चालू घडामोडी : २८ जुलै

ज्येष्ठ उद्योजक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन

  • महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनीचे (महिको) संस्थापक आणि मराठवाड्यातील ज्येष्ठ उद्योजक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे २४ जुलै रोजी वयाच्या ८२व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
  • बारवाले यांचा जन्म २७ ऑगस्ट १९३०मध्ये हिंगोली येथे झाला. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात भाग घेतला.
  • १९४७-४८ सालात स्वतंत्र भारतात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. अन्नधान्याचा हा तुटवडा बारवाले यांना ध्येयाकडे घेऊन गेला.
  • बारवाले यांनी महिकोच्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत कृषी क्रांती घडवून आणली.
  • याशिवाय त्यांच्या या कार्यामुळे बियाणे उद्योग हे एक वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रच खासगी उद्योग क्षेत्राला मिळाले. त्यातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
  • या बियाणांचा शोध लावल्यानंतर त्याचे देशभर वितरण, ते साठवण्याची सुविधा अशा पूरक व्यवसायांचाही विस्तार झाला. त्याबरोबरच कृषी क्षेत्रात क्रांती झाली.
  • बारवाले यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कपाशीच्या ‘बीटी’ वाणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य ‘मॉन्सेन्टो’ या सीड कंपनीने महिकोची निवड केली.
  • त्याच्या अतुलनिय कामगिरीबद्दल २००१साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्काराने सन्मान केला होता.
  • तसेच १९९८साली त्यांना वर्ल्ड फूड प्राईज फाऊंडेशन अमेरीका यांच्याकडून ‘वर्ल्ड फूड प्राईज’ या किताबाने गौरवण्यात आले होते.

नवाझ शरीफ पंतप्रधान पदावरून पायउतार

  • पनामा पेपर्स प्रकरणात, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरवले.
  • शरीफ यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला दाखल करण्यात यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
  • या निर्णयानंतर नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून, आता पंतप्रधानपदी कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • पंतप्रधानपदासाठी नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ यांचे नाव आघाडीवर आहे. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत.
  • याशिवाय पाकमध्ये लष्कराचे मोठे वजन असल्यामुळे, आता निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा लष्कराकडून फायदा घेतला जाण्याची शक्यता आहे.
 पार्श्वभूमी 
  • पनामा पेपर्सप्रकरणात तेहरिक ए इन्साफसोबतच काही विरोधी पक्षांनी नवाझ शरीफ यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
  • त्याच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने सहा सदस्यीय संयुक्त समिती स्थापन केली होती. १० जुलै रोजी या समितीने अहवाल सादर केला होता.
  • या अहवालात नवाझ शरीफ यांनी पैशाचा गैरवापर करत लंडनमध्ये बेनामी संपत्ती जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
  • या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने एकमताने शरीफ यांना दोषी ठरवत ते पंतप्रधानपदासाठी अपात्र असल्याचा निर्णय दिला.
  • ‘गॉडफादर’ आणि ‘पंजाबचे सिंह’ म्हणून ओळखले जाणाऱ्या शरीफ यांची राजकीय कारकीर्द यामुळे पणास लागली आहे.
  • न्यायालयाने शरीफ यांच्यासह मुले हसन, हुसैन, मरियम यांनाही दोषी ठरवले असून त्यांच्याविरोधात दाखल प्रकरणांची चौकशी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो अर्थात ‘नॅब’कडे सोपवली आहे.
  • सुनावणी सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या प्रकरणी निकाल द्यावा, असे आदेशही नॅबला देण्यात आले आहेत.
 अपूर्ण कालावधीचा इतिहास 
  • सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवाज शरीफ हे तिसऱ्यांदा आपला पंतप्रधानपदाचा कालावधी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.
  • सर्वाधिक वेळा पंतप्रधानपदावर येऊनही सर्वप्रथम देशाचे अध्यक्ष, मग लष्करी राजवट आणि आता न्यायसंस्था यांच्या कारवाईमुळे त्यांना पद सोडावे लागले.
  • नवाज शरीफ हे पाकिस्तानमधील राजकारणात सर्वांत प्रभावी असलेल्या शरीफ कुटुंबाचे आणि सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख आहेत.
  • १९९० ते १९९३ या काळात सर्वप्रथम पाकिस्तानचे पंतप्रधान बनले होते. या काळात देशाचे अध्यक्ष गुलाम इशाक खान यांच्याशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. 
  • खान यांनी आपले अधिकार वापरत संसदच बरखास्त केली. त्यामुळे लष्कराच्या दबावाखाली येत शरीफ यांना राजीनामा द्यावा लागला.
  • त्यानंतर १९९७ला ते पुन्हा या पदावर निवडून आले. मात्र, १९९९मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी बंड करत शरीफ यांना पदावरून हटविले.
  • पाकिस्तानमधील लष्करशाही जाऊन राजकीय स्थैर्य निर्माण झाल्यानंतर ५ जून २०१३ला शरीफ पुन्हा पंतप्रधान झाले.
  • यंदा ते कार्यकाळ पूर्ण करण्याची शक्यता असतानाच पनामा पेपर्स प्रकरण उद्भवले आणि या प्रकरणातच त्यांच्या या कादकिर्दीचा अंत झाला.
  • पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानांना आतापर्यंत आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.
  • त्यांना लष्कराचे बंड, न्यायालयाचे आदेश, पक्षातून हकालपट्टी अथवा हत्या या कारणांमुळे पंतप्रधानांचा कार्यकाळ कायम अपूर्णच राहिला आहे.
 न्यायालयाने अपात्र ठरविले दुसरे पंतप्रधान 
  • पाकिस्तानच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा पंतप्रधानांना पदासाठी अपात्र ठरविले आहे.
  • यापूर्वी २०१२मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने युसूफ रझा गिलानी यांना अपात्र ठरविले होते.
  • तत्कालीन अध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्याचे न्यायालयाचे आदेश मानण्यास गिलानी यांनी नकार दिला होता.

ॲक्सिस बँकेत शिखा शर्मा यांची पुनर्नियुक्ती

  • ॲक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली.
  • शर्मा यांची या पदावरील सध्याची मुदत जून २०१८मध्ये संपत आहे. त्यानंतर आणखी तीन वर्षांसाठी त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला.
  • नियामक संस्थांच्या संमतीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ही फेरनियुक्ती लागू होईल.
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल विमा कंपनीतून आठ वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत आल्यापासून शर्मा तेथे या पदावर आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा