चालू घडामोडी : ५ ऑक्टोबर

ब्रिटिश वैज्ञानिक त्रिमूर्तीला भौतिकशास्त्राचे नोबेल

  • ब्रिटिशवंशीय शास्त्रज्ञ डेव्हिड थोउलेस, डंकन हेल्डन आणि मायकल कोस्टेरलिट्स यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • द्रव्याच्या स्थितीवर केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हे तिघेही ब्रिटिश वंशाचे असले तरी काम अमेरिकेत करतात.
  • डॉ. थोउलेस हे वॉशिंगटन विद्यापीठात, डॉ. हेल्डन हे प्रिंन्स्टन विद्यापीठ तर डॉ. कोस्टेरलिट्स हे ब्राऊन विद्यापीठात कार्यरत आहेत.
  • भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सेसने त्यांना नोबेल पुरस्कारची घोषणा केली आहे.
  • १९८०च्या दशकात त्यांनी हे संशोधन केले होते. दशकापूर्वी केलेल्या संशोधनास नोबेल पुरस्कार क्वचितप्रसंगीच देण्यात येतो.
  • १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप ८ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (९.३६ हजार डॉलर किंवा ८.३४ हजार युरो) व पदक असे आहे.
 संशोधनाबद्दल 
  • डेव्हिड थुल्स, डंकेन हाल्डेन आणि मायकेल कोस्टरलिट्‌स यांनी पदार्थाच्या अज्ञात व आश्चर्यकारक अवस्थांचा शोध लावला. संघनन द्रव्य भौतिक विज्ञानात या संशोधकांचे कार्य मोठे आहे.
  • अतिवाहक पदार्थ, महाद्रायू (सुपरफ्लुइड्स) व चुंबकीय पटले यावर त्यांचे पायाभूत संशोधन आहे.
  • या संशोधनासाठी त्यांनी गणितीय तंत्राचा वापर करीत पदार्थाच्या सुपरकंडक्टर व सुपरफ्लुइड, तसेच मॅग्नेटिक फिल्मसारख्या विविध अवस्थांचा अभ्यास केला.
  • या संशोधनामुळे पदार्थाच्या नव्या व उन्नत अवस्थांच्या शोधाच्या दिशेने पाऊल पडले.
  • त्यांनी गणितातील पायऱ्यांनुसार बदलणाऱ्या टोपोलॉजी या तत्त्वाचा उपयोग करत, अतिशय पातळ अशा थरामधून विद्युत प्रवाह वाहतो व तो प्रत्येक टप्प्यावर मोजता येतो, हे सिद्ध केले.
  • पातळ थर, दोऱ्यासारख्या व त्रिमितीय पदार्थांमध्येही टोपोलॉजिकल टप्पे असतात, हे या संशोधनातून समोर आले.
  • याचा उपयोग आकारमान, क्षेत्रफळ, लांबी, रुंदी कमी केलेल्या पदार्थांमधील (कंडेन्सड मॅटर्स) अद्ययावत संशोधनासाठी होतो आहे.
  • भविष्यात इलेक्ट्रॉनिक्समधील नवनवीन संशोधन, सुपरकंडक्टर्स, तसेच पुंज संगणक (क्वांटम कॉम्प्युटर्स) बनविण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होईल.

आरबीआय द्वैमासिक पतधोरण

  • रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीच्या पहिल्याच पतधोरणात रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली.
  • नवा रेपो दर ६.२५ टक्के इतका असेल. यापूर्वीच्या पतधोरणातही रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली होती.
  • या दरकपातीमुळे गृहकर्जासह इतर कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बॅंकांमधील मुदतठेवींवरील व्याजही कमी होऊ शकते.
  • याचसोबत रिझर्व्ह बॅंकेचा रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्के इतका करण्यात आला असून, बॅंक रेट ६.७५ टक्के ठेवण्याचा निर्णय पतधोरण समितीने घेतला आहे.
  • पतधोरण समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो दरात कपात करण्याच्या बाजूने मतदान केले.
  • रिझर्व्ह बॅंकेचे यंदाचे पतधोरण अनेक कारणांनी महत्त्वाचे होते. यापूर्वी मध्यवर्ती बॅंकेच्या गव्हर्नरांनी व्याजदर निश्चितीबाबत अंतिम अधिकार होते.
  • यंदा मात्र पतधोरणाकरिता सरकारने सहा सदस्यांची नियुक्ती केली असून, तिचे अध्यक्षपद गव्हर्नरांकडे देण्यात आले आहे.
  • व्याजदराबाबत गव्हर्नर वगळता समितीतील अन्य पाच सदस्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. गव्हर्नरांना केवळ अधिक मतांच्या बाजूनेच कौल द्यावयाचा आहे.
  • दृष्टिक्षेपात पतधोरण :
    • रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात 
    • रेपो दर ६.२५ टक्के, तर रिव्हर्स रेपो दर ५.७५ 
    • कॅश रिव्हर्स दरात (सीआरआर) बदल नाही (४ टक्के)

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

  • ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, नाटककार शफाअत खान यांच्यासह लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • लेखिका व समीक्षिका शांता गोखले यांना अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
  • केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते २०१५चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
  • यावेळी विविध श्रेणींत देशातील ३९ नामवंत कलाकारांना त्यांच्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले, तर ३ मान्यवरांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
  • पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख आणि ताम्रपट असे आहे, तर शिष्यवृत्ती स्वरूपात ३ लाख रुपये प्रदान करण्यात आले.
  • प्रसिद्ध संगीतकार, गायक व महाराष्ट्राचे भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुगम संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • ‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’ यांसह अनेक मराठी व ‘धनवान’, ‘मशाल’ अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले.
  • प्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांना नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • ‘वाडा चिरेबंदी’, ‘प्रपोजल दोन’, ‘स्पेशल’ अशा अनेकानेक नाटकांचे उत्तम नेपथ्य त्यांनी केले आहे.
  • नाटय़ लेखनातील वैविध्यपूर्ण शैलीतून नाटक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे नाटककार शफाअत खान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • ‘ब्लॅक कॉमेडी’ या दुर्मीळ नाटय़ लेखन प्रकारावर हुकमत असणारे नाटककार म्हणून शफाअत खान प्रसिद्ध आहेत.
  • ‘किस्से’, ‘भूमितीचा फार्स’, ‘मुंबईचे कावळे’ यांसारख्या ब्लॅक कॉमेडी शैलीतील त्यांच्या नाटकांनी रसिकांना भुरळ घातली.
  • ‘राहिले दूर घर माझे’, ‘शोभायात्रा’ अशी अनेकानेक नाटके लिहून त्यांनी नाटय़ क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
  • महाराष्ट्रातील लावणी लोकनृत्याचा प्रचार व प्रसार करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रसिद्ध लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर यांना लावणी नृत्यातील उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • ललित कला व नाटय़ समीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लेखिका व समीक्षिका शांता गोखले यांना संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

रूपा गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती

  • अभिनेत्री व भाजपच्या नेत्या रूपा गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नव्वदच्या दशकामध्ये दूरदर्शनवर गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेमध्ये त्यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती.
  • माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राज्यसभेतील ही जागा रिक्त झाली होती.
  • पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रूपा गांगुली भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, त्या क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्ला याच्याकडून पराभूत झाल्या होत्या.
  • नव्वदच्या दशकांत त्यांनी काही हिंदी व बंगाली चित्रपटांतही भूमिका केल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा