नवीन बेनामी संपत्ती प्रतिबंध कायदा १ नोव्हेंबरपासून लागू
बेनामी संपत्ती प्रतिबंध या कायद्यातील नवीन नियम आणि तरतुदींची अमंलबजावणी १ नोव्हेंबर २०१६ पासून करण्यात येणार आहे.
काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी संसदेने ऑगस्टमध्ये बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा पारित केला केला आहे.
हा कायदा लागू झाल्यानंतर १९८८च्या बेनामी व्यवहार कायद्याचे नाव बदलणार असून, ते बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंध कायदा असे होणार आहे.
जुन्या कायद्यानुसार बेनामी व्यवहार केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा देण्याची तरतूद होती.
मात्र नवीन कायद्यामुळे ७ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय बेनामी संपत्ती आढळल्यास ती नुकसानभरपाई न देता जप्त करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे.
चर्च, गुरुद्वारा, मशीद तसेच मंदिरात मूळ संपत्ती असेल तर कलम ५८ अंतर्गत सरकारला ती मुक्त ठेवण्याचा अधिकार असेल.
नवीन कायद्यामध्ये शिक्षेमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे बेनामी व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे.
बॉक्सिंग फेडरेशनला सरकारची मान्यता
बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाला क्रीडा मंत्रालयातर्फे बॉक्सिंगची राष्ट्रीय संघटना म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
ही मान्यता दिल्यामुळे टोकियो ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय बॉक्सर्सना जय्यत तयारी करता येईल.
२०१२पासून बॉक्सिंग संघटनाच अस्तित्वात नसल्यामुळे भारतीय बॉक्सर्सचे प्रचंड नुकसान झाले होते.
रिओ ऑलिम्पिकमध्ये तर भारताचे केवळ ३ बॉक्सर्स सहभागी झाले. लंडन ऑलिम्पिकमध्ये ही संख्या ८ होती.
बॉक्सिंग असोसिएशनच्या सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये स्पाइसजेट एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
महाराष्ट्र बॉक्सिंगचे अध्यक्ष जय कवळी यांची बॉक्सिंग फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून निवड झाली.
एनआयए महासंचालकपदी शरदकुमार यांना मुदतवाढ
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी शरदकुमार यांना सलग दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
शरदकुमार हे १९७९च्या तुकडीचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. ३० जुलै २०१३ रोजी त्यांची ‘एनआयए’च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.
पठाणकोट हल्ला, काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, समझोता एक्स्प्रेस स्फोट, वर्धमान स्फोट अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास सध्या ‘एनआयए’ करीत आहे.
या प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण होण्यासाठी शरदकुमार यांच्या नियुक्तीचा लाभ होणार आहे.
शरदकुमार यांना त्यांच्या सेवाकाळात १९९६ आणि २००४मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
काश्मीरी गायिका राज बेगम यांचे निधन
काश्मीरमधील गानकोकिळा, काश्मीरच्या आशा भोसले अशी ख्याती मिळवलेल्या राज बेगम यांचे २६ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
रेडिओ काश्मीरसाठी त्यांनी गायन केले होते. तसेच भारत व परदेशात मैफलीही केल्या होत्या.
राज बेगम यांचा जन्म श्रीनगरमध्ये २७ मार्च १९२७ रोजी झाला. सुरुवातीला त्या महिलांसाठी गायन करीत असत, कारण त्या काळात समाजाची स्थिती बंदिस्त होती, अनेक बंधने महिलांवर होती.
शास्त्रीय संगीत, गीते यात त्यांना निपुणता मिळालेली होती. १९५४ ते १९८६ या काळात त्यांनी रेडिओ काश्मीरसाठी गायन केले.
२००२मध्ये त्यांना पद्मश्री तर २०१३मध्ये संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सादिक स्मृती पुरस्कार, काश्मिरी लोकसंगीत सुवर्णपदक, कला केंद्राचे रजत पदक, बक्षी पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा पुरस्कार त्यांना मिळाला होता.
बेगम यांच्या गायनाचा फारसा प्रसार झाला नाही. बरेच प्रयत्न करूनही त्यांचे संगीत सार्वजनिक पातळीवर आले नव्हते.
रेडिओ काश्मीरमध्ये केवळ सरकारी मनोवृत्ती असल्याने त्यांच्या गाण्याच्या कॅसेट वगैरे सहज उपलब्ध होताना दिसत नव्हत्या.
पतीने त्यांना गाण्यास मनाई केली पण प्रत्यक्ष मैफलीचा प्रतिसाद बघून त्यांचा विरोध मावळला.
त्यांनी या क्षेत्रात महिलांवर असलेल्या सामाजिक मर्यादा ओलांडल्या आणि दाल सरोवरइतकीच त्या काश्मीरची शान बनल्या.
भारत आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
कर्णधार आणि गोलरक्षक पी आर श्रीजेशच्या जबरदस्त बचावामुळे भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
भारताने दक्षिण कोरियावर पेनल्टी शूटमध्ये दक्षिण कोरियावर ५-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
निर्धारित वेळेत दोन्ही संघांचे २-२ गोल झाले होते. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यामध्ये भारताने दक्षिण कोरियाला ५-४ असे रोखले.
भारताचा संघ तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
मलेशिया आणि पाकिस्तानमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार असून, त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा अंतिम फेरीत सामना होईल.
२०११मध्ये या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जेतेपद पटकावणारा भारतीय संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा मान मिळवण्यास उत्सुक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा