राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राजकारणाचा २५ वर्षांचा अनुभव असलेले नायडू सध्या केंद्र सरकारमध्ये नगरविकास व माहिती प्रसारण मंत्री आहेत. वाजपेयींच्या काळात त्यांनी ग्रामविकास खात्याची धुरा सांभाळली होती.
नायडू प्रथम १९७८ आणि १९८३ साली आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. १९९३मध्ये भाजपचे सरचिटणीस झाले.
नायडू यांनी आतापर्यंत गृह, अर्थ, कृषी, संसदीय कामकाज तसेच परराष्ट्र व्यवहार या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे.
काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’कडून यापूर्वीच महात्मा गांधी यांचे नातू व माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांना काँग्रेससह १८ इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्टला होणार आहे. त्याच दिवशी मतदान होईल आणि त्याचदिवशी मतमोजणीही केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै आहे.
देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या १० ऑगस्ट रोजी संपणार आहे.
फेडररचे विश्वविक्रमी आठवे विम्बल्डन जेतेपद
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मरिन चिलिचवर सहज मात करत विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेच्या ऐतिहासिक जेतेपदावर नाव कोरले.
अकराव्यांदा विंबल्डनची अंतिम फेरी गाठणाऱ्या फेडररने अंतिम फेरीत चिलिचचा ६-३, ६-१, ६-४ असा तीन सरळ सेटमध्ये पराभव केला.
३५ वर्षे आणि ३४३ दिवस वय असलेला फेडरर विम्बल्डन जेतेपद जिंकणारा वयस्कर खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९७६मध्ये आर्थर ऍश यांनी वयाच्या ३२व्या वर्षी विम्बल्डन विजेतेपद मिळविले होते.
विम्बल्डन पुरुष एकेरीचे हे रॉजर फेडररचे आठवे जेतेपद आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.
फेडररने याआधी २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९ आणि २०१२मध्ये विम्बल्डन जेतेपद पटकावले होते. त्याने विल्यम रेनशॉ आणि पीट सॅम्प्रस यांचा ७ जेतेपदांचा विक्रम मोडला आहे.
पुरुष एकेरीत सर्वाधिक १९ ग्रँड स्लॅम जेतेपद फेडररच्या नावावर आहेत. यानंतर स्पेनच्या राफेल नदालच्या नावावर १५ ग्रँडस्लॅमची नोंद आहे.
एकही सेट न गमावता विम्बल्डन जेतेपद पटकावणारा तो ब्योन बोर्गनंतर तो पहिला खेळाडू ठरला. बोर्ग यांनी ४१ वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती.
एका ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आठ वेळा जेतेपद पटकावणारा फेडरर हा दुसरा खेळाडू आहे. राफेल नदालने फ्रेंच खुली स्पर्धा १० वेळा जिंकली आहे.
याशिवाय २९वा ग्रँडस्लॅम अंतिम सामना खेळणारा फेडरर हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यानंतर नदालने २२ तर सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचच्या २१ ग्रँडस्लॅम अंतिम सामने खेळले आहेत.
पंचगव्याच्या अभ्यासासाठी समिती
गाईपासून मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थापासून कोणते फायदे होतात याचा शास्त्रीय आधाराने अभ्यास करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या सदस्यांचा समावेश आहे.
दिल्ली येथील विज्ञान भारतीचे अध्यक्ष विजय भटकर हे या समितीचे सहअध्यक्ष आहेत.
सीएसआयआरचे माजी संचालक रघुनाथ माशेलकर, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा. रामगोपाल राव व आयआयटीच्या ‘सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी’ या संस्थेचे प्रा. व्ही के विजय यांचा समितीत समावेश आहे.
तसेच विज्ञान भारतीचे सरचिटणीस ए जयकुमार व नागपूरच्या गो विज्ञान अनुसंधान केंद्राचे सुनील मानसिंघका हे देखील या समितीत सदस्य आहेत.
‘सायंटिफिक व्हॅलिडेशन अँड रिसर्च ऑन पंचगव्य’ असे या प्रकल्पाचे नाव असून, गाईपासून मिळणाऱ्या पदार्थाबाबत वैज्ञानिक संशोधनावर आधारित फायद्यांची माहिती ही समिती गोळा करणार आहे.
गाईपासून मिळणाऱ्या पदार्थाचा वापर पोषण, आरोग्य व कृषी क्षेत्रात कशा प्रकारे होतो व त्याला वैज्ञानिक आधार काय आहे हे सांगण्याचे काम समिती करणार आहे.
गाईचे शेण, मूत्र, गाईचे दूध, दही व तूप यांच्या मिश्रणास पंचगव्य म्हणतात. त्याचे जे लाभ आहेत त्यांना वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न यात केला जाईल.
महिंद्रा अँड महिंद्राचे अमेरिकेत उत्पादन केंद्र
देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच अमेरिकेत पहिले उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.
त्यामुळे अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी महिंद्रा अँड महिंद्रा पहिलीच भारतीय कंपनी ठरणार आहे.
अमेरिकेचा समावेश जगातील महत्त्वाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठांमध्ये होत असल्याने या देशात विस्तार करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
महिंद्रा अँड महिंद्राने अमेरिकेत १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे आणि ते वर्षभरात डेट्रॉयटमध्ये उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.
कंपनीच्या या उत्पादन केंद्रामुळे ३ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. पुढील २-३ वर्षांमध्ये हा आकडा दुप्पट करण्याची कंपनीची योजना आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा