चालू घडामोडी : ३१ ऑक्टोबर

उद्योग व्यवसायासाठी अनुकूल राज्यांमध्ये महाराष्ट्र नववा

  • केंद्र सरकारच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन)ने उद्योग व्यवसायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला.
  • त्यानुसार उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा तसेच व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सोपी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र ९व्या क्रमांकावर आहे.
  • केंद्र सरकारने ३४० निकष लक्षात घेऊन ही  राज्याची क्रमवारी जाहीर केली आहे.
  • त्यात आंध्रप्रदेश आणि तेलंगण ही दोन्ही राज्ये ९८.७८ टक्के गुणांसह संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत.
  • कधीकाळी पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात राज्याची घसरण झाल्याचे दिसून आले असून या यादीमध्ये गुजरातला तिसरे स्थान मिळाले आहे.
  • कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांना या यादीमध्ये ‘उदयोन्मुख नेतृत्व’ असे संबोधण्यात आले आहे.
  • तर हिमाचल प्रदेश, तमिळनाडू आणि दिल्ली या राज्यांनी कामगिरीमध्ये अजून सुधारणा करणे आवश्यक असल्याची सूचना करण्यात आली आहे.
  • औद्योगिक विकास विभाग पोलिसदल व जागतिक बॅंकेच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
राज्यांची क्रमवारी
तेलंगण, आंध्रप्रदेश
गुजरात
छत्तीसगड
मध्यप्रदेश
हरयाणा
झारखंड
राजस्थान
उत्तराखंड
महाराष्ट्र

रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

  • अत्यंत प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार आहे.
  • वृत्तपत्र, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि सर्व भाषांमधील पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
  • २०१५मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या २८ वर्गवारीतील विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
  • एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक कै. रामनाथ गोएंका यांचा वारसा जतन करण्यासाठी रामनाथ गोएंका स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने २००५मध्ये या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली.
  • पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना आणि वैयक्तिक पातळीवरही या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
  • हा पुरस्कार देशातील माध्यमांत सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा मानला जातो. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ५० माध्यम समूहांतील ३०० पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अँडी मरेला व्हीएन्ना टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

  • ब्रिटनच्या अँडी मरेने फ्रान्सच्या जो विलफ्रेड सोंगावर ६-३, ७-६ (७-६) अशी मात करत व्हीएन्ना टेनिस स्पर्धा जिंकली.
  • मरेचे हे गेल्या काही महिन्यांमधील सलग तिसरे जेतेपद ठरले आहे. या जेतेपदामुळे मरेच्या रँकिंग गुणांमध्ये वाढ झाली आहे.
 स्विस टेनिस स्पर्धा 
  • क्रोएशियाच्या मरिन चिलिचने जपानच्या काय निशिकोरीवर ६-१, ७-६ (७-५) अशी मात करत स्विस टेनिस स्पर्धा जिंकली.
  • यंदाच्या मोसमातील चिलीचचे हे दुसरे जेतेपद आहे. त्याने ऑगस्टमध्ये १००० गुणांची सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली होती.
  • यामुळे आता मरिन चिलिचचा वर्ल्ड टुअर फायनल्स टेनिस स्पर्धेतील प्रवेशही निश्चित झाला आहे.

चालू घडामोडी : ३० ऑक्टोबर

भारताला आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेचे विजेतेपद

  • भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला हरवत आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
  • अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानचा ३-२ असा पराभव केला.
  • बचावातील काही चूका सोडल्या, तर भारताचे वर्चस्व सहज जाणवणारे होते. भारतीयांनी सुरवातीपासून आक्रमक खेळ करीत पाकवर दडपण आणले.
  • विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने आपल्या लौकिकानुसार खेळताना दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली आहे.
  • २०११मध्ये भारताने पाकिस्तान पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून पहिल्याच आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत बाजी मारली होती. त्यानंतरच्या दोन्ही स्पर्धा पाकने जिंकल्या होत्या.
  • २०१२साली पाकिस्तानने भारताला तर २०१३साली यजमान जपानला नमवून आशियाई चॅम्पियन बनला होता.
  • या वर्षांत भारताला सुल्तान अझलन शाह आणि चॅंपियन्स कंरडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

अंटार्क्टिक महासागरात जगातील सर्वांत मोठे सागरी उद्यान

  • अंटार्क्टिक महासागरात जगातील सर्वांत मोठे ‘रॉस सी सागरी उद्यान’ तयार करण्यास २४ देश आणि युरोपियन युनियनने तयारी दर्शविली आहे.
  • महासागराच्या एकूण १.५५ दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरात हे भव्य उद्यान असेल.
  • या सागरी उद्यानामुळे या भागातील दुर्मिळ प्रजातींचे सुमारे ३५ वर्षे तरी व्यापारी मच्छीमारांपासून संरक्षण होईल.
  • या भागात १.१ दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरात मासेमारीला पूर्ण बंदी असेल. जे पेंग्विन, व्हेल, समुद्र पक्षी, प्रचंड असे जलचर, अशा दहा हजार प्रकारच्या प्रजातींचे घर आहे, 
  • येथील काही भाग संशोधनासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. सागरी वैविध्याच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे.
  • रॉस समुद्र हा पर्यावरणाच्या दृष्टीने जगातील एक महत्त्वाचा समुद्र आहे. महासागराच्या दक्षिण भागातील १२ टक्क्यांपेक्षा अधिक भाग या उद्यानाने व्यापला जाईल.

कंबोडियाचे माजी पंतप्रधान पेन सोवान यांचे निधन

  • कंबोडियातील ख्मेर राजवटीला विरोध करून प्रथमच पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या पेन सोवान यांचे २९ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
  • पेन सोवान हे कंबोडियातील हुकूमशाही राजवटीनंतरचे पहिलेच पंतप्रधान होते. ते जून ते डिसेंबर १९८१पर्यंत पंतप्रधान पदावर होते.
  • त्यावेळी कंबोडिया पीपल्स रिपब्लिक ऑफ काम्पुचिआ या नावाने ओळखले जात असे.
  • कंबोडियामधील व्हिएतनामचे सैन्य माघारी घेण्याची मागणी केल्याबद्दल त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. तसेच त्यांना १० वर्षे हनोईमध्ये तुरुंगवासात ठेवले होते.
  • पेन सोवान यांनी कंबोडियन नॅशनल सस्टेनिंग पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली होती.
  • त्यांनी १९९८च्या निवडणुकीमध्ये भाग घेतला. मात्र त्यांना निवडणुकीमध्ये अपयश आले.
  • त्यांनी २०१२मध्ये कंबोडिया नॅशनल रेस्क्यू पार्टी या विरोधी पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते २०१३च्या सार्वत्रिक निवडणुकीमधून जिंकून आले.

चालू घडामोडी : २९ ऑक्टोबर

नवीन बेनामी संपत्ती प्रतिबंध कायदा १ नोव्हेंबरपासून लागू

  • बेनामी संपत्ती प्रतिबंध या कायद्यातील नवीन नियम आणि तरतुदींची अमंलबजावणी १ नोव्हेंबर २०१६ पासून करण्यात येणार आहे.
  • काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी संसदेने ऑगस्टमध्ये बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा पारित केला केला आहे.
  • हा कायदा लागू झाल्यानंतर १९८८च्या बेनामी व्यवहार कायद्याचे नाव बदलणार असून, ते बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंध कायदा असे होणार आहे.
  • जुन्या कायद्यानुसार बेनामी व्यवहार केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा देण्याची तरतूद होती.
  • मात्र नवीन कायद्यामुळे ७ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
  • याशिवाय बेनामी संपत्ती आढळल्यास ती नुकसानभरपाई न देता जप्त करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे.
  • चर्च, गुरुद्वारा, मशीद तसेच मंदिरात मूळ संपत्ती असेल तर कलम ५८ अंतर्गत सरकारला ती मुक्त ठेवण्याचा अधिकार असेल.
  • नवीन कायद्यामध्ये शिक्षेमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे बेनामी व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे.

बॉक्सिंग फेडरेशनला सरकारची मान्यता

  • बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाला क्रीडा मंत्रालयातर्फे बॉक्सिंगची राष्ट्रीय संघटना म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
  • ही मान्यता दिल्यामुळे टोकियो ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय बॉक्सर्सना जय्यत तयारी करता येईल.
  • २०१२पासून बॉक्सिंग संघटनाच अस्तित्वात नसल्यामुळे भारतीय बॉक्सर्सचे प्रचंड नुकसान झाले होते.
  • रिओ ऑलिम्पिकमध्ये तर भारताचे केवळ ३ बॉक्सर्स सहभागी झाले. लंडन ऑलिम्पिकमध्ये ही संख्या ८ होती.
  • बॉक्सिंग असोसिएशनच्या सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये स्पाइसजेट एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
  • महाराष्ट्र बॉक्सिंगचे अध्यक्ष जय कवळी यांची बॉक्सिंग फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून निवड झाली.

एनआयए महासंचालकपदी शरदकुमार यांना मुदतवाढ

  • राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी शरदकुमार यांना सलग दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • शरदकुमार हे १९७९च्या तुकडीचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. ३० जुलै २०१३ रोजी त्यांची ‘एनआयए’च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • पठाणकोट हल्ला, काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, समझोता एक्स्प्रेस स्फोट, वर्धमान स्फोट अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास सध्या ‘एनआयए’ करीत आहे.
  • या प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण होण्यासाठी शरदकुमार यांच्या नियुक्तीचा लाभ होणार आहे.
  • शरदकुमार यांना त्यांच्या सेवाकाळात १९९६ आणि २००४मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

काश्मीरी गायिका राज बेगम यांचे निधन

  • काश्मीरमधील गानकोकिळा, काश्मीरच्या आशा भोसले अशी ख्याती मिळवलेल्या राज बेगम यांचे २६ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
  • रेडिओ काश्मीरसाठी त्यांनी गायन केले होते. तसेच भारत व परदेशात मैफलीही केल्या होत्या.
  • राज बेगम यांचा जन्म श्रीनगरमध्ये २७ मार्च १९२७ रोजी झाला. सुरुवातीला त्या महिलांसाठी गायन करीत असत, कारण त्या काळात समाजाची स्थिती बंदिस्त होती, अनेक बंधने महिलांवर होती.
  • शास्त्रीय संगीत, गीते यात त्यांना निपुणता मिळालेली होती. १९५४ ते १९८६ या काळात त्यांनी रेडिओ काश्मीरसाठी गायन केले.
  • २००२मध्ये त्यांना पद्मश्री तर २०१३मध्ये संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सादिक स्मृती पुरस्कार, काश्मिरी लोकसंगीत सुवर्णपदक, कला केंद्राचे रजत पदक, बक्षी पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. 
  • बेगम यांच्या गायनाचा फारसा प्रसार झाला नाही. बरेच प्रयत्न करूनही त्यांचे संगीत सार्वजनिक पातळीवर आले नव्हते.
  • रेडिओ काश्मीरमध्ये केवळ सरकारी मनोवृत्ती असल्याने त्यांच्या गाण्याच्या कॅसेट वगैरे सहज उपलब्ध होताना दिसत नव्हत्या.
  • पतीने त्यांना गाण्यास मनाई केली पण प्रत्यक्ष मैफलीचा प्रतिसाद बघून त्यांचा विरोध मावळला.
  • त्यांनी या क्षेत्रात महिलांवर असलेल्या सामाजिक मर्यादा ओलांडल्या आणि दाल सरोवरइतकीच त्या काश्मीरची शान बनल्या.

भारत आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत

  • कर्णधार आणि गोलरक्षक पी आर श्रीजेशच्या जबरदस्त बचावामुळे भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
  • भारताने दक्षिण कोरियावर पेनल्टी शूटमध्ये दक्षिण कोरियावर ५-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
  • निर्धारित वेळेत दोन्ही संघांचे २-२ गोल झाले होते. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यामध्ये भारताने दक्षिण कोरियाला ५-४ असे रोखले.
  • भारताचा संघ तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
  • मलेशिया आणि पाकिस्तानमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार असून, त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा अंतिम फेरीत सामना होईल. 
  • २०११मध्ये या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जेतेपद पटकावणारा भारतीय संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा मान मिळवण्यास उत्सुक आहे.

चालू घडामोडी : २८ ऑक्टोबर

‘नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी’ योजनेला मंजुरी

  • नरेंद्र मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्पाचा एक भाग असलेल्या ‘नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी’ (एनएडी) या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • यामुळे देशातील सर्व शालेय मंडळे, मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांच्या गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्रेही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.
  • ‘डिजिटल डिपॉझिटरी‘ ठेवणे हे देशातील प्रत्येक शिक्षणसंस्थेला बंधनकारक राहणार आहे. यामुळे व्यवस्थेतील याबाबतचा गैरप्रकार थांबेल व पारदर्शकता येईल. 
  • या नव्या योजनेत सीबीएसईसह सर्व परीक्षा मंडळे, विद्यापीठ अनुदान आयोग, तंत्रशिक्षण संस्था आदी मान्यताप्राप्त संस्थांचा समावेश होणार आहे.
  • प्रत्येक वर्षी किमान पाच कोटी दस्तावेज डिजिटल करण्याचे उद्दिष्ट मंत्रालयाने समोर ठेवले आहे.
  • यां योजनेसाठी आगामी तीन वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद करण्यात आली आहे.
  • गुणपत्रिका व पदव्या डिजिटल करण्याची मूळ कल्पना ‘यूपीए’ सरकारमध्ये कपिल सिब्बल यांच्या कारकिर्दीत जन्माला आली होती.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री : प्रकाश जावडेकर

गोव्याच्या एकमेव महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे निधन

  • गोव्याच्या आतार्पयतच्या एकमेव महिला मुख्यमंत्री ठरलेल्या शशिकला काकोडकर यांचे २८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.
  • गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या त्या कन्या होत्या. गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणून शशिकला काकोडकर प्रसिद्ध होत्या.
  • दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकला काकोडकर यांनी १९७३मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर एप्रिल १९७९पर्यंत त्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होत्या.
  • गोव्यामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात शशिकला काकोडकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
  • ९०च्या दशकमध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी मराठी भाषेला प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले होते.
  • त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणावर इंग्रजी भाषेचा असलेला पगडा कमी करण्यातही त्यांनीच महत्त्वाची भूमिका निभावली होती.
  • भारतीय भाषा सुरक्षा मंच या गोव्यातील संघटनेचे अध्यक्षपद शशिकला काकोडकर यांच्याकडे होते.

चालू घडामोडी : २७ ऑक्टोबर


भारतीय रेल्वेचे रामायण पॅकेज

  • देशातील रामभक्तांना श्रीलंकेत असलेल्या रामयण काळातील ठिकाणांना भेट देता यावी यासाठी भारतीय रेल्वेने श्रीलंकेसाठी विशेष टूर पॅकेज ‘रामायण’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
  • या पॅकेजमधून रामभक्तांना श्रीलंकेतील अशोक वाटिका, सीता माता मंदिर, भक्त हनुमान मंदिर, बिभिषण मंदिर आणि मुनिवरम शिव मंदिर आदी धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. 
  • या योजनेची सुरुवात २४ नोव्हेंबरला होईल, तर पहिल्या फेरीतील टूरचा समारोप २९ नोव्हेंबला होईल.
  • त्यानंतर १० डिसेंबर, १२ जानेवारी, १० फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी टूरचे आयोजन होणार आहे.
  • पाच दिवसांच्या या टूरदरम्यान आयआरसीटीसीकडून व्हिसापासून विमान तिकीट, राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्था केली जाईल.
  • या संपूर्ण टूरसाठी आयआरसीटीसी प्रतिप्रवासी ४८,२०० रुपये एवढे शुल्क आकारणार आहे.
  • तसेच या श्रीलंका सफरीत प्रवाशांना कोलंबो कँडी या श्रीलंकेतील प्रमुख शहरांमध्येही फिरवून आणण्यात येणार आहे.  

प्रथमा माईणकर यांना ओपीपीआय महिला वैज्ञानिक पुरस्कार

  • सीएसआयआरच्या हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिक प्रथमा माईणकर यांना ‘ओपीपीआय महिला वैज्ञानिक पुरस्कार’ मिळाला.
  • मूळच्या तेलंगणातील असणाऱ्या डॉ. प्रथमा यांना सीएनएस म्हणजे चेतासंस्थेशी संबंधित रोग तसेच कर्करोग व क्षयरोगावर संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
  • अनेक औषधांना दाद न देणाऱ्या मल्टीड्रग रेझिस्टंट टीबीवर (क्षय) औषध शोधण्यासाठी त्यांचे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.
  • कर्करोग, अस्थमा, चेतासंस्था रोगांवर उपयोगी ठरणारी काही संयुगे त्यांनी प्रयोगशाळेत तपासली असून ती गुणकारी असल्याचे दिसून आले आहे.
  • प्रथमा यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र, जनुकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत झाले.
  • तेथेच त्यांनी कार्बनी रसायनशास्त्रात पीएचडी केली. सीएसआयआरच्या आयआयसीटी संस्थेतूनही नंतर त्यांनी पीएच.डी. केली.
  • साई लाइफ सायन्सेस, एव्होलेव्हा बायोटेक पेन बायोकेमिकल्स अशा अनेक संस्थांत काम केल्यानंतर १९९२मध्ये त्या सीएसआयआरच्या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करू लागल्या.
  • वैद्यकीय रसायनशास्त्र, औषध संशोधन या शाखांत त्यांचे संशोधन आहे. त्यांच्या संशोधनाने औषधनिर्मितीत महत्त्वाची भर टाकली आहे.

शकुंतला रेल्वेमार्गाचे राष्ट्रीयकरण

  • भारतीय रेल्वे ही सरकारी मालकीची असली तरीही शकुंतला रेल्वेमार्ग हा भारतात एकमेव असा रेल्वेमार्ग आहे जो खाजगी मालकीचा आहे.
  • लवकरच शकुंतला रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणार असून, ब्रिटीशकालीन रेल्वेची ही शेवटची ओळख लवकरच इतिहासजमा होणार आहे. 
  • विदर्भातील यवतमाळ ते अचलपूर दरम्यानचा १८८ किमीचा रेल्वे मार्ग शकुंतला रेल्वेच्या मालकीचा आहे.
  • केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा रेल्वेमार्ग ताब्यात घेण्याच्या प्रस्तावला मंजुरी दिली आहे.
  • ब्रिटीश कंपनी किलीक निक्सनने १९१० साली शकुंतला रेल्वेमार्गाची उभारणी केली. स्वातंत्र्यपूर्वकाळात कापसाची निर्यात करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात.
  • स्वातंत्र्यानंतर अन्य खासगी मालकीच्या रेल्वेमार्गाचे राष्ट्रीयकरण झाले. पण शुकंतला रेल्वे मार्गाची मालकी खासगी कंपनीकडेच राहिली.
  • या अरुंद रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याची योजना असून त्यामुळे दिल्ली-चेन्नई-बंगळुरुमधील अंतर ८० किमीने कमी होईल.
  • हा मार्ग वापरण्यासाठी भारतीय रेल्वे शकुंतला रेल्वेला वर्षाला २ ते ३ कोटी रुपये देते.
  • दोन प्रवासी गाडया आणि काही मालगाडया या मार्गावरुन धावतात. सध्या शकुंतला रेल्वेची मालकी भारतीय व्यक्तीकडे आहे.
  • करारानुसार भारत सरकारने हा मार्ग २०१६मध्ये ताब्यात घेतला नाही तर, राष्ट्रीयकरणासाठी आणखी दशकभर थांबावे लागेल. 

राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध उठविले

  • अनियमिततेमुळे रिझर्व्हं बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध २० वर्षांनंतर उठविले आहेत.
  • तत्कालीन संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे १९९५साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर रिझर्व्हं बँकेने निर्बंध लावले होते.
  • राज्य बँक संचालक मंडळाच्या अनियमित कारभारामुळे तोट्यात होती. त्यामुळे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.
  • नाबार्डने केलेल्या तपासणीत बँकेच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे रिझर्व्हं बँकेने राज्य बँकेवर विविध प्रकारचे ११ निर्बंध लावले होते.
  • परंतु आता रिझर्व्हं बँकेच्या अटींची पुर्तता केल्यानंतर राज्य बँकेवरील लावलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रशियाकडून विध्वंसक आरएस-२८ क्षेपणास्त्राची निर्मिती

  • अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील लक्ष्यांचा वेध घेऊ शकेल असे ‘आरएस-२८ सरमत’ नावाचे नवे आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र रशिया विकसित करत आहे.
  • आरएस-२८ हे पहिले सुपर हेवी आणि थर्मोन्यूक्लियन बाँबने युक्त असे क्षेपणास्त्र आहे. २०१८च्या अखेरपर्यंत ते रशियन सैन्यदलांच्या सेवेत दाखल होईल.
  • १०० टन वजनाचे  अवजड असे हे क्षेपणास्त्र १० टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.
  • तसेच एकाचवेळी १६ छोटी आणि १० मोठी अण्वस्त्रे वाहून नेण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. 
  • या क्षेपणास्त्राचा वेग ७ किमी प्रतिसेकंद एवढा असून, ते दहा हजार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर ते मारा करू शकते.
  • रशियाकडील सध्याचे अशा प्रकारचे आण्विक क्षेपणास्त्र त्याच्या संहारक शक्तिमुळे ‘सेटन’ (सैतान) या नावाने ओळखले जाते.
  • त्यामुळे त्याच्या या आणखी प्रगत आवृत्तीस नाटो देशांनी ‘सेटन-२’ असे नाव दिले आहे.

चालू घडामोडी : २६ ऑक्टोबर

‘जेंडर गॅप रिपोर्ट’मध्ये भारत ८७वा

  • लैंगिक समानतेबाबत नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक आकडेवारीनुसार (जेंडर गॅप रिपोर्ट २०१६) १४४ देशांच्या यादीत भारत ८७व्या क्रमांकावर आहे.
  • स्त्री-पुरूषांच्या शिक्षण आणि वेतनातील फरक बऱ्याच अंशी मिटविण्यात भारताला यश आल्यामुळे यंदा या क्रमवारीत भारताचे स्थान २१ क्रमाकांनी वधारले आहे.
  • जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) केलेल्या या सर्वेक्षणात पाकिस्तान मात्र शेवटहून दुसऱ्या स्थानावर असून येमेन अखेरच्या स्थानावर आहे.
  • केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
  • मात्र, अहवालातील आकडेवारीमुळे या योजनांना बराच लांबचा पल्ला गाठायचा असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • भारताने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात असलेली लैंगिक तफावत पूर्णपणे संपुष्टात आणल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  
  • बांगलादेशने या सूचीत भारताला मागे टाकत ७२वे स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ श्रीलंका १००व्या, नेपाळ ११०व्या, मालदीव ११५व्या आणि भूतान १२१व्या स्थानी आहेत.
  • या सूचीत आइसलँडने प्रथम स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ फिनलंड, नॉर्वे आणि स्वीडन असा क्रम आहे.
  • या सूचीत अमेरिका ४५व्या स्थानी आहे. ब्रिक्स राष्ट्रापैंकी दक्षिण आफ्रिका १५व्या, रशिया ७५व्या, ब्राझील ७९व्या आणि चीन ९९व्या स्थानी आहेत.  

‘इज ऑफ डुइंग बिजनेस‘मध्ये भारताला १३०वा

  • भारतात उद्योग-व्यवसायासाठी पुरेसे पोषक वातावरण तयार होण्यास वेळ असल्याचे सूचित करत जागतिक बँकेने ‘इज ऑफ डुइंग बिजनेस‘बाबत भारताला १३०व्या क्रमांकावर स्थान दिले आहे.
  • देशात अद्याप बांधकाम परवाना, कर्जप्राप्ती आणि आणखी काही परिमाणांबाबतीत सुधारणा न झाल्याचे बँकेने म्हटले आहे. 
  • जागतिक बँकेकडून विभिन्न परिमाणांवर १९० देशांची यादी तयार करण्यात आली आहे. गेल्यावर्षी भारत या यादीत १३१व्या स्थानावर होता.
  • सरकारकडून देशात उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारताला आघाडीच्या ५० देशांमध्ये आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. 
  • या अहवालात भारतात सुरु असलेल्या सुधारणांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
  • पाकिस्तान या यादीत १४४व्या क्रमांकावर आहे. जगभरात न्यूझीलंड देशात सर्वाधिक पोषक वातावरण असून सिंगापूर याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

फ्लिपकार्टचे सीएफओ संजय बावेजा यांचा राजीनामा

  • भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) संजय बावेजा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएफओची भूमिका बजावलेल्या बावेजा यांनी दोन वर्षांपुर्वी फ्लिपकार्टमध्ये प्रवेश केला होता.
  • जुलै महिन्यात कंपनीचे कायदेशीर हेड रजिंदर शर्मा यांनीदेखील १० महिन्यांमध्येच राजीनामा दिला होता. 
  • मिंत्राचे संस्थापक व फ्लिपकार्टच्या कॉमर्स व अॅडव्हर्टायझिंग विभागाचे प्रमुख मुकेश बन्सल आणि कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी अंकित नागोरी यांनी वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला निरोप दिला होता.

पॉल बेट्टी यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार

  • अमेरिकेचे लेखक पॉल बेट्टी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ पुरस्कार देण्यात आला.
  • साहित्यातील पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे.
  • पॉल बेट्टी यांच्या प्रसिद्ध 'द सेलआऊट' या कादंबरीला हा पुस्कार मिळाला. या पुरस्कारासाठी ५० हजार पौंड बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहेत. 
  • अमेरिकेतील कृष्णवर्णीय-आफ्रो अमेरिकी वंशाच्या एकेकाळच्या गुलामांची बहुसंख्या असलेले एक शहरच पुसले जाणे, ते पुन्हा वसवताना श्वेतवर्णीयांना खालची वागणूक देण्याचा आटोकाट प्रयत्न होणे, असे 'द सेलआऊट' या कादंबरीचे कथानक आहे.

तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

  • नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात १०५ मताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
  • नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अविश्वासाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
  • यावेळी झालेल्या मतदान प्रक्रियेत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सहभागी झाले होते. भाजपच्या ६ नगरसेवकांनी मात्र अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. 
  • अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यानंतर मुंढे यांच्या बाजूने शहरातील नागरिकांनी जनआंदोलन केले असून, त्यांनी ‘वॉक फॉर कमिशनर’ ही मोहीम सुरू केली आहे.
  • असल्याने या ठरावाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे चार दिवसांपासून राजकीय पटलावर हालचाली तीव्र झाल्या होत्या. अखेर मुंढे यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 
  • मुंढे यांनी नवी मुंबई पालिका आयुक्तपद हाती घेतल्यापासून अनेक धडाकेबाज निर्णय घेतले.
  • त्यांनी प्रशासनाला शिस्त लावली. महापालिकेतील पैशांची उधळपट्टी थांबवली. घोटाळेबाज अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांसाठी ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर सुरू केला. 
  • दरम्यानच्या काळात मुंढे आपल्याला मान देत नाहीत, असे सांगून अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळेच अविश्वास ठराव पुढे करण्यात आला होता.

येडियुरप्पा यांची खाण घोटाळ्यातून निर्दोष सुटका

  • कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांची ४० हजार कोटींच्या खाण घोटाळ्यातून सीबीआयच्या विशेष न्यायालयाले निर्दोष सुटका केली आहे.
  • २०१०मध्ये येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांना ४० कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • येडियुप्पा यांच्या २००८ ते २०११ या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सरकारी फायदे पदरात पाडून घेण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचा आरोप होता.
  • येडियुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 
  • त्यानंतर पक्षातून काही काळ बाहेर पडत स्वत:चा पक्ष त्यांनी स्थापन केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परतले.
  • या प्रकरणी येडियुरप्पा यांना तीन आठवड्यांचा तुरुंगवासही झाला. नंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती.
  • मात्र, आता त्यांच्यासह त्यांचे दोन मुलगे, जावई व जेएसडब्लूच्या अधिकाऱ्यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

चालू घडामोडी : २५ ऑक्टोबर

सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविले

  • टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
  • विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते.
  • रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यात टाटा सन्सचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे.
  • त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोहन सेन यांचा समावेश आहे.
  • २९ डिसेंबर २०१२ रोजी रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर टाटा समूहाच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्रींची निवड करण्यात आली होती.
 सायरस मिस्त्री 
  • टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे सायरस मिस्त्री हे सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे अध्यक्ष होते.
  • यापूर्वी १९३२मध्ये नवरोजी सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळली होती.
  • टाटा समुहाशी त्यांचा संबंध त्यांचे वडिल पालनजी मिस्त्री यांच्यामुळे आला. पालनजी यांची कंपनी दीडशेहून अधिक वर्ष बांधकाम क्षेत्रात होती.
  • सायरस मिस्त्री यांनी लंडनच्या इम्पिरिअल महाविद्यालयातून पदवी घेतली असून लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले.
  • शिक्षण झाल्यावर मिस्त्री हे वडिलांच्या पालनजी कंपनीमध्ये १९९१मध्ये संचालक म्हणून सामील झाले.
  • तीन वर्षांमध्ये ते व्यवस्थापकीय संचालक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने झपाट्याने यशाचे शिखर गाठले.
  • २००६पासून सायरस मिस्त्री टाटा सन्सचे संचालक झाले. नोव्हेंबर २०१२मध्ये ते या कंपनीचे उपाध्यक्ष झाले होते.
  • मिस्त्री यांना टाटामधील सर्वाधिक समभाग असलेल्या शापूरजी पालनजीचे प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष करण्यात आले होते.
  • टाटा उद्योग समूहात मुख्य प्रवर्तक टाटा ट्रस्टचा ६६ टक्के हिस्सा आहे. तर १८.४ टक्क्य़ांसह शापूरजी पालनजी ही दुसरी मोठी भागीदार कंपनी आहे.
  • गेल्या काही वर्षात टाटा कंपनीची वाटचाल मंदावली असल्यामुळे मिस्त्री यांना हटवण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

लुईस हॅमिल्टनचा ५०वा विजय

  • लुईस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रा. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत जेतेपद पटकावून कारकीर्दीतला ५०वा विजय साजरा केला.
  • जेतेपदांचे अर्धशतक पूर्ण करणारा हॅमिल्टन हा अ‍ॅलेन प्रोस्ट (५१) आणि मायकेल शूमाकर (९१) यांच्यानंतरचा तिसरा शर्यतपटू आहे.
  • या विजयामुळे मर्सिडिज संघाचा हॅमिल्टन विश्वविजेत्या शर्यतपटूंच्या यादीत ३०५ गुणांसह दुसऱ्या, तर संघसहकारी निको रोसबर्ग ३३१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
  • अमेरिकास सर्किटवर झालेल्या शर्यतीत हॅमिल्टनने १ तास ३८ मिनिटे १२.६१८ सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले.
  • त्यापाठोपाठ रोसबर्गने ४.५२० सेकंदाने शर्यत पूर्ण करून दुसरे, तर रेड बुलच्या डॅनिएल रिकिआडरेने १९.६९२ सेकंदाने शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान मिळविले.

बालकृष्णला मिस्टर एशिया २०१६ किताब

  • बेंगलुरू येथील व्हाइटफिल्ड परिसरात राहणारा २५ वर्षीय के. जी. बालकृष्ण याने बॉडीबिल्डिंगमधील ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब जिंकला आहे.
  • या विजयी कामगिरीनंतर बालकृष्ण ‘अर्नोल्ड श्वार्झनेगर ऑफ व्हिइटफिल्ड’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
  • फिलिपाईन्स येथे पार पडलेल्या ५व्या ‘फिल-एशिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप’मध्ये बालकृष्णने ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब जिंकला.
  • २०१३मध्ये जर्मनीत भरविण्यात आलेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स अंडर २४ ज्युनियर’ स्पर्धादेखील त्याने जिंकली होती.
  • तर २०१४मध्ये ग्रीसमध्ये भरविण्यात आलेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स अंडर २४ वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये देखील त्याने विजयी कामगिरी केली होती.

नाशिकमध्ये शांतता परिषद

  • नाशिक येथे १९व्या जागतिक शांतता परिषदेचे उदघाटन राज्यपाल सी. विद्याराव यांचे हस्ते २४ ऑक्टोबर रोजी झाले.
  • संयुक्त राष्ट्रांचा वर्धापनदिन, नामदार गोपालकृष्ण गोखले यांची १५१वी जयंतीनिमित्त या जागतिक शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • यावेळी अणु आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना अणु क्षेत्रातील असाधारण कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • या परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर हे असून यावेळी डॉ. मो. स. गोसावी यांचा सहस्त्रचंद्रदर्शन निमित्त सत्कार करण्यात आला.

चालू घडामोडी : २४ ऑक्टोबर

भारतातील तीनपैकी दोन कैदी दुर्बल समाजातील

  • भारतातील बहुतांश कैदी हे समाजातील दुर्बल समाजातील असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आले आहे.
  • या अहवालानुसार देशातील तुरूंगात असणाऱ्या प्रत्येक तीनपैकी दोन कैदी हे अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य मागासवर्गीय वर्गातील आहेत.
  • याशिवाय, बहुतांश कैद्यांचे शिक्षण दहावीपेक्षा कमी असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे.
  • भारतातील एकूण कैद्यांपैकी ९५ टक्के हे पुरूष आहेत. देशातील सर्वाधिक महिला कैद्यांची संख्या (३,५३३) उत्तरप्रदेशात आहे.
  • तुरूंगातील गर्दी लक्षात घेता छत्तीसगढ पहिल्या क्रमांकावर, दादरा आणि नगर हवेली दुसऱ्या तर दिल्लीतील तुरूंग तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • पोलीस आणि न्यायवस्थेकडून दलित समाजासंदर्भात भेदभाव करण्यात येत असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
  • एनसीआरबी या संस्थेकडून देशभरातील कैद्यांची माहिती नोंदविण्यात येते. या संस्थेकडूनकडून २०१५साली हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचे निधन

  • जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला आणि जपानी गिर्यारोहक जुन्को ताबेई (वय ७७) यांचे निधन झाले.
  • वयाच्या ३५व्या वर्षी १९७५मध्ये एव्हरेस्ट सर करत त्या एव्हरेस्टवर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. 
  • ७ खंडांतील ७ सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या पहिल्या महिला बनण्याचा मानही त्यांनी मिळविला. त्यांनी ६०हून अधिक देशांत गिर्यारोहण केले.
  • त्यांनी जपानमध्ये १९६९मध्ये महिलांचा पहिला गिर्यारोहण क्लब सुरू केला. ‘लेटस गो ऑन अ‍ॅन ओव्हरसीज एक्सपीडिशन बाय अवरसेल्व्हज’ हे त्या क्लबचे घोषवाक्य होते.
  • २०११च्या भूकंप आणि त्सुनामीची झळ बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी माऊंट फुजी हे शिखर सर केले होते. हे त्यांचे अखेरचे गिर्यारोहण ठरले.
  • माऊंट एव्हरेस्टच्या चढाईदरम्यान हिमस्खलनामुळे त्या बर्फाखाली गाडल्या गेल्या होत्या. मात्र, एका गाईडने बर्फाखालून सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांनी चढाई सुरू ठेवली.
  • २०१२मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान होऊनही त्या जिद्दीने त्या रोगाशी लढत गिर्यारोहणाचा छंद जोपासत होत्या.

एटी ऍण्ड टी कंपनीकडून टाईम वॉर्नरचे अधिग्रहण

  • एटी ऍण्ड टी कंपनीने ८५.४ अब्ज डॉलरला टाईम वॉर्नर ही कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यामुळे टाईम वॉर्नरच्या मनोरंजन व माध्यम व्यवसायाचा ताबा दूरसंचार कंपनी असलेल्या एटी ऍण्ड टी कंपनीकडे येणार आहे. 
  • हा व्यवहार कर्ज व रोखे अशा स्वरूपात होणार आहे. या व्यवहारातून टाईम वॉर्नरला प्रतिसमभाग १०७.५० डॉलर मिळणार आहेत.
  • या व्यवहारामुळे टाईम वॉर्नरच्या एचबीओ, सीएनएन आणि वॉर्नर ब्रदर्स यांसारख्या वाहिन्या एटी ऍण्ड टीच्या ताब्यात येतील.

चालू घडामोडी : २३ ऑक्टोबर

भारत तिसऱ्यांदा कबड्डी विश्वकप विजेता

  • पहिल्या सत्रात पिछाडीवर असणाऱ्या भारताने इराणवर रोमहर्षक विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
  • कठीण परिस्थितीत अजय ठाकूरने केलेल्या तुफानी आणि निर्णायक चढायांच्या जोरावर भारताने इराणचे आव्हान ३८-२९ असे मोडून काढले
  • इराणचा कर्णधार मेराज शेखच्या दमदार कामगिरीमुळे पहिल्या सत्रात भारत अडखळताना दिसला.
  • पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करत विजय मिळविला.
  • या एका सामन्यात चढायांमध्ये १२ गुण मिळवणारा अजय ठाकूर भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
  • याआधी भारताने २००४ आणि २००७ मध्ये कबड्डी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.
  • महाराष्ट्रात पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर सुमारे ९ वर्षांनंतर अहमदाबादमध्ये कबड्डी विश्वकप २०१६चे आयोजन करण्यात आले होते. 
  • आतापर्यंतच्या तिन्ही विश्वकप अंतिम सामन्यामध्ये भारताने अंतिम फेरीत इराणचाच पराभव केला आहे.

 कबड्डी विश्वकपबद्दल 
  • २००७नंतर १० वर्षांनी पुन्हा एकदा तिसरा कबड्डी विश्वकप (Indoor) भारतात अहमदाबाद, गुजरात येथे होत आहे.
  • हा विश्वकप गुजरातमध्ये होत असला तरी त्याची बीजे महाराष्ट्रातच रोवली गेली. महाराष्ट्रानेच कबड्डी ही सातासमुद्रापार नेण्याचे काम केले.
  • १९८१मध्ये प्रथमच कबड्डी भारताबाहेर म्हणजे जपानला गेली. त्यावेळी दोन पुरुष व दोन महिला संघ असे चार संघ जपानला गेले होते.
  • महाराष्ट्रात २००४ व २००७मध्ये प्रथम विश्वकपचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतर २०१६पर्यंत विश्वकप होऊ शकला नाही.
  • २००४मध्ये साऊथ कॅनरा स्पोर्टस क्लबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते जया शेट्टी यांच्या प्रयत्नाने भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे विश्वकप झाला.
  • नंतर २००७मध्ये विवेक पाटील यांच्या कर्नाळा स्पोर्टस क्लबने पनवेल येथे ही स्पर्धा भरवली.
  • २००४मध्ये १२ तर २००७मध्ये १६ संघ स्पर्धेत सहभागी झाले. पाकिस्तान मात्र एकही विश्वकपमध्ये खेळू शकलेला नाही.
  • या दोन्ही स्पर्धांसाठी शरद पवार यांच्या मदतीने सहभागी देशातील खेळाडूंना येण्याजाण्याच्या प्रवासाची तिकिटे देण्यात आली.
  • २००४मधील स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यावेळी जनार्दनसिंह गेहलोत त्याचे अध्यक्ष बनले.
  • या दोन विश्वकपमध्ये शैलेश सावंत, गौरव शेट्टी, पंकज शिरसाट हे महाराष्ट्राचे खेळाडू खेळले होते. परंतु यंदाच्या विश्वकपमध्ये महाराष्ट्राचा एकही खेळाडू भारतीय संघात नाही.
  • एकूणच जागतिक स्तरावर कबड्डीला नेण्यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन

  • रंगमंचावर नृत्य सादर करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले.
  • भरत नाट्य मंदिर येथे नाट्यत्रिविधा हा नृत्य, नाट्य, संगीताचा विशेष कार्यक्रम २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजिण्यात आला होता.
  • यात अश्विनी एकबोटे यांच्यासह डॉ. रेवा नातू, चिन्मय जोगळेकर अनुपमा बर्वे या कलावंतांचा समावेश होता.
  • हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या एकबोटे यांनी चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता.
  • अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यावरही त्यांचे तितकेच प्रेम होते. त्या नृत्यसंस्थाही चालवत होत्या.
  • चित्रपट : देबू, महागुरू, बावरा प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, हायकमांड, एक पल प्यार का, क्षण हा मोहाचा, मराठा टायगर्स
  • मालिका : दुहेरी, दूर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, कशाला उद्याची बात, अहिल्याबाई होळकर, ऐतिहासिक गणपती 
  • नाटक : त्या तिघींची गोष्ट, एका क्षणात, संगीत बावणखणी

वडोदरा देशातील दुसरे हरित विमानतळ

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे नव्या एकात्मिक विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन केले. कोचीनंतर आता हे देशातील दुसरे हरित विमानतळ आहे.
  • अशा प्रकारचे पहिले विमानतळ कोची येथे असून वडोदरामधील दुसरे विमानतळ देशाला अर्पण करण्यात आले आहे.
  • यावेळी मोदी यांनी वडोदरामध्ये पहिले रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णयदेखील जाहीर केला.

चालू घडामोडी : २२ ऑक्टोबर

गोरखा रायफल्सला कॅम्ब्रिअन गस्त अभ्यासात सुवर्णपदक

  • भारतीय लष्कराच्या गोरखा रायफल्सने जगातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या कॅम्ब्रिअन गस्त अभ्यासात सुवर्णपदक जिंकले आहे.
  • ब्रिटीश लष्कराने वेल्समध्ये आयोजित केलेल्या या अभ्यासात गोरखा रायफल्सच्या दुसऱ्या बटालिअनमधील ८ जवानांना सुवर्णपदक देण्यात आले.
 कॅम्ब्रिअन गस्त अभ्यास 
  • कॅब्रियन गस्त अभ्यास वेल्समधील कॅब्रियन डोंगररागात दरवर्षी पार पडतो. या अभ्यासात जगभरातील सैन्याचे पथक सामील होतात.
  • यामध्ये जवानांना ५५ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. हा मार्ग अत्यंत खडतर असतो आणि ४८ तासांमध्ये त्यांनी हे अंतर पूर्ण करणे गरजेचे असते.
  • यामध्ये जवानांना आव्हानांचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांना सोबत दिलेले सामान आणि किट बाळगावे लागते.
  • यातील काही सामान हरवल्यास संघाचे गूण वजा होत जातात. या सराव मोहीमेत जवानांची गुणवत्ता ही टक्केवारीच्या आधारे ठरते.
  • सुवर्ण पदक विजेत्या संघाला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण, रौप्य पदक पटकावणाऱ्या संघाला ६४ ते ७५ टक्के आणि कांस्य पदकासाठी ५५ ते ६४  टक्के मिळवणे गरजेचे असते.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइल फोनवर बंदी

  • शत्रू देशांकडून सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाने यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइल फोन वापरावर बंदी घातली आहे.
  • सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीनकडून सायबर हल्ल्यांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय तसेच धोरणासंबंधी अतिसंवेदनशील माहिती बाहेर फुटू नये, यासाठी खबरदारीच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.  
  • याव्यतिरिक्त पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय या भागातही स्मार्टफोनवर वापरावर बंदी घातली गेली आहे.

सादिक खान इग्लंमधील सर्वाधिक प्रभावशाली आशियाई

  • इग्लंमधील प्रभावशाली आशियाई नागरिकांच्या यादीमध्ये लंडनचे महापौर पाकिस्तानी वंशाचे सादिक खान सर्वात प्रभावशाली आशियाई ठरले आहेत.
  • या यादीमध्ये १०१ जणांचा समावेश आहे. मलाला युसूफझई, हिंदुजा बंधू, लक्ष्मी मित्तल यांनीही या यादीत स्थान मिळविले आहे. 
  • या यादीत माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून सरकारमध्ये व्यापार, नवोन्मेष आणि कौशल्यमंत्री राहिलेले साजीद जावेद दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • तर भारतीय वंशाच्या विद्यमान आंतरराष्ट्रीय विकासमंत्री प्रीती पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • नोबेल पुरस्कार विजेते सर व्यंकटरमन रामकृष्णन चौथ्या, एस.पी. हिंदुजा यांचा हिंदुजा परिवार सहाव्या क्रमांकावर आहे.

पुण्याच्या ‘स्वयम्’ला मोमेंटम फॉर चेंज पुरस्कार

  • संयुक्त राष्ट्रसंघातर्फे देण्यात येणाऱ्या ‘मोमेंटम फॉर चेंज’ या पुरस्कारासाठी पुण्याच्या स्वयम्‌ शिक्षण प्रयोग (एसएसपी) या संस्थेची निवड झाली आहे.
  • वातावरण बदल, कार्बन उत्सर्जन घटविणे, अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा प्रसार यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
  • या पुरस्कारासाठी जगातील चार संस्थांची निवड झाली असून, त्यात स्वयम्‌ ही भारतातील एकमेव संस्था आहे.
  • पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या मोरोक्को, नेपाळ व युगांडातील तीन संस्थांनाही राष्ट्रसंघाच्या वतीने गौरविले जाणार आहे.
  • स्वयम्‌च्या वतीने ११०० महिलांच्या स्वयंरोजगार संस्था ग्रामीण भागात चालविल्या जातात.
  • त्या माध्यमातून सुमारे एक लाखाहून अधिक महिलांना निर्धूर चुली व अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या उपकरणांचे वितरण केले आहे.

सर डेव्हिड कॉक्स यांना स्टॅटिस्टिक्स फाऊंडेशनचा पुरस्कार

  • सर डेव्हिड कॉक्स यांना स्टॅटिस्टिक्स फाऊंडेशनचा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • १९७२मध्ये सांख्यिकी क्षेत्रात त्यांचा प्रमाणात्मक हानी सिद्धांताबाबतचा शोधनिबंध खूप प्रसिध्द झाला होता.
  • कॉक्स यांनी मांडलेले प्रारूप हे विशिष्ट घटकांच्या आधारे मृत्युदर किंवा विशिष्ट गुणधर्माच्या आधारे रुग्णांचे वाचण्याचे प्रमाण सांगते.
  • त्यामुळे उपचार मूल्यमापनापासून ते शाळांतील मुलांची गळती, त्याची कारणे, एड्स पाहणी यंत्रणा, रोगप्रसाराची जोखीम यात बराच फायदा झाला आहे.
  • कॉक्स यांचा सिद्धांत हा विज्ञान व अभियांत्रिकीच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात वापरला जातो.
  • कॉक्स यांचा जन्म १९२४मध्ये बर्मिगहॅम येथे झाला. त्यांचे वडील जवाहिऱ्याच्या उद्योगात काम करीत होते.
  • त्यांनी सांख्यिकीचे शिक्षण केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून घेतले. लीड्स विद्यापीठातून ते पीएच. डी. झाले.
  • केंब्रिज विद्यापीठाची सांख्यिकी प्रयोगशाळेत संशोधन केल्यानंतर ते ब्रिकबेक कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले.
  • १९६६मध्ये ते लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या सांख्यिकी अध्यासनाचे प्रमुख बनले. १९६६ ते १९९१ या काळात ते बायोमेट्रिकचे संपादकही होते. 
  • त्यांनी ३०० शोधनिबंध व पुस्तके लिहिली, त्यात द प्लानिंग ऑफ एक्सपिरिमेंट्स, क्यूज, अ‍ॅनॅलिसिस ऑफ सव्‍‌र्हायव्हल डाटा यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे.
  • रॉयल सोसायटीचे ते फेलो असून त्यांना कर्करोगाच्या सांख्यिकी संशोधनासाठीचे केटरिंग प्राइज व सुवर्णपदक मिळाले होते.
  • १९८५मध्ये त्यांना नाइटहूड किताबाने सन्मानित करण्यात आले. रॉयल सोसायटीने त्यांना कोपली पदक देऊन सन्मानित केले.
  • त्यांनी सांख्यिकीचा वापर प्रत्यक्ष व्यवहारात करून दाखवला तसेच या क्षेत्रात अनेक तरुण संशोधक घडवले.

चालू घडामोडी : २१ ऑक्टोबर

बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध

  • लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई करणाऱ्या बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत.
  • बीसीसीआय व राज्य क्रिकेट संघटनांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • त्याचबरोबर, लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही बीसीसीआयला दिले आहेत.
  • लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यावरून बीसीसीआय व समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन संघर्ष सुरू आहे.
  • बीसीसीआयने यासंदर्भात न्यायालयात धाव घेऊन शिफारसी लागू करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती.
  • ही मागणी फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत लोढा समितीच्या शिफारशी लागू कराव्या लागतील, असे म्हटले  होते.
 न्यायालयाचे आदेश 
  • बीसीसीआयच्या बँक खात्यांची व बड्या रकमेच्या करारांची चौकशी करण्यासाठी लोढा समितीने स्वतंत्र लेखापरीक्षक (ऑडिटर) नेमावा.
  • महागड्या करारांसाठी रकमेची मर्यादा निश्चित करून भविष्यात या करारांची छाननीदेखील लेखापरीक्षकामार्फत करून घ्यावी.
  • बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी स्वत: समितीसमोर हजर राहून शिफारशींच्या अंमलबजावणी कधीपर्यंत करणार याची माहिती द्यावी.
  • बीसीसीआयकडून केल्या जाणाऱ्या महागड्या करारांवर लक्ष ठेवा आणि ठराविक रकमेच्या करारांनाच मान्यता द्या.
  • लोढा समितीच्या मान्यतेशिवाय बीसीसीआयला यापुढे कोणताही करार करता येणार नाही.

अमेरिकेतील महत्त्वाच्या मंडळावर डॉ. रेणू खटोड

  • अमेरिकेतील महत्त्वाच्या डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटीच्या शैक्षणिक सल्लागार मंडळावर भारतीय वंशाच्या डॉ. रेणू खटोड यांची नियुक्ती झाली.
  • भारतातील मंत्रालयांमध्ये गृह खात्याप्रमाणे असलेले होमलॅण्ड सिक्युरिटी हे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाते आहे.
  • डॉ. खटोड यांची नियुक्ती झालेल्या सल्लागार मंडळात त्या एकमेव भारतीय वंशाच्या आहेत.
  • देशांतर्गत सुरक्षा आणि शैक्षणिक धोरणे ठरवताना उपयुक्त ठरतील अशा शिफारशी मंत्रालयास सादर करण्याची जबाबदारी या मंडळावर आहे.
  • प्रा. डॉ. खटोड या मूळच्या उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रहिवासी आहेत. १९७३साली कानपूर विश्वविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली.
  • त्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्या पर्ड्यू विद्यापीठात गेल्या. तेथे राज्यशास्त्रात त्यांनी एमए केले.
  • काही काळ स्थानिक महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन सुरू केले. कालांतराने पीएच.डी.च्या संशोधनासाठी त्या पुन्हा पडर्य़ू विद्यापीठात आल्या.
  • १९८५मध्ये त्यांचा प्रबंध स्वीकारला गेला आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयातील डॉक्टरेट त्यांनी मिळवली.
  • २००८पासून त्या युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन सिस्टीमच्या चॅन्सेलर तर ह्युस्टन विद्यापीठाच्या अध्यक्ष आहेत.
  • जागतिक हवामान बदल, पर्यावरणीय राज्यशास्त्र आणि धोरणे यांसारख्या अनेक विषयांवरील त्यांचे शोधनिबंध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
  • डॉ. खटोड यांचे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आर्थिक, सामाजिक क्षेत्रांतही योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
  • फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ डलास तसेच भारतीय पंतप्रधानांच्या जागतिक सल्लागार मंडळावर त्या कार्यरत होत्या.
  • अमेरिकेसारख्या देशातील महत्त्वाच्या मंडळावर काम करण्याची संधी जन्माने भारतीय असलेल्या महिलेस मिळणे हा आपल्या देशाचा बहुमान आहे.

नवदीपसिंग सूरी युएईमध्ये भारताचे राजदूत

  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे राजदूत म्हणून नवदीपसिंग सूरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे एकंदर लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण ३७ ते ४२ टक्के आहे, 
  • सध्या ते ऑस्ट्रेलियात भारताचे उच्चायुक्त आहेत. पुढील महिन्यात ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये पदाची सूत्रे स्वीकारतील. 
  • अमृतसर येथील गुरुनानक विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर ‘सेल’ या सर्वात मोठ्या सरकारी उद्योगात काही काळ नोकरी केली.
  • त्यांनी भारतीय विदेश सेवेत १९८३मध्ये प्रवेश मिळवला. सूरी यांनी परकीय भाषा म्हणून अरबीची निवड केली.
  • कैरोतील भारतीय वकिलातीत १९८४साली त्यांना नियुक्ती मिळाली.  कैरोतीलच अमेरिकन विद्यापीठात अरबीमध्ये रीतसर शिक्षणही घेतले.
  • मग ३ वर्षे जगातील मोजक्या प्राचीन शहरांपैकी असलेल्या दमास्कस, अलेप्पोमध्ये त्यांनी सेवा बजावली.
  • १९९३मध्ये त्यांची वॉशिंग्टन येथील भारतीय वकिलातीत नियुक्ती झाली. नंतर १९९७साली टांझानियातील दार-एस-सलाम येथे त्यांना पाठविण्यात आले.
  • २०००साली लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयातील वृत्त विभागाचे प्रवक्ते आणि प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
  • २००९मध्ये पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेला फेसबुक, ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांशी जोडण्याच्या कामात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
  • प्रख्यात पंजाबी कादंबरीकार नानकसिंग हे सूरी यांचे आजोबा आहेत. त्यांच्या तीन कादंबऱ्यांचे सूरी यांनी इंग्रजी अनुवाद केले आहेत.

हैमा वादळाचा फिलिपिन्सला तडाखा

  • मागील तीन वर्षांतील सर्वांत भयंकर अशा ‘हैमा’ वादळाने फिलिपिन्समध्ये धडक दिली असून, या वादळाच्या तडाख्यात १२ लोकांचा मृत्यु झाला आहे.
  • फिलिपिन्सच्या उत्तर प्रांतामध्ये हजारो हेक्टर शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामध्ये भात आणि मक्याच्या शेतांचे अमर्याद नुकसान झाले आहे.
  • ताशी २२५ किलोमीटर वेगाचे वारे आणि मुसळधार पावसासह कॅगायन प्रांतात या वादळाने धडक दिली. तेथे किमान ५० ते ६० हजार हेक्टर भात शेती जमीनदोस्त झाली.

चालू घडामोडी : २० ऑक्टोबर

जीएसटी दराबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये एकमत नाही

  • जीएसटीचा दर काय असावा यावर जीएसटी परिषदेच्या तीन दिवसांच्या बैठकीत एकमत होऊ न शकल्याने हा दर निश्चित करण्यासाठी परिषदेची बैठक ३ व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे.
  • ही नवी कर प्रणाली लागू केल्यावर ज्या राज्यांचे महसुली नुकसान होईल त्यांना भरपाई देण्याची व्यवस्था कशी करावी, यावर मात्र एकमत झाले.
  • जीएसटी दराबाबत मात्र केंद्र आणि राज्यांमध्ये अजूनही विचार विनिमय होण्याची गरज आहे.
  • जीएसटी विधेयक मंजुरीनंतर आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एसजीएसटी आणि सीजीएसटी ही दोन विधेयके मंजूर करण्याला सरकारचे प्राधान्य आहे.
  • त्या पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती घडवून आणण्यासाठी जीएसटी परिषदेची बैठक बोलावली होती.

भारत आणि म्यानमार दरम्यान तीन करार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आँग सान स्यू की यांनी कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासंबंधी तीन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. 
  • मोदी आणि स्यू की या दोन्ही नेत्यांनी भारत आणि म्यानमारच्या सुरक्षा संबंधांवर प्रामुख्याने भर दिला.
  • प्रदेशात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी सहकार्य वाढविणे आणि एकत्रितपणे काम करण्याला दोन्ही देश प्राधान्य देणार आहेत.

भारत आणि चीनच्या लष्कराचा संयुक्त लष्करी सराव

  • भारत आणि चीनच्या लष्कराने २० ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पूर्व लडाखमध्ये संयुक्त लष्करी सराव केला.
  • या दोन देशांतील लष्करांनी भारतीय हद्दीत प्रथमच अशा प्रकारच्या सरावामध्ये भाग घेतला. 
  • सीमेलगतच्या एका भारतीय खेड्यात भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीनंतरच्या मदतकार्याचा दोन्ही देशांच्या लष्करांनी सराव केला.
  • याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतीय आणि चीनी लष्कराने चीनच्या हद्दीत अशाच प्रकारचा सराव केला होता.
  • भारतीय लष्करी पथकाचे नेतृत्व ब्रिगेडियर आर. एस. रामन आणि चीनी लष्करी पथकाचे नेतृत्व वरिष्ठ कर्नल फान जून यांनी केले. 
  • आण्विक पुरवठादार देशांच्या गटातील समावेशावरून आणि मसूद अझर याला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या मुद्यावरून भारत आणि चीनमधील संबंधांत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
  • चीन वारंवार पाकिस्तानची पाठराखण करत असून, भारताच्या भूमिकेला विरोध करत आहे.
  • या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील संयुक्त लष्करी सरावाच्या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सात भारतीय कंपन्यांना ‘टाइम्स नेटवर्क’तर्फे पुरस्कार

  • केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेत मोलाचे योगदान देणाऱ्या कंपन्यांना ‘टाइम्स नेटवर्क’तर्फे पुरस्कार देण्यात आले. भारतातील सात कंपन्या या पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या.
  • नवी दिल्लीतील ‘ताज पॅलेस’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया समिट अँड अॅवॉर्डस’ या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
  • ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून भारताला जगातील आघाडीचा उत्पादक देश करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने आखले आहे.
  • सकल राष्ट्रीय उत्पन्नात देशांतर्गत उत्पादनाचा वाटा २५ टक्के असावा, असाही सरकारचा प्रयत्न आहे.
 पुरस्कार यादी 
  • इस्रो : मेक इन इंडियासाठी उच्च तंत्रज्ञान पुरवणे.
  • हिंदुस्तान युनिलिव्हर लि. : सातत्यपूर्ण उत्पादन.
  • जीई इंडिया : मेक इन इंडियामध्ये सर्वाधिक गुंतवणूक.
  • सन फार्मा : मेक इन इंडियाच्या माध्यमातून सर्वाधिक निर्यात.
  • भारत फोर्ज लि. : उत्पादनांचे स्वदेशीकरण.
  • बॉस्क इंडिया : मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्मार्ट उत्पादन.
  • पतंजली आयुर्वेद : मेक इन इंडियाच्या माध्यमातून अभिनव उत्पादन.

प्राजना चौथा यांना फ्रान्सचा नाईटहूड किताब

  • हत्तींबाबत संशोधन करणाऱ्या संशोधिका प्राजना चौथा यांना फ्रान्सचा नाईटहूड किताब जाहीर झाला आहे.
  • प्राजना चौथा यांना सुरुवातीपासून हत्तींमध्ये स्वारस्य आहे. दोन दशके त्या हत्तींवर संशोधन करीत आहेत. कर्नाटकातील नागरहोल येथे त्या पाच हत्तींबरोबरच राहतात.
  • त्यांनी हत्तींशी नाते जोडताना आने माने फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. त्याचा उद्देश आशियायी हत्तींचे संवर्धन हा आहे.
  • ‘द ओल्ड एलिफंट रूट’ हा चित्रपट त्यांनी भारत-म्यानमार सीमेवर हत्तींच्या स्थलांतर मार्गावर केलेल्या संशोधनावर चित्रित केला आहे.
  • प्राजना यांचे वास्तव्य भारत, आफ्रिका व युरोपात असे होते. अनेकदा त्यांनी त्यांचे उद्योगपती वडील डी. के. चौथा यांच्याबरोबर जगप्रवासही केला.
  • लंडन विद्यापीठातून त्यांनी मानववंशशास्त्र व कलाइतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
  • कर्नाटकातील जेनू कुरुबा आदिवासींसमवेत काम करताना त्यांना हत्तींचे संशोधन करावेसे वाटले.
  • आशियन हत्तींचे जतन केले पाहिजे, अन्यथा ते नष्ट होतील, असे त्या सांगतात. भारत व म्यानमार या देशांत एकूण १६ हजार हत्ती आहेत; त्यांच्या संवर्धनावर त्यांचा भर आहे.

आयएनएस अरिहंत नौदलात दाखल

  • भारताने ‘आयएनएस अरिहंत’ ही स्वदेशी बनावटीची पहिली अण्वस्त्रक्षम पाणबुडी ऑगस्ट महिन्यात नौदलात दाखल केली.
  • या पाणबुडीमुळे आकाश, जमीन आणि पाणी या तीनही ठिकाणांहून आण्विक हल्ले करण्याची (आण्विक त्रिशक्ती) क्षमता भारताने साध्य केली.
  • अरिहंत ही भारताची स्वदेशी बनावटीची पहिली अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्र असलेली पाणबुडी आहे.
  • या पाणबुडीवर के-१५ या ७५० किमीपर्यंत अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत.
  • तसेच ३५०० किमीचा पल्ला असलेले के-४ हे क्षेपणास्त्रही पाणबुडीवर तैनात केले जाणार आहे.
  • अण्वस्त्रक्षम पाणबुडी सध्या भारतासह केवळ अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनकडे आहेत. 
 ‘अरिहंत’ची वैशिष्ट्ये 
  • वजन : ६००० टन
  • वेग : २२ नॉटिकल मैल/तास
  • लांबी : १०४ मीटर
  • रुंदी : १० मीटर
  • रिऍक्टर क्षमता : ८३ मेगावॉट
  • हल्ला करण्याची क्षमता : ३५०० किमीपर्यंत 

भारतीय टीव्ही आणि रेडिओ चॅनेल्सवर पाकिस्तानमध्ये बंदी

  • भारतीय टीव्ही आणि रेडिओ चॅनेल्सवर २१ ऑक्टोबरपासून पुर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने घेतला आहे.
  • जो कोणी रेडिओ आणि टीव्ही स्टेशन बंदीचे उल्लंघन करेल त्यांना कोणतीही नोटीस न देता परवाना रद्द करण्यात येणार आहे.
  • भारताशी संबंधित कोणतेच कार्यक्रम, सिरिअल आणि चित्रपट यामुळे दाखवण्यात येणार नाही आहेत.
  • भारतीय मीडियाला देण्यात आलेले हक्कदेखील काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवेज मुशर्रफ यांचे सरकार असताना २००६मध्ये हे हक्क देण्यात आले होते. 
  • १८ सप्टेंबरला झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना आणि त्यांच्या चित्रपटांना विरोध होत आहे.
  • भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना नोटीस

  • पनामा पेपर्स लीक प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना नोटीस बजावली आहे.
  • फेडरल ब्युरो ऑफ रेव्हेन्यू (एफबीआर)ने नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये शरीफ यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे.
  • शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाने बेकायदेशीरपणे देशाबाहेर पैसा पाठवल्याचे पनामा पेपर्सच्या माध्यमातून उघड झाले आहे.
  • एप्रिलमध्ये उघड झालेल्या पनामा पेपर्स लीकमुळे जगभरात खळभळ उडाली होती. या कागदपत्रांनुसार पनामा येथील मोसाक फोन्सेका ही कंपनी जगभरातील धनाढ्यांच्या कंपन्यांचे व्यवहार सांभाळत असे.

चालू घडामोडी : १९ ऑक्टोबर

भारत आणि रशियाचे नव्या ‘जनरेशन‘चे ब्राम्होस

  • भारत आणि रशिया संयुक्तपणे ६०० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे नव्या ‘जनरेशन‘चे ब्राम्होस क्षेपणास्त्र विकसित करणार आहेत.
  • चीन आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
  • त्यामुळे फ्रान्सबरोबर राफेल लढाऊ विमानांचा, रशियाकडून एस-४०० मिसाईल सिस्टीम खरेदीचा करार केल्यानंतर भारत आता रशियाबरोबर मिळून नव्या पिढीची ब्राम्होस क्षेपणास्त्र विकसित करणार आहे. 
  • ची सध्याची क्षमता ३०० किमी आहे. या रेंजमध्ये पाकिस्तानात खोलवर लक्ष्यांना टार्गेट करता येत नाही.
  • भारताकडे ब्राम्होसपेक्षा जास्त रेंजची क्षेपणास्त्रे आहेत. पण ब्राम्होसमध्ये विशिष्ट लक्ष्याला टार्गेट करण्याची क्षमता आहे.
  • या नव्या क्षेपणास्त्रांची रेंज ६०० किलोमीटर पेक्षा अधिक असेल तसेच लक्ष्याचाही अत्यंत अचूक वेध घेईल.
  • या क्षेपणास्त्रामुळे भारताला पाकिस्तानातील कुठल्याही ठिकाणाला लक्ष्य करता येईल.
  • क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण समूह (MTCR) मध्ये समावेश झाल्यामुळे भारताला हे तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे. 
  • एमटीसीआरच्या नियमानुसार गटाचे सदस्य नसलेल्या देशांना ३०० किमीपेक्षा जास्त रेंजच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची विक्री करता येत नाही.
  • पाकिस्तानबरोबर कुठल्याही प्रकारच्या युद्धात हे क्षेपणास्त्र गेमचेंजर ठरेल. ब्राम्होसमध्ये शत्रूच्या क्षेपणास्त्र सिस्टीमला भेदण्याची क्षमता आहे.

जीएसटी परिषदेच्या बैठकीस सुरूवात

  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषदेच्या तीन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठकीस १८ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली.
  • नवीन वर्षात १ एप्रिल २०१७पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करावायचा आहे. 
  • त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तुंसाठी संभाव्य जीएसटी दरासाठी ६ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २६ टक्के असे चार टप्पे निश्चित करण्यात आले.
  • पहिल्या दिवशी राज्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. यावर सर्व राज्यांचे एकमत झाले आहे. 
  • ईशान्येकडील ११ राज्ये व डोंगराळ भागांना नव्या कर प्रणालीत कसे सामावून घ्यायचे याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
  • जीएसटी परिषदेत सर्व मुद्यांबाबत सहमती होण्यासाठी अर्थ मंत्रालयाने २२ नोव्हेंबरची अंतिम तारीख निश्चित केली आहे.
  • गेल्यावर्षी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जीएसटीसाठी मोठय़ा प्रमाणातील वस्तूंसाठी १७-१८ टक्के कराचा दर ठेवण्याची शिफारस केली होती.
  • तर कमी किंमतीच्या वस्तूंसाठी १२ टक्के आणि महागड्या कार, मद्य, पानमसाला व तंबाखू आदीसाठी ४० टक्के कर आकारण्याचे सुचविले होते.
  • तसेच मौल्यवान धातूंसाठी २ ते ६ टक्के करदराची शिफारस करण्यात आली होती.

मेक माय ट्रीप आणि आयबिबोचे विलीनीकरण

  • पर्यटन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी मेक माय ट्रीप आणि आयबिबो ग्रूप या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे.
  • या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने या निर्णयाला मंजुरी दिली याची घोषणा १८ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
  • या विलीनीकरणामुळे आता मेक माय ट्रीप, गो आयबिबो, राईड, राईटस्टे आणि रेडबस या उपकंपन्याही एकत्र येणार आहे.
  • मेक माय ट्रीप ही वेबसाईट देश-विदेशातील हॉटेलमध्ये बुकींग, खासगी व व्यावसायिक टूरचे नियोजन आणि हवाई तिकीटाची नोंदणी यासाठी आघाडीवर आहे.
  • तर आयबिबोच्या गो आयबिबो आणि रेड बस या वेबसाईट हवाई तिकीटांची नोंदणी तसेच बस प्रवासाची ऑनलाईन नोंदणीसाठी प्रसिद्ध आहेत.
  • विलिनीकरणानंतर दिप कालरा हे मेक माय ट्रीपचे सीईओ आणि समूह अध्यक्ष तर राजेश मॅगोव हे मेक माय ट्रीपचे भारतातील सीईओ असतील.
  • आयबिबोचे संस्थापक आणि सीईओ आशिष कश्यप हे मेक माय ट्रीपच्या व्यवस्थापकीय मंडळात सामील होतील. ते सहसंस्थापक पदावर असतील.
  • आशिष कश्यप यांनी २००७ मध्ये आयबिबो समुहाची स्थापना केली होती.

सर्वोत्तम पर्यटन ठिकाणांच्या यादीत कक्काथुरुथू बेट

  • केरळच्या कक्काथुरुथू या बेटाला ‘नॅशनल जिओग्राफिक’ नियतकालिकाने प्रसिध्द केलेल्या जगातील सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
  • नॅशनल जिओग्राफिकने ‘अराऊंड द वर्ल्ड इन २४ अवर्स’ या नावाने पर्यटनासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे.
  • त्यात २४ तासांत जगातील कोणती ठिकाणे, कोणत्या वेळी सर्वोत्तम आणि प्रेक्षणीय असतात, याचा वेध घेण्यात आला आहे.
  • निळेशार पाणी, नारळाची झाडे यांच्या सान्निध्यात या बेटावरून सूर्यास्त पाहणे, हा आनंददायी अनुभव आहे, नॅशनल जिओग्राफिकने म्हटले आहे.
  • केरळला निसर्गाचे वरदान लाभले आहे. जगभरातील पर्यटक केरळला भेट देतात.
  • कोचीपासून जवळ असलेल्या कक्काथुरुथला पारंपरिक बोटीने जाता येते. हे बेट पक्षी निरीक्षकांसाठीही पर्वणी आहे

अनुसूचित जाती-जमाती हबची निर्मिती

  • देशातील दलित व आदिवासी समुदायातील उद्योजकांना व्यापार, उद्योग क्षेत्रामध्ये चालना देण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती-अनूसूचित जमाती हबची (एससी-एसटी) निर्मिती करण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन करण्यात आले. या हबसाठी प्राथमिक खर्च ४९० कोटी रुपये येणार आहे. 
  • एससी-एसटी हब बाजाराची उपलब्धता, देखरेख, बांधणी क्षमता, आर्थिक साह्याच्या योजना, सर्वोत्तम व्यापार पद्धतींविषयी जनजागृती आदी कार्यक्रम राबविण्यामध्ये मदत करणार आहे.
  • याचसोबत केंद्र सरकारने सार्वजनिक खरेदी धोरणाचे उद्दिष्ट साध्य करताना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वयंपूर्ण बनविण्यास मदत करणार आहे.
  • २०१२च्या सार्वजनिक खरेदी धोरणानुसार केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील गुंतवणुकीमध्ये ४ टक्के गुंतवणूक ही अनूसूचित जाती-जमातीच्या उद्योजकांसाठी असावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

नवाज शरीफ पीएमएल-एन पक्षाच्या अध्यक्षपदी निवड

  • पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग : नवाज (पीएमएल-एन) पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
  • पनामा पेपर्सप्रकरणी आरोप झाल्यानंतर पद सोडण्यासाठी शरीफ यांच्यावर मोठा दबाव आला होता.
  • अध्यक्षपदासाठी झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत शरीफ यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.
  • पीएमएल-एनचे ज्येष्ठ नेते रजा झफरूल हक यांची पक्षाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

चालू घडामोडी : १८ ऑक्टोबर

इरोम शर्मिला यांची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

  • सोळा वर्षे उपोषण केल्यानंतर राजकारणात येण्याची घोषणा करणाऱ्या आयर्न लेडी इरोम शर्मिला यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
  • पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स या नव्या पक्षाच्या माध्यमातून त्या जनतेची सेवा करणार आहेत.
  • याच महिन्यात इरोम शर्मिला यांना जिल्हा न्यायालयाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका खटल्यात निर्दोष ठरवले होते.
  • मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हटवण्याच्या मागणीसाठी त्यांनी १६ वर्षे उपोषण केले होते.
  • त्यांना त्यात यश आले नाही. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले व राजकीय पक्ष स्थापण्याची भुमिका घेतली होती.
  • इरोम शर्मिला यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काँग्रेसला कशा पद्धतीने पराभूत करायचे, याचे धडे घेतले.
  • काँग्रेस आणि भाजपला हरविण्यासाठी आम आदमी पक्षाने काय रणनिती आखली होती, हे त्यांनी जाणून घेतले.
  • इरोम शर्मिला यांनी उपोषण सोडल्यानंतर भाजपने त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते.
  • तसेच २०१४साली आम आदमी पक्षाने इरोम शर्मिला यांना मणिपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती.

डॉ. सलील लचके यांना गेरार्ड जे मॅँगोन तरुण वैज्ञानिक पुरस्कार

  • मोतीबिंदूसह इतर नेत्ररोगांवर संशोधन करणारे डॉ. सलील लचके यांना फ्रान्सिस एलसन सोसायटीच्या गेरार्ड जे मॅँगोन तरुण वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • पुणे विद्यापीठातून बीएस्सी व एमएस्सी केल्यानंतर, सध्या ते डेलावर विद्यापीठात जैवविज्ञानाचे सहायक प्राध्यापक आहेत. तेथे त्यांनी जीवशास्त्रात पीएच.डी. केली.
  • सस्तन प्राण्यांच्या डोळ्याची रचना समजून घेऊन मोतीबिंदू लांबवणे हा लचके यांच्या संशोधनाचा एक विषय आहे.
  • लचके यांना सोल लॅबचे सदस्य असताना शोधनिबंधासाठी पुरस्कार मिळाला. त्यामुळे त्यांना संशोधनासाठी आणखी प्रेरणा मिळाली.
  • त्यांनी नंतर ३२ शोधनिबंध लिहिले असून २०१२मध्ये त्यांना प्यू चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार जैववैद्यकात मिळाला होता. 
  • सध्या ते नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या १.९५ दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पावर काम करीत असून डोळ्यांची भिंगे पेशीय व रेणवीय प्रक्रियांनी पारदर्शक कशी ठेवता येतील हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
  • डोळ्याच्या रोगास कारण ठरणाऱ्या जनुकांचे नियंत्रण करणे हा त्याच्या संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहे.
  • त्यामुळे लचके यांचे संशोधन संपूर्ण जगातील लोकांना नेत्रआरोग्य मिळण्यासाठी वरदान ठरणार आहे.

बीसीसीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  • लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी अडथळे आणत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. 
  • सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला जस्टिस लोढा यांच्या शिफारसी पूर्णपणे लागू करण्याचे आदेश दिले होते.
  • आता पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आल्याने बीसीसीआयला शिफारशी लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

टिफ्सा जागतिक स्पर्धेमध्ये भारताला चार पदके

  • भारताच्या मल्लांनी इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या टिफ्सा जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये एका सुवर्णपदकासह एकूण चार पदकांची कमाई केली.
  • भारताच्या दालमियाने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटामध्ये अझरबैजानच्या महंमद सहानचाप पराभव करत सुवर्णपदक पटकावले. 
  • भारताचा लवसिंग ८० किलो गटात रौप्यपदक विजेता ठरला. अंतिम फेरीत अझरबैजानच्या महंमद आलिमने लववर ५-१ अशी मात केली.
  • याशिवाय नवीन कुमार आणि जोशील या भारतीय कुस्तीगिरांनी आपापल्या गटात ब्राँझपदक जिंकले.
  • नवीनने ९० किलो गटात ब्राँझपदकाच्या लढतीत लिथुआनियाच्या ओलेग याला पराभूत केले.
  • तर जोशीलने सुपर हेवीवेट (९७ ते १२५ किलो) गटात अफगाणिस्तानच्या मुस्तफा सुलतानीचा पराभव करून ब्राँझपदकावर नाव कोरले.

सायना नेहवालची आयओसी अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी निवड

  • भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. 
  • या अॅथलिट्स कमिशनचे अध्यक्षपद अँजेला रुजारिओ भूषवत असून,  या कमिशनमध्ये नऊ उपाध्यक्ष आणि दहा सदस्य आहेत.