चालू घडामोडी : २३ डिसेंबर

जीएसटी दरात पुन्हा कपात

  • केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या ३१व्या बैठकीत ३३ वस्तू व सेवांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • टीव्ही, संगणक, टायर, सिनेमाची तिकिटे यांवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता २८ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमध्ये केवळ २८ वस्तू उरल्या आहेत.
  • ३३ पैकी २६ वस्तूंवरचा जीएसटी १२, ५ व ० टक्के करण्यात आला आहे. तर बाकी ७ वस्तूंवरचा जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. हे सुधारित दर १ जानेवारी २०१९पासून लागू होतील.
  • जीएसटीला तर्कसंगत करणे ही सततची प्रक्रिया असून २८ टक्क्यांची श्रेणी टप्प्याटप्प्याने अस्तंगत होईल, असे बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत जेटली म्हणाले.
  • यासंदर्भात ९९ टक्के वस्तू किंवा सेवांवरील जीएसटी १८ टक्के किंवा त्यापेक्षा कमी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली होती.
  • या बैठकीत महसूल प्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी जीएसटी परिषदेने ७ सदस्यीय समितीची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. ही समिती काही ठराविक राज्यांमध्ये महसूल केंद्रित संकलनास कारणीभूत घटकांचे विश्लेषण करेल.
जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्क्यावर आलेल्या वस्तू
  • २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर
  • मॉनिटर आणि ३२ इंचापर्यंतचे दूरचित्रवाणी संच, संगणकाचे मॉनिटर्स.
  • डिजिटल कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर
  • मोबाइल पॉवर बँक
  • व्हिडीओ गेम नियंत्रक (कन्सोल्स).
  • क्रीडा साहित्य.
  • वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट, गिअर बॉक्स, पुनर्प्रक्रिया केलेले टायर.
  • १०० रुपयांवरचे सिनेमा तिकिट.
जीएसटी दर कमी झालेल्या इतर वस्तू
  • थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स, धार्मिक यात्रा, १०० रुपयांपेक्षा कमी मूल्याचे सिनेमा तिकिट: जीएसटी १८ वरून १२ टक्के.
  • दिव्यांग व्यक्तींसाठीच्या व्हीलचेअरच्या सुटे भाग: २८ वरून ५ टक्के.
  • संगमरवर दगड: १८ वरून ५ टक्के.
  • फूटवेअर, चालण्यासाठीची आधारकाठी, लाकडी बूच, राखेपासून बनवलेल्या विटा: जीएसटी १२ वरून ५ टक्के.
जीएसटीमुक्त झालेल्या वस्तू
  • गोठवलेल्या भाज्या, संगीतावरील पुस्तके आणि जनधन योजनेतील ठेवींसाठी बँकातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा.
जीएसटी २८ टक्क्यांच्या करटप्प्यातील वस्तू
  • वातानुकूलन यंत्रे आणि डिशवॉशरसारख्या चैनीच्या वस्तू.
  • आलिशान मोटारगाड्या, वाहनांचे सुटे भाग.
  • मद्य, तंबाखू, सिगारेट, पानमसाला.
  • सिमेंट
वस्तू आणि सेवा कर परिषद
  • वस्तू आणि सेवा कर परिषद (गुड्स ॲन्ड सर्व्हिसेस टॅक्स काउन्सिल) ही मध्यवर्ती वैधानिक संस्था जीएसटीचे नियमन करते. केंद्रीय अर्थमंत्री हे या परिषदेचे प्रमुख असतात.
  • जीएसटी परिषदेच्या शिफारसींनुसार वस्तू आणि सेवा कराचे दर अधिसूचित केले जातात. ही परिषद केंद्र व राज्य शासनांना वस्तू व सेवा करांच्या विविध बाबींवर सल्ले देते.
  • केंद्र शासन व राज्य शासने तसेच राज्य शासनांबाबत परस्परांमध्ये जीएसटीच्या विविध पैलूंबाबत सामंजस्य राखले जाईल याची काळजी जीएसटी परिषद घेते.

अग्नी-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • लष्कराने ओडिशामधील डॉ. अब्दुल कलाम बेटावरून मोबाइल लाँचरच्या साह्याने अग्नी-४ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी घेतली.
  • अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम व ४,००० किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-४ या क्षेपणास्त्राचे हे सातवे परीक्षण होते.
  • यापूर्वी लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने याच ठिकाणावरून २ जानेवारी २०१८ रोजी या क्षेपणास्त्राचे परीक्षण केले होते.
  • या क्षेपणास्त्रामुळे ४,००० किमी अंतरावरील क्षेत्रात मारा करता येणे शक्य होणार आहे.
अग्नी-४
  • हे क्षेपणास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे. तर याची निर्मिती भारत डायनॅमिक्स लिमिटेडने केली आहे.
  • या क्षेपणास्त्राची लांबी २० मीटर आहे आणि वजन सुमारे १७ टन आहे. हे क्षेपणास्त्र ४,००० किमी अंतरावरुन त्याच्या लक्ष्याचा अचूक भेद घेऊ शकते.
  • या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात चीनची बीजिंग आणि शांघाय ही शहरदेखील येतात. हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.
  • विश्वासार्हता व अचूकतेसाठी हे क्षेपणास्त्र प्रगत अॅविऑनिक्स व पाचव्या पिढीच्या संगणक प्रणालीने सुसज्ज आहे.
  • यामध्ये लक्ष्याचा अचूक भेद घेण्यासाठी Ring Laser Gyro based Inertial Navigation System (RINS) आणि विशासार्ह Micro Navigation System (MINGS) देखील बसविण्यात आले आहे.
डॉ. अब्दुल कलाम बेटाबद्दल
  • पूर्वी व्हीलर बेट म्हणून ओळखल्या जाणारे डॉ अब्दुल कलाम बेट हे ओडिशाच्या किनाऱ्यावर स्थित आहे.
  • इंग्रज कमांडंट लेफ्टनंट व्हीलरच्या नावावरुन या बेटाला व्हीलर हे नाव देण्यात आले होते.
  • २७ जुलै २०१७ रोजी दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त या बेताचे नामकरण डॉ. अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
  • भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ आणि देशाचे लाडके राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे ४ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.
  • इंडियन इंटेग्रेटेड टेस्ट रेंज मिसाईल टेस्टिंग फॅसिलीटी डॉ अब्दुल कलाम बेटावर स्थित आहे. गहिरमाथा सागरी अभयारण्यही या बेटाच्या जवळच आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या समूह विद्यापीठास मंजुरी

  • मुंबईतील ४ महाविद्यालयांना एकत्रित करून डॉ. होमी भाभा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले समूह (क्लस्टर) विद्यापीठ स्थापन करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
  • डॉ. होमी भाभा विद्यापीठात मुंबईतील शासकीय विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) या मुख्य विद्यालयासह सिडनहॅम कॉलेज, एल्फिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय (बीएड कॉलेज) या ४ महाविद्यालयांचा समावेश असेल.
  • विज्ञान आणि संशोधनाला चालना देण्यासाठी १९२०मध्ये पहिली भारतीय विज्ञान संस्था म्हणून रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ची स्थापना करण्यात आली. आता ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नावाने ओळखली जाते.
  • याच संस्थेची कुलाबा येथील इमारत डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे मुख्यालय म्हणून ओळखली जाईल.
  • राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान (रुसा)च्या माध्यमातून देशभरात ४ महाविद्यालयांचे मिळून १ विद्यापीठ स्थापन केले जात आहे.
  • रुसाच्या धोरणानुसार तयार होणारे डॉ. होमी भाभा विद्यापीठ राज्यातील पहिले आणि देशातील तिसरे समूह (क्लस्टर) विद्यापीठ आहे.
  • होमी भाभा विद्यापीठाला मान्यता देतानाच त्यासाठी आवश्यक पदांना आणि खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठासाठी केंद्र सरकारकडून ५५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
  • या समूह विद्यापीठातील चारही महाविद्यालयांचे अनुदान अथवा सेवाशर्ती तशाच राहणार आहेत. त्यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वा अन्य लाभ तसेच चालू राहतील.
लाभ
  • विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अशा पद्धतीने ४ महाविद्यालये एकत्र करून विविध विद्याशाखांचा त्यामध्ये समावेश करून समूह विद्यापीठाची स्थापना केल्यास, त्याचा शैक्षणिक लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
  • तसेच यामुळे मोठ्या विद्यापीठांवरील ताण कमी होईल शिवाय जागतिक स्तरावरील रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे या विद्यापीठांना शक्य होणार आहे.
  • कौशल्य विकासावर भर असणाऱ्या या विद्यापीठांमुळे गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.
चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम
  • डॉ. होमी भाभा विद्यापीठात चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू केला जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शाखांमधील अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
  • यामुळे सिडनहॅम कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याला कला विषयासाठी एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे, तसेच त्याला विज्ञान संस्थेत विज्ञान शाखेच्या विषयनिवडीचे स्वातंत्र्यही असणार आहे.
  • यामध्ये ६५ क्रेडिट असलेला मुख्य विषय असेल, तर उर्वरित ३५ क्रेडिट इतर विषयांमध्ये मिळवता येऊ शकतील.

देशातील सर्वोत्तम १० पोलीस स्थानकांची नावे जाहीर

  • गृह मंत्रालयाकडून २०१८ या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील पहिल्या १० पोलीस स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
  • यामध्ये महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाला अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
  • सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस स्थानकांमध्ये राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशनने पहिला क्रमांक पटकावला आहे.
  • गुजरातमध्ये २० डिसेंबरपासून सुरू झालेल्या डीजीपी-आयजीपी कॉन्फरन्समध्ये गृह मंत्रालयाकडून या १० पोलिस ठाण्यांचा गौरव करण्यात आला.
  • गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पहिल्या ३ स्थानांवरील पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
  • स्थानिक पोलिस ठाण्याला प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत ही मानांकने निवडण्यात आली आहे.
सर्वोत्तम पोलीस स्टेशनची यादी
  1. कालू (बिकानेर, राजस्थान)
  2. कॅम्पबेल बे (अंदमान-निकोबार)
  3. फरक्का (मुर्शिदाबाद, पश्‍चिम बंगाल)
  4. नेत्तापक्कम (पुदुच्चेरी)
  5. गुदेरी (कर्नाटक)
  6. चोपाल (हिमाचल प्रदेश)
  7. लाखेरी (राजस्थान)
  8. पेरियाकुलम (तमिळनाडू)
  9. मुन्स्यारी (उत्तराखंड)
  10. कुडचरे (गोवा)

बुलढाण्याचा बाला रफिक बनला महाराष्ट्र केसरी

  • गतविजेत्या अभिजित कटकेवर ११-३ अशी मात करत बुलढाण्याच्या बाला रफिकने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.
  • विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते बाला रफिक शेखला महाराष्ट्र किताबाची मानाची गदा प्रदान करण्यात आली.
  • मुळचा बुलढाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले होते.
  • अभिजित हा मॅटवरील, तर बाला रफिक मातीमधील कुस्तीचा मातब्बर खेळाडू आहे. अंतिम सामन्यात बालाने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली.
  • माती विभागात ९२ किलो वजन गटात नांदेडच्या अनिल जाधवने मुंबईच्या सुहास गोडगेला पराभूत करुन सुवर्णपदक जिंकले.
  • मॅट विभागात पुण्याच्या अक्षय भोसलेने कोल्हापूरच्या सिकंदर शेखला नमवून ९२ किलो वजन गटात सुवर्णपदक पटाकावले.
महाराष्ट्र केसरी
  • ही महाराष्ट्र राज्यातील प्रसिध्द कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १९६१ साली झाली.
  • सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. परंतु १९८२पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली.
  • २००८पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली.
  • या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.
  • मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग ३ वेळा महाराष्ट्र केसरी किताब मिळवले आहेत.
  • तर २०१४ ते २०१६चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी आहे. २०१७चा महाराष्ट्र केसरी किताब पुण्याचा अभिजित कटके याने मिळवला.

वेदांगी कुलकर्णीची जगाला सायकलवरुन प्रदक्षिणा

  • महाराष्ट्राच्या पुण्याची २० वर्षीय वेदांगी कुलकर्णी संपूर्ण विश्वाला सायकलवरुन सर्वात जलद प्रदक्षिणा घालणारी आशियातील पहिली महिला ठरली आहे.
  • तिने १४ देशांमधून २९ हजार किमीचा आपला सायकल प्रवास १५९ दिवसांत पूर्ण करत हा विक्रम केला. यासाठी तिने दररोज ३०० किमी सायकल चालवली.
  • वेदांगीने ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातून जुलै २०१८मध्ये आपल्या सायकल प्रवासास प्रारंभ केला होता. २३ डिसेंबर रोजी कोलकता येथे तिचा हा प्रवास संपला.
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, कॅनाडा, आईसलँड, पोर्तुगाल, स्पेन फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड आणि रशिया या देशांमधून तिचा प्रवास झाला.
  • जागतिक पातळीवर हा विक्रम इंग्लंडच्या जेनी ग्राहमच्या नावावर आहे. तिने याच वर्षी १२४ दिवसांत ही मोहीम फत्ते केली होती.

अमरिकेत पुन्हा शटडाऊन

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व काँग्रेस (अमेरिकी संसद) यांच्यात अर्थ विधेयकावर एकमत न झाल्याने सरकारच्या अंशत: टाळेबंदीला (शटडाऊन) सुरुवात झाली.
  • २०१८मधील अमेरिकेतील हे तिसरे शटडाऊन आहे. या शटडाऊनमुळे अमेरिकेतील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना शटडाऊनच्या काळासाठी विनावेतन काम करावे लागणार आहे.
  • मेक्सिकोच्या सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ट्रम्प यांची सीमेवर भिंत बांधण्याची योजना आहे. त्यासाठी ते अर्थविधेयकात ५ अब्ज डॉलरची तरतूद करू इच्छितात.
  • मात्र विरोधी डेमॉक्रॅटिक पक्षाने त्याला विरोध केला आहे. काँग्रेसच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये (प्रतिनिधीगृहात) ट्रम्प यांना पाठिंबा मिळाला तरी सिनेटमध्ये झालेल्या विरोधामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.
  • सरकारच्या ७५ टक्के खात्यांना सप्टेंबर २०१९पर्यंतचा निधी यापूर्वीच मंजूर झाला आहे. त्यात सेनादले, आरोग्य आणि अन्य सेवांचा समावेश आहे.
  • मात्र उर्वरित २५ टक्के खात्यांसाठीचा निधी अद्याप मंजूर झालेला नाही. त्यात गृह, न्याय, शेती आदी खात्यांचा समावेश आहे.
  • त्यामुळे त्यांच्यासह नासा ही अंतराळ संशोधन संस्था, वाणिज्य खाते आदींमधील कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागेल किंवा बिनपगारी काम करावे लागेल.
  • या शटडाऊनची व्याप्ती अतितीव्र नसली तरी ऐन नाताळच्या हंगामात महत्त्वाच्या अशा ९ सरकारी खात्यांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांच्या राजीनाम्यामुळे विस्कळीत झालेले ट्रम्प प्रशासन यामुळे आणखीनच कोलमडणार आहे.
शटडाऊन म्हणजे काय?
  • अमेरिकेच्या राजकारणात सरकारी खर्चाला मंजुरी देणारे विधेयक संसदेत पास झाले नाही; किंवा अध्यक्षांनी अशा खर्चाला परवानगी देणाऱ्या अध्यादेशावर सही करण्यास नकार दिल्यास ‘शटडाऊन’ होते.
  • अशा परिस्थितीत, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाते किंवा विनावेतन काम करायला सांगितले जाते.
  • २०१८पूर्वी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना २०१३मध्ये शटडाउनची वेळ आली होती. त्यावेळी २ आठवडे सरकारी कामकाज पूर्णपणे बंद होते. त्यामुळे ८ लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले.
  • त्याचप्रमाणे १९८१, १९८२, १९९०, १९९५ आणि १९९६ या वर्षांमध्येही अमेरिकेवर शटडाउनची नामुष्की ओढवली होती.

ब्रॉडबँड सेवांसाठी चीनचा पहिला उपग्रह लाँच

  • २२ डिसेंबर २०१८ रोजी चीनने स्पेस-आधारित ब्रॉडबँड सेवांसाठी आपला पहिला दळणवळण उपग्रह लाँच केला आहे.
  • या दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपण लाँग मार्च ११ कॅरियर रॉकेटच्या सहाय्याने उत्तर-पश्चिमी चीनमधील जिउक्यूआन उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून करण्यात आले.
  • होंग्युन प्रकल्पाअंतर्गत CASICचे (China Aerospace Science and Industry Corporation) हे पहिलेच उपग्रह प्रक्षेपण आहे.
  • अशाच प्रकारे ब्रॉडबँड सेवा पुरविण्याची योजना असलेल्या प्रतिस्पर्धी गुगल आणि इतर कंपन्यांना टक्कर देणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
होंग्युन प्रकल्प
  • चीनने सप्टेंबर २०१६मध्ये होंग्युन प्रकल्प सुरू केला होता.
  • या प्रकल्पांतर्गत चीनने जगातील वापरकर्त्यांना स्पेस-आधारित कम्युनिकेशन नेटवर्क स्थापन करून ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याची योजना आखली आहे.
  • जगातील अतिदुर्गम भागातही इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरविणे हादेखील प्रकल्पाचा उद्देश आहे.
  • CASIC २०२३पर्यंत समुद्रसपाटीपासून १ हजार किमी उंचीवरील कक्षेत १५० होंग्युन उपग्रह स्थापित करणार आहे, जे पुढे मागणीनुसार वाढवले जाऊ शकतील.
  • CASIC ही चीनी सरकारच्या मालकीची व चीनी अंतरीक्ष कार्यक्रमाची मुख्य कंत्राटदार कंपनी आहे.
  • आतापर्यंत विनामुल्य इंटरनेट प्रदान करण्यासाठी गुगल, स्पेसएक्स, वनवेब आणि टेलीसॅट यासारख्या कंपन्यानीच उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
  • अमेरिकन कंपनी स्पेसएक्सने स्टारलिंक प्रकल्प सुरू केला आहे. याअंतर्गत २०२०पर्यंत अंतराळात १२ हजार उपग्रह स्थापित करण्यात येणार आहेत.
  • आणखी एक अमेरिकन कंपनी वनवेबने निम्न कक्षेत ६४८ उपग्रहांचा एक समूह स्थापित करण्याची योजना आखली आहे.

पॅट्रिक शानाहन अमेरिकेचे हंगामी संरक्षण सचिव

  • पॅट्रिक शानाहन यांची अमेरिकेचे नवीन हंगामी संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते १ जानेवारी २०१९पासून कार्यभार सांभाळतील.
  • पॅट्रिकने यांनी यापूर्वी बोईंगमध्ये काम केले आहे. २०१७मध्ये त्यांची डेप्युटी संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
पार्श्वभूमी
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर पररराष्ट्र धोरणावरुन मतभेद झाल्यामुळे जीम मॅटिस यांनी २१ डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संरक्षण सचिव पदाचा राजीनामा दिला आहे.
  • तज्ञांचा सल्ला झुगारुन ट्रम्प यांनी सीरियामधून २,००० अमेरिकन सैनिक माघारी बोलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मॅटिस यांनी हा निर्णय घेतला होता.
  • जीम मॅटिस हे अतिशय अनुभवी व्यक्ती आहेत. ट्रम्प यांच्या अस्थिर धोरणांमध्ये संतुलन राखण्यासाठी जीम मॅटिस यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
  • जीम मॅटिस यांच्या राजीनाम्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामध्ये अस्थिरता येऊ शकते.

गितेगा: बुरुंडीची नवी राजधानी

  • २२ डिसेंबर रोजी बुरुंडी देशातील सरकारने गितेगा या शहराला देशाची नवीन राजधानी म्हणून घोषित केली आहे.
  • बुरुंडीची यापूर्वीची राजधानी असलेले बुजुम्बुरा हे शहर आता देशाची आर्थिक राजधानी असेल.
  • बुरुंडीचे राष्ट्राध्यक्ष पिएरे न्कुरुन्झीझा यांनी २००७मध्ये राजधानी हलविण्याची प्रतिबद्धता जाहीर केली होती.
  • बुरुंडी सरकारने यापुढील मंत्रिमंडळाच्या बैठका गितेगा येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९मध्ये गितेगामध्ये ५ मंत्रालयेही स्थापन केली जातील.
  • गीतेगाची लोकसंख्या फक्त ३० हजार आहे. याउलट बुजुम्बुराची लोकसंख्या १.२ दशलक्ष आहे.
बुरुंडी
  • बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. बुरुंडीच्या उत्तरेला रवांडा, पूर्व व दक्षिणेला टांझानिया व पश्चिमेला कांगो हे देश आहेत.
  • बुरुंडीला १९६२मध्ये स्वातंत्र्य मिळाले. याचे क्षेत्रफळ २७,८३४ चौकिमी आहे. या देशाचे चलन बुरुंडीयन फ्रँक आहे. बुरुंडी हा जगातील १० सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.

लक्ष्मीकांत यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार

  • सुप्रसिद्ध लोकप्रिय लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकारांच्या जोडीमधील लक्ष्मीकांत यांना या वर्षीचा ‘मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार’ मरणोत्तर जाहीर झाला आहे.
  • तसेच प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा तिमोथी यांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
  • मोहम्मद रफी यांच्या ९३व्या जयंती निमित्त मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे हे पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. या पुरस्कारांचे हे ११वे वर्ष आहे.
  • संगीतकार लक्ष्मीकांत कुडाळकर यांना देण्‍यात येणाऱ्याया जीवनगौरव पुरस्‍काराचे स्वरूप १ लाख रूपयाचा धनादेश आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
  • तर उषा तिमोथी यांना देण्‍यात येणाऱ्या रफी पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रूपयाचा धनादेश आणि स्‍मृतीचिन्‍ह असे आहे.
  • यापुर्वी संगीतकार प्यारेलाल, आनंदजी, मरणोत्तर श्रीकांत ठाकरे, गायक अमीत कुमार, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

प्रीमियर बॅडमिंटन लीगला सुरुवात

  • प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) चौथ्या आवृत्तीला २२ डिसेंबर रोजी सुरूवात झाली. पीबीएलचा हा हंगाम १३ जानेवारी २०१९पर्यंत असेल.
  • या लीगमध्ये पी.व्ही.सिंधु, कॅरोलिना मारिन, किदंबी श्रीकांत, एच.एस.प्रणॉय यासारखे दिग्गज अनुभवी खेळाडू भाग घेणार आहेत.
  • प्रीमियर बॅडमिंटन लीग भारतातील फ्रँचाईजी-आधारित बॅडमिंटन स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात २०१३मध्ये झाली.
  • हैदराबाद हॉटशॉट संघ या स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा विजेता होता. दिल्ली डॅशर्सने दुसऱ्या व हैदराबाद हन्टर्स संघाने तिसऱ्या हगामाचे विजेतेपद मिळविले होते.
प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील संघ
  • हैदराबाद हन्टर्स: हैदराबाद
  • बंगलोर रॅपटर्स: बंगलोर
  • अवध वॉरियर्स: लखनऊ
  • मुंबई रॉकेट्स: मुंबई
  • दिल्ली डॅशर्स: नवी दिल्ली
  • चेन्नई स्मॅशर्स: चेन्नई
  • अहमदाबाद स्मॅश मास्टर्स: अहमदाबाद
  • नार्थईस्टर्नवॉरियर्स: गुवाहाटी
  • पुणे सेवेन एसेस: पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा