चालू घडामोडी : २२ जुलै
पंतप्रधान वय वंदना योजना
- ज्येष्ठ नागरिकांसाठी नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान वय वंदना योजनेचा (पीएमव्हीव्हीवाय) २१ जुलै रोजी शुभारंभ केला.
- ही एक नवी निवृत्तिवेतन योजना (पेन्शन प्लान) असून, ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
- ही योजना भारतीय जीवन वीमा अर्थात एलआयसीकडून ऑफलाईन तसेच ऑनलाईनेही खरेदी करता येणार आहे.
- ही योजना १० वर्षाला ८ ते ८.३ टक्के प्रतिवर्ष दराने पेन्शन सुनिश्चित करते. तसेच या योजनेला सेवा कर आणि जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
- १० वर्षाच्या या योजनेअंतर्गत मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक कालावधीत पेन्शन मिळू शकणार आहे.
- ही पेन्शन फक्त पुढील १० वर्षांकरिता गॅरेटेंड मिळणार असून, ही पेन्शन स्कीम ४ मे २०१७ ते ३ मे २०१८ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध आहे.
- आठ टक्क्यांचा घोषित व्याजदर आणि ‘एलआयसी’ला प्रत्यक्षात देता येणारा व्याजदर यांच्यातील फरकाची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे.
- व्याजदरांची घसरण चालू असताना ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय देणारी असू शकते.
- दहा वर्षांच्या कालावधी संपताना विमाधारकाला संपूर्ण रक्कम व निवृत्तिवेतनाचा शेवटचा हफ्ता मिळेल.
- या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शन खरेदीची पूर्ण रक्कम कुठलीही वजावट न करता लाभार्थ्यांने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळेल.
- पेन्शन चालू असताना पैशांची गरज लागल्यास तीन वर्षांनंतर पेन्शन खरेदीच्या ७५ टक्के इतकी रक्कम कर्ज मिळू शकते अर्थात त्याकरिता लागू असलेला व्याजदर द्यावा लागेल.
- याशिवाय मुदतीआधीही या योजनेतून बाहेर पडता येऊ शकते. त्या स्थितीमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या ९८ टक्के रक्कम परत मिळेल.
- या योजनेत पूर्ण कुटुंबाकरिता पेन्शन खरेदीची कमाल मर्यादा ७.५० लाख रुपये ही आहे. यात पती/पत्नी (ज्येष्ठ नागरिक) व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश आहे.
- थोडक्यात एकाच कुटुंबात पती-पत्नी दोघांना पेन्शन पाहिजे असेल पती ३.५० लाख तर पत्नी ४ लाख रुपये गुंतवू शकते.
- दरमहा १ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी १.५० लाख, तर ५ हजार रुपये मिळविण्यासाठी ७.५० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.
डॉ. डॉगबी ख्रिस न्यान यांना आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार
- इबोला, झिका यांसारख्या नवीन विषाणुजन्य रोगांचे संशोधन करणारे डॉ. डॉगबी ख्रिस न्यान यांना प्रतिष्ठेचा आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.
- त्यांनी वेगवेगळ्या रोगांचे विषाणू शोधून निदान करण्याच्या शोधलेल्या चाचणीसाठी त्यांना आफ्रिकेचा हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार देण्यात आला.
- त्यांच्या या चाचणीद्वारे अवघ्या एक तासात विषाणू कुठल्या रोगाचा आहे ते समजते. ही चाचणी सोपी व कमी खर्चीक आहे.
- आफ्रिकेसारख्या अप्रगत देशांतील दूरस्थ भागातील लोकांसाठी या चाचणीचा वापर केला जात आहे.
- त्यांच्या या विषाणूशोधन चाचणीचा व्यावसायिक वापर सुरू होईल, तेव्हा ती रोगनिदानातील मोठी क्रांती असेल.
- बर्लिनमधील हुम्बोल्ट विद्यापीठातून न्यान यांनी वैद्यक शाखेची पदवी घेतली. नंतर ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ या संस्थेतून त्यांनी वैज्ञानिक म्हणून प्रशिक्षण घेतले. संसर्गजन्य रोगातील निदानात ते निष्णात मानले जातात.
- रक्तातील संसर्गातून एचआयव्ही, हेपॅटिटिस बी, हेपॅटिटिस सी, हेपॅटिटिस इ, डेंग्यूचा विषाणू, नाईल विषाणू, चिकुनगुनिया विषाणू पसरतात. ते सगळे विषाणू ओळखण्याची एकच सर्वसमावेशक चाचणी त्यांनी शोधून काढली.
- त्यांनी हेपॅटिटिस बी विषाणूच्या निदानावर केलेले संशोधन ‘क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीजेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
- लायबेरियात इबोलाचा उद्रेक झाला तेव्हा तेथील इबोला आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे ते प्रमुख होते.
- आफ्रिकन इनोव्हेशन फाऊंडेशनद्वारे आफ्रिकेतील नवप्रवर्तक संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार देण्यात येतो.
- स्वित्झर्लंडमधील दानशूर उद्योजक जीन क्लॉद बॅस्टॉस द मोराइस यांनी आफ्रिकन इनोव्हेशन फाऊंडेशनची स्थापना केली.
संजय कोठारी नव्या राष्ट्रपतींचे सचिव
- देशाचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव म्हणून ‘पब्लिक एंटरप्रायजेस सिलेक्शन बोर्डा’चे अध्यक्ष संजय कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांच्याकडे माध्यम सचिवपदाची तर वनसेवेतील गुजरात केडरचे ज्येष्ठ अधिकारी भारत लाल यांना संयुक्त सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने पुढील दोन वर्षांसाठी या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे.
- कोठारी हे १९७८च्या आयएएस बॅचचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी राज्य आणि केंद्रीय पातळीवरदेखील विविध पदांवर काम केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा