सुरजीत भल्ला यांचा आर्थिक सल्लागार मंडळाचा राजीनामा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार मंडळातील सदस्य (Economic Advisory Council) असलेले सुरजीत भल्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर २४ तासांच्या आत भल्ला यांनी राजीनामा दिला आहे.
- पंतप्रधान मोदी यांची साथ सोडणारे भल्ला हे मागील १५ महिन्यांतील चौथे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.
- याआधी निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढीया यांनी ऑगस्ट २०१७मध्ये, मुख्य अर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी जून २०१८मध्ये आणि अलीकडेच आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आहे.
- गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयातील उच्चपदस्थांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत.
आर्थिक सल्लागार परिषद
- मोदी सरकारने सप्टेंबर २०१७मध्ये या आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. ही परिषद गैर-संविधानिक असून, ती स्वायत्तरित्या काम करते.
- आर्थिक विषय तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य विषयांबाबत सरकारला विशेषत: पंतप्रधानांना सल्ला देण्याची जबाबदारी या परिषदेवर असते.
- सध्या राथिन रॉय, अशिमा गोयल आणि शामिका रवी हे या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत.
- ही परिषद चलनवाढ, जीडीपी परिवर्तन, आयात-निर्यात परिवर्तन, व्यापार आणि वाणिज्य इ. साठी अनुकूल वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांना सल्ला देते.
- ही परिषद वेळोवेळी पंतप्रधानांना आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांविषयी अहवाल सादर करते. देशातील विविध आर्थिक समस्यांचे ही परिषद विश्लेषण करते.
मोहालीमध्ये शाश्वत जल व्यवस्थापनावरील पहिली परिषद
- शाश्वत जल व्यवस्थापनावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद मोहाली (पंजाब) येथील इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस (आयएसबी)मध्ये आयोजित केली गेली.
- केंद्रीय जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्पाअंतर्गत भाक्रा-बियास व्यवस्थापन मंडळाद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले.
- ही परिषद १० आणि ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा मुख्य विषय ‘शाश्वत जल व्यवस्थापन’ होता.
- ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, स्पेन, नेदरलँड, कोरिया, कॅनडा, जर्मनी, श्रीलंका अशा अनेक देशांसह अनेक प्रतिष्ठीत संस्थांचे प्रतिनधी या परिषदेला उपस्थित होते.
या परिषदेचे उद्देश
- जल व्यवस्थापनासाठी जनजागृती करणे.
- स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जल संसाधनांच्या उत्तम व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे.
- जल व्यवस्थापनासाठी शाश्वत धोरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे.
- संबंधित जल व्यवस्थापनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार, वैज्ञानिक आणि शैक्षणिक समुदाय यांना एकत्र आणणे.
भारताचे कॅग राजीव महर्षी युएनच्या लेखापरीक्षक पॅनलचे उपाध्यक्ष
- भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक राजीव महर्षी यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या लेखापरीक्षक पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या लेखापरीक्षक पॅनेलच्या न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या वार्षिक बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली.
- या बैठकीत युनायटेड किंग्डमच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांची संयुक्त राष्ट्रांच्या ऑडिटर पॅनलच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली.
- या बैठकीत संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या एजन्सीच्या दरम्यान लेखापरीक्षणावर चर्चा करण्यात आली. पुढील वर्षी ही बैठक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जर्मनीच्या बॉन येथे होणार आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या लेखापरीक्षक पॅनलची स्थापना १९५९मध्ये करण्यात आली होती. लेखापरीक्षणात सहकार्य वाढविणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या लेखापरीक्षक बोर्ड आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष संस्थांचे लेखापरीक्षक यांचा या पॅनलमध्ये समावेश आहे.
राजीव महर्षी
- माजी गृह सचिव असलेले राजीव महर्षी यांची सप्टेंबर २०१८मध्ये देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) म्हणून नियुक्ती झाली होती.
- राजस्थान कॅडरच्या १९७८च्या तुकडीचे आयएएस अधिकारी महर्षी यांनी ऑगस्ट २०१७मध्ये गृहसचिवाच्या रुपात २ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
- राजीव महर्षी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोमध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. याचबरोबर दिल्ली विद्यापीठातून बीए आणि एमएचे शिक्षण घेतले आहे.
- घटनात्मक अधिकारी या नात्याने कॅगवर केंद्र आणि राज्य सरकारांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी असते. कॅगचा अहवाल संसद आणि राज्य विधानसभेत सादर केला जातो.
एचएएलकडून लाईट युटीलिटी हेलिकॉप्टर विकसित
- हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने ६ किलोमीटर उंचीवर उडणारे कमी वजनाचे ‘लाईट युटीलिटी हेलिकॉप्टर’ विकसित केले आहे.
- हे हेलिकॉप्टर बंगळूरू (कर्नाटक) येथे विकसित करण्यात आले आहे. त्याचे पहिले उड्डाण सप्टेंबर २०१६मध्ये तर दुसरे उड्डाण मे २०१७मध्ये करण्यात आले होते.
- जानेवारी २०१९मध्ये केल्या जाणाऱ्या चाचणीमध्ये, हे हेलीकॉप्टर शीत प्रदेशात अतिउंच भागात उड्डाण करण्याचा प्रयत्न करेल.
लाइट युटिलिटी हेलीकॉप्टर
- हे एक अत्याधुनिक नव्या पिढीचे हेलिकॉप्टर असून, त्याची रचना आणि विकास हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या रोटरी विंग संशोधन आणि डिझाइन केंद्राद्वारे देशातच केले जाते.
- हे नवीन हेलिकॉप्टर भारतीय सशस्त्र सैन्याच्या जुन्या चीता आणि चेतक या हेलिकॉप्टर्सची जागा घेईल.
- हे हेलीकॉप्टर ताशी २२० किमी वेगाने उड्डाण करू शकते आणि हे ६.५ किमी उंचीवर उड्डाण करू शकते.
- ते ४०० किलोपर्यंतची सामग्री ३५० किमीच्या रेंजमध्ये वाहून नेण्यास सक्षम आहे. यामध्ये ग्लॉस कॉकपिट वापर करण्यात आला आहे. यात TM/HAL Ardiden 1U/शक्ति 1U सिंगल टर्बो शाफ्ट इंजिनचा वापर केला गेला आहे.
- हे हेलीकॉप्टर सैन्य आणि नागरी अशा दोन्ही कार्यांसाठी उपयुक्त आहे. याचा वापर टेहळणी तसेच कमी वजनाच्या सामानाच्या परिवहनासाठी केला जाऊ शकतो.
- हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे १८७ अशा हेलिकॉप्टर्सची मागणी करण्यात आली असून, यातील १२६ हेलिकॉप्टर्स लष्करात तर ६१ हेलिकॉप्टर्स हवाई दलात सामील केले जातील.
हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड (HAL)
- ही बंगळूरू (कर्नाटक)मध्ये स्थित एक सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे. ती केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
- ही कंपनी अत्याधुनिक एअरक्राफ्ट्स आणि एरोइंजिन तंत्रज्ञानाच्या विकासाचे कार्य करते.
- एचएएलने आतापर्यंत ध्रुव ॲडवांस्ड लाइट हेलीकाप्टर, मल्टी रोल सेवेन सीटर चेतक हेलीकाप्टर, लाइट कॉम्बॅट हेलीकाप्टर चीता आणि लांसर इत्यादि विकसित केले आहे.
इयुचे भारतात जीन मोनेट सेंटर फॉर एक्सिलंस
- युरोपियन युनियनने (इयु) भारतातील पहिले जीन मोनेट सेंटर फॉर एक्सिलंस (उत्कृष्टता केंद्र) नवी दिल्ली येथे सुरु केले.
- मणिपाल उच्च शिक्षण अकादमीमध्ये (MAHE) युरोपियन अध्ययन विभागात हे केंद्र उघडण्यात आले.
- या केंद्राला संस्कृती, समाज, शिक्षण आणि साहित्यात अभ्यास करण्यासाठी १ दशलक्ष युरोंचे अनुदान देण्यात येणार आहे.
- या नवीन केंद्रामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील शैक्षणिक संबंध बळकट होतील.
- या केंद्रात युरोपियन साहित्यावर सार्वजनिक कार्यशाळा आणि भारत-युरोपियन युनियन बैठकीचे आयोजन केले जाईल.
- मणिपाल उच्च शिक्षण अकादमीला इरॅस्मस-जीन मोनेट अभियानांतर्गत पाचव्यांदा अनुदान देण्यात आले आहे.
जीन मोनेट
- हे एक फ्रेंच राजकारणी अर्थतज्ञ आणि रणनीतीकार होते. ते युरोपियन एकात्मतेचे कडवे समर्थक होते. त्यांना युरोपियन युनियनच्या संस्थापकांपैकी एक मानले जाते.
- त्यांना ‘युरोपचे जनक’ असेही संबोधले जाते. १९५०मध्ये युरोपियन कोळसा व स्टील समुदायाची स्थापना करण्यात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती.
- त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १८८८ रोजी फ्रान्समध्ये झाला. त्यांचे निधन १६ मार्च १९७९ रोजी झाले.
गृह मंत्रालयाचे @CyberDost ट्विटर हँडल
- सायबर गुन्ह्यांबद्दल जागरुकता पसरविण्यासाठी गृह मंत्रालयाने @साइबर दोस्त (@CyberDost) हे ट्विटर हँडल सुरु केले.
- सायबर गुन्ह्यांबद्दल मुलभूत माहिती लोकांना देणे आणि सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठीच्या सावधगिरीबद्दल लोकांना माहिती देणे, हा या ट्विटर हँडलचा हेतू आहे.
- या ट्विटर हँडलद्वारे, लोकांना सायबर गुन्ह्यांबद्दल शिक्षित केले जाईल. त्यांना तक्रार दाखल करणे व सायबर स्पेसचा दुरुपयोग याबद्दल माहिती देण्यात येईल. यामुळे सायबर गुन्ह्यांमुळे होणारी हानी टाळता येऊ शकते.
- सध्या बँकिंग, वाहतूक, विमानचालन, रेल्वे, उर्जा आणि इतर सर्व भागात माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
- आयटीचा सातत्याने उपयोग केल्यामुळे सायबर गुन्हेगारीची संख्या देखील वाढत आहे. सरकार सुरक्षित सायबर स्पेस निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
नासाने शोधले बेन्नू लघुग्रहावर पाण्याचे अस्तित्व
- नासाच्या OSIRIS-REx अंतराळयानाने बेन्नू लघुग्रहावर पाण्याचे अस्तित्व शोधून काढले आहे.
- हा लघुग्रह आकाराने फारच लहान असल्यामुळे यावर द्रव अवस्थेमध्ये पाणी असणे खूप कठीण आहे. हे पाणी बेन्नूच्या मूळ ग्रहावरचे (ज्या विशाल ग्रहाचा बेन्नू भाग होता) असण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
- ६ डिसेंबर रोजी नासाचे OSIRIS-REx हे अंतराळयान २ वर्षांच्या प्रवासानंतर बेन्नू नावाच्या लघुग्रहावर पोहचले होते.
- OSIRIS-RExचा अर्थ Origins, Spectral Interpretation, Resource Identification, Security-Regolith Explorer असा आहे.
- हा ग्रह पुढील दीड वर्ष या लघुग्रहाचा अभ्यास करणार आहे. याद्वारे बेन्नू ग्रहाचा आकार, पृष्ठभाग आणि वातावरण यांचा अभ्यास केला जाईल.
- हे यान बेन्नूवरून विविध नमुने घेऊन परत येईल. संशोधन कार्यासाठी या यानात ५ विविध वैज्ञानिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.
OSIRIS-Rex
- OSIRIS-Rex हे मिशन सप्टेंबर २०१६मध्ये मिशन १०१९५५ बेन्नुच्या अभ्यासासाठी लॉन्च करण्यात आले होते. प्रक्षेपणानंतर या यानाने १.८ अब्ज किमीचा प्रवास केला आहे.
- हे नासाचे पहिले असे मिशन आहे ज्यामध्ये लघुग्रहाच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर हे अंतरिक्षयान लघुग्रहांवरून काही नमुन्यांसह २०२३मध्ये पृथ्वीवर परत येईल.
- हे अंतराळयान लॉकहीड मार्टीन स्पेस सिस्टम्स कंपनीकडून विकसित करण्यात आलेले आहे.
बेन्नू
- बेन्नू अपोलो समूहातील पर्वताच्या आकारचा लघुग्रह आहे. सप्टेंबर १९९९मध्ये लिनियर प्रकल्पाद्वारे हा लघुग्रह शोधण्यात आला.
- हा लघुग्रह कार्बनने समृध्द आहे. जीवनाची मुलभूत रासायनिक तत्वे आढळणाऱ्या लघुग्रहांच्या श्रेणीमध्ये बेन्नूदेखील येतो.
- या ग्रहावरील नमुन्यांमुळे बेन्नुचे उत्पत्ती आणि ब्रम्हांडाच्या उत्पत्तीविषयी महत्वाची माहिती मिळू शकते.
- टीप: लघुग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह. मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यानच्या रिकाम्या जागेत लघुग्रहांचा पट्टा आहे.
जमाल खशोगीसह इतर पत्रकार यंदा टाइम पर्सन ऑफ द इयर
- टाइम मासिकाने सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोगीसह इतर पत्रकारांना ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ जाहीर केले.
- खशोगीसह टाइम पर्सन ऑफ द इयरमध्ये मारिया रेस, वू लोन व क्याव सो ओऊ आणि कॅपिटल गॅझेट या वर्तमानपत्राच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- टाइम मासिक १९२७पासून ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ची निवड करत आहे. वर्षभर चांगल्या वा वाईट कारणांसाठी सर्वाधिक बातम्यांमध्ये राहिलेल्या व्यक्ती अथवा संस्थेची निवड या गौरवासाठी केली जाते.
- गेल्यावर्षी भूतकाळात झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल मौन सोडणाऱ्या महिलांना (#Metoo मोहिमेला) प्रतिष्ठित ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ हा गौरव देण्यात आला होता.
पार्श्वभूमी
- सौदी अरेबियाने २ ऑक्टोबर २०१८ रोजी बेपत्ता झालेले स्तंभलेखक, पत्रकार आणि लेखक जमाल खशोगी यांच्या हत्येची पुष्टी केली होती.
- इस्तंबूल (तुर्की)मधील सौदी अरेबियाच्या दूतावासात त्यांची हत्या करण्यात आली होती. यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.
- जमाल खशोगी यांनी सौदीमध्ये अल-अरब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आणि अल-वतन वर्तमानपत्राचे संपादक म्हणून काम केले होते.
- त्यांनी सौदी अरेबियाच्या सरकारवर टीका करणारे अनेक लेख लिहिले. ते सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि देशाचे शासक सलमानचे यांचे टीकाकार होते. यमनमध्ये सौदीच्या हस्तक्षेपाचा त्यांनी विरोध केला होता.
२०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होणार
- संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे.
- जगभरातील अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची मागणी भारताने केली होती.
- भारताच्या या प्रस्तावाचे चीन, रशिया, माली, आफ्रिकन युनियन, नायजेरिया, सेनेगल, इथिओपिया, झिम्बाबेसह अनेक देशांनी समर्थन केले आहे.
- भारतात यापूर्वीच २०१८ हे वर्ष 'तृणधान्य वर्ष' साजरे करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, रागी, नाचणी यासह अन्य पिकांचा समावेश आहे.
- केंद्र सरकारने एप्रिल २०१८मध्ये ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांचे उत्पादन, वापर आणि व्यापार वाढावा यासाठी त्यांना पौष्टिक अन्नधान्य (न्यूट्री-सिरीयल) म्हणून घोषित केले आहे.
अन्न व कृषी संघटना
- इंग्रजी: Food and Agriculture Organization (FAO)
- स्थापना: १६ ऑक्टोबर १९४५
- मुख्यालय: रोम, इटली
- सदस्य: १९४ देश
- ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. भूक निवारणासाठी जगभर प्रयत्न करणे, हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे.
- कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व ग्रामीण लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाच्या स्थितीत सुधारणा करून त्यांचे जीवनमान उंचावणे, या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
११ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय पर्वत दिन
- प्रतिवर्षी ११ डिसेंबर दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिन (इंटरनॅशनल माउंटन डे) म्हणून साजरा केला जातो. या दिनाची स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेने २००३मध्ये केली होती.
- उद्देश: आंतरराष्ट्रीय समुदायाला पर्वतांचे रक्षण करण्यासाठी प्रेरित करणे व पर्वतांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणे.
- यावर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचा मुख्य विषय ‘Mountains Matter’ हा आहे. संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेद्वारे (एफएओ) या दिनासाठी समन्वय केले जाते.
- एफएओच्या मते, पर्वत ताज्या पाण्याचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. जगातील एकूण ताज्या पाण्यापैकी ६०-८० टक्के ताजे पाणी पर्वतान्द्वारे उपलब्ध होते.
- याशिवाय जैव विविधतेसाठीदेखील पर्वत हे फार महत्वाचे आहेत. जगभरातील अंदाजे १ अब्ज लोक पर्वत क्षेत्रात राहतात. तर सुमारे ५० कोटी लोक पाणी, अन्न आणि स्वच्छ ऊर्जेसाठी पर्वतांवर अवलंबून असतात.
- गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदल, जमिनीची धूप, मानवी अतिक्रमण आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्वतांना मोठ्या प्रमाणात हानी पोहचली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा