चालू घडामोडी : २ जुलै
के के वेणुगोपाल भारताचे १५वे महान्यायवादी
- भारताचे सर्वोच्च विधि अधिकारी अर्थात (१५वे) महान्यायवादी म्हणून कोट्टायम कटनकोट वेणुगोपाल यांची नियुक्ती झाली आहे. माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची जागा ते घेतील.
- कायदा क्षेत्रात त्यांची कारकीर्द फार मोठी आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सरकारला ‘आधार’सारख्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना फायदा होणार आहे.
- गेली पन्नास वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत असून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कायदेतज्ज्ञ आहेत.
- के के वेणुगोपाल यांचा जन्म केरळात १९३१मध्ये नायर कुटुंबात झाला. त्यांचे वडील एम के नंबियार यांचा वकिलीचा वारसा त्यांना लाभला आहे.
- वेणुगोपाल यांचे कायद्याचे शिक्षण बेळगावच्या आर एल लॉ कॉलेजमधून झाले. त्यांनी १९५४मध्ये मद्रास उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
- १९६३मध्ये वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. १९७२मध्ये तेथे ते वरिष्ठ वकील बनले.
- नंतर जनता पक्षाच्या कारकीर्दीत मोरारजी देसाई यांनी त्यांची ॲडिशनल सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती केली होती.
- मंडल, अयोध्या, न्यायाधीश नियुक्ती प्रकरण, जयललिता प्रकरण यात त्यांनी युक्तिवाद केले. २०१५मध्ये त्यांना पद्मविभूषण हा मानाचा नागरी किताब मिळाला.
- त्यांची युक्तिवादाची वेगळी शैली व राज्यघटनेचे ज्ञान अजोड आहे. अयोध्या प्रकरणात त्यांनी अलीकडे लालकृष्ण अडवाणी यांची बाजू मांडली होती. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात त्यांनी ‘न्यायमित्र’ म्हणून काम केले.
- ते उत्तम वकील तर आहेतच, पण मानवतेशी त्यांचे नाते अतूट आहे. त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून बराच पैसा केरळातील आदिवासी मुलांचे शिक्षण व वैद्यकीय सुविधा तसेच धर्मादाय संस्था यासाठी दिला आहे.
अमेरिका भारताला गार्डियन ड्रोन देणार
- अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र विभागाने भारताला २२ प्रीडेटर गार्डियन ड्रोन निर्यात करण्यासाठी आवश्यक परवाने दिले आहेत.
- मोदी-ट्रम्प यांच्या भेटीनंतर काही दिवसांमध्येच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताला ड्रोन निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.
- गार्डियन ड्रोन विमाने मानवरहित असून, ती २७ तास आकाशात राहू शकतात व ५०,००० फूट उंचीवरून उडू शकतात.
- भारताच्या सागरी सुरक्षेला मजबुती देण्यासाठी गार्डियन ड्रोन उपयोगी पडणार आहेत. भारतीय नौदलाची गुप्तचर, टेहळणी क्षमता यामुळे वाढणार आहे.
- गार्डियन ड्रोनमुळे हिंदी महासागरातील शत्रू सैन्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे भारतीय सैन्याला शक्य होणार आहे.
- हा करार दोन ते तीन अब्ज डॉलर्सचा असून, त्यानुसार २२ गार्डियन ड्रोन अमेरिका भारताला देणार आहे.
- याशिवाय अमेरिकेने एफ १६ व एफए १८ विमाने भारताला विकण्याची तयारी दर्शवली आहे.
- तसेच अमेरिका व भारत वज्र प्रहार, रेड फ्लॅग युद्ध अभ्यास या कवायतीत एकत्र सहभागी होणार आहेत.यामुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढेल
विक्रीकर भवनाचे जीएसटी भवन असे नामकरण
- देशभरात जीएसटी अर्थात वस्तू-सेवा कर लागू झाल्यानंतर विक्रीकर विभागाचे आता वस्तू-सेवा कर विभाग असे नामांतर करण्यात आले आहे.
- तसेच विक्रीकर कार्यालयाचे वस्तू-सेवा कर कार्यालय आणि विक्रीकर भवनाला जीएसटी भवन असे नामकरण करण्यात आले आहे.
- जीएसटी लागू झाल्याने देशभरातील कर संकलन करणाऱ्या विभागांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
- मुख्यत: विक्रीकर विभागाकडेच जीएसटी वसुलीचे काम असल्याने आणि जीएसटी वसुलीचे कामकाज प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याने अद्ययावत यंत्रणा प्रत्येक जिल्हय़ाच्या मुख्य विक्रीकर कार्यालयांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे.
माजी नौदल अधिकारी कविना यांचे निधन
- माजी नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर बहादूर नरीमन (बी एन) कविना यांचे ऑस्ट्रेलियातील अॅडलेड शहरात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
- १९७१च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढल्या गेलेल्या युद्धामध्ये कराचीवरील हल्ल्यात कविना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- युद्धातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना वीरचक्र प्रदान करून गौरवण्यात आले होते.
- १९७१च्या युद्धात भारताच्या हल्ल्याचा मुख्य भर पूर्व आघाडीवर असला तरी पश्चिम आघाडीवरही काही महत्त्वाच्या कारवाया करण्यात आल्या.
- त्यात ४ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या कराची बंदरावर भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्रसज्ज युद्धनौकांनी केलेल्या यशस्वी हल्ल्याचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.
- ऑपरेशन ट्रायडेंट असे सांकेतिक नाव असलेल्या या हल्ल्यात नौदलाच्या आयएनएस नि:पात, निर्घात आणि वीर या युद्धनौकांनी भाग घेतला होता.
- त्यापैकी आयएनएस नि:पातचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर बी एन कविना यांनी केले होते. कराची बंदरावरील हल्ल्याच्या शिल्पकारांपैकी ते एक प्रमुख सेनानी होते.
- आयएनएस नि:पातने कराची बंदराजवळ पाकिस्तानी मालवाहू जहाज एमव्ही व्हिनस चॅलेंजर आणि त्याला संरक्षण पुरवणाऱ्या पीएनएस शाहजहान यांच्यावर स्टाइक्स क्षेपणास्त्रे डागली. त्यात दोन्ही नौकांचे मोठे नुकसान झाले.
- एमव्ही व्हिनस चॅलेंजर पाकिस्तानी सैन्यासाठी अॅल्युमिनियम वाहून नेत होती. ती काही अंतरावर जाऊन समुद्रात बुडाली. तर पीएनएस शाहजहान या विनाशिकेचेही मोठे नुकसान झाले.
- त्यानंतर आयएनएस नि:पातने कराची बंदरातील केमारी येथील इंधन साठय़ांवर हल्ला करून ते नष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला युद्धात इंधनाचा तुटवडा भासला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा