चालू घडामोडी : २९ जुलै

शाहिद अब्बासी पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान

  • नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर शाहिद खाकान अब्बासी हे पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
  • नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ हे खासदार म्हणून निवडून येईपर्यंत अब्बासी हे पंतप्रधानपदी कायम असतील.
  • सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • संसदेत शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याने पंतप्रधानपदाला तूर्तास तरी धोका नाही.
  • शरीफ यांचे बंधू आणि सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असलेले शाहबाज शरीफ हे शरीफ यांचे उत्तराधिकारी असतील.
  • मात्र पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यामुळे शाहबाज यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर (मजलिस-ए-शूरा) खासदार म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.
  • यासाठी नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरुन शाहबाज शरीफ निवडणूक लढवतील.
  • हा मतदारसंघ शरीफ कुटुंबीयांचा बालेकिल्ला असून शाहबाज शरीफ यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
 शाहिद खाकान अब्बासी 
  • शाहिद खाकान अब्बासी १९८८पासून सहावेळा ते पाकिस्तानच्या संसदेवर निवडून गेले आहेत.
  • अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिवर्सिटीमधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पदवी घेतली आहे.
  • अब्बासी हे नवाझ शरीफ यांचे निष्ठावंत असून, विद्यमान शरीफ यांच्या मंत्रिमंडळात ते तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री होते.
  • यापूर्वी ते एअर ब्ल्यु या खासगी विमान कंपनीचे ते सीईओ तसेच, १९९७ ते १९९९ या काळात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे चेअरमन होते.
  • १९९९साली जनरल परवेझ मुशर्रफ यांनी शरीफ यांचे सरकार उलथवून लावले. त्यावेळी अब्बासी यांना अटक करण्यात आली. ते दोन वर्ष तुरुंगात होते. २००१ साली कोर्टाने त्यांची सुटका केली.
  • शहाबाज शरीफ यांची संसदेमध्ये निवड होईपर्यंत शाहिद खाकान अब्बासी ४५ दिवसांसाठी हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
 पार्श्वभूमी 
  • नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर करून आणि मनी लाँडरिंगद्वारे लंडन व अन्यत्र मालमत्ता विकत घेतल्याचे पनामा पेपर्स प्रकरणातून समोर आले होते.
  • याप्रकरणी पाकिस्तानच्या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांनाही दोषी ठरविले.
  • शरीफ यांनी घटनेची पायमल्ली केली असून ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश कोर्टाने दिला होता.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने शरीफ यांनी नाइलाजाने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

जेष्ठ उर्दू लेखक नैयर मसूद यांचे निधन

  • सरस्वती पुरस्काराने सन्मानित जेष्ठ उर्दू लेखक नैयर मसूद यांचे २४ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
  • मसूद यांचे गंजिफा, इत्र ए कांफूर, ताऊस चमन की मैना इत्यादी लघुकथा संग्रह प्रसिध्द आहेत. ३५ कादंबऱ्या व अनेक लघुकथा त्यांच्या नावावर आहेत.
  • नैयर मसूद यांचा जन्म सन १९३६मध्ये लखनौ येथे झाला. नैयर मसूद यांचे वडील सईद मसूद हसन रिझवी हे लखनौ विद्यापीठात पर्शियन भाषा शिकवायचे.
  • नैयर यांनीदेखील लखनौ विद्यापीठात पर्शियन भाषेचे अध्यापन दीर्घकाळ केले. या भाषेच्या विभागाचे ते प्रमुखही होते.
  • जागतिक साहित्यात खूपच मोठे स्थान असलेल्या फ्रान्झ काफ्काच्या कथा उर्दू भाषेत अनुवादित करण्याचे मोलाचे काम मसूद यांनी केले. काफ्काच्या कथा उर्दूत आणणारे नैयर हे एकमेव लेखक.
  • त्यांच्या लिखाणात सामाजिक व राजकीय विषय सर्रास दिसतात. मात्र त्यांचे लिखाण त्या अर्थाने सुलभ, सोपे नाही. वास्तव, स्वप्न, गूढता यांचे अजब मिश्रण त्या लिखाणात आढळते.
  • त्यांना २००१ साली उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने तर २००७ साली सरस्वती सम्मान प्रदान करून गौरविण्यात आले.
  • साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९७० साली पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.

‘ओबामाकेअर’ विधेयक मतदानात ट्रम्प पराभूत

  • अमेरिकेत ओबामाकेअर नावाने आळखले गेलेले विधेयक रद्द करण्यासाठी झालेल्या मतदानात ट्रम्प प्रशासन ४९ विरुद्ध ५१ मतांनी पराभूत झाले.
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी नागरिकांना सवलतीच्या दरांत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ओबामाकेअर विधेयक संमत केले होते.
  • मात्र या विधेयकामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे सांगत सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ते रद्द करण्याचे प्रयत्न चालवले होते.
  • ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीदरम्यानही निवडून आल्यास ओबामाकेअर विधेयक रद्द करण्याचे आश्वासन अमेरिकी मतदारांना दिले होते.
  • या विधेयकाबाबत अमेरिकेच्या सिनेटमध्ये झालेल्या मतदानात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या ३ सिनेटरनी विरोधात मतदान केल्याने ट्रम्प यांचा पराभव झाला.
  • ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष साधारणपणे ओबामाकेअर विधेयक रद्द करण्याच्या तर विरोधी डेमोक्रॅट पक्ष हे विधेयक कायम ठेवण्याच्या बाजूने होता.
  • मात्र ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जॉन मॅककेन, सुसान कॉलिन्स आणि लिसा मर्कोवस्की या तीन सिनेटरनी ओबामाकेअर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान करत बंडखोरी केली.

बीफ निर्यातीत भारत जगात तिसरा

  • अन्न आणि कृषी संस्था अर्थात एफएओ आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन (ओईसीडी) यांनी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार बीफच्या निर्यातीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
  • या दोन्ही संस्थांनी २०१७ ते २०२६ या दशकभराचा अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये पुढची दहा वर्षे बीफ निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमाकांवर राहिल असेही नमूद करण्यात आले आहे.
  • गेल्या वर्षी भारतानं १.५६ मिलियन टन बीफ निर्यात केले, हेच प्रमाण येत्या काळात कायम राहिल असा अंदाज वाटतो आहे.
  • जगात जे बीफ निर्यात केले जाते त्याचा १६ टक्के वाटा येत्या दहा वर्षांमध्ये भारत उचलेल ज्याचे प्रमाण २०२६पर्यंत १.९३ मिलियन टन असेल, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
  • जागतिक क्रमवारीचा विचार करता, बीफ निर्यातीत ब्राझील पहिल्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा