देशातील रामभक्तांना श्रीलंकेत असलेल्या रामयण काळातील ठिकाणांना भेट देता यावी यासाठी भारतीय रेल्वेने श्रीलंकेसाठी विशेष टूर पॅकेज ‘रामायण’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या पॅकेजमधून रामभक्तांना श्रीलंकेतील अशोक वाटिका, सीता माता मंदिर, भक्त हनुमान मंदिर, बिभिषण मंदिर आणि मुनिवरम शिव मंदिर आदी धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
या योजनेची सुरुवात २४ नोव्हेंबरला होईल, तर पहिल्या फेरीतील टूरचा समारोप २९ नोव्हेंबला होईल.
त्यानंतर १० डिसेंबर, १२ जानेवारी, १० फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी टूरचे आयोजन होणार आहे.
पाच दिवसांच्या या टूरदरम्यान आयआरसीटीसीकडून व्हिसापासून विमान तिकीट, राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्था केली जाईल.
या संपूर्ण टूरसाठी आयआरसीटीसी प्रतिप्रवासी ४८,२०० रुपये एवढे शुल्क आकारणार आहे.
तसेच या श्रीलंका सफरीत प्रवाशांना कोलंबो कँडी या श्रीलंकेतील प्रमुख शहरांमध्येही फिरवून आणण्यात येणार आहे.
प्रथमा माईणकर यांना ओपीपीआय महिला वैज्ञानिक पुरस्कार
सीएसआयआरच्या हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिक प्रथमा माईणकर यांना ‘ओपीपीआय महिला वैज्ञानिक पुरस्कार’ मिळाला.
मूळच्या तेलंगणातील असणाऱ्या डॉ. प्रथमा यांना सीएनएस म्हणजे चेतासंस्थेशी संबंधित रोग तसेच कर्करोग व क्षयरोगावर संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
अनेक औषधांना दाद न देणाऱ्या मल्टीड्रग रेझिस्टंट टीबीवर (क्षय) औषध शोधण्यासाठी त्यांचे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.
कर्करोग, अस्थमा, चेतासंस्था रोगांवर उपयोगी ठरणारी काही संयुगे त्यांनी प्रयोगशाळेत तपासली असून ती गुणकारी असल्याचे दिसून आले आहे.
प्रथमा यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र, जनुकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत झाले.
तेथेच त्यांनी कार्बनी रसायनशास्त्रात पीएचडी केली. सीएसआयआरच्या आयआयसीटी संस्थेतूनही नंतर त्यांनी पीएच.डी. केली.
साई लाइफ सायन्सेस, एव्होलेव्हा बायोटेक पेन बायोकेमिकल्स अशा अनेक संस्थांत काम केल्यानंतर १९९२मध्ये त्या सीएसआयआरच्या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करू लागल्या.
वैद्यकीय रसायनशास्त्र, औषध संशोधन या शाखांत त्यांचे संशोधन आहे. त्यांच्या संशोधनाने औषधनिर्मितीत महत्त्वाची भर टाकली आहे.
शकुंतला रेल्वेमार्गाचे राष्ट्रीयकरण
भारतीय रेल्वे ही सरकारी मालकीची असली तरीही शकुंतला रेल्वेमार्ग हा भारतात एकमेव असा रेल्वेमार्ग आहे जो खाजगी मालकीचा आहे.
लवकरच शकुंतला रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणार असून, ब्रिटीशकालीन रेल्वेची ही शेवटची ओळख लवकरच इतिहासजमा होणार आहे.
विदर्भातील यवतमाळ ते अचलपूर दरम्यानचा १८८ किमीचा रेल्वे मार्ग शकुंतला रेल्वेच्या मालकीचा आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा रेल्वेमार्ग ताब्यात घेण्याच्या प्रस्तावला मंजुरी दिली आहे.
ब्रिटीश कंपनी किलीक निक्सनने १९१० साली शकुंतला रेल्वेमार्गाची उभारणी केली. स्वातंत्र्यपूर्वकाळात कापसाची निर्यात करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात.
स्वातंत्र्यानंतर अन्य खासगी मालकीच्या रेल्वेमार्गाचे राष्ट्रीयकरण झाले. पण शुकंतला रेल्वे मार्गाची मालकी खासगी कंपनीकडेच राहिली.
या अरुंद रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याची योजना असून त्यामुळे दिल्ली-चेन्नई-बंगळुरुमधील अंतर ८० किमीने कमी होईल.
हा मार्ग वापरण्यासाठी भारतीय रेल्वे शकुंतला रेल्वेला वर्षाला २ ते ३ कोटी रुपये देते.
दोन प्रवासी गाडया आणि काही मालगाडया या मार्गावरुन धावतात. सध्या शकुंतला रेल्वेची मालकी भारतीय व्यक्तीकडे आहे.
करारानुसार भारत सरकारने हा मार्ग २०१६मध्ये ताब्यात घेतला नाही तर, राष्ट्रीयकरणासाठी आणखी दशकभर थांबावे लागेल.
राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध उठविले
अनियमिततेमुळे रिझर्व्हं बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध २० वर्षांनंतर उठविले आहेत.
तत्कालीन संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे १९९५साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर रिझर्व्हं बँकेने निर्बंध लावले होते.
राज्य बँक संचालक मंडळाच्या अनियमित कारभारामुळे तोट्यात होती. त्यामुळे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.
नाबार्डने केलेल्या तपासणीत बँकेच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे रिझर्व्हं बँकेने राज्य बँकेवर विविध प्रकारचे ११ निर्बंध लावले होते.
परंतु आता रिझर्व्हं बँकेच्या अटींची पुर्तता केल्यानंतर राज्य बँकेवरील लावलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रशियाकडून विध्वंसक आरएस-२८ क्षेपणास्त्राची निर्मिती
अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील लक्ष्यांचा वेध घेऊ शकेल असे ‘आरएस-२८ सरमत’ नावाचे नवे आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र रशिया विकसित करत आहे.
आरएस-२८ हे पहिले सुपर हेवी आणि थर्मोन्यूक्लियन बाँबने युक्त असे क्षेपणास्त्र आहे. २०१८च्या अखेरपर्यंत ते रशियन सैन्यदलांच्या सेवेत दाखल होईल.
१०० टन वजनाचे अवजड असे हे क्षेपणास्त्र १० टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.
तसेच एकाचवेळी १६ छोटी आणि १० मोठी अण्वस्त्रे वाहून नेण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे.
या क्षेपणास्त्राचा वेग ७ किमी प्रतिसेकंद एवढा असून, ते दहा हजार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर ते मारा करू शकते.
रशियाकडील सध्याचे अशा प्रकारचे आण्विक क्षेपणास्त्र त्याच्या संहारक शक्तिमुळे ‘सेटन’ (सैतान) या नावाने ओळखले जाते.
त्यामुळे त्याच्या या आणखी प्रगत आवृत्तीस नाटो देशांनी ‘सेटन-२’ असे नाव दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा