लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई करणाऱ्या बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत.
बीसीसीआय व राज्य क्रिकेट संघटनांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्याचबरोबर, लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही बीसीसीआयला दिले आहेत.
लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यावरून बीसीसीआय व समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन संघर्ष सुरू आहे.
बीसीसीआयने यासंदर्भात न्यायालयात धाव घेऊन शिफारसी लागू करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती.
ही मागणी फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत लोढा समितीच्या शिफारशी लागू कराव्या लागतील, असे म्हटले होते.
अमेरिकेतील महत्त्वाच्या मंडळावर डॉ. रेणू खटोड
अमेरिकेतील महत्त्वाच्या डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटीच्या शैक्षणिक सल्लागार मंडळावर भारतीय वंशाच्या डॉ. रेणू खटोड यांची नियुक्ती झाली.
भारतातील मंत्रालयांमध्ये गृह खात्याप्रमाणे असलेले होमलॅण्ड सिक्युरिटी हे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाते आहे.
डॉ. खटोड यांची नियुक्ती झालेल्या सल्लागार मंडळात त्या एकमेव भारतीय वंशाच्या आहेत.
देशांतर्गत सुरक्षा आणि शैक्षणिक धोरणे ठरवताना उपयुक्त ठरतील अशा शिफारशी मंत्रालयास सादर करण्याची जबाबदारी या मंडळावर आहे.
प्रा. डॉ. खटोड या मूळच्या उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रहिवासी आहेत. १९७३साली कानपूर विश्वविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली.
त्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्या पर्ड्यू विद्यापीठात गेल्या. तेथे राज्यशास्त्रात त्यांनी एमए केले.
काही काळ स्थानिक महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन सुरू केले. कालांतराने पीएच.डी.च्या संशोधनासाठी त्या पुन्हा पडर्य़ू विद्यापीठात आल्या.
१९८५मध्ये त्यांचा प्रबंध स्वीकारला गेला आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयातील डॉक्टरेट त्यांनी मिळवली.
२००८पासून त्या युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन सिस्टीमच्या चॅन्सेलर तर ह्युस्टन विद्यापीठाच्या अध्यक्ष आहेत.
जागतिक हवामान बदल, पर्यावरणीय राज्यशास्त्र आणि धोरणे यांसारख्या अनेक विषयांवरील त्यांचे शोधनिबंध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. खटोड यांचे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आर्थिक, सामाजिक क्षेत्रांतही योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ डलास तसेच भारतीय पंतप्रधानांच्या जागतिक सल्लागार मंडळावर त्या कार्यरत होत्या.
अमेरिकेसारख्या देशातील महत्त्वाच्या मंडळावर काम करण्याची संधी जन्माने भारतीय असलेल्या महिलेस मिळणे हा आपल्या देशाचा बहुमान आहे.
नवदीपसिंग सूरी युएईमध्ये भारताचे राजदूत
संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे राजदूत म्हणून नवदीपसिंग सूरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे एकंदर लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण ३७ ते ४२ टक्के आहे,
सध्या ते ऑस्ट्रेलियात भारताचे उच्चायुक्त आहेत. पुढील महिन्यात ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये पदाची सूत्रे स्वीकारतील.
अमृतसर येथील गुरुनानक विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर ‘सेल’ या सर्वात मोठ्या सरकारी उद्योगात काही काळ नोकरी केली.
त्यांनी भारतीय विदेश सेवेत १९८३मध्ये प्रवेश मिळवला. सूरी यांनी परकीय भाषा म्हणून अरबीची निवड केली.
कैरोतील भारतीय वकिलातीत १९८४साली त्यांना नियुक्ती मिळाली. कैरोतीलच अमेरिकन विद्यापीठात अरबीमध्ये रीतसर शिक्षणही घेतले.
मग ३ वर्षे जगातील मोजक्या प्राचीन शहरांपैकी असलेल्या दमास्कस, अलेप्पोमध्ये त्यांनी सेवा बजावली.
१९९३मध्ये त्यांची वॉशिंग्टन येथील भारतीय वकिलातीत नियुक्ती झाली. नंतर १९९७साली टांझानियातील दार-एस-सलाम येथे त्यांना पाठविण्यात आले.
२०००साली लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयातील वृत्त विभागाचे प्रवक्ते आणि प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
२००९मध्ये पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेला फेसबुक, ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांशी जोडण्याच्या कामात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
प्रख्यात पंजाबी कादंबरीकार नानकसिंग हे सूरी यांचे आजोबा आहेत. त्यांच्या तीन कादंबऱ्यांचे सूरी यांनी इंग्रजी अनुवाद केले आहेत.
हैमा वादळाचा फिलिपिन्सला तडाखा
मागील तीन वर्षांतील सर्वांत भयंकर अशा ‘हैमा’ वादळाने फिलिपिन्समध्ये धडक दिली असून, या वादळाच्या तडाख्यात १२ लोकांचा मृत्यु झाला आहे.
फिलिपिन्सच्या उत्तर प्रांतामध्ये हजारो हेक्टर शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामध्ये भात आणि मक्याच्या शेतांचे अमर्याद नुकसान झाले आहे.
ताशी २२५ किलोमीटर वेगाचे वारे आणि मुसळधार पावसासह कॅगायन प्रांतात या वादळाने धडक दिली. तेथे किमान ५० ते ६० हजार हेक्टर भात शेती जमीनदोस्त झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा