चालू घडामोडी : ७ ऑक्टोबर

भारताच्या जीसॅट १८चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारताच्या जीसॅट १८ या उपग्रहाचे ६ ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील फ्रेंच गयाना (कौरो) येथून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • हा उपग्रह ५ ऑक्टोबर रोजी प्रक्षेपित करण्यात येणार होता. परंतु खराब हवामानामुळे त्याचे प्रक्षेपण एक दिवस पुढे ढकलले.
  • एरियनस्पेसच्या एरियन ५ व्हीएन २३१ या प्रक्षेपकाच्या मदतीने जीसॅट १८चे प्रक्षेपण पार पडले. याच्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा मस्टर २ हा उपग्रहही अवकाशात सोडण्यात आला.
  • जीसॅट १८ हा ३४०४ किलो वजनाचा उपग्रह सी बँड व केयू बँड सेवांचा विस्तार करण्यासाठी सोडण्यात येत असून त्यात ४८ संदेशवहन ट्रान्सपाँडर आहेत.
  • जीसॅट १८ इस्रोकडून अवकाशात सोडला गेलेला विसावा उपग्रह आहे. या अत्याधुनिक उपग्रहाचा भारताच्या माहिती दूरसंचार सेवेला उपयोग होणार आहे.
  • या उपग्रहाचा लाभ मुख्यत्वे दूरसंचार, दूरदर्शन, व्हीसॅट आणि डिजिटल बातम्या या क्षेत्रांत होणार आहे.
  • दूरसंचार क्षेत्रातील सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी भारताने यापूर्वी १४ उपग्रह सोडले असून जीसॅट १८मुळे ही सेवा आणखी बळकट होईल.

शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार २०१६


 डॉ. अमलेंदु कृष्णा 
  • मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्चचे डॉ. अमलेंदु कृष्णा यांना गणितशास्त्र प्रवर्गात भारतातील नोबेल समजला जाणारा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • डॉ. कृष्णा यांचे मूळ काम ‘अल्जिब्रिक-के’ सिद्धांतावर आधारित आहे. गणितातील काही मूलभूत संकल्पना मांडून त्यांनी त्यात संशोधन केले आहे.
  • २०१५मध्ये त्यांना खास गणित क्षेत्रासाठीच्या ‘रामानुजन’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • त्यांनी ‘सायकल्स अ‍ॅण्ड मोटिव्हज’ या बीजगणितीय शाखेत काम केले असून एवढा अवघड विषय असूनही सर्वाचे लक्ष त्याकडे वेधले आहे.
  • ते मूळचे बिहारचे असूनत्यांचे शाळा व महाविद्यालयीन शिक्षणही तेथेच झाले. कुटुंबातील अडचणींवर मात करून त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे.
  • २००१मध्ये ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले व पीएच.डी. केली, त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेऊन ते परत मायदेशी आले.
  • त्यांचे एकूण २५ शोधनिबंध प्रकाशित आहेत. भौमितिक रचना समजून घेण्यासाठीच्या के-सिद्धांतावर त्यांचे संशोधन आधारित आहे.
 डॉ. नियाज अहमद 
  • मूळचे अकोल्याचे व सध्या हैदराबाद विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. नियाज अहमद यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • अकोल्याजवळील पारस या लहानशा खेडय़ात जन्मलेल्या डॉ. नियाज अहमद यांनी नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयातून पदवी मिळवली. 
  • त्यानंतर हरियाणातील कर्नालच्या राष्ट्रीय डेअरी संशोधन केंद्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
  • १९९८ला ते हैदराबादच्या डीएनए संस्थेत संशोधक म्हणून रुजू झाले. २००८मध्ये विद्यापीठात दाखल झालेल्या अहमद यांनी गेल्या १५ वर्षांत संशोधन क्षेत्रात मोठी मजल गाठली आहे.
  • जिवाणूंमुळे मानवाला होणारे आजार व त्याचे निदान, हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे.
  • पशू व मानवांना होणाऱ्या आजारातील साम्य, तसेच पशूंच्या आजारामुळे मानवावर होणारे दुष्परिणाम, हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे.
  • सध्या त्यांनी ‘वन हेल्थ’ या उपक्रमांतर्गत जिवाणूंमुळे मानवाला कर्करोग होतो का? आणि होत असेल तर त्याचे निदान, यावर संशोधन सुरू केले आहे.
  • अहमद यांनी पशू व मानव यांच्यातील समान धागे शोधत प्रथमच एका पशुवैद्यकाला शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराचा मान मिळवून दिला आहे.
 शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराविषयी 
  • कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक-संचालक शांतिस्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थ १९५७पासून हा पुरस्कार दिला जातो.
  • जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, गणित, इंजिनिअरिंग, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र या क्षेत्रांत उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या संशोधकांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
  • हा भारतातील विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. ४५ वर्षांच्या आतील संशोधकांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. 
  • मानपत्र, मानचिन्ह आणि ५ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच वयाच्या ६५व्या वर्षांपर्यंत पुरस्कारार्थींना दरमहा १५ हजार रुपये मिळतात.
  • दरवर्षी संस्थेच्या वर्धापनदिनी म्हणजे २६ सप्टेंबरला या पुरस्कारांची घोषणा होते. पंतप्रधानांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात.
पुरस्कार्थींची यादी
नाव प्रवर्ग
ऋषिकेश नारायण जैवविज्ञान
सुवेन्द्र नाथ भट्टाचार्य जैवविज्ञान
पार्थ सारथी मुखर्जी रसायनशास्त्र
सुनील कुमार सिंग जमीन वातावरण समुद्र शास्त्र
अविनाश कुमार अग्रवाल अभियांत्रिकी
वेंकट नारायण पद्मनाभ अभियांत्रिकी
अम्लेंदू कृष्ण गणितशास्त्र
नवीन गर्ग गणितशास्त्र
सुब्रमन्यम अनंत रामकृष्ण भौतिकशास्त्र
सुधीर कुमार वेम्पती भौतिकशास्त्र
नियाझ अहमद वैद्यकीय शास्त्र

जितू रायला नेमबाजी वर्ल्डकपमध्ये रौप्यपदक

  • पिस्तुल नेमबाज जितू राय याने इटलीच्या बोलोग्ना येथे सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्डकपमध्ये ५० मीटर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.
  • जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील जितूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्या जोरदार कामगिरीचे संकेत दिले आहेत.
  • जितू रिओतील शानदार कामगिरीनंतरही पदकापासून वंचित राहिला होता व त्याला आठव्या स्थानावर राहावे लागले होते.
  • ८ नेमबाजांच्या फायनलमध्ये तो १८८.८ गुणांसह चीनच्या वेई पांग (१९०.६ गुण) याच्यापेक्षा खूप कमी अंतराच्या फरकाने मागे राहिला. 
  • जितूने एकूण ५६८ गुणांसह क्वॉलिफाइंग फेरीत दुसरे स्थान मिळवत रौप्यपदकावर नाव कोरले.
  • उल्लेखनीय बाब म्हणजे या स्पर्धेत जगातील अव्वल १० नेमबाज सहभागी झाले होते.

पक्षांना प्रचारासाठी सरकारी साधनांच्या वापरास मनाई

  • भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले.
  • या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित पक्षाची मान्यता रद्द करण्यात येईल, अशा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.
  • त्यामुळे आता सार्वजनिक सुविधांचा वापर करून स्वत:चा किंवा पक्षचिन्हाचा प्रचार करण्याच्या राजकीय पक्षांच्या मनसुब्यांना चाप बसणार आहे.
  • यापूर्वी नोटीस बजावूनही ही कागदपत्र सादर न करणाऱ्या ५७ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाने रद्द केली होती.
  • नोटीस बजावण्यात आलेल्या पक्षांमध्ये भाजपसह आठ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश होता.

नयनज्योत लाहिरी यांना जॉन एफ रिचर्ड्स पुरस्कार

  • इतिहासाच्या नामवंत प्राध्यापक आणि पुरातत्त्व क्षेत्रातील विद्वान डॉ. नयनज्योत लाहिरी यांच्या ‘अशोका इन एन्शन्ट इंडिया’ या बहुचर्चित पुस्तकाला २०१६चा जॉन एफ रिचर्ड्स पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • अमेरिकन हिस्टरी असोसिएशनतर्फे (एएचए) दरवर्षी दक्षिण आशियाई इतिहासावरील पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो.
  • प्रा. लाहिरी यांचा जन्म ३ मार्च १९६० रोजी दिल्लीत झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट मिळवली.
  • १९८२ ते १९९३ या काळात त्या दिल्लीतील हिंदू कॉलेजात अधिव्याख्यात्या होत्या. त्यानंतर त्या दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक बनल्या. सध्या त्या हरयाणातील अशोका विद्यापीठात कार्यरत आहेत.
  • प्राचीन भारताचा इतिहास, भारतीय पुरातत्त्वशास्त्र आणि जागतिक वारसा स्थळांचा त्यांचा विशेष व्यासंग असून या क्षेत्रातील त्यांच्या मतांची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते.
  • या विषयावरील अनेक शोधनिबंध त्यांनी लिहिले असून जगभरातील प्रतिष्ठित नियतकालिकांत ते प्रसिद्ध झाले आहेत.
  • आसाममधील प्राचीन स्थळांविषयी त्यांनी केलेले संशोधन मूलगामी स्वरूपाचे मानले जाते.
  • सम्राट अशोकावरील पुरस्कारप्राप्त पुस्तकासाठीही त्यांनी भरपूर परिश्रम घेतले, प्रवास केला आणि अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा बारकाईने अभ्यास केला.
  • पुरातत्त्व क्षेत्रातील त्यांचे अजोड काम लक्षात घेऊन इन्फोसिस फाउंडेशनने २०१३मध्ये त्यांना ५५ लाखांचा पुरस्कार देऊन गौरवले होते.
  • डॉ. लाहिरी यांची ग्रंथसंपदा
    • फाइंडग फरगॉटन सिटीज : हाऊ द इण्डस सिव्हिलायझेशन वॉज डिस्कव्हर्ड
    • द डिक्लाइन अ‍ॅण्ड फॉल ऑफ द इण्डस सिव्हिलायझेशन
    • द आर्किऑलॉजी ऑफ इण्डियन रूट्स अ‍ॅण्ड रिसोर्स यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा