देशाच्या १५व्या राष्ट्रपतिपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आले होते. यात ९९ टक्के आमदार-खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
या निवडणुकीत कोविंद यांना एकूण ७,०२,६४४ (६५.६५ टक्के) मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना ३,६७,३१४ (३४.३५ टक्के) मते मिळाली.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या ५० टक्यांहून अधिक मतांची आवश्यकता असते.
प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर, रामनाथ कोविंद हे २५ जुलैपासून राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारतील.
गोळाफेकपटू मनप्रीत कौर उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
भारताची आघाडीची गोळाफेकपटू मनप्रीत कौर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था म्हणजेच ‘नाडा’ने केलेल्या उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळलेली आहे.
आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चीनमध्ये मनप्रीत कौरच्या लघवीचे नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले होते.
या तपासणीत स्टिम्युलेंट डायमिथाईल ब्युटाईल अमाईन या उत्तेजकाचे नमुने सापडल्याचे समोर आले आहे.
मनप्रीतच्या पटियाला येथील हॉस्टेलवर धाड टाकली असतानाही नाडाच्या अधिकाऱ्यांना याच उत्तेजकांचे नमुने आढळले होते.
सलग दुसऱ्या चाचणीत मनप्रीत दोषी आढळल्याने मनप्रीतवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
पुढील चौकशी होईपर्यंत मनप्रीतला लंडन येथे होणाऱ्या आगामी वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघातूनही वगळ्यात आले आहे.
नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत मनप्रीत कौरने गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.
उत्तेजक सेवन प्रकरणात आता मनप्रीत कौरची चौकशी करण्यात येणार आहे, त्यात मनप्रीतला आपलं निर्दोषत्व सिद्ध करावे लागणार आहे. असे न झाल्यास मनप्रीत कौरचे सुवर्णपदकही काढून घेण्यात येईल.
मनप्रीतने चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रॅण्डप्रिक्समध्ये १८.८६ मीटर गोळाफेक करीत लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपसाठी पात्रता सिद्ध केली होती.
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन
आकाशगंगा, भालू, आम्ही जातो अमुच्या गावा, प्रेमासाठी वाट्टेल ते अशा मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे १९ जुलै रोजी निधन झाले.
साठ व सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून उमा भेंडे यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांनी तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते.
कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई रमादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत काम करत असे, तर वडील श्रीकृष्ण साक्रीकर अत्रे यांच्या कंपनीत होते.
लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिले होते. त्यांचे मूळ नाव अनसुया साक्रीकर होते. त्यांनी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरतनाट्यमचे शिक्षणही घेतले होते.
त्यांनी स्वत:ची श्री प्रसाद चित्र ही संस्था सुरू करून चित्रनिर्मिती केली. भालू, चटकचांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार हे चित्रपट त्यांनी बनविले.
त्यांनी भालजी पेंढारकर, वसंत जोगळेकर, राजदत्त, माधवराव शिंदे, कमलाकर तोरणे, मुरलीधर कापडी, हिंदीत सत्येन बोस अशा अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केले.
‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
२०१२ साली उमा भेंडे यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पाकिस्तान दहशतवाद्यांच्या आश्रयदाता
अमेरिकी परराष्ट्र खात्याने प्रकाशित केलेल्या ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम’ या अहवालात पाकिस्तानचा समावेश दहशतवाद्यांच्या आश्रयदाता देशांच्या यादीत करण्यात आला आहे.
पाकिस्तान व्यातिरिक्त अफगाणिस्तान, सोमालिया, विस्तीर्ण सहारा, सुलू, सुलावेसी, दक्षिण फिलिपिन्स, इजिप्त, इराक, लेबनॉन, लिबिया, येमेन, कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे देशही दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा