अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक २०१८ लोकसभेत ३० जुलै रोजी आवाजी मतदानाने मंजूर झाले.
यापूर्वीच्या कायद्यामध्ये सज्ञान स्त्रीवरील बलात्कारासाठी शिक्षेची तरतूद असली तरी १२ किंवा १६ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद नव्हती.
ती उणीव भरून काढून गुन्हेगारांवर वचक बसावा या हेतूने हे विधेयक संमत करण्यात आले. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा वेगाने तपास करून पीडितेला न्याय देण्याचे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.
या विधेयकात १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार प्रकरणातील किमान शिक्षा ७ वर्षांहून वाढवून १० वर्षे केली आहे. ही शिक्षा आजीवन कारावासापर्यंतही वाढविली जाऊ शकते. प्रसंगी मृत्युदंडही ठोठावला जाऊ शकतो.
तसेच १६ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासाठी किमान शिक्षेची तरतूद १० वर्षांवरून २० वर्षे इतकी वाढवण्यात आली आहे. तसेच ही शिक्षा आजीवन कारावासापर्यंतही वाढविली जाऊ शकते.
१६ वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्काराबद्दल आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर १२ वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा असेल.
बलात्कार प्रकरणात दोषी अथवा निर्दोष ठरविलेल्या प्रकरणांचे अपील सहा महिन्यांच्या आत निकाली काढावे लागतील. तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची यात तरतूद आहे.
तसेच १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात आता आरोपीला जामीन मिळू शकणार नाही.
पीडितेला तपासात होणारा त्रास पाहता, कोणताही वकील पीडितेच्या चारित्र्याबाबत प्रश्न करणार नाही, अशीदेखील तरतूद या विधेयकात आहे.
एक हजार कसोटी सामने खेळणारा इंग्लंड पहिला संघ
भारताविरुद्ध एजबस्टन येथे होणारा पहिला कसोटी सामना यजमान इंग्लंडसाठी पुरुष विभागातील १०००वा कसोटी सामना असणार आहे.
१००० कसोटी सामने खेळणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरणार आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने ८१२ कसोटी सामने खेळले आहेत.
इंग्लंडने मार्च १८७७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत ते ९९९ कसोटी सामने खेळले आहेत.
त्यापैकी ३५७ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळविला आहे तर २९७ मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ३४५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीच्या अव्वल श्रेणी पंच मंडळातील वरिष्ठ सदस्य व न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो हे आयसीसीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी त्यांच्या हस्ते इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रिव्ह्ज यांचा रौप्य सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे.
भारताविरुद्ध इंग्लंडने जून १९३२मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. उभय संघांदरम्यान ११७ कसोटी सामने खेळले गेले असून, इंग्लंडने ४३ सामन्यांत तर भारताने २५ सामन्यांत विजय मिळवला आहे. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत.
पोस्टाची पेमेंट बँक ऑगस्टपासून सुरु होणार
देशभरातील ६५० शाखा आणि १७ कोटी खात्यांसह बहुप्रतीक्षित ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ (आयपीपीबी) ऑगस्टपासून ग्राहकांच्या सेवेत रूजूहोत आहे.
रिझर्व्ह बँकेकडून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर ऑगस्टपासून बँकेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
पेमेंट बँकेचा परवाना प्राप्त झालेली आयपीपीबी ही एअरटेल आणि पेटीएमनंतरची तिसरी संस्था आहे.
देशभरात सध्या १.५५ लाख टपाल कार्यालयांचे (पैकी १.३३ लाख कार्यालये ग्रामीण भागात) जाळे पसरले आहे. ही कार्यालये पोस्टाच्या पेमेंट बँकेसाठी ग्राहक केंद्रे म्हणून कार्यरत राहणार आहेत. या शिवाय ६५० शाखा अधिकृतरित्या कार्यरत राहणार आहेत.
याशिवाय आयपीपीबीतर्फे लवकरच देशभरात ५००० एटीएमचीही उभारणी करण्यात येणार आहे. तसेच, ग्रामीण भागात ३२५० अॅक्सेस पॉइंटची निर्मिती करण्यात येणार आहे.
शिवाय ग्रामीण भागात ११ हजार डाक सेवकांची आणि शहरी भागासाठी पोस्टमनची पदे निर्माण करून घरपोच बँकेची सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
खातेधारकांना आपल्या आयपीपीबी खात्यामधून सुकन्या समृद्धी, आवर्ती योजना, स्पीड पोस्ट आदी योजनांचाही लाभ घेता येणार आहे.
आयपीपीबीतर्फे लवकरच ऑनलाइन बँकिंग सेवेसाठी अॅप सादर करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना फोन बिल, डीटूएच, गॅस आणि विजेची देयके अदा करता येणार आहेत.
आयपीपीबीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक : सुरेश सेठी
दिल्लीला क्षेपणास्त्राच्या सुरक्षाकवचाने सुसज्ज करण्यात येणार
अमेरीकेतील ९/११ प्रमाणे विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोनने हल्ला होऊ नये म्हणून राजधानी दिल्लीला सुरक्षित आणि अभेद्य करण्याच्या दृष्टीने भारताने प्रयत्न सुरु केले आहेत.
यामध्ये दिल्लीला क्षेपणास्त्राच्या सुरक्षाकवचाने सुसज्ज करण्यात येणार आहे. जुनी हवाई संरक्षण प्रणाली बदलून नवी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
तसेच व्हीआयपी नॉन-फ्लाय झोन आणि हल्ल्या करण्यासाठी येणाऱ्या विमानांना नेस्तनाभूत करण्याच्या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संरक्षण परिषदेमध्ये ‘नॅशनल अॅडवान्स्ड सर्फेस टू एअर मिसाइल सिस्टीम-२’ला मान्यता देण्यात आली. ही प्रणाली अमेरिकेकडून १ अब्ज डॉलर्सना खरेदी केली जाणार आहे.
या व्यतिरिक्त दिल्ली परिसरातील हवाई संरक्षण योजनेंतर्गत सुमारे ८९ व्हीआयपी परिसरांची पुनर्रचना करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रपती भवन, संसद, उत्तर आणि दक्षिण विभाग आदी महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
‘नॅशनल अॅडवान्स्ड सर्फेस टू एअर मिसाइल सिस्टीम-२’मध्ये ३डी रडार, लहान आणि मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रे, प्रक्षेपक, अग्निशमन केंद्रे असतील.
त्यामुळे विविध दिशांनी एकाचवेळी हल्ला झाल्यास त्यांची माहिती वेगाने मिळून, क्षेपणास्त्रे शोधून ती नष्ट करणे सोपे होणार आहे.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्येही तसेच इस्राइलच्या काही शहरांमध्ये आणि मॉस्कोमध्येही सध्या अशाच प्रकारची प्रणाली कार्यरत आहे.
नितीन घोरपडे आयर्नमॅन किताबाचा मानकरी
औरंगाबादचा मॅरेथॉनपटू नितीन घोरपडेने जर्मनीतील हंम्बुर्ग येथील स्पर्धा जिंकत ‘आयर्नमॅन’ हा किताब पटाकावला.
आयर्नमॅन हा किताब पटाकावणारा नितीन घोरपडे हा मराठवाड्यातील पहिलाच मॅरेथॉनपटू ठरला आहे.
हंम्बुर्ग आयर्नमॅन स्पर्धा २९ जुलै रोजी झाली. या स्पर्धेत ३.८ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकल चालविणे आणि ४२.२ किमी धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धकाने हे सर्व सलग न थांबता करायचे असतात. ही तिन्ही आव्हाने पार करणाऱ्याला ‘आयर्नमॅन’ हा किताब दिला जातो.
यासाठी १५.५० तासांचा वेळ निश्चित करण्यात आला होता, परंतु नितीनने १२.५९ तासांत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करीत 'आयर्नमॅन' हा किताब पटाकावला.
जगातील सर्वात खडतर मानली जाणारी ‘खार्दूंग ला’ मॅरेथॉन स्पर्धा नितीनने १२ तास ३५ मिनिटांत पूर्ण केली होती. अशी कामगिरी करणारा तो मराठवाड्यातील पहिलाच धावपटू आहे. ही स्पर्धा ७२ किलोमीटर अंतराची असते.
मुंबई विद्यापीठातील स्टेडियममध्ये सलग २४ तास धावण्याचा विक्रमही नितीनने केला आहे. २४ तास धावताना त्याने ११५.६ किलोमीटर अंतर कापले.
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सीईओपदी सीमा नंदा
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या सीमा नंदा यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अमेरिकेतील मोठ्या राजकीय पक्षाच्या सीईओपदी नियुक्त होणाऱ्या सीमा नंदा भारतीय-अमेरिकी समुदायातील पहिल्याच नागरिक आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समितीच्या नियमित कामकाजाची जबाबदारी नंदा यांच्यावर आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या सीईओ म्हणून नंदा यांच्यासमोर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे.
या निवडणुकीसाठीची धोरणे ठरविण्यात नंदा यांचा महत्त्वाचा सहभाग असणार आहे.
घुसखोरांसाठी सर्वांत सोयीचे ठिकाण असलेल्या आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा (राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका) मसुदा जाहीर करण्यात आला.
यानुसार आसाममधील एकूण ३.२९ कोटी अर्जांमधून २.८९ कोटी लोकांचे नावे या राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली. तर ४० लाख लोकांची नावे यातून वगळण्यात आली.
कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकत्व सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांची नावे या मसुद्यामधून बाहेर ठेवण्यात आली.
हा केवळ मसुदा असून, त्याला अंतिम रूप देण्यात आलेले नाही. ज्या रहिवाशांची नावे या मसुद्यात समाविष्ट केलेली नाहीत, त्यांना नागरिकत्वासाठी दावा करण्याचा आणि या निर्णयावर आक्षेप घेण्याची संधी मिळणार असल्याचे रजिस्ट्रार जनरल यांनी स्पष्ट केले आहे.
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० तुकड्या तैनात करण्यात आल्या.
तसेच बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेजारील देशांमधून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करुन येथेच वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांची संख्या मोठी आहे. ही देशाच्या सुरक्षेसह इतर कारणांसाठी गंभीर बाब आहे.
भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सावो गेम्समध्ये सुवर्णपदक
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फिनलंडमधील सावो गेम्समध्ये ८५.६९ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्णपदक पटकावले.
आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने त्याने चीन तैपेईच्या चाओ सुन चेंगचा पराभव केला. चेंगने ८२.५२ मीटरपर्यंत भालाफेक करीत रौप्य जिंकले.
२३ वर्षीय चेंग हा एकमेव आशियाई खेळाडू आहे ज्याने ९० मीटरपेक्षा पुढे भालाफेक करीत विक्रम नोंदवला आहे.
त्याने चीन तैपेईत गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सीटी गेम्समध्ये ९१.३६ मीटर अंतरावर भाला फेकत विक्रम नोंदवला होता.
नीरजने यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मे महिन्यांत दोहा येथे झालेल्या डायमंड लीग मिटिंगमध्ये त्याने ८७.४३ मीटर भालाफेकत वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
या सुवर्णपदकामुळे त्याने आशियातील विक्रमवीर चेंगला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याचा मान पटकावला आहे.
दाऊदी बोहरा समाजातील अनिष्ट खतना प्रथेवर प्रश्नचिन्ह
दाऊदी बोहरा मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या अल्पवयीन मुलींच्या खतना प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या प्रथेवर बंदी आणावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
या याचिकेबाबत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बायकांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो असे म्हटले आहे.
खतनासारख्या अनिष्ट प्रथा महिलांच्या गुप्ततेचा अधिकार उल्लंघन करणाऱ्या आहेत. ही प्रथा लैंगिक संवेदनशीलतेसाठी मारक ठरते. तसेच आरोग्यासाठीही हानीकारक आहे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
खतनासारख्या प्रथा या स्त्रियांचा स्वाभिमान धुळीला मिळवणाऱ्या आहेत असेही कोर्टाने म्हटले आहे.
दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाच्या अल्पवयीन मुलींची सुंता करण्याच्या या अनिष्ट प्रथेवर संपूर्ण भारतात बंदी घालण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
सौरभ वर्माला रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद
भारताचा माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता सौरभ वर्माने जपानच्या कोकी वातानाबेला पराभूत करत रशिया ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत सौरभने जपानच्या कोकी वातानाबेची झुंज १९-२१, २१-१२, २१-१७ अशा ३ सेट्समध्ये मोडून काढली.
दुखापतीमुळे बराच काळ ग्रस्त असलेल्या सौरभने २०१६मध्ये चायनीज तैपेई मास्टर्स स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतरचे त्याचे हे पहिलेच जेतेपद आहे.
याशिवाय सौरभने बेंगळुरूत झालेली अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन स्पर्धा जिंकून आशियाई स्पर्धेतील स्थानही निश्चित केले आहे.
याच स्पर्धेच्या मिश्र दुहेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीने मिश्र दुहेरीचे रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत रशियाचा व्लादिमिर इव्हानोव्ह आणि कोरियाची मिन क्यूंग किमने त्यांना पराभूत केले.
स्मृती मंधानाचे महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक
इंग्लंडमधील केआयए (KIA) सुपर लीग स्पर्धेत भारताच्या स्मृती मंधानाने महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनशी बरोबरी केली आहे.
वेस्टर्न स्ट्रॉम संघाकडून खेळताना स्मृतीने १८ चेंडूत अर्धशतक केले. या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. स्मृतीने या सामन्यात १९ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावांची खेळी केली.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या केआयएसुपर लीग स्पर्धेत खेळणारी स्मृती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
याआधी हरमनप्रीत कौरला सरे स्टर्स संघाने करारबद्ध केले होते, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे तिला एकही सामना खेळता आला नव्हता.
भारतात दरवर्षी सुमारे १०० वाघांचा मृत्यू
भारतात दरवर्षी सुमारे १०० वाघांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘क्लॉ’ (कन्झर्वेशन, लेन्स आणि वाईल्डलाईफ) या समूहाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
भारतात गेल्या सात महिन्यांत सुमारे ५५ वाघांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील २६ मृत्यू हे मध्य भारतातील महाराष्ट्र (११), मध्यप्रदेशात (१५) झालेले आहेत.
गेल्या सात महिन्यांत सुमारे २२ वाघिणींचा मृत्यू झाला आहे. सुमारे १५ पिलांना जन्म देण्याची एका वाघिणीची क्षमता असते. ही बाब लक्षात घेतल्यास झालेली हानी फार मोठी आहे.
मध्य भारतात वीज प्रवाहाचा धक्का हे वाघांच्या मृत्यूचे एक मोठे कारण समोर आले आहे. सुमारे १२ वाघांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला.
रस्ते अपघातातील वाघमृत्यूची संख्याही अधिक आहे. ‘बाजीराव’ नावाचा ढाण्या वाघ महाराष्ट्राने अपघातात गमावला होता.
या ५५ पैकी १३ वाघांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. १५ वाघांचा मृत्यू अनैसर्गिक तर २७ मृत्यू नैसर्गिक असल्याचे समोर आले आहे. यातील २२ मृत्यू हे एक ते तीन वर्षे वयोगटातील वाघांचे आहेत.
भारतातील एचआयव्ही बाधितांच्या प्रमाणात घट : यूएन एड्स
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एचआयव्हीसंदर्भात कार्यरत असलेल्या सहयोगी संस्थेने (यूएन एड्स) जागतिक पातळीवरील ‘माइल्स टू गो’ हा अहवाल नुकताच जाहीर केला.
या अहवालात २०१० ते २०१७ दरम्यानची एचआयव्ही संबंधित आकडेवारी देण्यात आली आहे.
जागतिक पातळीवर एचआयव्ही रोखण्यासाठी अपेक्षित वेगाने काम होत नसल्याची धोक्याची घंटा या अहवालाद्वारे वाजवण्यात आली आहे.
नव्याने एचआयव्ही बाधितांचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक पातळीवर गेल्या सात वर्षांमध्ये एचआयव्ही बाधितांचे प्रमाण केवळ १८ टक्क्यांनी कमी झाले.
एचआयव्ही बाधितांची संख्या २०१०मध्ये २२ लाख होती. २०१७मध्ये ती १८ लाखांवर आली आहे. नव्या एचआयव्ही बाधितांपैकी ९७ टक्के रुग्ण पूर्व युरोप आणि मध्य आशियातील आहेत.
एचआयव्हीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १ लाख ६० हजार वरून ६९ हजार इतके कमी झाले. तर एचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण २३ लाखांवरून २१ लाखांवर आल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट झाले.
भारतासह कंबोडिया, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांनी विशेष लक्ष दिल्यामुळे २०१०च्या तुलनेत २०१७मधील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. फिलिपिन्स आणि पाकिस्तानमध्ये मात्र एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढतेच आहे.
भारतात २०१०मध्ये एचआयव्ही आढळून आलेल्या नव्या रुग्णांचे प्रमाण जवळपास १ लाख २० हजार होते. २०१७मध्ये ते कमी होऊन जवळपास ८८ हजारांवर आले आहे.
फियाट-क्रायस्लरचे माजी सीईओ सर्गियो मार्कियोनी यांचे निधन
फियाट-क्रायस्लर कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सर्गियो मार्कियोनी यांचे २५ जुलै रोजी निधन झाले. त्यांचे वय ६६ वर्षे होते.
आधी फियाट आणि नंतर क्रायस्लर या दोन्ही कंपन्यांना कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा स्थिरस्थावर करण्यात सर्गियो मार्कियोनी यांचा सिंहाचा वाटा होता.
२००४मध्ये त्यांनी प्रथम फियाट कंपनीचे सीईओ पद स्वीकारले आणि त्यांनी अल्पावधीतच फियाट कंपनीला तोट्याच्या फेऱ्यातून बाहेर काढले.
फियाट-५०० या चिमुकल्या मोटारीला त्यांनी नव्याने बाजारात आणले. फियाट कंपनीसाठी ती अत्यंत लाभदायी खेळी ठरली.
मंदीसदृश परिस्थितीमुळे २००८मध्ये अमेरिकेतली क्रायस्लर कंपनी डबघाईला आली. त्यांनी फियाटला मदतीसाठी पुकारले. फियाट-क्रायस्लर कंपनीची जबाबदारीही मार्कियोनी यांच्याकडे आली.
मार्कियोनी यांचे नेतृत्व आणि मोक्याच्या पदांवर (लीडरशिप टीम) योग्य माणसे नेमण्याची त्यांची क्षमता फियाट-क्रायस्लरलाही नव्या वाटेवर घेऊन गेली.
मार्कियोनी यांना भारताविषयी प्रेम आणि रतन टाटांविषयी नितान्त आदर होता. फियाट कंपनीने टाटांच्या सहकार्याने भारतात बस्तान मांडण्याचा अपयशी प्रयत्न केला होता.
फियाट कंपनीचे उत्कृष्ट इंजिन उपलब्ध असतानाही टाटांनी देशी बनावटीचे इंजिन विकसित केले आणि यशस्वीरीत्या वापरून दाखवले याचे मार्कियोनी यांना विलक्षण कौतुक होते.
त्यांनी सतत नवीन उपायांचा, धोरणांचा विचार केला. जुलै २०१८मध्ये त्यांनी आपल्या सर्व पदांवरुन राजीनामा दिला आणि काही दिवसांनी त्यांचे निधन झाले.
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणचे चलन कोसळले
अणुकार्यक्रमामुळे अमेरिकेने इराणवर घातलेल्या कडक निर्बंधांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या इराणचे चलन दिवसेंदिवस कोसळत आहे.
२८ जुलै रोजी एका डॉलरच्या बदल्यात १.१२ लाख इराणी रिआल इतकी विक्रमी घसरण इराणच्या चलनाची झाली. त्यापूर्वी २७ जुलै रोजी एका डॉलरची किंमत ९८ हजार रिआल होती.
जानेवारी २०१८मध्ये एका डॉलरची किंमत ३५,१८६ एवढी होती. गेल्या चार महिन्यांमध्ये इराणी रिआलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
अर्थव्यवस्थेत होत असलेल्या पडझडीमुळे इराणी नागरिक चिंतीत झाले आहे. त्यामुळे आपली बचत आणि गुंतवणुकीला ते डॉलरच्या रूपात सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मे २०१८मध्ये अमेरिकेने अणुकरारामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणला पुन्हा एकदा निर्बंधांचा सामना करावा लागला.
आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला १० पदके
इस्तानबुल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण १० पदकांची कमाईकेली आणि त्यात ७ पदके महिलांनी जिंकली आहेत.
पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू ठरली. तिने ५५ किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर ६-३ असा विजय मिळवला.
राष्ट्रकुल विजेत्या बजरंग पुनियाने सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची (७० किलो गट) कमाई केली. महिन्याच्या सुरूवातीला जॉर्जियात झालेल्या स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
६१ किलो वजनी गटात संदीप तोमरवर इराणच्या मोहम्मदबाघेर याखकेशीने ८-२ अशी मात केली. त्यामुळे संदीपला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महेशकुमार मलानी पाकिस्तानात संसदीय निवडणूक जिंकणारे पहिले हिंदू
पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत महेशकुमारमलानी संसदीय निवडणूक जिंकणारे पहिले हिंदू ठरले आहेत.
सिंध प्रांतातील थरपरकरमधील खुल्या मतदारसंघातून त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीतर्फे निवडणूक लढविली होती.
पाकिस्तानातील हिंदू राजस्थानी पुष्करना ब्राह्मण नेता मलानी यांनी ही निवडणूक एकूण १४ प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवून जिंकली आहे.
मलानी यांच्या विरोधात हाफिझचा पक्ष अल्लाहु अकबर तहरीक, तहरीक-ए-लबेक पाकिस्तान या पक्षांचे उमेदवार आणि काही अपक्ष उमेदवार उभे होते.
२०१३च्या निवडणुकीत देखील मलानी सिंध प्रांतातील पीएस-६१ ही विधानसभेची जागा जिंकणारे पहिले हिंदू ठरले होते. ते २००३ ते २००८ दरम्यान पीपीपीच्या आरक्षित जागेवरून संसद सदस्यही झाले होते.
पाकिस्तानात २००२मध्ये कायद्यात बदल करून बिगर मुस्लीम नागरिकांना देखील मतदान आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार देण्यात आला होता.
५५ वर्षीय मलानी अल्कसंख्याक समुदायाचे नेते आहेत आणि त्यांनी निवडणूकीत एकूण ३७ हजार २४५ मते मिळवली. त्याचे प्रतिस्पर्धी अरब जकाउल्ला यांना १८ हजार ३२३ मते मिळाली.
भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची २७ जुलै रोजी तिसरी पुण्यतिथी.
लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे झाला.
२७ जुलै २०१५ रोजी आयआयएम शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले.
अब्दुल कलाम यांचे संपुर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारासह पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीआरडीओमध्ये (संरक्षण संशोधन विकास संस्था) काम करण्यास सुरुवात केली.
कलाम यांना कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी भारतीय लष्करासाठी हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले.
१९६३साली कलाम यांनी नासा या जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही-३ या प्रकल्पांवर काम सुरु केले. हे दोन्ही प्रोजेक्ट यशस्वी झाले.
भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाने पोखरण येथे दुसरी अणूस्फोटाची चाचणी केली.
या चाचणीच्यावेळी राजकीय आणि तांत्रिक दोन्ही आघाडयांवर कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. यानंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ म्हणून लोक त्यांना ओळखू लागले.
१९९२ ते १९९९ या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २००२मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. २५ जून २००२ रोजी त्यांनी देशाचे ११वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.
अब्दुल कलाम यांना लहान मुलांची आवड होती. ही लहान मुलेच उद्याची भविष्य आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्तवेळ मुलांसोबत घालवायचे. त्यांच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे द्यायचे.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. राजेंद्र शिंदे
मुंबईच्या सेंट झेवियर्स या ख्यातकीर्त महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉ. राजेंद्र शिंदे यांची महाविद्यालयाच्या प्राचार्य (प्रिन्सिपल) पदावर नियुक्ती झाली आहे.
काही प्रमाणात धार्मिक पगडा असलेल्या झेविअर्सच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे शिंदे हे महाविद्यालयाचे पहिलेच मराठी प्राचार्य आहेत.
गुणवत्तेचा दर्जा, कडक शिस्त, सातत्याने नवोन्मेष घडविण्याची उर्मी आणि विद्यार्थीपूरक धोरण यामुळे मुंबईत या महाविद्यालयाचा कमालीचा दबदबा आहे. येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असते.
याच महाविद्यालयात १९८०मध्ये विद्यार्थी म्हणून शिंदे यांनी प्रवेश घेतला होता. पुढे याच महाविद्यालयात त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले.
१९८३मध्ये ते उपप्राचार्य झाले. आता येत्या १ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाचे २४वे प्राचार्य म्हणून ते पदभार स्वीकारतील.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा सर्व कारभार ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून चालविला जातो. दिल्ली, चेन्नई, कोलकात्यातही अशीच ख्रिश्चन महाविद्यालये आहेत. तिथेही आजवर बिगरखिस्ती माणूस प्राचार्य झालेला नाही.
मूळचे नाशिक जिल्ह्यातील ओढा गावचे असलेल्या राजेंद्र शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या, सरकारी शाळेत झाले.
पुढच्या शिक्षणासाठी ते मुंबईत आले. १९८०साली त्यांनी वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी झेविअर्समध्ये प्रवेश घेतला.
पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी महाविद्यालयातील वनस्पती संग्रहालयचे अभिरक्षक म्हणून काम सुरू केले. हे काम करीत असतानाच वनस्पतिशास्त्रात पीएचडीही केली.
टॅक्सनॉमी हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. औषधी वनस्पती, वनस्पतींची नावे यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे.
सामान्य माणसाला तुलनेने किचकट वाटणारा वनस्पतिशास्त्रासारखा विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी आहे.
पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी निसर्गाची भाषा शिकावी यासाठी झटणारे, विद्यार्थ्यांमधील कुतूहलाला संशोधनाची वाट दाखवणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती आहे.
शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण
देशातील सर्व खगोलप्रेमी याबरोबरच नागरिकांनी २७ जुलै रोजी पौर्णिमेला या शतकातील (२००१ ते २१००) सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण अनुभवता आले.
या ग्रहणाचा कालावधी चार तास (तीन तास पंचावन्न मिनिटे) असल्याने हे सर्वांत मोठ्या कालावधीचे ठरले. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल.
२७ जुलै रोजी रात्री १०.४५ मिनिटांनी हे ग्रहण सुरू झाले. १ तास दीड मिनिटे इतका केल चंद्राची खग्रास अवस्था होती.
जुलै महिन्यामध्ये सूर्य पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते.
या ग्रहणादरम्यान पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते.
चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते.
हे खग्रास चंद्रग्रहण हे ‘सारोस’ चक्रातील १२९वे ग्रहण होते. या आधीचे सर्वांत मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते.
याच दिवशी सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा तांबडा ग्रह मंगळही प्रतियुतीमध्ये आला. तो २००३नंतर प्रथमच पृथ्वीपासून इतक्या कमी अंतरावर आला.
पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडांतून (युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका) हे ग्रहण पाहायला मिळाले.
जवळपास संपूर्ण भारतातून या ग्रहणाच्या सर्व स्थिती (स्पर्श, संमिलन, उन्मीलन व मोक्ष) पाहायला मिळाल्या.
भारतीय महिला तिरंदाजी संघ विश्वक्रमवारीत प्रथम स्थानी
भारताच्या महिला तिरंदाजी कम्पाऊंड संघाने विश्वक्रमवारीत ऐतिहासिक कामगिरीसह प्रथम स्थान पटकविले आहे.
कम्पाऊंड प्रकारात अव्वल स्थान मिळविण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. रिकर्व्ह प्रकारात दीपिका कुमारी यापूर्वी विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली होती.
अंताल्या आणि बर्लिन विश्वचषकात रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या भारताच्या महिला संघाचे एकूण ३३४२.६ गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानावरील चायनीज तायपेई संघाचे सहा गुण कमी आहेत.
विश्वचषकात रौप्य संपादन करणाऱ्या दोन्ही संघात ज्योती सुरेखा वेन्नाम आणि मुस्कार किरार यांचा समावेश होता.
अंताल्या स्पर्धेत दिव्या घयाल हिचा तिसरी खेळाडू म्हणून तर बर्लिन स्पर्धेच्यावेळी तृषा देव हिचा संघात समावेश होता.
वैयक्तिक गटात अव्वल दहा खेळाडूंमध्ये भारताचे दीपिका कुमारी आणि अभिषेक वर्मा या दोन खेळाडूंचा समावेश आहे. दोन्ही खेळाडू अनुक्रमे रिकर्व्ह आणि कम्पाऊंड प्रकारात सातव्या स्थानावर आहेत.
पश्चिम बंगालचे नामांतरण बांगला करण्यासाठी ठराव मंजूर
पश्चिम बंगाल विधानसभेत पश्चिम बंगाल राज्याचे नामांतरण ‘बांगला’ असे करण्याचा ठराव मंजूर झाला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व भाषांमध्ये हे नामांतरण करण्यात यावे असे ठरावात म्हटले होते.
आता हा ठराव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. गृह मंत्रालयाने ठरावाला मंजुरी दिली तरच पश्चिम बंगालचं ‘बांगला’ असे नामांतरण केले जाऊ शकते.
याआधी २९ ऑगस्ट २०१६ रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभेत नामांतरण करण्याचा ठराव मंजूर झाला होता.
यानुसार पश्चिम बंगालचे नाव बंगालीमध्ये बांगला, तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये बंगाल असे करण्याचा प्रस्ताव होता.
मात्र त्यावेळी काँग्रेस, भाजपा आणि डाव्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. एकाच राज्याला तीन वेगवेगळी नावे देता येणार नसल्याची सबब केंद्र सरकारने दिली होती.
बेंजामिन पवार्डने मारलेला गोल विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट
फ्रान्सचा बचावपटू बेंजामिन पवार्ड याने अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात मारलेला गोल हा विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोल असल्याची घोषणा फिफाकडून करण्यात आली आहे.
ल्युकास हेरांडेजकडून मिळालेल्या पासवर उजव्या पायाने अफलातून फटका लगावत केलेला गोल हा तांत्रिकदृटय़ा अप्रतिम गोल असल्याचे फिफाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
सामन्याच्या ५७व्या मिनिटाला त्याने केलेल्या या गोलमुळे फ्रान्सला त्यावेळी २-२ अशी बरोबरी साधता आली. त्यानंतर फ्रान्सने तो सामना ४-३ असा जिंकला.
फिफा विश्वचषकातील एकूण १६९ गोलपैकी तो सर्वोत्तम असल्याचे प्रेक्षकांच्या मताद्वारे स्पष्ट झाले.
त्या गोलला कोलंबियाचा मध्यरक्षक ज्युआन क्विंटेरो याने जपानविरुद्ध फ्री किकवर मारलेला गोल आणि क्रोएशियाच्या ल्युका मॉड्रीचने अर्जेंटिनाविरुद्ध केलेल्या गोलपेक्षा अधिक जनसमर्थन मिळाले.
कारगिल युद्धाला २६ जुलै रोजी १९ वर्षे पूर्ण झाली. १९९९च्या कारगिल युद्धात लढलेल्या जवानांच्या त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९साली कारगिल युद्ध झाले होते. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत पराभूत करत जगाला आपल्या वीरतेचा संदेश दिला.
१९६५ आणि १९७१ पेक्षा या युद्धाचे स्वरुप वेगळे होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती.
६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या कारगिल युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. तर १३०० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते.
या युद्धात भारतीय सैन्याने ३००० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
१८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने धाडसाने शत्रूवर विजय मिळवला होता.
या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. तसेच यावेळेस भारताने केलेल्या हवाई कारवाईला सफेदसागर नाव देण्यात आले होते.
दोन अण्वस्त्रधारी सत्ता एकमेकांसमोर ठाकण्याच्या दुर्मिळ घटनेपैकी एक ही घटना होती. या युद्धाच्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते.
तेव्हापासून भारतीय जवानांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण म्हणून २६ जुलै हा कारगिल विजयदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवाणी यांना मॅगसेसे पुरस्कार
आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार २०१८ या वर्षासाठी सहा जणांना जाहीर करण्यात आला. या सहा जणांमध्ये २ स्त्रियांचा तसेच २ भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.
प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वाटवाणी या दोन भारतीयांना मानाचा मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला आहे.
याशिवाय पुरस्कार विजेत्यांमध्ये फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी, व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम, कंबोडियाचे युक छांग आणि ईस्ट तिमोर या नवजात देशातील मारिया डी लार्देस मार्टिन्स क्रूझ या चौघांचाही समावेश आहे.
कंबोडियाच्या युक छांग यांनी आपल्या देशातील वंशसंहाराची स्मृती जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या स्मृतींमधून विद्वेषाला कायमची मूठमाती मिळावी, ही त्यांची यामागची संकल्पना.
ईस्ट तिमोरच्या मारिया यांनी सर्व वंश व वर्णाच्या नागरिकांना सामाजिक न्याय मिळावा, यासाठी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या लढ्यात गरिबी हटावला विशेष स्थान आहे.
फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी यांनी गेले अर्धशतक सामाजिक न्यायाची लढाई चालवली आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांचा रोषही पत्करला.
व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम यांनी अपंगत्वावर मात करून देशातील अपंगांसाठी सारे जीवन वाहिले आहे.
मंगळाच्या पृष्ठभागाखाली मोठ्या सरोवराचा शोध
इटलीच्या संशोधकांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे या ग्रहावर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी व जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
याबाबतचे संशोधन त्यांनी अमेरिकेतील सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध केले आहे.
युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीने या सरोवरचा शोध लागला आहे.
मंगळावरील बर्फाच्या थराखाली हे सरोवर असून, त्याची लांबी जवळपास २० किलोमीटर आहे. मंगळ ग्रहावर सापडलेला पाण्याचा हा सर्वांत मोठा साठा आहे.
हे सरोवर बर्फाच्या थराखाली दीड किलोमीटर खोलीवर आहे. मंगळावर तात्पुरत्या कालावधीसाठी पाण्याचे प्रवाह होते, ही समजूत या नव्या शोधामुळे चुकीची ठरली असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
मंगळावर कायमस्वरूपी पाण्याचा साठा असून, त्यामुळे जीवसृष्टीला पोषक वातावरणही असण्याची शक्यता आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
मंगळ ग्रह सध्या थंड, ओसाड आणि कोरडा असला तरी तो उबदार आणि काहिसा ओलसरही आहे. ३.६ अब्ज वर्षांपूर्वी येथे भरपूर पाणीसाठा आणि पाण्याची तळी असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे.
या नवीन शोधामुळे मंगळ मोहिमेवर मानवाला पाठविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तानात इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष
पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळवता आले नाही.
तरीही ६५ वर्षीय इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनणार हे जवळपास निश्चित आहे. इम्रान खान पाकिस्तानचे १९वे पंतप्रधान असतील.
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.
नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी २७० जागांसाठी पार पडलेल्या निवणुकीत ११५ जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने जिंकल्या.
नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) पक्षाला ६३ व असिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत पाकिस्तानची सत्ता बळकावू पाहणारा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफीज सईदच्या अल्लाह-ओ-अकबर पक्षाला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही.
निवडणुकीत गैरप्रकाराद्वारे इम्रान खानच्या पक्षाने इतक्या जागा मिळवल्याचा आरोप शरीफ यांच्या पीएमएल-एनसह अन्य पक्षांनीही केला आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंबलीमध्ये एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी २७२ उमेदवार थेट जनतेमधून निवडले जातात. तर बाकीच्या ६० जागा महिलांसाठी आणि १० जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.
२७२ पैकी दोन ठिकाणी अजूनही निवडणूक झालेली नाही त्यामुळे इम्रान यांना बहुमतासाठी १३६ हा आकडा जुळवून आणावा लागेल. सरकार स्थापनेसाठी त्यांना छोटया पक्षांची व अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
अशा अस्थिर स्थितीत पाक लष्कर व आयएसआय यांचा इम्रान खान यांच्यावर दबाव वाढणार असून, तसे होणे भारतास त्रासदायक आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर भारताबाबत इम्रान काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
इम्रान पंतप्रधान झाल्यास काश्मीर प्रश्न अधिक चिघळण्याची व भारतातील दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
कर्नाटकमध्ये दुर्मिळ रक्तगटाचा शोध
कर्नाटकमधील कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका अतिशय दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावला आहे. या रक्तगटाचे नाव पीपी किंवा पी नल फोनोटाइप असे आहे.
ज्या रुग्णाचा हा रक्तगट आहे, तो रुग्ण हा रक्तगट असणारी देशातील पहिली आणि एकमेव व्यक्ती ठरली आहे.
या रुग्णाच्या रक्ताचा नमूना आंतरराष्ट्रीय ब्लड ग्रूप रेफरन्स लॅबॉरेटरीमध्ये ब्रिस्टल येथे (यूके) तपासणीसाठी पाठवले असता या रुग्णाच्या रक्तात पीपी फेनोटाइप सेल्स असल्याचे आढळले.
व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणाला मंजुरी
व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. एकत्रीकरणानंतर ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी असेल.
दोन्ही कंपन्या एकत्रित आल्यानंतर त्यांचे एकत्रित मूल्य २३ अब्ज डॉलरवर (दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक) जाण्याची शक्यता आहे.
शिवाय या कंपनीकडे देशातील दूरसंचार उद्योगाचा ३५ टक्के बाजार हिस्सा राहणार असून, एकूण ग्राहक संख्या ४३ कोटींवर जाणार आहे.
यामुळे व्होडाफोन आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओ यांच्यात येत्या काही दिवसांत नव्याने डेटायुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे.
सध्याचे ग्राहक राखून नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी या तिन्ही कंपन्या अधिक आकर्षक डेटा योजना व अन्य सुविधा सादर करण्याची शक्यता आहे.
आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाद्वारे मोबाइल व्यवसायाच्या एकत्रीकरणासाठी दूरसंचार विभागाला एकत्रितरित्या ७२६८.७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाला केंद्र सरकारने ९ जुलैलाच मंजुरी दिली होती. मात्र, तत्पूर्वी दोन्ही कंपन्यांना सरकारने थकीत रक्कम भरण्याविषयी सूचना केली होती.
दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीमध्ये कुमारमंगलम बिर्ला यांच्यावर गैरकार्यकारी संचालकपदाची जबाबदारी येणार आहे.
नव्या कंपनीच्या सीईओपदी व्होडाफोन इंडियाचे सध्याचे सीओओ बालेश शर्मा तर सीएफओपदी आयडियाचे चीफ फायनान्शियल ऑफिसर अक्षय मुंद्रा यांची नियुक्ती होणार आहे.
पाकिस्तानात मुख्य न्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिलेची नेमणूक
बलुचिस्तान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ताहिरा सफदर या महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.
पाकिस्तानसारख्या धर्मसत्ताक व पुराणमतवादी देशात पहिल्यांदाच एखाद्या महत्त्वाच्या पदावर महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आतापर्यंत मुख्य न्यायाधीशपदी महिलेची नेमणूक झाली नव्हती.
ताहिरा यांचा जन्म क्वेट्टा येथे ५ ऑक्टोबर १९५७ रोजी झाला. बलुचिस्तानात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची १९८२मध्ये नेमणूक झाली.
बलुचिस्तान विद्यापीठातून नंतर त्यांनी उर्दू साहित्यातून पदव्युत्तर पदवी व १९८०मध्ये युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.
त्यांची वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणून १९८७मध्ये नेमणूक झाली. नंतर १९९१ मध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे पद त्यांच्याकडे आले.
१९९८मध्ये त्यांची बलुचिस्तान सेवा लवादाच्या सदस्यपदी निवड, २००९ मध्ये याच लवादाचे अध्यक्षपद असा त्यांचा प्रवास प्रगतीकडे होत राहिला.
नंतर त्यांची नेमणूक २००९ मध्ये उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली व नंतर २०११मध्ये त्यांना या पदावर कायम करण्यात आले.
अलीकडे त्या माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यातील तीनसदस्यीय पीठाच्या सदस्या होत्या.
३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी देशातील काही न्यायाधीशांना अटक करून आणीबाणी जाहीर केली होती, त्याबाबतचा हा खटला महत्त्वपूर्ण आहेच, शिवाय त्यातील त्यांची नेमणूकही लक्ष वेधणारी आहे.
पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेवर आयएसआय व लष्कराचा सतत दबाव वाढला असताना ताहिरा यांचा मार्ग कंटकमय असला तरी त्यांची नियुक्ती तेथील महिलांचे मनोबल वाढवणारी आहे.
ख्यातनाम निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांचे निधन
आकाशवाणी पुणे केंद्राच्या ख्यातनाम निवेदिका आणि मराठी लेखिका सुधा नरवणे (वय ८८) यांचे हदयविकाराच्या झटक्याने २२ जुलै रोजी निधन झाले.
नरवणे यांनी १० वर्षांहून अधिक काळ ऑल इंडिया रेडीओचे प्रादेशिक केंद्र अर्थात आकाशवाणीसाठी निवेदिका म्हणून काम केले होते. त्यांच्या आवाजात अनेक वर्षे आकाशवाणीच्या सकाळी सातच्या बातम्यांचे प्रसारण होत असे.
आकाशवाणीवरील आपल्या कारकिर्दीसह लेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. लघुकथा, लघुनिबंध लेखनासह त्या अनुवादही उत्तम करत.
इंद्रधनू, ते अठरा सेकंद, लामणदिवा, जननी : माता, कन्या, मातृत्व, इतवा मुंडाने लढाई जिंकली : आदिवासी जीवनावरील कथा अशी त्यांनी लिहिलेली व अनुवाद केलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्या काळात नावाजलेल्या सत्यकथा, किर्लोस्कर, हंस, स्त्री, माणूस अशा अनेक नियतकालिकांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले होते.
त्यांच्या आजवरच्या कामगिरीबद्दल राज्य पुरस्काराबरोबरच अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी आतापर्यंत त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
अमेरिकेकडून भारताला सीएएटीएसए कायद्यातून सवलत
अमेरिका सीएएटीएसए या विशेष कायद्यातून भारताला सवलत देणार आहे. या कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्यावर निर्बंध आहेत.
त्यामुळे भारताचा रशियाकडून एस-४०० ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
एकूण ३९ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार असून भारत रशियाकडून एस-४००च्या पाच सिस्टीम विकत घेणार आहे.
भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियाबरोबर हा करार केला असता तर भारतावर मेरीकेने आर्थिक निर्बंध लावले असते. पण आता हा धोका उरलेला नाही.
भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या तीन देशांना सीएएटीएसए या विशेष कायद्यातून सवलत मिळणार आहे.
एस-४००मुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होईल. मागच्या दोन ते तीन वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये या व्यवहाराची बोलणी सुरु आहेत.
शत्रूची क्षेपणास्त्रे, टेहळणी विमाने, स्टेलथ तंत्रज्ञानाने युक्त असलेली फायटर विमाने शोधून नष्ट करण्याची एस-४००ची क्षमता आहे.
ऑक्टोंबर २०१६मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये गोव्यात बैठक झाली. त्यावेळी सर्व प्रथम एस-४००च्या व्यवहाराबाबत करार झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ जुलै रोजी रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिका या ३ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. २३ ते २७ जुलै दरम्यान पाच दिवसांचा मोदींचा हा दौरा आहे.
रवांडा आणि युगांडा या देशाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मोदींनी रवांडा देशाला भेट दिली. दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेला रवांडा हा देश आहे.
यावेळी मोदी आणि रिपब्लिक ऑफ रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांच्यात द्विपक्षीय संवाद झाला.
या संपुर्ण दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान सुरक्षा, व्यापार, संस्कृती, कृषी, दुग्ध व्यवसायासंबंधी विविध करार करण्यात आले.
दोन्ही देशातील संबंध वृद्धींगत होण्यासाठी या दौऱ्यात भारताकडून २०० गायी रवांडा देशाला भेट म्हणून देण्यात आल्या.
रवांडामध्ये गरीबातल्या गरीब कुटुंबासाठी गाय हे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने, ‘गिरिंका’ या उपक्रमांतर्गत गरीब कुटुंबांना २०० गायी भारताने भेट म्हणून दिल्या.
रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांच्या विशेष पुढाकाराने ‘गिरिंका’ (एक कुटुंब एक गाय) ही राष्ट्रीय सामाजिक संरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.
रवांडा हा देश छोटा असला तरीही राजधानीचे शहर असलेल्या किगलीत अत्यंत रचनात्मक रित्या मेट्रोचे जाळे उभारण्यात आले आहे. तसेच संपूर्ण देशात वेळेला अनन्य साधारण महत्त्व आहे.
महिला सशक्तीकरणातही रवांडा हा देश अव्वल स्थानी आहे. रवांडामध्ये दोन तृतीयांश महिला या खासदार आहेत.
या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी गेल्या ४ वर्षात ५४ देशांना भेटी दिल्या आहेत. या दौऱ्यांवर १४८४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
त्यांनी गेल्या ४ वर्षातील १७१ दिवस विदेशात घालविले आहेत. त्यामुळे मोदींच्या पंतप्रधान कार्यकाळातील १२ टक्के वेळ परदेशात गेला आहे. मोदींच्या ४ वर्षीय कार्यकाळात त्यांनी अमेरिकेला सर्वाधिक वेळा भेट दिली.
एनपीएमधून सरकारी बँकांना बाहेर काढण्यासाठी ‘सशक्त’ मोहिम
वाढत्या थकित कर्जाचा सामना करणाऱ्या बँकांच्या ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकित कर्जाच्या मालमत्तांचा निपटारा करण्यासाठी बँका आणि वित्त कंपन्यांमध्ये आंतरकर्ज करार करण्यात आला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या थकित कर्जातून सरकारी बँकांना बाहेर येता यावे याकरिता ‘सशक्त’ ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.
याचाच एक भाग म्हणून विविध सरकारी तसेच खासगी बँका, वित्त कंपन्या यांच्या दरम्यान आंतरकर्ज करार झाला.
यानुसार ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकित कर्जाची खाती असलेल्या कर्जदार कंपन्यांच्या मालमत्तांचा तिढा सुटणार आहे.
आंतरकर्ज करारांतर्गत २२ सरकारी बँका, १९ खासगी बँका, ३२ विदेशी बँका, १२ वित्तीय कंपन्यांनी स्वाक्षरी केली आहे. यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ, हुडको यांचाही समावेश आहे.
या करारानुसार, ५० कोटी रुपयांवरील थकित कर्जाचे प्रत्येक खाते याबाबत नेमण्यात आलेली समिती हाताळेल.
संबंधित थकित कर्जदाराकडून ज्या बँकेची सर्वाधिक रक्कम थकित आहे, ती बँक याबाबतचा तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेईल. निर्णय मात्र सर्वानुमते घेण्यात येईल.
त्यानंतर तो निर्णय सर्व कर्ज देणाऱ्या बँक, वित्त कंपन्यांना बंधनकारक असेल. हा कर्ज तिढा १८० दिवसांमध्ये सोडविणे बंधनकारक असेल.
थकित कर्जाची समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पंजाब नॅशनल बँकेचे बिगर अध्यक्ष सुनिल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
या समितीने मालमत्ता पुनर्बाधणी कंपनी स्थापन करण्याची शिफारस सरकारकडे केली होती.
देशातील बँकांमधील एकूण अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) रक्कम डिसेंबर २०१७ अखेर ९ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
मराठा आंदोलन: काकासाहेब शिंदे कोण होते?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारत जलसमाधी घेतली.
त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.
गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे (वय २७) हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाला होता.
गंगापूर तहसील कार्यालयासमोर शेकडो तरुणांचे सुरु असलेले ठिय्या व उपोषण आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत, मराठी समाजाच्या नेत्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा प्रसासानाला दिला होता.
याच आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गंगापूर तहसील परिसरात तणाव निर्माण झाला. तसेच या घटनेनंतर आंदोलनाला वेगळे वळण लागले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.
सरकारने काकासाहेबांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत आणि त्यांचा भावाला आठवड्याभरात सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात मेघा धाडे विजेती
कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली असून पुष्कर जोगने दुसरे स्थान पटकावले.
मेघा धाडेला १८ लाख ६० हजार रुपये आणि खोपोली येथे निर्वाणा लिजर रिअॅलिटी यांच्याकडून सिटी ऑफ म्युझिक या गृहप्रकल्पातील घर बक्षिस म्हणून मिळाले.
बिग बॉस स्पर्धेत तिसरी आलेली स्मिता गोंदकर हिला जेमिनी ऑईल यांच्याकडून उत्कृष्ठ आरोग्यासाठी बक्षिस मिळाले.
मेघा धाडेने कसोटी जिंदगी की, कस्तुरी, झुंज या मालिकांमध्ये तर मॅटर, मान सन्मान, एक होती राणी आदी चित्रपटात काम केले आहे.
गेले ३ महिने सुरु असलेल्या मराठी बिग बॉसच्या घरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. बिग बॉसचे टास्क पूर्ण करताना अनेक वादाचे प्रसंग उभे राहिले होते.
बिग बॉस मराठीच्या या पहिल्या पर्वात प्रथम १५ कलाकार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यानंतर ३ स्पर्धक हे वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आले होते.
यापैकी अंतिम फेरीत मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि सई लोकुर यांनी स्थान मिळवले होते.
पाकिस्तानात निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी तृतीयपंथींची नेमणूक
पाकिस्तानात होत असलेल्या मतदान प्रक्रिया आणि निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी १२५ तृतीयपंथींची नेमणूक करण्यात आली आहे.
हे तृतीयपंथी मतदान व इतर प्रक्रियेतील पारदर्शकता आणि व्यवस्था यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत.
ट्रस्ट फॉर डेमोक्रॅटिक एज्युकेशन अँड अकाऊंटेबिलिटी या स्वयंसेवी संस्थेने निवडणुकीच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नागरीकांना प्रशिक्षण दिले आहे, त्यात या तृतीयपंथीयांचाही समावेश आहे.
या सर्वांची लाहोर, कराची, इस्लामाबाद, क्वेट्टा या शहरांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल.
निवडणूक निरीक्षक म्हणून हे लोक कोठे मतदारांच्या अधिकारांचा संकोच होत असेल किंवा समाजातील अल्पसंख्यांकावर अन्याय होत असेल तर त्याची नोंद करतील.
याबरोबरच १३ तृतीयपंथी या निवडणुकीत विविध भागांतून निवडणूकही लढवत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या तृतीयपंथीयांची संख्या ५ लाख इतकी आहे.
डेव्हिड हेडलीवर अमेरिकेतील तुरुंगात जीवघेणा हल्ला
२६/११च्या मुंबई हल्ल्यातील कटात पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेला सहाय्य करणाऱ्या डेव्हिड कोलोमन हेडली याच्यावर अमेरिकेतील तुरुंगात जीवघेणा हल्ला झाला आहे.
पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक असलेल्या हेडलीला मुंबई हल्ल्याबद्दल दोषी ठरवत अमेरिकन न्यायालयाने ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. शिकागो तुरुंगात तो स्थानबद्ध आहे.
हेडलीच्याच बराकीत जेरबंद असलेल्या दोन कैद्यांनी त्याच्यावर ८ जुलै रोजी हल्ला केला. या हल्ल्यात हेडली गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेडलीवर हल्ला करणारे दोघे कैदी भाऊ असून, काही दशकांपूर्वी पोलिसांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली आहे.
दाऊद सईद गिलानी असे मूळ नाव असलेला हेडली पाकिस्तान सरकार तसेच दहशतवादी संघटनांसाठी ‘डबल एजंट’ म्हणून काम करीत होता.
२००६ ते २००८ दरम्यान त्याने अनेक वेळा भारतात येऊन सीएसटी रेल्वेस्थानक, कॅफे लिओपोल्ड, हॉटेल ताज, नरिमन हाऊस तसेच ट्रायडंट हॉटेलचे फोटो व व्हिडीओ लष्कर ए तोयबाला दिले होते.
मुंबई हल्ल्यातील सहभाग उघड होताच अमेरिकेने त्याला पकडले, मात्र भारताच्या हवाली न करता त्याच्यावर आपल्याच देशात खटला चालवला.
फेब्रुवारी २०१६मध्ये त्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई विशेष न्यायालयात कबुलीजबाब दिला होता.
२६/११ च्या हल्ल्यामुळे मुंबई हादरली होती. या हल्ल्यात २५०पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता.
डॉ. किसन महाराज साखरे यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१७-१८चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ. किसन महाराज साखरे यांना घोषित करण्यात आला.
संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
मानपत्र, ५ लक्ष रुपये रोख तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, डॉ. यु. म. पठाण, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सीस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. किसन महाराज साखरे हे संत वाङमयावर अध्यापन करत असून, गेल्या ५७ वर्षापासून अनेक मासिक व वृत्तपत्रांमधून उपनिषदे तसेच इतर संत वाङमयावर ते लेखन करीत आहेत.
संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे ते अध्यक्ष असून, त्या समितीव्दारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती त्यांनी केलेली आहे.
आकाशवाणीवर त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यदेखील केलेले आहे.
ज्ञानेश्वरीच्या वेदनिष्ठा, सोहम योग, योगत्रयी प्रवचनमालांवर त्यांनी १०० हून अधिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे.
महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच अनेक संस्थांवर त्यांनी विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे.
प्रतिवर्षी १ मे ते ३१ मे या कालावधीत विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क संस्कार शिबीराचे आयोजन करत असतात.
ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून दृकश्राव्य रुपात इंटरनेटवर उपलब्ध करुन देण्याचा पहिला प्रकल्पही त्यांनी पूर्ण केलेला आहे.
१९९०साली त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पावणेतीन क्विंटल ताम्रपटावर कोरुन एक चिरंजीव प्रकल्प पूर्ण केलेला आहे.
संत साहित्यातील योगदानासाठी त्यांना टिळक विद्यापीठाकडून डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
विविध सामाजिक,सांस्कृतिक तसेच वारकरी सांप्रदायिक संस्थांनी त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.
सलग ३ वर्षे आधारकार्डचा वापर न केल्यास ते निष्क्रिय होणार
सलग ३ वर्षे आधारकार्डचा वापर न केल्यास ते निष्क्रिय करण्याचा निर्णययुनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने घेतला.
त्यामुळे पॅनकार्ड आणि बँक खात्याला आधार जोडणी करणे बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच आधार आणि पॅनकार्ड यांच्यावरील नाव, जन्मदिनांक, जन्मवर्ष आणि छायाचित्र या माहितीमध्ये तफावत आढळल्यास त्यांची जोडणी करता येणार नसल्याचेही यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी जोडणी करण्यासाठी दिलेली मुदत पुन्हा वाढविली होती.
आतापर्यंत आधार आणि पॅन क्रमांक जोडणीसाठी ५ वेळा मुदतवाढ देण्यात आली असून, हीच मुदत आता ३१ मार्च २०१९पर्यंत वाढवण्यात आली आहे.
याशिवाय बँक खाते, मोबाईल सीमकार्ड, एलपीजी गॅस सिलींडर अनुदान आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे.
परंतु, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
ज्या नागरिकांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडला आहे, त्यांना आधारशी संबंधित कोणत्याही माहितीमधील बदल प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे.
मुंग्यांच्या एका प्रजातीला डॉ. हिमेंदर भारती यांचे नाव
मुंग्यांच्या प्रजातीवर गेली २० वर्षे काम करणारे डॉ. हिमेंदर भारती यांचे नाव मुंग्यांच्या एका प्रजातीला देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमधील पिरपांजाल हिमालयातील पर्वतराजीत शोधण्यात आलेल्या मुंग्यांच्या एका प्रजातीला लेप्टोजेनीस भारती असे नाव देण्यात आले आहे.
डॉ. भारती हे पतियाळातील पंजाब विद्यापीठात प्राणिशास्त्र व पर्यावरण विज्ञान विभागाच्या ‘अँट सिस्टीमॅटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करतात.
पिरपांजालमध्ये शोधण्यात आलेली मुंगी ११-१२ मिमी लांबीची असून, ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेंपरेट हॉर्टिकल्चर’ या श्रीनगरमधील संस्थेचे डॉ. शाहीद अली अकबर यांनी या मुंग्यांच्या प्रजातीचा शोध लावला आहे.
नव्या मुंगीचा शोध मॉर्फालॉजी तंत्राने लावण्यात आला. डॉ. अकबर यांनीच या प्रजातीला डॉ. भारती यांचे नाव देण्याचे सुचविले. या मुंगीबाबतचा त्यांचा शोधनिबंध ‘बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला.
डॉ. हिमेंदर भारती व त्यांच्या विद्यार्थ्यांनी भारतातील मुंग्यांच्या एकूण ७७ नव्या प्रजाती शोधल्या असून त्यातील २२ पश्चिम घाटातील आहेत.
त्यांनी आग्नेय आशियातील व्हिएतनाम, मलेशिया व चीन या देशांतील आणखी चार नव्या प्रजाती शोधल्या आहेत.
पंजाब विद्यापीठात त्यांनी मुंग्यांची संदर्भसूचीच तयार केली असून त्यांच्याकडे भारत व इतर देशांतील मुंग्यांच्या एक हजार प्रजातींचे नमुने आहेत.
डॉ. भारती यांचे संशोधन मुंग्यांची जीवनशैली, परिसंस्था, त्यांचे उत्क्रांतीतील स्थान, जंगलांच्या संवर्धनात मुंग्यांची भूमिका असे खूप व्यापक आहे.
मुंग्यांच्या अभ्यासाची मिरमेकॉलॉजी नावाची एक शाखा आहे, त्यातील ते अग्रणी संशोधक आहेत.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) २९१ कंपन्यांना त्यांच्या संचालक मंडळावर १ एप्रिल २०२०पासून अकार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
या २९१ कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि भारती एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे.
सेबीच्या नव्या नियमानुसार हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी कंपन्यांना अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या दोन्ही जबाबदाऱ्यांचे विभाजन करावे लागणार आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि भारती एअरटेलचे सुनील भारती मित्तल हे सध्या आपआपल्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या दोन्हीही पदांवर आहेत.
पण २०२०मध्ये या दोघांसह टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, ओएनजीसी, कोल इंडिया, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो आणि एचसीएल टेक्नोलॉजी या कंपन्यांना दोन पदांचे विभाजन करावे लागणार आहे.
सेबीने नियुक्त केलेल्या कोटक समितीने केलेल्या शिफारसीनुसार हा नवीन नियम तयार करण्यात आला आहे.
याशिवाय कंपन्यांच्या संचालक मंडळांवर स्वतंत्र महिला संचालकाची नियुक्त करण्याचा सेबीचा नियम आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सेबीने १ एप्रिल २०१९ची मुदत दिली आहे.
भारताचा धावपटू मोहम्मद अनास याही याने झेक रिपब्लीक येथील ४०० मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
ही शर्यत ४५.२४ सेकंदात पूर्ण करत मोहम्मद अनासने नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे.
गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान मिळविताना अनसने ४५.३१ सेकंदांचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यापूर्वीचा ४५.३२ सेकंदाचा विक्रम त्याच्याच नावावर होता.
मिल्खा सिंगनंतर राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत प्रवेश करणारा अनास हा दुसरा भारतीय ठरला. मिल्खा सिंग यांनी १९५८मध्ये ४४० यार्ड शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते.
भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अनासने ४२ वर्षांनंतर भारताला चारशे मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते.
याच स्पर्धेत महिलांची ४०० मीटर शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारताच्या आर. पुवम्मानेही सुवर्णपदक जिंकले.
तर पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत ४०० मीटरमधील माजी राष्ट्रीय विक्रमवीर आरोक्य राजीवने २०.७७ सेकंद वेळ देत कांस्यपदक जिंकले.
सचिन राठी आणि दीपक पुनियाला सुवर्णपदक
आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे कुस्तीपटू सचिन राठी (७४ किलो वजनी गट) आणि दीपक पुनियाने (८६ किलो वजनी गट) सुवर्णपदक जिंकले.
सचिन राठीने फ्रीस्टाइल कुस्तीत मंगोलियाचा पहेलवान बॅटअर्डेन ब्यामबासुरेन याला नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
दीपकने अंतिम फेरीत तुर्कमेनिस्तानच्या अजथ गजबीय याच्यावर विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले.
दीपकने यापूर्वी २०१६मध्ये आशियाई कॅडेट व आशियाई कुमार स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०१७मध्ये या दोन्ही स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.
त्याचबरोबर याच स्पर्धेत भारताच्या सूरज कोकाटे (६१ किलो वजनी गट), मोहितने (१२५ किलो वजनी गट) कांस्यपदकाची कमाई केली.
सुनील छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा २०१७ या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार’ जाहीर कण्यात आला आहे.
छेत्रीने नुकताच आपला १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. बायचुंग भूतियानंतर ही कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला. तो भारत आणि बंगळुरू एफसीचा स्ट्रायकर आहे.
पुरुष गटात छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर महिला गटात कमलादेवीला २०१७ची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
एआयएफएफच्या २०१७चे अन्य पुरस्कार:
बेस्ट ग्रासरुट डेव्हलपमेंट प्रोग्राम पुरस्कार : केरळ एफ.ए.
सहायक रेफ्री पुरस्कार : सुमंत दत्ता
सर्वोत्कृष्ट रेफ्री पुरस्कार : सी. आर. कृष्णा
फखर झामन पाकिस्तानचा पहिला द्विशतकवीर
झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या फखर झामनने द्विशतक रचले. द्विशतक रचणारा पाकिस्तानचा तो पहिला खेळाडू ठरला.
पाकिस्तानकडून यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम सईद अन्वर यांच्या नावावर होता. त्यांनी १९९७मध्ये भारताविरुद्ध १९४ धावा केल्या होत्या.
फखर झामन क्रिकेटविश्वातील सहावा द्विशतकवीर ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, ख्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केले आहे.
या सामन्यात झामनने १५६ चेंडूंत २४ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर नाबाद २१० धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.
त्याचबरोबर पाकिस्तानचे सलामीवीर फखर झामन आणि इमाम उल हक यांनी ३०४ धावांची भागीदारी रचत पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रमही केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी हा विश्वविक्रम श्रीलंकेचे सलामीवीर सनथ जयसूर्या आण उपुल थरंगा यांच्या नावावर होता. त्यांनी २००६साली लीड्स येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात २८६ धावांची भागीदारी केली होती.
या सामन्यात झामनने नाबाद २१० धावांची खेळी साकारली, तर इमामने ११३ धावा करत झामनला चांगली साथ दिली.