अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच झहीर खानकडे भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तर भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असताना राहुल द्रविडकडे फलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे.
रवी शास्त्रींची निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली असून, २०१९च्या विश्वचषकापर्यंत ते संघाचे प्रशिक्षक राहणार आहेत.
येत्या २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी मालिकेपासून शास्त्री कार्यभार सांभाळतील.
अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यावर प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याबद्दल मोठी उत्सुकता होती.
रवी शास्त्री यांना प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात यावी, यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आग्रही होता.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक पदासाठी पाच जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून येण्याआधी रवी शास्त्री यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत संघाच्या मुख्य व्यवस्थापकाची भूमिका पार पाडली होती.
बीसीसीआयच्या क्रिकेटविषयक सल्लागार समितीने शास्त्री यांची निवड केली. या समितीमध्ये सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश होता.
या तिघांनी प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
प्रशिक्षकपदासाठी शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, फिल सिमन्स, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांनीही अर्ज दाखल केला होता.
गोपाळकृष्ण गांधी यूपीएचे उपराष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार
काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) उपराष्ट्रपतीपदासाठी महात्मा गांधींचे नातू व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
सत्ताधारी एनडीएने उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यापूर्वीच १८ विरोधी पक्षांच्या वतीने गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची कारकीर्द १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.
भारताने अमेरिकेकडून खनिज तेलाची आयात करणार
भारताने पहिल्यांदाच अमेरिकेकडून खनिज तेलाची आयात करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीचा करार नुकताच झाला आहे.
या करारानुसार खनिज तेलाची पहिली खेप ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेमधून भारतात पोहोचणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच अमेरिका दौरा केला आहे. त्यानंतर काही आठवड्यांतच खनिज तेलाच्या आयातीसाठी अमेरिकेसोबत करार झाला आहे.
भारत हा खनिज तेलांचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. खनिज तेलाची पहिली खेप ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतून भारतात पोहोचणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अमेरिकेशी हा करार केला आहे.
अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणारे यूएस मार्स वजनदार आणि उच्च प्रतीचे सल्फर ग्रेडचे खनिज तेल आहे. याचे शुद्धीकरण ओडिशामधील कारखान्यात होणार आहे.
खनिज तेलाच्या मर्यादित साठ्यांमुळे भारताला उर्जासाधनांसाठी आतापर्यंत आखाती देशांवर अवलंबून राहावे लागत होते.
चीन आणि कोरिया आदी देशही आखाती देशांकडून तेल खरेदी करण्याऐवजी अमेरिकेकडून खनिज तेल खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
नायलॉनच्या मांजावर पूर्ण बंदी
पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) घेतला आहे.
एनजीटीने सर्व राज्य सरकारांना दिलेल्या आदेशात सिंथेटिक मांजा किंवा नायलॉनच्या दोऱ्याची निर्मिती, विक्री, त्याची साठवणूक, खरेदी आणि वापरावर तात्काळ बंदी घालण्यास सांगितले आहे.
पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा नागरिकांचे गळे चिरणारा आणि झाडांवर अडकलेला मांजा पक्ष्यांना जखमी करणारा ठरला आहे.
त्यामुळे पक्षीप्रेमींनी या मांजावर बंदीची मागणी केली होती. मात्र, या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नव्हती.
शहरी भागात नायलॉनच्या मांजामुळे नागरिकांचे विशेषत: वाहनधारकांचे नाक, कान, गळे चिरण्याच्या घटना पतंगोत्सवाच्या सुमारास घडत आहेत. यात पक्षीदेखील मोठय़ा प्रमाणात जखमी होतात.
या पार्श्वभूमीवर एनजीटीकडून याबाबत आता सक्तीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन
व्यंग्यचित्रातून दिसतो ‘चेहऱ्याआडचा माणूस’ असे सांगणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे ११ जुलैच्या मध्यरात्री आजारपणाने निधन झाले.
ज्यांच्या व्यंग्यचित्रांनी प्रसंगी अनेकांना अंतर्मुख केले... कागदावर जणू जगण्याचे तत्त्वज्ञानच मांडले... अशी मंगेश तेंडुलकर यांची ओळख होती.
वाढते दारिद्य्र, शहरातील टेकडीफोड, वाहनांचा गोंगाट, रस्त्यांची दुर्दशा, अशा गंभीर अन् हलक्या-फुलक्या विषयांवरील वेगळा विचार देणारी त्यांची व्यंग्यचित्रे होती.
तेंडुलकर यांनी १९५४ पासून व्यंगचित्रे काढण्यास सुरवात केली होती. भुईचक्र, संडे मूड, कार्टुन ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
संडे मूड या पुस्तकासाठी त्यांनी वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कारही मिळाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा