भारत आणि रशिया यांच्यातील वार्षिक बैठकीवेळी संरक्षण, ऊर्जा, वीज, जहाज बांधणी, अवकाश तंत्रज्ञान यांसह १६ क्षेत्रांत करार करण्यात आले.
ब्रिक्स परिषदेसाठी भारत, रशिया, चीन, ब्राझील व दक्षिण आफ्रिका या पाच देशांचे राष्ट्रप्रमुख दक्षिण गोव्यातील बाणावली येथे आले आहेत.
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत व रशियामध्ये स्वतंत्रपणे चर्चा झाली व या चर्चेनंतर करारांची घोषणा करण्यात आली.
संरक्षण क्षेत्रातील करारानुसार भारतामध्ये कामोव्ह २२ टी हेलिकॉप्टरचे उत्पादन, ४ अत्याधुनिक फ्रिगेटची बांधणी दोन्ही देश मिळून करणार आहेत.
मेक इन इंडिया संकल्पनेच्या उद्देशपूर्तीसाठी रशिया मदत करणार आहे. वार्षिक संरक्षण औद्योगिक परिषदेसाठीही दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) भारतीय नॅशनल इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ) सोबत मिळून भारतात संयुक्तरित्या सुमारे १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
या संयुक्त फंडात आरडीआयएफ आणि एनआयआयएफचे प्रत्येकी ५० कोटी डॉलर्सचे योगदान असणार आहे.
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे राष्ट्रार्पण
भारताच्या नागरी अणुऊर्जा मोहिमेला महत्त्वपूर्ण आयाम देणाऱ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे १५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रार्पण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बाणावलीतून तामिळनाडूतील कुडनकुलम प्रकल्पाच्या ई-फलकाचे अनावरण करून राष्ट्रार्पण केले.
यावेळी रशियाच्या सहकार्याने देशात आणखी आठ अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मोदी यांनी जाहीर केले.
त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याची पायाभरणी केल्याचे जाहीर केले.
कुडनकुलमच्या पहिल्या टप्प्यामुळे भारताला १००० मेगावॅट अणुऊर्जा प्राप्त झाली असून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात आणखी १००० मेगावॅट अणुऊर्जा तयार होणार आहे.
याव्यतिरिक्त दोन देशांमध्ये नैसर्गिक वायू वाहिनीचा मार्ग सुरू करण्यासाठी लवकरच संयुक्त मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
दिल्लीमध्ये आशिया पॅसिफिक मीट
दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवव्या आशिया पॅसिफिक मीटचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतासह विविध १० देशांतील १४ थिएटर स्कूलचे रंगकर्मी आपल्या नाट्य कलाकृती, संस्कृती व कला क्षेत्रातील अनुभव यांचे आदान प्रदान करतील.
‘द स्ट्रेंग्थ ऑफ आशिया इन कंटेंपररी थिएटर परफॉर्मन्स कल्चर’ही नवव्या आशिया पॅसिफिक मीटची थिम आहे.
त्याला अनुसरून १० थिएटर स्कूलशी संलग्न २० देशातले नाट्य कला शिक्षक, विद्यार्थी, समीक्षक व रंगभूमी कलाकार या संमेलनात सहभागी होत आहेत.
यानिमित्ताने भारतीय रंगभूमीचे कलाकार आपल्या थिएटर कलेचा व रंगभूमीच्या महान परंपरेचा अविष्कार जगासमोर सादर करतील.
तसेच भारतातल्या रंगकर्मींना आशिया पॅसिफिक ब्युरो स्कुल थिएटरच्या विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधीही मिळेल.
नवव्या आशिया पॅसिफिक मीटच्या संयोजन समितीच्या सूत्रधार प्रा. त्रिपुरारी शर्मा आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा