद कैफची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने १३ जुलै रोजी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कैफने १२ वर्षापूर्वी भारतीय संघासाठी अखेरचा सामना खेळला होता.
त्याने २०००मध्ये कसोटी, तर २००२मध्ये वन-डेत पदार्पण केले होते. कैफ सध्या हिंदीत समालोचन करतो.
१३ जुलै २००२ रोजी झालेल्या नेटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये कैफने लॉर्ड्सच्या मैदानावर ८७ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. १३ जुलै रोजीच कैफने निवृत्तीची घोषणा केली आहे.
मोहम्मद कैफने भारतासाठी १३ कसोटीत ६२४ धावा केल्या आहेत. तसेच १२५ वनडे सामन्यांमध्ये २७५३ धावा केल्या आहेत.
एच-१बी व्हिसाचे नुतनीकरण न झाल्यास मायदेशी परतावे लागणार
अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसाचे नूतनीकरण न झाल्यास व्हिसाधारकाला थेट मायदेशी पाठवण्याची तरतूद असलेले धोरण लागू केले आहे.
यामुळे चेंज ऑफ स्टेटससाठी करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला तर त्या व्यक्तीवर देशातून हद्दपार करण्याची कारवाई होणे शक्य आहे.
अमेरिकेत नोकरीसाठी जाऊन तिथे स्थायिक होऊ पाहणाऱ्या भारतीयांच्या अडचणींमध्ये यामुळे वाढ होणार आहे.
व्हिसा नसल्यास अमेरिकेत काम करणाऱ्या व्यक्तीला नोकरी गमावण्याचीही वेळ येऊ शकते. तसेच अशा व्यक्तीचे अमेरिकेतले वास्तव्यही बेकायदेशीर असणार आहे.
अशा परिस्थितीत इमिग्रेशन कोर्टाच्या निर्णयापर्यंत त्या व्यक्तीला काही महिने अमेरिकेत काढावे लागू शकतात.
तसेच नोटीस टू अपिअर बजावल्यानंतर कोर्टापुढे न आल्यास अमेरिकेत पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी थेट ५ वर्षांची बंदी केली जाऊ शकते.
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसारख्या कामात प्रावीण्य असलेल्या परदेशी व्यक्तींना एच१-बी व्हिसा जारी केला जातो.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी त्यांच्या कार्यकाळात ही व्यवस्था सुरु केली. आऊटसोर्सिंग फर्मना हा व्हिसा दिला जातो.
उच्च स्तरिय कुशल व्यावसायिकांना नियुक्त करण्यासाठी अमेरिकन कंपन्या एच१-बी व्हिसाचा वापर करतात. मागील वर्षी अमेरिकेत एच१-बी व्हिसासाठी २ लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा