भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. यू आर राव यांचे २४ जुलै रोजी वयाच्या ८५व्या वर्षी बंगळुरूमध्ये निधन झाले.
इस्रोच्या शासकीय समितीचे अध्यक्ष म्हणून राव कार्यरत होते. तसेच, ते तिरुअनंतपुरम येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरूही होते.
राव यांनी १९७२साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदार घेतली होती. भारताचा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’च्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते.
उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमारू या खेडेगावात १० मार्च १९३२ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता.
त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर डलास येथील टेक्सास विद्यापीठात अध्यापन केले.
१९६६ मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
१९८४ ते १९९४ या काळात त्यांनी देशाच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते.
‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, ॲपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.
राव यांचा आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने प्रतिष्ठित ‘दि २०१६ आईएएफ हॉल ऑफ फेम'मध्येही समावेश केला होता.
वॉशिंग्टन येथे २०१३मध्ये ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले ते पहिले भारतीय आहेत.
अंतराळ क्षेत्रातील राव यांनी दिलेल्या योगदानाबाबत १९७६साली त्यांचा पद्मभूषण तर २०१७मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
याशिवाय इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार, युरी गागारिन पुरस्कार असे असंख्य पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.
भारताला नमवून इंग्लंड विश्वविजेता
महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पहिल्या विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले.
मिताली राजच्या भारतीय महिला क्रिकेट संघाला महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत इंग्लंडकडून ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
भारतावर मात करत इंग्लंडने चौथ्या विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली. इंग्लंडने याआधी १९७३, १९९३ आणि २००९ मध्ये विश्वचषक जिंकला आहे.
प्रथम फलंदाजी केलेल्या यजमान इंग्लंडला ५० षटकात ७ बाद २२८ धावांवर रोखल्यानंतर, भारताचे प्रयत्न ९ धावांनी कमी पडले.
मुंबईकर पूनम राऊतने केलेली ८६ धावांची झुंजार खेळीही भारताचे विश्वविजेतेपद साकारु शकली नाही.
अन्या श्रुबसोल हिने ४६ धावांत ६ बळी घेत भारताच्या हातातील विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. भारताचा डाव ४८.४ षटकात २१९ धावांत संपुष्टात आला.
नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशन
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहीमेअंतर्गत आता सुपर कॉम्प्युटर भारतात तयार होणार आहेत.
नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशन अंतर्गत या देशी सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीचे काम पुण्यातील सीडॅककडे सोपवण्यात आले आहे.
४ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेला गेल्या वर्षी मार्चमध्ये मंत्रिमंडळाच्या अर्थ समितीने मान्यता दिली होती.
यानुसार योजेनेंतर्गत तीन टप्प्यांमध्ये ५० सुपर कॉम्प्यूटरची निर्मिती करण्याचे ध्येय आहे. हे सुपर कॉम्प्युटर परमपेक्षाही जास्त वेगवान असतील.
सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये हायस्पीड इंटरनेट स्विच आणि कॉम्प्यूट यासारख्या उपकरणांची भारतात डिझाईन आणि निर्मिती करण्यात येणार आहे.
या सुपरकॉम्प्युटरचा आराखडा, त्यासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांची निर्मिती आणि ते जोडण्याचे काम सी-डॅक करणार आहे.
सुपर कॉम्प्युटरच्या या योजनेवर विज्ञान आणि प्रोद्योगिक मंत्रालयाचे वरिष्ठ वैज्ञानिक मिलिंद कुलकर्णी लक्ष ठेवतील.
हे सुपर कॉम्प्युटर देशभरातील विविध वैज्ञानिक संस्थांना देण्याचा सरकारचा मानस आहे.
प्रणॉयला युएस ओपनचे विजेतेपद
भारताच्या एच एस प्रणॉयने भारताच्याच परुपल्ली कश्यपवर मात करत अमेरिकन ओपन ग्रांप्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
प्रणॉयने २१-१५, २०-२२, २१-१२ अशा सरळ सेट्समध्ये परुपल्ली कश्यपला पराभूत केले.
प्रणॉयचे कारकिर्दीतील हे तिसरे ग्रांप्री गोल्ड जेतेपद आहे. त्याने २०१४मध्ये इंडोनेशिया मास्टर्स व २०१६मध्ये स्वीस ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
२०१०च्या युथ ऑलिंपिकमध्ये प्रणॉयने रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर २०१४मध्ये व्हिएतनाम ओपनमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पाकिस्तानला रशियाने एमआय-१७१ई हेलिकॉप्टर दिले
पाकिस्तानला युद्धासाठी नसलेले (नॉन-कॉम्बॅट) प्रकारचे रशियन बनावटीचे एमआय-१७१ई हेलिकॉप्टर मिळाले आहे.
या वर्षात पाकिस्तानला रशियाकडून मिळालेले हे असे दुसरे हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर पाकच्या अशांत बलुचिस्तानात प्रांतासाठी मागवण्यात आले आहे.
एमआय-१७१ हे एमआय-१७ लष्करी मालवाहतूक हेलिकॉप्टरचा नागरी प्रकार असून ते याआधीच पाकिस्तानी लष्कराच्या सेवेत आहे.
एमआय-१७१ हेलिकॉप्टर प्रवासी किंवा मालवाहतूक, वैद्यकीय, शोध व बचावकार्य अशा कुठल्याही मोहिमेत उत्तम कामगिरी बजावते.
हे हेलिकॉप्टर ‘कन्व्हर्टिबल’ पर्यायात तयार करण्यात आले असून, २७ प्रवासी आणि ४ टनांपर्यंतचे वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
मालवाहतुकीसाठी असलेल्या त्याच्या कॅबिनचे रूपांतर फार कमी वेळात १३ सीट्स व एक फ्लाइट अटेन्डंट असलेल्या व्हीआयपी कॅबिनमध्ये होऊ शकते.
तसेच यामधील सीट्स काढून टाकल्यास १४ स्ट्रेचर्स वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे या हेलिकॉप्टरचा वापर रुग्णवाहिका म्हणूनही करता येऊ शकतो.
रशियन हेलिकॉप्टर्सने या हेलिकॉप्टरच्या पुरवठय़ाचा करार बलुचिस्तान प्रांताच्या सरकारशी डिसेंबर २०१६मध्ये केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा