अबूधाबीचे क्राउन प्रिन्स प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे
अबूधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान जानेवारी २०१७मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
अबूधाबी हे संयुक्त अरब अमीरातच्या (यूएई) ७ सदस्यांपैकी सर्वात शक्तिशाली असून, कच्चे तेल निर्यात करणारा खूप मोठा देश आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी अबूधाबीच्या क्राऊन प्रिन्स यांना प्रजासत्ताक दिनी भारतात येण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
दहशतवादावर भारत आणि यूएई या देशांची सारखीच भूमिका आहे. यूएईच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारताला तेल आयात करण्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.
शारापोवावरील बंदीची शिक्षा कमी
उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळलेली रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवावरील बंदीची शिक्षा कमी करण्यात आली असून, २ वर्षांऐवजी तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे मारिया आगामीएप्रिल महिन्यात पुनरागमन करू शकेल. शिवाय, फ्रेंच ओपनच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रँडस्लॅमसाठी खेळेल.
जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया ओपन दरम्यान मेलडोनियम घेतल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने शारापोवावर २ वर्षांची बंदी घातली होती.
शारापोवाने याविरोधात क्रीडा लवादाकडे याचिका करत किमान बंदीचा कालावधी तरी कमी करावा अशी विनंती केली होती.
त्यावर विचार करून आता क्रीडा लवादाने शारापोवावरील बंदी नऊ महिन्यांनी कमी केली आहे.
शारापोवावर २६ जानेवारी २०१६ ते २५ जानेवारी २०१८ या कालावधीसाठी बंदी घातली होती. बंदीची शिक्षा ९ महिन्यांनी कमी झाल्याने शारापोवाला पुढील वर्षातच पुनरागमन करता येणार आहे.
किरेन डिसूझाने केली स्पार्टाथॅलोन यशस्वीपणे पूर्ण
नागपूरमध्ये जन्मलेल्या किरेन डिसूझाने जगातील खडतर मानल्या जाणाऱ्या २४६ किलोमीटर अंतराची ‘स्पार्टाथॅलोन’ यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
या वार्षिक स्पर्धेचे आयोजन ग्रीसच्या अथेन्स आणि स्पार्ट यांच्यादरम्यान करण्यात आले होते.
अशी कामगिरी करणारा २३ वर्षीय किरेन भारताचा पहिला स्पर्धक आहे. त्याने हे अंतर ३३ तास ३ मिनिट २५ सेकंद वेळेत पूर्ण केले.
या शर्यतीदरम्यान त्याने १०० मैल अंतर १८.३७ तासांमध्ये पूर्ण करण्याचा पराक्रम करताना १५९.५ किमी अंतरावर असलेला ४७वा चेक पॉर्इंट गाठला.
सहभागी ३७० स्पर्धकांमध्ये त्याला ८६व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या शर्यतीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय ठरला.
शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा ओलिव्हच्या पानाचा मुकुट व पुरस्कार म्हणून इरोटस नदीचे जल प्रदान करून गौरव करण्यात आला
या शर्यतीपूर्वी त्याला ६० किलोमीटर अंतराच्या शर्यतीचा ‘अल्ट्रा मॅराथॉनपटू’ म्हणूनही गौरविण्यात आले होते.
गेल्या वर्षी त्याने १०० मैलांची सालोमन भट्टी लेक्स अल्ट्रा मॅरेथॉन जिंकून सर्वांत वेगवान भारतीय अॅथलिटचा मान मिळवला होता.
गेल्या वर्षी त्याने लद्दाखची २२२ किलोमीटर अंतराची अल्ट्रा शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय अॅथलिट होण्याचा मान मिळवला होता.
सौदी अरेबियामध्ये इस्लामी हिजरी कॅलेंडरचा त्याग
सौदी अरेबियाने खर्चकपात करण्यासाठी इस्लामी हिजरी कॅलेंडरचा त्याग करून, ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला आहे.
ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये महिन्यातील कामकाजाचे दिवस जास्त असल्यामुळे संपूर्ण वर्षात वेतनापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत सौदी सरकारची मोठी कपात होणार आहे.
कॅलेंडर बदलाला सौदी मंत्रिमंडळाने गेल्याच आठवड्यात मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आता सरकारच्या जानेवारी-डिसेंबर या आर्थिक वर्षाला सुसंगत झाले आहेत.
सौदी अरेबिया हा जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश आहे. गेल्या दोन वर्षांपासून तेलाच्या किमती निम्म्यापेक्षा जास्त घसरल्यामुळे सौदी सरकार आर्थिक संकटांना तोंड देत आहे.
इस्लामच्या कॅलेंडरमधील महिने चंद्रावर आधारित आहेत. त्यामुळे हिजरी महिन्यात २९ किंवा ३० दिवस असतात. या उलट ग्रेगोरियन कॅलेंडरमधील महिन्यात फेब्रुवारी वगळता ३० किंवा ३१ दिवस असतात.
ग्रेगरियन कॅलेंडरच्या तुलनेत हिजरी कॅलेंडरमधील दिवस बरेच कमी भरतात. त्यामुळे सौदी सरकारला जास्त वेतन द्यावे लागते. शिवाय ग्रेगोरियन कॅलेंडर जगात सर्वत्र वापरले जाते.
काटकसरीचे धोरण म्हणून सौदी अरेबियाने मंत्र्यांच्या वेतनात २० टक्के कपात केली आहे. कनिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार गोठविण्यात आले आहेत. १ ऑक्टोबरपासून हे काटकसरीचे उपाय लागू झाले आहेत.
सौदीत खासगी क्षेत्राच्या तुलनेत सरकारचे कर्मचारी दुप्पट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी आहेत, तसेच सुट्ट्याही जास्त आहेत. त्यात आता सरकार सुधारणा करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा