ज्येष्ठ शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे २४ जुलै रोजी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले.
विज्ञानातील कठीण गोष्टी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. वैज्ञानिक तथ्ये आणि त्यांची प्रक्रिया सोप्या शब्दांत त्यांनी मांडल्या.
यशपाल हे दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘टर्निंग पाँईंट’ या विज्ञान मालिकेत ‘विज्ञान गुरू’च्या भूमिकेत होते. या माध्यमातून ते विज्ञान आणि निसर्गातील अनेक रहस्यांची उकल ते रंजक पद्धतीने करत.
पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर १९२६ रोजी प्रा.यशपाल यांचा जन्म झाला. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.
त्यांनी भौतिकशास्त्रात १९४९मध्ये पदवी तर १९५८मध्ये मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएचडीही मिळवली होती.
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विज्ञानविषयक अनेक समित्यांचे त्यांनी सदस्य व सल्लागार म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांमध्येही कार्य केले.
यशपाल यांनी प्रा.पीटर्स बर्नार्ड यांच्याबरोबर विश्वकिरणांवर (कॉस्मिक किरण) महत्त्वाचे काम केले.
१९७३मध्ये यशपाल अहमदाबादला इस्रोच्या स्पेस अॅप्लीकेशन सेन्टरमध्ये दाखल झाले. तेथे यशपाल यांच्या गटाला सॅटलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरीमेंट उर्फ साईट कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती.
त्यांनी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान व बिहार येथील चार राज्यातील ग्रामीण मुलांचे शिक्षण सेटलाईटद्वारा करण्याचा उपक्रम राबविला होता.
१९८१ साली ते दोन वर्षांकरिता युनेस्कोमध्ये यूएन कॉन्फरन्स ऑन आऊटर स्पेसचे प्रमुख बनले.
१९८३-८४ दरम्यान ते योजना आयोगाचे मुख्य सल्लागार होते. पुढे ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे सचिव झाले.
१९८६ ते १९९१ पर्यंत त्यांनी यूसीजीचे अध्यक्षपद भूषवले. या काळात त्यांनी भारतभर चार अंतर विद्यापीठीय केंद्रे स्थापन केली. २००७-१२ दरम्यान ते जेएनयूच्या कुलपतीपदी होते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या तत्कालीन भारत जन विज्ञान जाथा या भारतव्यापी कार्यक्रमाचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले होते.
विज्ञानातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना १९७६मध्ये पद्मभूषण तर २०१३मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
महिला व बालविकास मंत्रालयाचे ‘शी-बॉक्स’ पोर्टल
नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्याच्या तक्रारी करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने ‘शी-बॉक्स’ हे पोर्टल सुरू केले.
या पोर्टलवर केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांना लैंगिक छळ होत असल्यास तक्रारी करता येतील.
लवकरच यात खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत असलेल्या महिलांनाही समाविष्ट केले जाईल असे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी जाहीर केले.
याशिवाय नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचे प्रमाण किती आहे याची देशव्यापी पाहणी करण्यात येणार आहे.
लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी ऑनलाइन मंच उपलब्ध करून देण्याची घोषणा गेल्या ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती.
सद्यस्थितीला नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या गुन्ह्यांची नोंद घेण्याची कुठलीही केंद्रीभूत व्यवस्था नाही.
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१४पासून कामाच्या ठिकाणी विनयभंग व इतर गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
२०१५च्या आकडेवारीनुसार ११९ गुन्हे यात दाखल झाले त्यात ७१ लोकांवर आरोपपत्रे ठेवण्यात आली तर एकूण ५ जणांना शिक्षा झाली.
प्रोजेक्ट ७५ इंडिया
नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक पाणबुडी निर्मितीच्या प्रकल्पावर पुन्हा काम सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
या संबंधित करार पूर्णत्वास गेल्यास, तो संरक्षण भारताचा आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा करार असेल.
रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्वीडन आणि स्पेन या सहा देशांच्या मदतीने भारत सहा अत्याधुनिक पाणबुड्यांची निर्मिती करणार आहे.
या प्रकल्पाला केंद्र सरकारने प्रोजेक्ट ७५ इंडिया (पी-७५ आय) असे नाव दिले आहे. या प्रकल्पासाठी ७० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती लक्षात घेऊन या प्रकल्पाला गती देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
या कराराला नोव्हेंबर २००७ मध्येच संमती देण्यात आली आहे. मात्र अद्याप या करारांतर्गत कोणत्याही पाणबुडीची निर्मिती करण्यात आलेली नाही.
सहा अत्याधुनिक पाणबुड्यांच्या उभारणीचा प्रकल्प संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.
रामनाथ कोविंद देशाचे १४वे राष्ट्रपती
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे एस केहर यांच्याकडून शपथ ग्रहण केल्यानंतर रामनाथ कोविंद देशाचे १४वे राष्ट्रपती बनले आहेत.
बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये १६ वर्षे वकिली केली आहे. याशिवाय कोविंद यांची राज्यसभा सदस्य म्हणूनही दोनदा निवड झाली आहे.
आयसीसी विश्वचषक संघाच्या कर्णधारपदी मिताली राज
आयसीसीने जाहीर केलेल्या महिला विश्वचषक (२०१७) संघाच्या कर्णधारपदी भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची निवड करण्यात आली आहे.
विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या संघातील निवडक खेळाडूंची आयसीसीच्या १२ सदस्यीय संघात निवड होत असते.
मिताली राजने या संपूर्ण स्पर्धेत ४०९ धावा केल्या. यात न्यूझीलंडविरुद्ध महत्वाच्या सामन्यात केलेली शतकी खेळीचा समावेश आहे.
मिताली राज व्यतिरीक्त भारतीय संघातील हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा या खेळाडूंचाही आयसीसीच्या या संघात समावेश करण्यात आला आहे.
याव्यतिरीक्त मालिकावीराचा किताब पटकावणारी इंग्लंडची टॅमसिन बेमाँटसह पाच इंग्लिश महिला क्रिकेटपटूंचा या संघात समावेश आहे.
याव्यतिरीक्त दक्षिण आफ्रिकेच्या तीन आणि ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटपटूला या संघात जागा मिळाली आहे.
तमिळनाडूच्या शाळांमध्ये वंदे मातरम् अनिवार्य
तमिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम् हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे.
याशिवाय सरकारी कार्यालये व संस्था, खासगी कंपन्या व कारखाने, उद्योग आदींमध्येही महिन्यातून एकदा वंदे मातरम् वाजविणे व गाणे बंधनकारक केले आहे.
वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.
राष्ट्रगीताचा तमिळ व इंग्रजी अनुवाद करण्याची सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला न्यायालयाने दिली आहे.
वंदे मातरम् गाण्यास कुणाचा काही आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही, पण त्यासाठी वैध कारण असायला हवे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी जन-गण-मन हे राष्ट्रगीत देशभरातील सर्व सिनेमाघरांमध्ये वाजवणे तसेच पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवणे अनिवार्य केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा