देशातील सौर उर्जेवर चालणाऱ्या पहिल्या डीईएमयू (डिझेल इलेक्ट्रॉनिक मल्टिपल युनिट) ट्रेनला १४ जुलै रोजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला.
सध्या दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल. या रेल्वेसाठी अद्याप नवे मार्ग आणि प्रवास भाडे ही ठरवण्यात आलेले नाही.
१६०० हॉर्स पॉवर असलेल्या या ट्रेनमध्ये एकूण १० कोच आहेत. या रेल्वेतील एका कोचमधून ८९ लोक प्रवास करू शकतात.
१० पैकी ८ कोचच्या छतावर १६ सोलर पॅनल बसवलेले आहेत. सौरऊर्जेमुळे या सोलर पॅनलमधून ३०० वॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे.
त्यामुळे कोचमध्ये बसवलेला बॅटरी चार्ज होणार आहे. याद्वारेच या रेल्वेतील सर्व दिवे, पंखे आणि माहिती यंत्रणा चालणार आहे.
या ट्रेनमध्ये पावर बॅकअपची सुविधा असून, एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही रेल्वे ७२ तास बॅटरीवर चालू शकते.
ही रेल्वे चेन्नईतल्या इंटीग्रील कोच फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आली आहे. तर इंडियन रेल्वेज ऑर्गनायजेशन ऑफ अल्टरनेटिव फ्यूअल या संस्थेने यासाठी सोलर पॅनल बनवले आहे.
या सोलर पॅनलची निर्मिती मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत करण्यात आली असून, त्यासाठी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुढील २५ वर्षांची या सोलर सिस्टीमची वॉरंटी असणार आहे.
या रेल्वेच्या निर्मितीसाठी १३.५४ कोटी रूपये इतका खर्च आला आहे. एका प्रवासी कोचची किंमत सुमारे १ कोटी रूपये आहे.
ही रेल्वे प्रत्येक वर्षी २१ हजार लीटर डीझेलची बचत करणार आहे. तसेच दरवर्षी ९ टन कार्बन उत्सर्जनही कमी होणार आहे. त्यामुळे या ट्रेनमुळे प्रदूषणही थांबवण्यास बऱ्याच अंशी मदत होणार आहे.
या रेल्वेच्या माध्यमातून, जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलर पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात आला आहे.
२०१६-१७च्या रेल्वे बजेटमध्येच अशा ट्रेनचा उल्लेख करण्यात आला होता. पुढच्या ६ महिन्यांत असे आणखी २४ कोच वाढवण्यात येणार आहेत.
नोबेलविजेते लेखक लियू शाबो यांचे तुरुंगवासात निधन
चीनच्या नागरिकांना मुलभूत मानवी व लोकशाही हक्क मिळावेत यासाठी लढा देणारे नोबेल शांतता पुरस्कारविजेते ज्येष्ठ लेखक लियू शाबो यांचे १३ जुलै रोजी वयाच्या ६१व्या वर्षी तुरुंगवासातच निधन झाले.
चीन सरकारने सन २००९मध्ये लियू यांना राष्ट्रद्रोहाबद्दल दोषी ठरवून ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.
मुलभूत मानवी हक्क मिळावेत व चीनची एकपक्षीय राजकीय व्यवस्था अधिक खुली व लोकाभिमुख करावी यासाठी ‘चार्टर ०८’ नावाची स्वाक्षरी मोहीम चालविल्याबद्दल त्यांना राष्ट्रद्रोही ठरविले गेले.
तुरुंगात असतानाच त्यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले. मात्र ओस्लो येथे सन २०१०मध्ये झालेल्या नोबेल सोहळ्यात त्यांना सहभागी होता आले नव्हते.
सुमारे महिनाभरापूर्वी लियू शाबो यांना यकृताचा कर्करोग असल्याचे जाहीर करण्यात आले व त्यांची रवानगी रुग्णालयात करण्यात आली. परंतु योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.
लियू शाबो यांना सन २००९मध्ये अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी लिऊ शाबो यांना काही महिन्यांतच त्यांच्या राहत्या घरात स्थानबद्ध करण्यात आले. त्या आजतागायत नजरकैदेतच आहेत.
१९८९मध्ये बीजिंगस्थित तियानानमेन चौकातील ऐतिहासिक लोकशाहवादी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.
जगभर गौरव झालेले परंतु स्वदेशातील छळामुळे तुरुंगातच अखेरचा श्वास घ्यावा लागलेले लियो हे दुसरे नोबेल शांतता पुरस्कारविजेते ठरले आहेत.
याआधी जर्मनीचे शांततावादी कार्ल व्हॉन ओस्सिएत्सी यांचे जुलमी नाझी राजवटीच्या तुरुंगात सन १९३८मध्ये निधन झाले होते.
भारतीय शास्त्रज्ञांकडून दिर्घीकांच्या महासमूहांचा शोध
सुमारे २ कोटी अब्ज सूर्याएवढे वस्तूमान असणाऱ्या ‘सरस्वती’ दिर्घीकांच्या महासमूहांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला आहे.
इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्सतील (आयुका) शास्त्रज्ञ जॉयदीप बागची यांच्या नेतृत्त्वाखाली देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे संशोधन जगासमोर मांडले आहे.
त्यामुळे विश्वाच्या निर्मिती विषयी मांडण्यात आलेल्या खगोलीय घटनांचा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे.
आयुकासह इंडियन इस्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड एज्युकेशन रिसर्च (आयसर), नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) जमशेदपूर व केरळमधील न्यूमन कॉलेजमधील विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांनी ‘सरस्वती’ दिर्घीकांचा शोध लावला आहे.
आयुकाचे शास्त्रज्ञ जॉयदीप बागची यांनी २००२मध्ये दिर्घीकांच्या समूहाविषयीचे संशोधन सुरू केले होते.
मात्र, पुढील काही वर्षात याबाबतची अधिक माहिती समोर आली होती. त्यानंतर देशातील विविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने त्यांनी सलग २-३ वर्षात हे संशोधन पूर्ण केले.
आकाशगंगेमध्ये एवढ्या मोठ्या दिर्घीकांचा समूह असण्याबाबतची माहिती प्रथमच समोर आली आहे. या दिर्घीकांची व्याप्ती ६० कोटी प्रकाशवर्ष एवढी असण्याची शक्यता आहे.
तसेच या दिर्घीकांचा समूह मीन राशीमध्ये असल्याचे शोध प्रबंधात स्पष्ट करण्यात आले आहे. ४३ दिर्घीकांच्या या समूहाला ‘सरस्वती’असे नाव देण्यात आले आहे.
जगात भारतीय जनतेचा सरकारवर सर्वाधिक विश्वास
जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने लोकशाही असलेल्या जगातील प्रमुख ३४ देशांमध्ये सरकारविषयी लोकांमध्ये असलेल्या विश्वासाबद्दल सर्वेक्षण केले आहे. यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
देशातील ७३ टक्के जनतेचा सरकारवर विश्वास असल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
जगातील इतर देशांमधील लोकांच्या तुलनेत भारतीय जनतेचा देशातील सरकारवर अधिक विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेत समावेश होणाऱ्या देशांचे फोर्ब्सकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये लोकशाही असलेल्या ३४ देशांचा समावेश आहे.
लोकांच्या मनात सरकारबद्दल असलेल्या विश्वासाची पडताळणी सर्वेक्षणातून करण्यात आली आहे. यामध्ये भारताने पहिला क्रमांक मिळवला आहे.
भारतापाठोपाठ कॅनडाचा दुसरा क्रमांक लागतो तर तुर्कस्तान आणि रशिया संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर जर्मनी, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, जपान यांचा क्रमांक लागतो.
अमेरिका तसेच स्पेनमधील अवघ्या ३० टक्के जनेतेने सरकारबद्दल विश्वास दाखवला आहे.
अमेरिका स्पेननंतर, फ्रान्स (२८ टक्के), ब्राझील (२६ टक्के), दक्षिण कोरिया (२४ टक्के) आणि ग्रीस (१३टक्के) यांचा क्रमांक लागतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा