चालू घडामोडी - ५ फेब्रुवारी २०१५

•     शारदा चिटफंड गैरव्यवहाराचाLC Goyal & Anil Goswami तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कामकाजात हस्तक्षेप केल्यामुळे केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांना केंद्र सरकारने पदावरून हटविले.
•     शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणात अटक झालेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या वतीने गोस्वामी यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना फोन केला होता.
•     गोस्वामी यांच्या जागी एल. सी. गोयल यांची नवे गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. एल. सी. गोयल यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
•     कोळसा खाण लिलावप्रकरणी अनेक कंपन्यांमध्ये चुरशीची लढत सुरू झाली आहे. यामध्ये सर्वाधिक बोली वेदांतकडून लावण्यात आली आहे.
•     कोळसा खाणींच्या लिलावाच्या पहिल्या फेरीत खाण सम्राट अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत समूहाने २३ खाणींपैकी १४ खाणींसाठी बोली लावली आहे. 
•     पहिल्या फेरीत एकूण २३ खाणींचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात अदानी उद्योग समूह, आदित्य बिर्ला, आणि जिंदाल समूहानेही भाग घेतला आहे.
•     वेदांत समूहाने विविध १४ कोळसा खाणींसाठी २५ निविदा भरल्या आहेत.
•     इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी गुजरातमधील निलंबित अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. पांडे यांच्यासह अन्य तिघांना विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
•     विशेष न्यायालयाने आज पांडे यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन देण्याचा निर्णय घेतला.
•     तसेच त्यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पांडे हे प्रकरणात अटक झालेले सर्वांत वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत. पांडेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सीबीआयच्या न्यायालयाकडून यापूर्वी फेटाळण्यात आला होता.
•     इशरत जहाँ चकमक प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पांडे यांचे नाव आहे. १५ जून २००४ मध्ये जेव्हा इशरत जहाँला चकमकीत ठार करण्यात आले, तेव्हा पांडे हे सहआयुक्त होते.
•     लाच घेतल्याप्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) अटक करण्यात आली आहे.
•     जागेचा ताबा परत देण्यासाठी मंजूर केलेल्या ठरावावर स्वाक्षरी करण्यासाठी सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापौर माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० जानेवारीला रंगेहाथ पकडले होते.
•     राज्यातील तब्बल ६२४ कोटी २८ लाख रुपये किमतीच्या सिंचन कामांच्या १२८ निविदा देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केल्या.
•     तसेच कोकणातील १२ सिंचन प्रकल्पांच्या कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली.
•     ‘अग्नी ५’चे प्रकल्प संचालक आर. के. गुप्ता यांना प्रकल्पातून हटविण्याचा निर्णय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) घेतला आहे.
•     काही दिवसापूर्वीच ‘अग्नी ५’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा