चालू घडामोडी : १२ जुलै

एनडीआरएफच्या महासंचालकपदी संजय कुमार

 • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच ‘एनडीआरएफ’च्या महासंचालकपदी हरियाणाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांची निवड करण्यात आली आहे.
 • या दलाचे आधीचे प्रमुख आर के पचनंदा यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या (आयटीबीपी) प्रमुखपदी निवड झाल्यामुळे त्यांची जागा आता संजय कुमार घेतील.
 • भारतीय पोलीस सेवेच्या १९८५च्या तुकडीतील हरियाणा केडरचे अधिकारी असलेल्या संजय कुमार यांनी राज्यात विविध पदे भूषविली आहेत.
 • कुलू येथे पोलीस अधीक्षक, सिमला परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अशा पदांवर काम केल्यानंतर त्यांना केंद्रात पाठवण्यात आले. काही काळ ते केंद्रीय राखीव पोलीस दलात होते.
 • रेल्वे मंत्रालयात मुख्य दक्षता अधिकारी या पदावर असताना रेल्वेचे एजंट आणि काही कर्मचाऱ्यांचे साटेलोटे उघडकीस आणून कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई त्यांनी केली होती.
 • अपर पोलीस महासंचालक असताना राज्याची सर्व पोलीस ठाणी ऑनलाइन व्हावीत यासाठी त्यांनी गृह मंत्रालयातून विशेष निधी मंजूर करवून आणला होता.
 • पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, पासपोर्टसाठी लागणारा पोलीस पडताळणी अहवाल ऑनलाइन पाठवणे यांसारखे विधायक उपक्रम राज्यात त्यांनी राबवल्याने जनतेत ते लोकप्रिय बनले.
 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) 
 • आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार २००६मध्ये ‘एनडीआरएफ’ची स्थापना करण्यात आली.
 • देशात अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला तातडीने धावून जाणे हे या दलाचे प्रमुख कार्य आहे.
 • विविध राज्यांत या दलाच्या १२ बटालियन्स कार्यरत असून आजमितीस १३ हजार जवान यात कार्यरत आहेत.
 • नैसर्गिक आपत्तींबरोबर जैविक वा रासायनिकअस्त्रांचा हल्ला झाला तरी त्यास समर्थपणे तोंड देता यावे याचे दलातील जवानांना प्रशिक्षण दिलेले असते.

बांगलादेशची चीनकडून पाणबुड्यांची खरेदी

 • भारताचा जवळचा सहकारी बांगलादेशने चीनकडून २०.३० कोटी अमेरिकन डॉलर्सना दोन पाणबुडया विकत घेतल्या आहेत.
 • बांगलादेश नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी या दोन पाणबुडया विकत घेतल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले.
 • ०३५जी मिंग क्लासच्या या पाणबुडया आहेत. बीएन नबाजत्रा आणि बीएन आग्राजत्रा अशी या पाणबुडयांना नावे देण्यात आली आहेत.
 • २०१३मध्ये बांगलादेशने रशियाकडून युध्दसामग्री खरेदी करार केला. त्यावेळी शेख हसीना यांनी चीनकडून पाणबुडया विकत घेण्याची योजना जाहीर केली होती.
 • सध्या सिक्कीम सीमेवरुन भारत आणि चीनमध्ये संबंध ताणले गेले आहेत. अशावेळी बांगलादेश चीनच्या जवळ जाणे भारताला परवडणारे नाही.

इसिसविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्सला आर्थिक मदत

 • इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्स या देशास सुमारे ५ लाख डॉलर्स म्हणजे ३.२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
 • भारताने एखाद्या देशाला दहशतवादी संघटनेशी लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • फिलिपीन्सची राजधानी असलेल्या मनिला शहराच्या दक्षिणेस असलेल्या मिंदानाओ प्रांतामध्ये इसिसशी फिलिपिनो सैन्य लढत आहे.
 • या लढाईमध्ये आत्तापर्यंत फिलिपिनो सैन्यामधील किमान ९० सैनिक व ३८० दहशतवादी ठार झाले आहेत. याशिवाय बऱ्याच नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे.
 • ही लढाई अद्याप सुरु असून दहशतवाद्यांच्या तावडीत शेकडो नागरिक असल्याचे आढळून आले आहे.
 • फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी मिंदानाओ प्रांतात गेल्या ६० दिवसांपासून मार्शल कायदा लागू केला आहे.
 • केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि फिलिपिन्सचे परराष्ट्र मंत्री अॅलन पीटर सायटानो यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर भारताकडून ही मदत देण्यात आली आहे.

सुनील छेत्री आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर

 • भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर झळकला आहे. हा मान मिळणारा तो भारताचा पहिलाच फुटबॉलपटू आहे.
 • आशियाई फुटबॉल महासंघातर्फे प्रकाशित होत असलेल्या या त्रैमासिकात स्टार खेळाडू, मार्गदर्शक, क्लब तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत असतात.
 • आशियाई फुटबॉलमध्ये त्यास खूपच महत्त्व आहे. या त्रैमासिकाच्या १९व्या अंकाच्या मुखपृष्ठावर छेत्रीचे छायाचित्र झळकले आहे. 
 • छेत्री हा बंगळूर एफसीचा प्रमुख खेळाडू आहे. छेत्रीवरील लेखात त्याचे बालपण, त्याला लहानपणासून असलेली फुटबॉलची आवड, यावर भर आहे.
 • छेत्रीचे वडील लष्कर फुटबॉल संघात होते, तर त्याची आई नेपाळकडून फुटबॉल खेळली आहे.
 • त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल पाकिस्तानविरुद्ध २००५मध्ये केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा