जर्मनीतील हॅम्बर्ग येथे ७ व ८ जुलै रोजी १२व्या ‘जी-२०’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
‘परस्परसंबंध असलेल्या जगाची मांडणी’ (Shaping an Inter-connected World) अशी या परिषदेची थीम होती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यप शी जिनपिंग, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासह जगातील अन्य आघाडीचे नेते या परिषदेला उपस्थित होते.
दहशतवादाशी लढा आणि आर्थिक सुधारणा यांशिवाय या परिषदेत मुक्त आणि खुला व्यापार, तापमानवाढ, स्थलांतर, शाश्वत विकास आणि जागतिक स्थैर्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावेळी पॅरिस पर्यावरण करार नाकारणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन जी-२० गटातर्फे करण्यात आले.
परिषदेच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-२० नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला.
मोदींनी यावेळी दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एक अॅक्शन प्लान जगासमोर ठेवत १० मोठ्या योजनांची घोषणा केली.
तसेच मोदींनी दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात जगातील इतर देशांना एकत्र येण्याचे आवाहनही केले.
आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारत आघाडीवर
ओडीशात सुरु असलेल्या २२व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचे खेळाडू कौतुकास्पद कामगिरी करत आहेत.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत ७ सुवर्ण, ३ रौप्य व १० कांस्य अशी २० पदके मिळवली आहेत आणि पदक तालिकेत प्रथम स्थान राखले आहे.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशच्या सुधा सिंगने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात ९ मिनिटे ५९.४७ सेकंदांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले.
यापूर्वी २००९, २०११ आणि २०१३च्या आशियाई स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
उत्तर कोरियाची हायो ग्योंगने १०:१३.९४ सेकंदासह रौप्य, जर जपानच्या नाना साटोने १०:१८.११ सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक निश्चित केले.
उत्तर कोरियाची हायो ग्योंगने १०:१३.९४ सेकंदासह रौप्य, जर जपानच्या नाना साटोने १०:१८.११ सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक निश्चित केले.
महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भारताच्या अनू राघवन हिने (५७.२२ सेकंद) रौप्यपदक पटकावले.
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळच्या शर्यतीत एमपी जबीरने ५०.२२ सेकंदांची वेळ नोंदवून कांस्यपदक निश्चित केले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या महम्मद अनास व निर्मला शेरॉन यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात ४०० मीटर धावण्याची शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले होते.
त्यापाठोपाठ अजय कुमार व पी यू चित्रा यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात १५०० मीटर धावण्याची शर्यत जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले.
केरळच्या चित्राने १५०० मीटर अंतराची शर्यत ४ मिनिटे १७.९२ सेकंदांत पार करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
तर पुरुषांमध्ये १५०० मीटर अंतर ३ मिनिटे ४५.८५ सेकंदात पूर्ण करीत अजय कुमारने सुवर्णपदक जिंकले. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेतेपद आहे.
महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या संजीवनी जाधवने ५००० मीटर प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले.
अवघ्या २० वर्षांच्या संजीवनीने आपल्या पहिल्याच आंतराष्ट्रीय स्पर्धेत केलेली कामगिरी ही नक्कीच कौतुकास्पद आहे.
गंगा, यमुना ‘जिवंत व्यक्ती’ नाहीत
गंगा आणि यमुना या मोठ्या नद्यांना जिवंत व्यक्तीचा दर्जा देण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
सरन्यायाधीश जे एस खेहर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी उत्तराखंड सरकारने उच्च न्यायालयाच्या विरोधात केलेल्या याचिकेवर वरील स्थगिती दिली.
गंगा नदीच्या तीरावर खाणकाम आणि दगड फोडण्याचे काम केले जाते त्याबद्दल हरिद्वार येथील नागरिक मोहम्मद सलीम यांनी केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता.
गंगा नदीवरील शक्ती कालव्याच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे ७२ तासांत हटविण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने डेहराडूनच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिला होता.
आदेशाचे पालन न केल्यास दंडाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा