राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत हिना सिधूला सुवर्ण
- ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या हिना सिधूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- १० मी एअर पिस्तुल प्रकारात हिनाने ६२६.२ गुणांची कमाई करत पहिले स्थान पटकावले. हिनाचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले.
- काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत पार पडलेल्या आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेत हिनाने जितू रायसोबत १० मी पिस्तुल मिश्र प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
- हिनाव्यतिरीक्त भारताच्या दिपक कुमारने १० मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
- लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारा गगन नारंग या प्रकारात चौथ्या क्रमांकावर राहिला.
रेल्वे अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय
- रेल्वेकडून लवकरच रेल्वे तिकिटासाठीच्या आरक्षण अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे.
- सध्या आरक्षण अर्ज भरताना त्यावर पुरुष आणि महिला यांच्यासाठी अनुक्रमे ‘एम’ आणि ‘एफ’ असे दोन पर्याय देण्यात येतात.
- मात्र आता त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी ‘टी’ हा पर्याय द्यावा, अशी सूचना रेल्वेकडून देण्यात आली आहे. ‘टी’ म्हणजे ट्रान्सजेंडर अर्थात तृतीयपंथी.
- या बदलामुळे तृतीयपंथीयांच्या तिसऱ्या लिंगासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध झाला आहे. यापूर्वी हा पर्याय ट्रान्सजेंडर (महिला/ पुरुष) असा होता.
- २०१४च्या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथींना तिसऱ्या लिंगाचा दर्जा दिला होता.
- या निर्णयानंतर निर्णयानंतर पासपोर्ट, शिधावाटप पत्रिका, बँकांचे अर्ज, मतदार ओळखपत्र यांच्यासह अनेक ओळखपत्रकांवर तिसऱ्या लिंगासाठी ‘टीजी’, ‘टी’ किंवा ‘इतर’चा पर्याय देणे सुरू केले होते.
- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय सध्या तृतीयपंथींशी संबंधित अनेक प्रकरणांवर काम करत आहे. शिवाय संसदेच्या स्थायी समितीकडून प्रस्तावित तृतीयपंथी जन विधेयक २०१६चे परीक्षणही केले जात आहे.
फुटबॉल महासंघाच्या निवडणुका अवैध
- काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द करत, पाच महिन्यांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
- फुटबॉल महासंघाने घेतलेल्या निवडणुकांमधून राष्ट्रीय क्रीडा संहितेचे उल्लंघन झाल्याचे मतही दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
- याचसोबत दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्य निवडणुक आयुक्त एस वाय कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.
- २००८साली फुटबॉल महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन झाले. यानंतर २००९साली पटेल यांनी महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.
- डिसेंबर २०१६मध्ये फुटबॉल महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पटेल यांची पुन्हा एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
- दर चार वर्षांनी या निवडणुका होतात. प्रफुल्ल पटेल यांची ही अध्यक्ष म्हणून सलग तिसरी वेळ आहे.
- पटेल यांच्या निवडीला क्रीडा क्षेत्रात सुधारणांसाठी काम करणारे कार्यकर्ते राहुल मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
- पटेल यांच्याच नेतृत्वाखाली फुटबॉल महासंघाने फिफाच्या १७ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते.
- तसेच २०१९साली होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारताने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
प्रज्ञाशोध परीक्षेत ओबीसींना आरक्षण
- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांनाही आरक्षण देण्यात येणार आहे.
- या परीक्षेमध्ये एससी, एसटी आणि अपंग व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद आहे. यामध्ये आता ओबीसींचाही समावेश करण्यात येईल.
- २०१८च्या शैक्षणिक वर्षासाठी ओबीसींच्या जागांवर प्रवेश देणे सुरु झाले आहे. त्यानंतर २०१९ साठी ओबीसींचा नवा कोटा लागू होणार आहे.
- त्याचबरोबर सरकारने एनटीएससी शिष्यवृत्तीतही दुप्पट वाढ करण्याचे ठरवले आहे. ही शिष्यवृत्तीची रक्कम १००० रुपयांवरुन २००० रुपये होणार आहे.
- त्याचबरोबर पीएचडीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत युजीसीच्या नियमांप्रमाणे बदल होईल.
- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १९६२मध्ये नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम अंतर्गत सुरु करण्यात आली होती.
- विद्यार्थ्यांमधील उच्च बुद्धिमापन आणि शैक्षणिकदृष्ट्या हुशार मुलांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते.
- सुमारे एक कोटी विद्यार्थी या परीक्षेसाठी दरवर्षी पात्र ठरतात. यांपैकी १००० यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.