भारतासह अन्य चार देशांनीही सार्क परिषदेवर टाकलेल्या बहिष्कारामुळे पाकिस्तानने नोव्हेंबरमध्ये होणारी सार्क देशांची शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने इस्लामाबादमध्ये येत्या ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय दक्षिण आशियाई देशांच्या (सार्क) शिखर परिषदेला न जाण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान या देशांनीही भारताच्या बाजूने उभे राहत इस्लामाबादमध्ये सार्क परिषदेला न जाण्याचा निर्णय घेतला.
२ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेनेही १९व्या सार्क शिखर परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्कमधील आठपैकी पाच सदस्यांनी पाकिस्तानविरोधी भूमिका घेतल्याने प्रचंड दबावाखाली आलेल्या पाकिस्तानला ही शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला.
इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क शिखर परिषदेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
कर्नाटकसाठी एच. डी. देवेगौडांचे बेमुदत उपोषण
कावेरी पाणीवाटपाच्या वादात कर्नाटकला न्याय मिळावा या मागणीसाठी माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
कर्नाटकने ६ ऑक्टोबरपर्यंत रोज सहा हजार क्यूसेक पाणी तमिळनाडूला द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
तसेच या प्रश्नी कावेरी जल व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे.
या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी कर्नाटकला न्याय मिळावा यासाठी १ ऑक्टोबर रोजी उपोषण सुरू केले.
गोव्यात ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
गोव्यात ५ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या चषकाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले.
या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि ब्रिक्स देशांचे राजदूत उपस्थित होते.
या स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. तसेच ही स्पर्धा १७ वर्षांखालील गटाची आहे.
गगनजित भुल्लरला कोरिया ओपनचे विजेतेपद
भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लरने २६९ गुणांची खेळी करून कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
गगनजितचे एशियन टूरमधील हे सहावे आणि एकूण सातवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.
दोन वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून जेतेपद जिंकणाऱ्या गगनजितने चार राऊंडमध्ये ६८, ६६, ६८ व ६७ गुणांची (कार्ड) खेळी केली.
गगनजितला हे विजेतेपद जिंकल्यानंतर एकूण १ लाख ९६ हजार डॉलरचे रोख पारितोषिक मिळाले.
त्याने एशियन टूरमध्ये २०१३मध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते. २०१४मध्ये तो मनगटाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता.
बिजिंगमध्ये प्रदुषणाचा यलो अलर्ट
चीनची राजधानी असलेल्या बिजिंग शहराने २ ऑक्टोबर रोजी प्रदूषणाचा पहिला यलो अलर्ट जारी केला आहे.
प्रचंड प्रमाणात पसरलेल्या धुक्यामुळे इथल्या हवामान विभागाला हा अलर्ट द्यावा लागला.
बिजिंगच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) १ ऑक्टोबर रोजी २०० ते ३००च्या दरम्यान होता. हा निर्देशांक खूप जास्त प्रदूषणाचे द्योतक आहे.
या अलर्टमुळे बांधकामाच्या साइट, आउटडोर बार्बेक्यू आणि शेतकऱ्यांना गवताची शेकोटी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
चीनमध्ये हवामानाचे चार रंगांचे स्थितीदर्शक आहेत. तांबडा रंग अत्यंत खराब हवामान दर्शवतो. त्यानंतर अनुक्रमे केशरी, पिवळा आणि निळा रंग उतरंडीने खराब हवा दर्शवतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा