रेल्वे प्रवाशांचा समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेकडून ‘रेल सारथी’ (Rail Saarthi) मोबाईल अॅप रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते १४ जुलै रोजी लॉंच करण्यात आले.
याआधी एखाद्या प्रवाशाला रेल्वेसंबंधी तक्रार करायची असल्यास अनेक अडचणी येत होत्या. तसेच, तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते, यासंदर्भात प्रश्न उपस्थित होत होते.
मात्र आता रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांच्या रेल्वे प्रवासासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहे.
या मोबाईल अॅपवरुन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकिट बुकींगही करता येणार आहे. तसेच या अॅपच्या माध्यमातून विमानाचे तिकीटही बुक करता येणार आहे.
प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांची ऑर्डर, रेल्वेचे टाईम टेबल आणि विशेष म्हणजे रेल्वेचे लोकेशन सुद्धा या अॅपमधून पाहता येणार आहे.
रेल्वेच्या आगमन आणि प्रस्थानाची वेळ, प्लॅटफॉर्म नंबर, ट्रेनला होणारा उशीर, रद्द गाड्या, आसन व्यवस्था यांची माहितीही मिळणार आहे.
त्याचबरोबर या अॅपमध्ये महिला सुरक्षा, तक्रार आणि सूचना नोंदवण्याचीही सोय आहे.
यासोबतच या अॅपवरून टॅक्सी, पोर्टस सर्व्हिस, रिटायरिंग रूम हॉटेल, टूर पॅकेज, ई कॅटरिंग आदींचे बुकिंग करता येणार आहे.
भारतीय रेल्वे या सेवा, संबंधित आस्थापनांशी मिळकत वाटणीच्या मॉडेलच्या आधारावर उपलब्ध करून देईल.
त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून रेल्वेला दरवर्षी किमान १०० कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.
डॉ. मुरली बनावत यांना ब्रिक्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार
सौरऊर्जेच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे तेलंगणचे वैज्ञानिक डॉ. मुरली बनावत यांना ब्रिक्स देशांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.
हैदराबाद विद्यापीठात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी सौरऊर्जेवर संशोधन केले आहे.
मूळचे तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यातील असलेल्या बनावत यांनी फोटोव्होल्टॅइक सोलर सेलवर (प्रकाशीय सौर विद्युतघट) संशोधन केले आहे.
त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून बीएस्सी तर हैदराबाद विद्यापीठातून एमएस्सी पदवी घेतली. नंतर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून फोटोव्होल्टॅइक सेलवर पीएचडी केली.
त्यांचे शोधनिबंध अनेक नामांकित नियतकालिकांत प्रसिद्ध झाले असून फ्रंटियर्स इन ऑप्टिक्स अँड फोटॉनिक्स, फ्रंटिटर इन फिजिक्स या नियतकालिकांचे ते संपादकही आहेत.
त्यांनी काही काळ सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन करताना सौरऊर्जा साठवण्यासाठी नवीन रासायनिक घटकांचा शोध घेतला आहे.
फोटोव्होल्टॅइक सेलसाठी सेंद्रिय व पेरोव्हस्काइट पदार्थ किफायतशीर ठरतात, ही गोष्ट त्यांनी प्रथम प्रयोगानिशी दाखवून दिली.
सौरऊर्जा हा प्रदूषणविरहित स्रोत असला, तरी त्याच्या साठवणुकीत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
त्यासाठी पेरोव्हस्काइटचा वापर केलेले स्वस्त व वापरण्यास सोपे विद्युत घट त्यांनी तयार केले आहेत.
सौरऊर्जा साठवणीसाठी नवनवीन रासायनिक पदार्थ विकसित करण्यात त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे.
सौरघटाच्या निर्मितीत डॉ. मुरली यांनी मोठे काम केले असून त्याचा फायदा केवळ भारतालाच नव्हे तर ब्रिक्स देशांनाही होणार आहे.
गर्बाइन मुगुरुझाला विम्बल्डनचे विजेतेपद
स्पेनची महिला टेनिसपटू गर्बाइन मुगुरुझाने अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सला नमवून विम्बल्डनच्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.
मुगुरुझाने ७-५, ६-० असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. तिचे कारकिर्दीतील हे पहिलेचे विम्बल्डनचे जेतेपद आहे.
मुगुरुझाने कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँण्डस्लॅम विजेतेपद आहे. २०१६मध्ये तिने सेरेना विल्यम्सला हरवून फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.
कारकिर्दीत दुसऱ्यांदा विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुगुरुझाला याआधी २०१५साली सेरेना विलियम्सविरुद्ध पराभव झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
गर्बाइन मुगुरुझाच्या रूपाने २३ वर्षांनंतर प्रथमच स्पेनच्या खेळाडूला विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावण्यात यश आले.
याआधी मुगुरुझाची विद्यमान प्रशिक्षक कोंचिटा मार्टिनेज यांनी १९९४मध्ये मार्टिना नवरातिलोवाला नमवून विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनच्या पहिल्या महिला खेळाडूचा मान मिळवला होता.
उपविजेत्या व्हीनसने याआधी २०००, २००१, २००५, २००७ आणि २००८ मध्ये पाच वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे.
भारताच्या सुंदरसिंह गुर्जरला सुवर्णपदक
लंडन येथे सुरु असलेल्या आंतराष्ट्रीय पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुंदरसिंह गुर्जरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
भालाफेक प्रकारात सुंदरने ६०.३६ मीटर लांब भाला फेकत श्रीलंकेच्या दिनेश प्रियंथाला मागे टाकत ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
राजस्थानच्या २१ वर्षीय सुंदर सिंगला गेल्यावर्षी रिओ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत उशिरा पोहचल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले होते.
सुंदरने यापूर्वी फेझा आयपीसी ऍथलेटिक्स ग्रा प्रि स्पर्धेत भालाफेक, गोळाफेक आणि थाळीफेक या प्रकारात तीन सुवर्णपदके मिळविली होती.
गडचिरोलीत हिवताप नियंत्रणासाठी कार्यगट स्थापन
गडचिरोली जिल्हय़ातील हिवतापाचा प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठीसर्च फाऊंडेशनचे संस्थापक महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट (टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, सर्च फाऊंडेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ, जबलपूर आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे.
गडचिरोलीत अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा अजूनही पोहोचलेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाने असंख्य आदिवासी मृत्युमुखी पडतात.
शासनाच्या या मंजुरीनुसार एकूण नऊ सदस्यीय कार्यगटाच्या अध्यक्षपदी डॉ. अभय बंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मुक्त शालेय शिक्षण मंडळ योजना
महाराष्ट्र राज्य मुक्त शालेय शिक्षण मंडळ स्थापन करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.
शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षांना समकक्ष परीक्षा या मंडळातर्फे घेतल्या जातील. हे प्रस्तावित मंडळ राज्य मंडळाचा भाग राहणार आहे.
शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे व्यवसायिक कौशल्य, व्यवहारिक ज्ञान, गरजा यांचा वेगळा विचार सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत नाही.
त्यामुळे या योजनेद्वारे मुक्त विद्यालयासाठी प्रवेशाच्या पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीसाठी स्वतंत्र पात्रता ठरविण्यात आल्या आहेत.
यामुळे कला, क्रिडा क्षेत्रात रस असणाऱ्या व करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केवळ दहावी व बारावीमध्ये अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन मुक्त विद्यालयाची परीक्षा देता येणार आहे.
या योजनेसाठी राज्य पातळीवर शिक्षण संचालक दर्जाचा अधिकारी प्रमुख राहणार आहे.
इतर अधिकारी व कर्मचारी हे प्रतिनियुक्ती अथवा कंत्राटी तत्वावर नेमण्याचा अधिकार राज्य मंडळास शासन मान्यतेने राहणार आहे.
१५ जुलै: महाराष्ट्र कबड्डी दिन
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचा १५ जुलै हा जन्मदिन संपूर्ण राज्यात ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
अनेकांचा विरोध डावलून, ९ खेळाडूंचा ’हुतुतू’ आणि ७ खेळाडूंचा ’आंतराराष्ट्रीय कबड्डी’ यांचे संमीलन घडवून बुवा साळवी यांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून दिली.
अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्षपद बुवांकडे होते. बुवा साळवी हे महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या कबड्डी संघटनेचे आधारस्तंभ होते.
बुवा साळवींनी केलेल्या प्रयत्नांमुळेत कबड्डीचा १९९०च्या आशियाई खेळांमध्ये समावेश झाला आणि पुढील पाच चतुर्वार्षिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवता आले.
यानंतर भारताच्या बाहेर जपान, पाकिस्तान, आणि बंगला देश यांचे संघही कबड्डी खेळू लागले.
कबड्डीतल्या आपल्या कार्यासाठी बुवांना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र आणि देशभरात बुवा ‘कबड्डी महर्षी’ नावाने ओळखले जायचे.
महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा मानाचा ‘शिवछत्रपती जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सत्कार केला होता. वयाच्या ७५ व्या वर्षी बुवांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा