चालू घडामोडी : १२ ऑक्टोबर
अपंग सरकारी कर्मचाऱ्यांना सरंक्षण
- कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला शासनाच्या सेवेत असताना अपंगत्व आल्यास त्याला पदमुक्त किंवा त्याची पदनावती करू नये, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
- यासाठी केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून १९७२ सालच्या केंद्रीय नागरी सेवा कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
- या निर्णयामुळे सरकारी सेवेतील विकलांग कर्मचाऱ्यांना नोकरी राखण्यात किंवा योग्य निवृत्तीवेतन मिळण्यासाठी मदत होणार आहे.
- सरकारी सेवेत असताना अपंगत्व आल्यास संबंधित कर्मचाऱ्याला अपंग व्यक्तींच्या हक्कांच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या १९९५सालच्या कायद्याचे नियम लागू होतील.
- या कायद्यातील कलम ४७नुसार कोणतेही आस्थापन अपंगत्वामुळे कर्मचाऱ्याला पदमुक्त किंवा त्याची पदनावती करू शकत नाही. तसेच संबंधित व्यक्तीला पदोन्नती नाकारता येत नाही.
- कर्मचाऱ्याला सेवेत रुजू असताना कायमस्वरुपी शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व आल्यामुळे सेवेतून निवृत्त व्हावे लागले तर त्याला नव्या तरतुदीप्रमाणे निवृत्तीवेतन आणि इतर भत्ते मिळतील.
- यासाठी त्याने निवृत्तीच्या दिवसापर्यंत किती वर्षांची सेवा केली आहे, तो कालावधी गृहीत धरण्यात येईल. मात्र, यासाठी त्याला अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
रेल्वेमध्ये काचेचे छत असलेले डबे जोडण्याचा निर्णय
- भारतातील निसर्गसौंदर्याचा प्रवाशांना आस्वाद घेता यावा यासाठी भारतीय रेल्वेने काचेचे छत असलेले तीन डबे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- सुरुवातीला या डब्यांचा वापर काश्मीर आणि तामिळनाडूतील अरकू घाटात केला जाणार आहे.
- भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन आणि रिसर्च डिझाईन्स अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन व इंटिग्रल कोच फॅक्टरी (पेरुम्बदूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे डबे तयार करण्यात येणार आहेत.
- प्रत्येक डब्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून डिसेंबरपर्यंत हे डबे सेवेत येणार आहे.
- यातील एक डबा काश्मीर खोऱ्यातील रेल्वेला तर उर्वरित दोन डबे तामिळनाडूतील अरकू घाटातून जाणाऱ्या गाडीला जोडले जातील.
- काचेचे छत असलेले हे डबे संपूर्णपणे वातानुकुलित असतील. तसेच हे डबे अद्ययावत माहिती-मनोरंजन सुविधांनी सज्ज असतील.
- काचेचे छत असलेल्या गाड्यांमध्ये निसर्गसौंदर्याचा पुरेपुर आस्वाद घेण्याची संधी असल्याने पर्यटकांकडूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो.
- भारतात पहिल्यांदाच काचेचे छत असलेल्या डब्याचा प्रयोग केला जाणार आहे. भारतातही यामुळे रेल्वे पर्यटनाला नवी उभारी मिळेल.
जयललिता यांच्याकडील सर्व खाती पनिरसेल्वम यांच्याकडे
- जे. जयललिता यांच्या दीर्घकाळच्या इस्पितळातील वास्तव्यामुळे त्यांच्याकडील सर्व खाती ओ. पनिरसेल्वम यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
- तमिळनाडू राज्याच्या प्रशासनात निर्माण झालेली अस्थिरता दूर करण्याचा तात्पुरता उपाय म्हणून मुख्यमंत्री जयललिता यांनी हा निर्णय घेतला आहे.
- यामुळे मुख्यमंत्रीपदी जयललिताच कायम राहणार असून मंत्रिमंडळ बैठक मात्र पनिरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.
- तमिळनाडूत अशा प्रकारच्या घटनाक्रमाची ३६ वर्षांनी पुनरावृत्ती होत आहे.
- तत्कालीन मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन मृत्यूपूर्वी असेच दीर्घकाळ रुग्णशय्येवर होते. तेव्हाही राज्यपालांनी त्यांच्याकडील खाती तेव्हाचे वित्तमंत्री नेदुच्चेझिन यांच्याकडे सोपविली होती.
- जयललिता यांना ताप आणि निर्जलीकरणामुळे २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- त्यांच्यावर उपचार सुरू असून तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
प्रख्यात दिग्दर्शक आँद्रेज वाजदा यांचे निधन
- प्रख्यात पोलिश दिग्दर्शक आँद्रेज वाजदा यांचे १० ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
- अखेरपर्यंत काम करत राहिलेल्या वाजदा यांनी आपल्या साठ वर्षांच्या कारकिर्दीत चाळीसहून आधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
- मॅन ऑफ आयर्न, अॅशेस अँड डायमंड, कॅनल, द प्रॉमिस्ड लँड आणि कॅटिन या त्यांच्या चित्रपटांनी जगभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
- त्यांच्या अखेरच्या आफ्टरइमेज या चित्रपटाला २०१७ ऑस्कर फॉरेन फिल्मच्या यादीत स्थान मिळाले आहे.
- २००२मध्ये वाजदा यांना ऑस्करने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
- नाझी आक्रमण, सोवियत रशियाचे आक्रमक रूप आणि कम्युनिस्ट राजवटीखाली दडपल्या गेलेल्या वास्तवाचे दर्शन त्यांनी आपल्या चित्रपटांतून करून दिले.
विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक जलद गोल
- विश्वचषक पात्रता फेरीच्या जिब्राल्टरविरुद्धच्या सामन्यात बेल्जियमच्या ख्रिश्चन बेन्टेके या खेळाडूने खेळ सुरु झाल्यापासून सातव्या सेकंदाला पहिला गोल नोंदवून नवा विक्रम प्रस्थापित केला.
- विश्वचषक पात्रता सामन्यांमधील याआधीचा सर्वात जलद गोल खेळ सुरु झाल्यापासून ८.३ सेकंदाला केला गेला होता.
- १९९३ मध्ये सॅन मरिनो या लहानश्या बेटाच्या संघातील डेव्हिड गॉल्तियेरी याने हा गोल इंग्लंडसारख्या मातब्बर संघाविरुद्ध नोंदविला होता.
- क्लबच्या पातळीवर झालेल्या सामन्यांमध्ये मात्र पूर्वी याहूनही झटपट गोल झालेले आहेत.
- त्यामुळे फुटबॉल या खेळाच्या इतिहासातील हा सर्वात जलदगती गोल नसला तरी विश्वचषक स्पर्धेत किंवा पात्रता फेऱ्यांमधील सर्वाधिक जलद म्हणून बेन्टेकेच्या गोलची नोंद झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा