जुआन मॅन्युएल सॅन्टोस यांना शांततेचा नोबेल पुरस्कार
कोलंबियाचे अध्यक्षजुआन मॅन्युएल सॅन्टोस यांना २०१६ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोलंबियामध्ये ५२ वर्षांपासून सुरु असलेला यादवी संघर्ष संपविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोबेलने गौरविण्यात आले.
कोलंबियन यादवी युद्धात आत्तापर्यंत २ लाख २० हजार लोक मरण पावले असून, ६० लाख लोक विस्थापित झाले आहेत.
बंडखोरांबरोबर शस्त्रसंधी करार घडवून आणत शांतीचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न केल्याचे नोबेल समितीने त्यांच्या नावाची घोषणा करताना म्हटले आहे.
गुजरातमधून पाकला होणारा भाजीपाला पुरवठा बंद
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकिस्तानला भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे दररोज ३ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. गेल्या २ दिवसांपासून निर्यात बंद करण्यात आली आहे.
गुजतरामधून पाकिस्तानला दररोज ५० ट्रकद्वारे १० टन भाजीपाला निर्यात करण्यात येतो. त्यामध्ये टोमॅटो आणि मिरचीचे प्रमाण सर्वाधिक असते.
टोमॅटो आणि मिरचीसोबतच लिंबू आणि भोपळ्याचीही पाकिस्तानमध्ये निर्यात केली जाते. वाघा सीमारेषेवरुन हा भाजीपाला पाकिस्तानमध्ये पाठवला जातो.
गुजरातमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी १९९७नंतर प्रथमच पाकिस्तानला भाजीपाल्याची निर्यात बंद केली आहे.
जोपर्यंत दोन्ही देशातील संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत पाकला भाजीपाल्याचा पुरवठा करणार नाही, अशी ठोस भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
बांगलादेश, आखाती देश, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आदी देशांना नियमितपणे भाजीपाल्याची निर्यात सुरूच असल्याचेही ते म्हणाले.
परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका घुरडे यांची हत्या
फर्स्ट लेडी ऑफ स्मेल अशी ओळख असलेल्या परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका घुरडे यांची त्यांच्या गोव्यातील राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे.
त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला. मारेकऱ्यांनी मोनिका यांच्यावर बलात्कार करून घरात चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोनिका या घरात एकट्याच होत्या. मोनिका या पतीसोबत दुरावा निर्माण झाल्यानंतर जुलै २०१६पासून येथे भाड्याने राहत होत्या. मोनिका घुरडे या भारतातील प्रसिद्ध परफ्यूम एक्सपर्ट होत्या.
मोनिका यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हैतीला मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
उत्तर अमेरिकेतील कॅरेबियन बेटावरील सर्वांत गरीब देश असलेल्या हैतीमध्ये मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे.
या चक्रीवादळामुळे हैतीमध्ये मोठया प्रमाणावर जिवीत व वित्तहानी झाली असून, ८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
वादळाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाचा दुर्गम भागाशी संपर्क तुटला असून त्यामुळे तेथील हानीची माहितीही उपलब्ध झालेली नाही.
हैती आणि क्यूबामध्ये आपला परिणाम दाखवून या वादळाने बहामास द्वीपसमुहाकडे आगेकूच केली आहे.
हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओबामा प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली आहे.
कॅरेबियन देशात मागील एक दशकातील हे सर्वात विध्वंसक व शक्तिशाली वादळ असल्याचे सांगितले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा