चालू घडामोडी : १३ जुलै

लष्कराला आपत्कालीन स्थितीत शस्त्र खरेदीचे अधिकार प्रदान

 • केंद्र सरकारकडून लष्कराला गंभीर आणि आपत्कालीन स्थितीत थेट शस्त्र खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत.
 • सीमेवर होणाऱ्या चकमकींदरम्यान सैन्याला शस्त्रसज्ज ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • शस्त्र खरेदीच्या प्रक्रियेला अनेकदा बराच कालावधी लागतो. त्याच पार्श्वभूमीवर थेट लष्कराला शस्त्र खरेदी करण्याचे केंद्राकडून देण्यात आले आहेत.
 • या निर्णयामुळे लष्कराला आता दारुगोळा आणि शस्त्र सामग्री थेट खरेदी करता येणार आहे.
 • याअंतर्गत १० प्रकारची शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांच्या थेट खरेदीचे संपूर्ण अधिकार लष्कराच्या उपप्रमुखांना देण्यात आले आहेत.
 • युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास सैन्याकडे पुरेशी शस्त्रे नसल्याचे अंतर्गत आढाव्यातून समोर आल्यानंतर लष्कराला थेट शस्त्र खरेदी करता येईल.
 • मात्र अधिकार मिळालेल्या लष्कराच्या उपप्रमुखांवर वेळोवेळी शस्त्रसज्जतेचा आढावा घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
 • शस्त्रांची कमतरता जाणवल्यास तेच त्यास जबाबदार असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गंगा नदीकाठी बांधकामांना बंदी

 • गंगा नदीकाठचा १०० मीटरचा परिसर राष्ट्रीय हरित लवादाकडून ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
 • त्यामुळे आता या भागात कोणतेही बांधकाम करता येणार नाही. हरिद्वार ते उन्नाव या दरम्यानच्या भागासाठी हा नियम लागू असणार आहे.
 • तसेच हरिद्वार ते उन्नावदरम्यान वाहणाऱ्या गंगा नदीजवळील ५०० मीटर परिसरात कचरा टाकल्यास ५० हजार रुपयांचा दंडही आकारला जाणार आहे.
 • गंगा नदीकाठच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
 • लवादाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जाते का, हे पाहण्यासाठी देखरेख समिती स्थापन करण्याचा आदेशही संबंधित यंत्रणेला दिला आहे.
 • राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, याबाबतचे अहवाल वेळोवेळी देखरेख समितीला द्यावे लागणार आहेत.
 गंगा नदी 
 • भारतातील सर्वात लांब नदी.
 • लांबी: २,५१० किमी 
 • जलवाहन क्षेत्र: ८,३८,२०० किमी 
 • गंगेचा उगम: उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री येथे ‘भागीरथी’ या नावाने उगम. देवप्रयाग येथे अलकनंदा नदी ही गंगेला मिळते.
 • देवप्रयागनंतर भागीरथी-अलकनंदा यांच्या संयुक्त प्रवाहाला ‘गंगा’ हे नाव प्राप्त होते. बांगलादेशमध्ये गंगा ‘पद्मा’ नावाने वाहते. 
 • पश्चिम बंगाल व बांगलादेश या भागात गंगेच्या असंख्य शाखांचा प्रवाह होऊन जगातील सर्वात मोठा विस्तीर्ण ५८,७८२ चौ. किमी क्षेत्रफळाचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे.
 • गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या मुखालगत १६,९०० चौ. किमी विस्ताराचा अरण्यमय व दलदलीचा सुंदरबन हा प्रदेश विखुरलेला आहे. हा प्रदेश बंगाली वाघांचे माहेरघर आहे.
 • गंगा नदीत दररोज लाखो टन कचरा आणि हजारो लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येते. यामुळे गंगा नदी प्रदूषित झाली आहे.
 • कारखान्यांमधून सोडले जाणारे पाणी, लोकांकडून फेकला जाणारा कचरा यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे.

भारताला प्रथमच नाट्य ऑलिम्पिकचे यजमानपद

 • भारताला प्रथमच नाट्य ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले असून १७ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०१८ दरम्यान आठव्या नाट्य ऑलिम्पिकचे भारतात आयोजन केले जाणार आहे.
 • यादरम्यान देशातील १५ शहरांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ठ ५०० नाट्य कलाकृतींचा आस्वाद घेता येईल.
 • १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये या नाट्य ऑलिम्पिकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन होईल. तर ८ एप्रिलच्या मुंबईतील समारोपाला देशाचे नवे राष्ट्रपती उपस्थित असतील.
 • या नाट्यमहोत्सवामध्ये ५०० नाटकांबरोबर सुमारे ७०० कलाकृतींचे प्रयोग केले जातील. तसेच यात देशातील १५०, तर जगातील ५० नाट्यसमूहांचा (थिएटर ग्रूप्स) सहभाग असेल.
 • क्रीडा क्षेत्रातील ऑलिम्पिकच्या धर्तीवर नाट्य ऑलिम्पिकची संकल्पना १९९३मध्ये ग्रीसमध्ये मांडण्यात आली.
आजपर्यंतची नाट्य ऑलिम्पिक
पहिले १९९५ ग्रीस
दुसरे १९९९ जपान
तिसरे २००१ रशिया
चौथे २००६ इस्तंबूल
पाचवे २०१० सोल, दक्षिण कोरिया
सहावे २०१४ बीजिंग
सातवे २०१६ वॉर्सा, पोलंड
आठवे २०१८ भारत

प्रख्यात सारंगी वादक पंडित ध्रुव घोष यांचे निधन

 • प्रख्यात सारंगी वादक पंडित ध्रुव घोष यांचे १० जुलै रोजी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.
 • घोष हे संगीत महाभारतीचे संस्थापक पंडित निखिल घोष यांचे सुपुत्र आणि तबलावादक पंडित नयन घोष यांचे धाकटे बंधू होते.
 • घोष यांनी देशभरात एकल सारंगीवादक म्हणून स्थान मिळवले. त्यांचे सारंगी वादन भारताबाहेरही आवडीने ऐकले जात. त्यामुळे भारतात आणि युरोपात त्यांचे सतत कार्यक्रम होत असत.
 • भारतीय विद्या भवनाच्या संगीत नर्तन विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
 • मध्य प्रदेश सरकारतर्फे त्यांना सारंगीवादक उस्ताद अब्दुल लतीफ खान यांच्या नावाचा पुरस्कारही मिळाला होता.

बैजू पाटील यांना जपानचा ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार

 • वन्यजीव छायाचित्रणात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जपानचा ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार एखाद्या भारतीय व्यक्तीला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘मायक्रो वर्ल्ड’ कॅटॅगरीमधील हा पुरस्कार आहे.
 • जपानमधील टोकियो येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या एका सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल.
 • बैजू यांनी गोव्यात काढलेल्या ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ची आशियातील ८,५०० छायाचित्रांतून ‘हायली ऑनर्ड’ प्रकारात निवड झाली.
 • या बेडकाचा रंग पूर्णपणे हिरवा असून एखादा कोळी (स्पायडर) झाडांच्या पानांवर जसा फिरतो त्याप्रमाणेच हा बेडूक फिरत असतो.
 • ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ हा केवळ कोकण आणि गोव्यातच आढळतो. त्याचे छायाचित्र काढण्यासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे.
 • बैजू पाटील यांना आतापर्यंत वन्यजीव छायाचित्रणातील ३२ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.

नेपाळ घेणार चीनकडून इंटरनेट सेवा

 • नेपाळने येत्या ऑगस्ट महिन्यापासून चीनकडून इंटरनेट सेवा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या परिसरातील भारताची इंटरनेट सेवेबाबतची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे.
 • नेपाळ सध्या भारताकडून पुरवण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवेवर अवलंबून आहे. भैरहवा, बिरगुंज आणि बिराटनगर या भागातून टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून ही इंटरनेट सेवा पुरवली जाते.
 • चीनकडून हिमालयाच्या परिसरातून नेपाळपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला नेपाळमध्ये चीनी इंटरनेट सेवा सुरू होईल.
 • ही इंटरनेट सेवा चीनच्या मुख्य भागातून न पुरवता हाँगकाँगमधून पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे नेपाळमधील लोकांना गुगल आणि फेसबुकचा वापर करता येईल.
 • चीन ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून नेपाळला जोडला गेल्याने दक्षिण आशियाई परिसरातील भारताच्या वर्चस्वाला काही प्रमाणात धक्का बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा