चालू घडामोडी : ९ ऑक्टोबर

कबड्डी वर्ल्डकपमध्ये भारताला पहिला विजय

  • अहमदाबाद, गुजरात येथे सुरु असलेल्या कबड्डी वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला नमवत पुनरागमन केले आहे.
  • अननुभवी ऑस्ट्रेलियाला ५४-२० अशा फरकाने पराभवाची धूळ चारत भारत ‘अ’ गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
  • भारतातर्फे दीपक हुडाने ६, परदीप नरवाल ५ आणि संदीप नरवालने २ रेड पॉईंट मिळवले. बचावात मंजीत छिल्लरने पुन्हा एकदा ५ गुण मिळवले.
 कबड्डी वर्ल्डकपबद्दल 
  • २००७नंतर १० वर्षांनी पुन्हा एकदा तिसरा कबड्डी वर्ल्डकप (Indoor) भारतात अहमदाबाद, गुजरात येथे होत आहे.
  • हा वर्ल्डकप गुजरातमध्ये होत असला तरी त्याची बीजे महाराष्ट्रातच रोवली गेली. महाराष्ट्रानेच कबड्डी ही सातासमुद्रापार नेण्याचे काम केले.
  • १९८१मध्ये प्रथमच कबड्डी भारताबाहेर म्हणजे जपानला गेली. त्यावेळी दोन पुरुष व दोन महिला संघ असे चार संघ जपानला गेले होते.
  • महाराष्ट्रात २००४ व २००७मध्ये प्रथम वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतर २०१६पर्यंत वर्ल्डकप होऊ शकला नाही.
  • २००४मध्ये साऊथ कॅनरा स्पोर्टस क्लबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते जया शेट्टी यांच्या प्रयत्नाने भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे वर्ल्डकप झाला.
  • नंतर २००७मध्ये विवेक पाटील यांच्या कर्नाळा स्पोर्टस क्लबने पनवेल येथे ही स्पर्धा भरवली.
  • २००४मध्ये १२ तर २००७मध्ये १६ संघ स्पर्धेत सहभागी झाले. पाकिस्तान मात्र एकही वर्ल्डकपमध्ये खेळू शकलेला नाही.
  • या दोन्ही स्पर्धांसाठी शरद पवार यांच्या मदतीने सहभागी देशातील खेळाडूंना येण्याजाण्याच्या प्रवासाची तिकिटे देण्यात आली.
  • २००४मधील स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यावेळी जनार्दनसिंह गेहलोत त्याचे अध्यक्ष बनले.
  • या दोन वर्ल्डकपमध्ये शैलेश सावंत, गौरव शेट्टी, पंकज शिरसाट हे महाराष्ट्राचे खेळाडू खेळले होते. परंतु यंदाच्या वर्ल्डकपमध्ये महाराष्ट्राचा एकही खेळाडू भारतीय संघात नाही.
  • एकूणच जागतिक स्तरावर कबड्डीला नेण्यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे आहे. 

बिल गेट्‌स अमेरिकेतील सर्वात धनवान व्यक्ती

  • फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ‘अमेरिकेतील सर्वात धनवान व्यक्तींची यादी २०१६’मध्ये पाच भारतीय वंशांच्या धनवंतांचा समावेश आहे.
  • या यादीत एकूण ४०० धनवान व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌स पुन्हा एकदा अग्रस्थानी आहेत.
  • गेल्या २३ वर्षांपासून गेट्‌स या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांच्याकडे ८१ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.
  • भारतीय वंशांच्या व्यक्तीमध्ये सिंफनी टेक्नॉलॉजीचे संस्थापक रमेश वाधवानी, आउटोसोर्सिंग फर्म सिनटेलचे सहसंस्थापक भरत व नीरजा देसाई, हवाई वाहतूक क्षेत्रातील राकेश गंगवाल, उद्योजक जॉन कपूर आणि सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार कवितर्क राम श्रीराम यांचा समावेश आहे.
फोर्ब्स यादीतील भारतीय श्रीमंत
नावे यादीतील स्थान एकूण संपत्ती
रमेश वाधवानी २२२ २.८ अब्ज डॉलर
भरत व नीरजा देसाई २७४ २.५ अब्ज डॉलर
राकेश गंगवाल ३२१ २.२ अब्ज डॉलर
जॉन कपूर ३३५ २.१ अब्ज डॉलर
कवितर्क राम श्रीराम ३६१ १.९ अब्ज डॉलर

विराट कोहलीचे दुसरे द्विशतक

  • न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात २११ धावांची खेळी करत विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे.
  • कसोटीत दोन वेळा द्विशतक करणारा विराट हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
  • याशिवाय एकाच वर्षात दोनदा द्विशतक ठोकण्याचा सचिनच्या विक्रमाशीही विराटने बरोबरी केली आहे.
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने ३६६ चेडूंमध्ये २० चौकारांसह २११ धावा केल्या.
  • विराट कोहलीने अजिंक्य रहाणेसोबत चौथ्या विकेटसाठी तब्बल ३६५ धावांची भागीदारी करत भारताला पाचशेचा टप्पा ओलांडून दिला.

नवज्योत कौर भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

  • क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी व भाजपच्या आमदार नवज्योत कौर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
  • सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पत्नीदेखील भाजपचा राजीनामा देतील हे अपेक्षितच होते.
  • सिद्धू यांनी नुकतीच ‘आवाज ए पंजाब’ या नव्या पक्षाची स्थापना केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा