वेटलिफ्टिंगमध्ये चानूला विश्वविक्रमी सुवर्णपदक
- अमेरिकेतील अनाहिममध्ये आयोजित जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला वेटलिफ्टर साईखोम मिराबाई चानूने विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्ण पदकाची कमाई केली.
- ४८ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो असे एकूण १९४ किलो वजन उचलत तिने हा विश्वविक्रम केला.
- यापूर्वी फक्त कर्णम मलेश्वरीने १९९४ आणि १९९५ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकही मिळवले होते.
- २२ वर्षानंतर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करणारी मिराबाई चानू ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे.
- या स्पर्धेत थायलंडच्या सुकचारोन तुनियाने रौप्य आणि सेगुराने इरिसने कांस्यपदक पटकावले.
- डोपिंगच्या प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्तान, युक्रेन आणि अझरबैजान या देशाचे वेटलिफ्टर्स स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.
- मीराबाईचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी पूर्व इम्फाळ येथे साईखोम कुटुंबात झाला. वेटलिफ्टिंग खेळाची प्रेरणा तिने मणिपूरची वेटलिफ्टिंगपटू कुंजराणी देवीकडून घेतली.
- २०१४मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या मीराने ४८ किलो वजनी गटात एकूण १७० किलो वजन उचलले होते.
- चानू २०१५च्या जागतिक स्पर्धेत नवव्या, तर २०१४च्या स्पर्धेत अकराव्या स्थानावर राहिली होती.
- सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत चानूने सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे पुढील वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ती पात्र ठरली आहे.
महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य
- राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून (एनसीआरबी) प्रसिध्द करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वात भ्रष्ट राज्य ठरले आहे.
- या अहवालानुसार, २०१६मध्ये देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या घटनांपैकी २२.९ टक्के (१,०१६) घटना या एकट्या महाराष्ट्रात समोर आल्या आहेत.
- २०१६मध्ये महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या १,२७९ तर २०१४मध्ये १,३१६ घटना समोर आल्या होत्या. त्या तुलनेत २०१६मध्ये आकडेवारी (१,०१६) कमी झाल्याचे दिसत आहे.
- या यादीत महाराष्ट्राखालोखाल ओडिसाचा क्रमांक लागतो. ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या ५६९ घटना समोर आल्या आहेत.
- त्यानंतर केरळमध्ये ४३०, मध्य प्रदेशमध्ये ४०२, आणि राजस्थानमध्ये ३८७ प्रकरणे समोर आली आहेत.
बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचे निधन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचे ३० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९०व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
- राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता.
- महास्थवीर चंद्रमणी यांच्या नेतृत्वात इतर सात भिक्खूंनी डॉ. आंबेडकरांना अशोक विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. यात भिक्खू प्रज्ञानंद यांचा समावेश होता.
- बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचा जन्म १८ डिसेंबर १९२८ रोजी श्रीलंकेत झाला होता. १९४२मध्ये वयाच्या १३व्या वर्षी ते भारतात आले.
- प्रज्ञानंद लखनऊच्या रिसालदार पार्कमधील बुद्ध विहारात राहत होते. बाबासाहेबांनी या बुद्ध विहाराला दोन वेळा भेट दिली होती. या बुद्ध विहाराची व्यवस्था पाहणारे सर्वात वरिष्ठ भदन्ते होते.
- त्यांनी लखनऊतील भारतीय बौद्ध समिती, श्रावस्ती बुद्ध विहार, भारतीय बौद्ध शिक्षण परिषद यांचे अध्यक्षपद तर रिसालदार पार्क बुद्धविहाराचे आजीवन अध्यक्षपद भूषवले होते.
दक्षिण किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ
- भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून या वादळात तामिळनाडू आणि केरळमध्ये एकूण ९ जणांना जीव गमवावा लागला आहे.
- पुढील २४ तासांत ओखी चक्रीवादळ लक्षद्वीपच्या दिशेने सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे रुपांतर या चक्रीवादळात झाले आहे. बांगलादेशने या वादळाला ‘ओखी’ असे नाव दिले आहे.
- या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे सध्या ७० ते ८० किमी प्रति तास या वेगाने वारे वाहत असून वाऱ्याचा वेग १०० किमी प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे.