भारत, अमेरिका आणि जपान नौदलाच्या ‘मलबार २०१७’ या युद्धाभ्यासाला बंगालच्या उपसागरात १० जुलैपासून सुरुवात झाली आहे.
मलबार युद्धाभ्यासात १६ युद्धनौका, ९५ लढाऊ विमानांसह २ पाणबुड्यांचा सहभाग आहे. हा युद्धाभ्यास १७ जुलैपर्यंत चालणार आहे.
१९९२पासून भारत आणि अमेरिका बंगालच्या उपसागरात दरवर्षी मलबार नाविक सरावाचे आयोजन करत आहे.
या सरावाचे हे २१ वे पर्व असून, तिन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात येते.
या सरावात जपानच्या मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सने सलग चौथ्या वर्षी सहभाग घेतला आहे.
एकमेकांच्या सहकार्याने टेहेळणी, बचाव आणि हल्ला यांचा सराव या वेळी केला जाणार आहे. याशिवाय, वैद्यकीय मदत, शस्त्रसाठा पुरविणे, हेलिकॉप्टर कारवाई यांचा सरावही केला जाणार आहे.
या युद्धसरावात भारतीय नौदलात २०१३मध्ये समावेश करण्यात आलेल्या आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवरील प्रात्यक्षिकाचे विशेष आकर्षण असणार आहे.
तसेच अमेरिकेकडून १ लाख टन वजनी एअरक्राफ्टची वाहतूक करु शकणारी युएसएस निमित्ज ही महत्त्वाची युद्धनौका युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे.
आण्विक ऊर्जेवर चालणारी ही युद्धनौका एफए-१८ या फायटर जेट्स विमानांनी सज्ज आहे.
तर जपानकडून २७ हजार टन वजनी हेलिकॉप्टर कॅरिअर इझुमो या सरावात सहभागी असेल. याशिवाय जेएस साजानामी या जहाजाचाही सहभाग असेल.
गेल्या तीन आठवड्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सिक्किम सीमेजवळील डोक्लाम भागात जोरदार खडाजंगी सुरु आहे.
भारत आणि चीनमधील या ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका आणि जपानच्या या संयुक्त युद्धाभ्यासाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
२००७मध्ये भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरने मलबार युद्धाभ्यासात सहभाग घेतला होता. त्यावेळी चीनने याचा तीव्र विरोधदेखील दर्शवला होता.
अहमदाबाद भारतातील पहिले जागतिक वारसा शहर
युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.
युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज सिटी हा दर्जा मिळवणारे अहमदाबाद भारतातील पहिले शहर ठरले आहे.
पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात झालेल्या युनेस्कोच्या ४१व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा शहर निवड प्रक्रियेसाठी भारतातून दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद शहरांचा समावेश करण्यात आला होता.
अहमदाबादला जागतिक वारसा शहर घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला तुर्की, लेबनान, ट्युनिशिया, पेरू, कजाखस्तान, फिनलँड, झिम्बाब्वे आणि पोलंडसह २० देशांनी पाठिंबा दिला.
बादशहा अहमद शहा याने सहाशे वर्षांपूर्वी अहमदाबाद शहराची बांधणी केली होती. या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.
अहमदाबादचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन हा दर्जा देण्यात आला आहे. आता अहमदाबादला आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्किटेक्ट टेक्नोलॉजिकल मदत मिळणार आहे.
कांकरिया झील, हठीसिंह जैन मंदिर, जामा मशीद, राणी सिपरी मशीद, साबरमती आश्रम, केलीको संग्रहालय या सारख्या वास्तूंनी हे शहर पर्यटन समृद्ध आहे.
अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे.
अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची २६ सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या आठवणींवर प्रकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत.
युनेस्को: संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था
स्वयंप्रभा डिजिटल योजनेचा शुभारंभ
इयत्ता नववी ते पीएचडीपर्यंतचे दर्जेदार शिक्षण देशातील कोणालाही घरबसल्या उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्वयंप्रभा डिजिटल योजनेची’ अनोखी व क्रातिकारी भेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुपौर्णिमेनिमित्त देशाला दिली.
देशभरातील विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये असलेले सुमारे ७२ लाख ग्रंथांचे ज्ञानभांडार जनतेसाठी खुल्या करणाऱ्या या योजनेचे लोकार्पण ९ जुलै रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रपतिपदावरून पायउतार होण्यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी प्रणव मुखर्जींचा शिक्षण क्षेत्राशी संबंधित हा अखेरचा कार्यक्रम होता.
‘डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन’ या राष्ट्रीय योजनेत स्वयं, स्वयंप्रभा डिजिटल प्लॅटफॉर्म, नॅशनल डिजिटल लायब्ररी आणि नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे.
एसबीआयकडून नेपाळमध्ये ‘डिजिटल व्हिलेज’
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ‘डिजिटल व्हिलेज’ उपक्रमांतर्गत नेपाळमधील काठमांडूपासून पूर्वेला २५ किमी अंतरावर असलेल्या जारीसिंगपौवा या गावाचा कायापालट केला आहे.
एसबीआयच्या नेपाळमधील सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या गावात डिजिटल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या गावात पैसे काढणे व भरण्यासाठी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे. या गावातील नागरिकांना ४३० डेबिट कार्डचे वितरण करण्यात आले आहे.
हे गाव डोंगराळ भागात असल्याने काठमांडूपासून नजीक असूनही त्याचा फारसा अन्य भागाशी संपर्क नाही.
त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येत होत्या. डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
अमरनाथ यात्रेला निघालेल्या बसवर दहशतवादी हल्ला
दहशतवाद्यांनी १० जुलैच्या रात्री रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केला.
या हल्ल्यात ७ भाविक मरण पावले असून, ३ पोलिसांसह ३२ जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये ५ महिला यात्रेकरूंचा समावेश आहेत.
ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती.
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी ७ नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने या नियमाचे उल्लंघन केले.
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिला होता. त्यानुसार सुरक्षाही वाढविण्यात आली होती.
टेहळणीसाठी ड्रोनचही वापर यावेळी करण्यात येत होता. मात्र त्यानंतरही हल्ला झाल्यानंतर सुरक्षेतील त्रुटी पुढे आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा