अमेरिकी गायक आणि गीतकार बॉब डिलन यांना २०१६चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेली ५४ वर्षे बॉब यांनी सतत नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांमध्ये स्विडीश अकादमीने बॉब यांचे कौतुक केले.
७५ वर्षीय डिलन यांचे लिखाण पारंपारिक लिखाण पद्धतीला छेद देणारे आहे. साचेबद्ध लिखाण न करता वेगळ्या पद्धतीने लिखाण करणे हे डिलन यांचे वैशिष्ट्य आहे.
बॉब डिलन यांनी अमेरिकी गायन संस्कृतीत नवे काव्य निर्माण केले असून, त्यांच्या या काव्यासाठीच त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे.
बॉब डिलन हे नोबेल पुरस्कार पटकावणारे २५९ अमेरिकन आहेत. तर साहित्यासाठी नोबेल पुरस्कार पटकावणारे बॉब डिलन हे नववे अमेरिकन साहित्यिक आहेत.
१९९३मध्ये कादंबरीकार टोनी मॉरिसन यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
मॉरिसन यांच्यानंतर २३ वर्षांनी बॉब डिलन यांच्या रूपाने एखाद्या अमेरिकन व्यक्तीला साहित्याचे नोबेल मिळाले आहे.
पहिल्यांदाच एका गीतकाराला त्याच्या गाण्यासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कौटुंबिक हिंसाचार कायद्यात अमुलाग्र बदल
सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमॅस्टिक व्हायलन्स अॅक्ट’ या कायद्यातील ‘प्रौढ पुरुष’ हे शब्द काढून त्यात आमुलाग्र बदल केला आहे.
या बदलामुळे आता छळ करणाऱ्या घरातील पुरुषांसोबत महिलांही या कायद्याच्या चौकटीत येणार आहेत.
घरातीलच व्यक्तींकडून होणाऱ्या छळापासून महिलांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने २००५मध्ये हा कायदा केला होता.
या कायद्याच्या कलम २ मध्ये कायद्यात वापरलेल्या विविध शब्द/ शब्दावलींच्या व्याख्या दिल्या आहेत.
त्यापैकी पोटकलम २(क्यू)मध्ये ‘प्रतिवादी’ची म्हणजे या कायद्यानुसार ज्यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येईल अशा व्यक्तींची व्याख्या आहे.
त्यात तक्रारदार महिलेने ज्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे, अशी घरातील कोणीही प्रौढ पुरुष व्यक्ती, असे म्हटले होते.
न्यायालयाने यातून ‘प्रौढ पुरुष’ हे दोन शब्द काढून टाकल्याने प्रतिवादीची व्याख्या घरातील फक्त प्रौढ पुरुषांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
आता तक्रारदार महिलेचा छळ करणारी घरातील व्यक्ती पुरुष असो वा स्त्री, या दोघांविरुद्धही न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालय म्हणते की, घरात छळ होणाऱ्या महिलांना हर तऱ्हेचे संरक्षण देण्याच्या उद्देशाने कायदेमंडळाने हा कायदा केला आहे.
कायद्यास अपेक्षित असलेला छळ लिंगसापेक्ष नाही. तसेच शारीरिक, मौखिक, भावनिक आणि आर्थिक अशा सर्व प्रकारच्या छळास हा कायदा लागू होतो.
राष्ट्रीय भूगर्भविज्ञान उपक्रमाचे ओडिशामध्ये उद्घाटन
ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यात तरंगा येथे केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय भूगर्भविज्ञान उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तेल आणि नैसर्गिक वायूसारखेच भूगर्भातील हायड्रोकार्बन वायूचा साठा शोधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ओडिशातील महानदीच्या खोऱ्यातून याची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ७९.५७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) तसेच ऑइल इंडिया लिमिटेड देशभरात सर्व्हे करणार आहे.
या सर्व्हेमुळे भूगर्भातील तेलपद्धतीचा सखोल अभ्यास होणार आहे, तसेच ओडिशातील हायड्रोकार्बनच्या साठ्याचा शोध लागल्यानंतर राज्यातील गुंतवणुकीचा ओघ वाढेल.
पुण्यामध्ये विश्व पंजाबी संमेलन
गुरू गोविंदसिंगजी यांच्या ३५०व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुण्यात १८, १९ व २० नोव्हेंबर रोजी विश्व पंजाबी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या संमेलनात भारताच्या विविध राज्यातील तसेच कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह विविध देशातले पंजाबी लेखक, साहित्यिक, कवी, समीक्षक व पंजाबी साहित्यप्रेमी बांधव सहभागी होणार आहेत.
पंजाब सरकार, महाराष्ट्र सरकार व पुणे महापालिकेच्या सहकार्याने संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी पुणे येथील सरहद संस्थेने स्वीकारली आहे.
संमेलनासाठी पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राचे गुरू गोविंदसिंग नगरी असे नामकरण करण्यात येणार आहे.
गत वर्षी संत नामदेवांची कर्मभूमी पंजाबमधील घुमान येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात विश्व पंजाबी साहित्य संमेलन पुण्यात भरवण्याची घोषणा झाली होती.
पुणे येथील विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान विख्यात पंजाबी साहित्यिक पद्मश्री डॉ. सुरजीत पट्टर भूषवणार आहेत.
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा हे संमेलनाच्या समारोपाचे प्रमुख अतिथी असतील.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाचे मुख्य पुरस्कर्ते आहेत.
आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारत अव्वल
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताने अव्वल स्थान मिळविल्याबद्दल आयसीसीची कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली.
भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांच्या हस्ते विराटला ही गदा देण्यात आली. भारताने पाकिस्तानला मागे टाकून हा क्रमांक मिळवला.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची कसोटी संपल्यानंतर हा सोहळा पार पडला.
कोलकाता येथील दुसऱ्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वलस्थान पक्के झाले होते.
भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना ३२१ धावांनी जिंकल्यानंतर औपचारिकरित्या भारताच्या कसोटीतील प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब झाले.
महेंद्रसिंग धोनीने यापूर्वी अव्वल क्रमांकासाठी ही गदा स्वीकारली होती. त्यानंतर हा मान मिळवणारा विराट हा भारताचा दुसरा कप्तान ठरला आहे.
मालदीव ‘कॉमनवेल्थ’मधून बाहेर पडणार
मालदीव सरकारने १३ ऑक्टोबर रोजी कॉमनवेल्थ देशांच्या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
कॉमनवेल्थ गटात आपल्याला अन्यायकारक व अयोग्य वागणूक मिळत असून त्यामुळे देशाच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ केली जात असल्याचे मालदीव सरकारच्या परराष्ट्र खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कॉमनवेल्थ गटाकडून काही दिवसांपूर्वी मालदीवला लोकशाही सरकारच्या कारभारात सुधारणा न केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची धमकी देण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय राजकारणात संघटनेशी संबंधित देशांची पत वाढविण्यासाठी आणि फायद्यासाठी आमचा वापर केला जात असल्याचे मालदीवने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मालदीवकडून कॉमनवेल्थ गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनेक दशकांच्या हुकुमशाहीनंतर मालदीवने २००८ मध्ये बहुपक्षीय लोकशाही राजवटीचा अवलंब केला होता.
मालदीवमधून सीरियातील नागरी युद्धात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्या अटकेमुळे मालदीवला न जाण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता निर्माण झाली आणि मालदीवने चीनच्या पाठिंब्याचे निशाण नाचवण्याचा प्रयत्न केला होता.
थायलंडचे राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचे निधन
थायलंडमध्ये भगवान रामासमान असलेले राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचे निधन झाले आहे.
थायलंडचे राजा भूमिबोल हे जगात सर्वाधिक जास्त काळ राज्य करणारे सम्राट म्हणून ओळखले जातात.
थायलंडचे लोक त्यांना एका वेगळ्याच उंचीवरून पाहत असत. त्यांचे व्यक्तिमत्त्व कनवाळू वडिलांसारखं होते.
राजकारणाच्या वरचे स्थान त्यांना प्राप्त होते. थायलंडमध्ये त्यांना एका देवासमान पुजले जात होते.
१९३२मध्ये थायलंडमधली राजेशाही संपवण्यात आली. १९३५मध्ये भूमिबोल यांचे काका प्रजादीपोक यांनी राजाचे पद सोडले.
त्यानंतर राजाचे पद भूमिबोल यांचे मोठे बंधू आनंद यांना बहाल करण्यात आले. त्यावेळी आनंद हे फक्त ९ वर्षांचे होते.
१९४६मध्ये राजा आनंद यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षी भूमिबोल राजसिंहासनाच्या गादीवर विराजमान झाले.
त्यानंतर त्यांनी अविरतपणे जनतेची सेवा केली. भूमिबोल यांना फोटो काढणे, खेळण्याचा छंद होता. ते गाणेही लिहित असत.
फ्रान्समध्ये थायलंडचे राजदूत असलेल्या व्यक्तीच्या मुलीशी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर बँकॉकमध्ये नवे सम्राट म्हणून त्यांचे राज्यरोहण करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा