चालू घडामोडी : २८ ऑक्टोबर
‘नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी’ योजनेला मंजुरी
- नरेंद्र मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्पाचा एक भाग असलेल्या ‘नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी’ (एनएडी) या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
- यामुळे देशातील सर्व शालेय मंडळे, मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांच्या गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्रेही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.
- ‘डिजिटल डिपॉझिटरी‘ ठेवणे हे देशातील प्रत्येक शिक्षणसंस्थेला बंधनकारक राहणार आहे. यामुळे व्यवस्थेतील याबाबतचा गैरप्रकार थांबेल व पारदर्शकता येईल.
- या नव्या योजनेत सीबीएसईसह सर्व परीक्षा मंडळे, विद्यापीठ अनुदान आयोग, तंत्रशिक्षण संस्था आदी मान्यताप्राप्त संस्थांचा समावेश होणार आहे.
- प्रत्येक वर्षी किमान पाच कोटी दस्तावेज डिजिटल करण्याचे उद्दिष्ट मंत्रालयाने समोर ठेवले आहे.
- यां योजनेसाठी आगामी तीन वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद करण्यात आली आहे.
- गुणपत्रिका व पदव्या डिजिटल करण्याची मूळ कल्पना ‘यूपीए’ सरकारमध्ये कपिल सिब्बल यांच्या कारकिर्दीत जन्माला आली होती.
- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री : प्रकाश जावडेकर
गोव्याच्या एकमेव महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे निधन
- गोव्याच्या आतार्पयतच्या एकमेव महिला मुख्यमंत्री ठरलेल्या शशिकला काकोडकर यांचे २८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.
- गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या त्या कन्या होत्या. गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणून शशिकला काकोडकर प्रसिद्ध होत्या.
- दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकला काकोडकर यांनी १९७३मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर एप्रिल १९७९पर्यंत त्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होत्या.
- गोव्यामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात शशिकला काकोडकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
- ९०च्या दशकमध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी मराठी भाषेला प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले होते.
- त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणावर इंग्रजी भाषेचा असलेला पगडा कमी करण्यातही त्यांनीच महत्त्वाची भूमिका निभावली होती.
- भारतीय भाषा सुरक्षा मंच या गोव्यातील संघटनेचे अध्यक्षपद शशिकला काकोडकर यांच्याकडे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा