चालू घडामोडी : १४ ऑक्टोबर
ईबीसी उत्पन्नमर्यादेत ६ लाख रुपयांपर्यंत वाढ
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची (ईबीसी) उत्पन्नमर्यादा ६ लाख रुपयांपर्यंत वाढवून उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
- या योजनेबरोबरच भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
- या महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून उत्तम मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे.
- राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व घटकांतील विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरणार आहे.
- या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक असून, विद्यार्थ्याला प्रवेशासाठी किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
- अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना विनाअट लाभ मिळणार आहे. या दोन अटींव्यतिरिक्त कुठलीही अट योजनेसाठी लागू नाही.
- शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.
- भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातून मुलांची मोठ्या शहरांमध्ये निवासाची व्यवस्था केली जाणार आहे.
- यामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, विविश योजनांवर नोंदणीकृत मजुरांच्या पाल्यांना शहरांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
- मोठ्या शहरांमध्ये निवास व्यवस्थेसाठी प्रतिवर्ष ३० हजार रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी २० हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.
- वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ ते ६ लाख रुपयांदरम्यान आहे, अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज शासन अदा करणार आहे.
चीनकडून बांगलादेशला २४ अब्ज डॉलर्सचे कर्ज
- भारताला शह देण्यासाठी चीनने बांगलादेशला पायाभूत सुविधांसाठी २४ अब्ज डॉलर्सच्या सवलतीच्या दरातील कर्जाची घोषणा केली आहे.
- गोव्यात झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी येतानाच चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी आधी बांगलादेशचा दौरा केला आहे.
- शी यांची बांगलादेश भेट ही चिनी राष्ट्राक्षांकडून बांगलादेशाला देण्यात आलेली गेल्या ३० वर्षांतील पहिलीच भेट असणार आहे.
- बांगलादेशमध्ये वीजनिर्मिती प्रकल्प, बंदर आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी हे कर्ज वापरले जाणार आहे.
- चीन १,३२० मेगावॅट वीज प्रकल्पासह समुद्र किनाऱ्यांवरील बंदरे आणि २५ योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे.
- तसेच महामार्गांचा विकास, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणांसाठीही चीन हातभार लावणार आहे.
- बांगलादेशमधील राजनैतिक प्रभाव वाढविण्याचा भारताकडून प्रयत्न होत असतानाच चीनकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
- नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्यावर भर दिला.
- गेल्या वर्षी केलेल्या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला २ बिलीयन डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली होती.
- बांगलादेशशी भारताचे राजकीय आणि आर्थिक संबंध अतिशय चांगले आहेत. यामुळेच भारताने येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
- भारताच्या मदतीने जपानही बांगलादेशला ऊर्जा आणि बंदर विकासासाठी कमी व्याजावर कर्ज देत आहेत.
- यामुळे या अत्यंत महत्त्वपूर्ण देशातील राजनैतिक प्रभाव वाढविण्याची स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्राध्यापक कुमुदिनी दांडेकर यांचे निधन
- लोकसंख्याशास्त्राचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाची देशात पायाभरणी करणाऱ्या संशोधक-प्राध्यापक कुमुदिनी दांडेकर यांचे निधन झाले.
- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ (कै.) प्रा. वि. म. दांडेकर यांच्या त्या पत्नी होत.
- गोखले अर्थशास्त्र संस्थेत १९४९ ते १९८० या काळात त्या कार्यरत होत्या. तेथे लोकसंख्याशास्त्र विभागाचे प्रमुखपद त्यांनी भूषविले.
- जागतिक आरोग्य संघटनेसाठीही त्यांनी काम केले. तसेच, विविध सरकारी समित्यांचे त्यांनी काम पाहिले.
- विविध पुस्तके, संशोधनपर निबंध व अहवाल त्यांनी लिहिले आहेत. भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी या संस्थेच्या नियामक मंडळाच्या त्या सन्मान्य सदस्य होत्या.
गोव्यात ‘डक बोट्स’ सेवा
- पाण्यावर आणि जमिनीवर चालू शकेल (ऍम्फिबियन) अशा भारतातील पहिल्या विशेष वाहनाचे गोव्यामध्ये मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
- पर्यटन खात्याच्या पुढाकाराने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ‘डक बोट्स’ नावाने प्रचलित अशी ही सेवा आहे.
- दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या सेवेमुळे गोवा सरकार व गोवा पर्यटनाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोचला गेला आहे.
- ‘एम्फिबियन डिझाइन प्रा. लिमीटेड’ या कंपनीने ‘एडव्हान्स अम्फिबियस डिझाइन इंक’ या अमेरिकन कंपनीच्या मदतीने ही डक बोट तयार केली आहे.
- सुरवातीला अशी दोन वाहने मांडवी नदीच्या पात्रात पर्यटकांसाठी उपलब्ध केली जातील.
- पणजी ते जुने गोवे आणि डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यापर्यंत हे वाहन पर्यटकांना घेऊन जाणार आहे.
- ही सेवा नोव्हेंबरपासून पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. या सफरीत पर्यटकांना गोव्याचे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभव पाहायला मिळेल..
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॅनियल काळे यांचे निधन
- कोल्हापूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॅनियल काळे यांचे १४ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता.
- गेली सात वर्षे कोल्हापूरमधील व्हाईट आर्मी इंटरनॅशनल या संस्थेने त्यांची सर्व जबाबदारी घेतली होती.
- देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेचे मोठे योगदान आहे.
- डॅनियल काळे सुभाषबाबूंच्या मोजक्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. त्यांच्या नव्वदीनंतरही ते लोकांना स्वातंत्र्य आणि शिस्तीचा कानमंत्र देत असत.
बिइंग बाबा रामदेव
- रामदेव बाबांचा योगगुरू ते राजकीय प्रवास खूप चित्तवेधक आहे. संपूर्ण जगात योगासनांचा प्रचार करण्यात त्यांची महत्वपूर्ण भुमिका राहिलेली आहे.
- रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या उत्पादनाच्या माध्यमातून देशात स्वदेशी अभियानास पुन्हा चालना दिली आहे.
- रामदवे बाबा इंडिया टूडे या नियतकालिकेचे उपसंपादक उदय महूरकर यांच्या साहाय्याने आपली आत्मकथा लिहिणार आहेत.
- ‘बिइंग बाबा रामदेव’ असे या पुस्तकाचे नाव असेल. पुढच्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित होण्याची शक्यता असून, याचे प्रकाशन पेंग्विन बुक्स इंडिया करणार आहे.
- या आत्मकथेत रामदेव बाबांच्या माहीत नसलेल्या बाबी जगासमोर येतील. योगगुरू ते पतंजली ब्रँडपर्यंतचा त्यांच्या प्रवासाचा या पुस्तकात समावेश असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा