चालू घडामोडी : २८ डिसेंबर

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

  • तिहेरी तलाकची अनिष्ट प्रथा संपुष्टात आणणारे ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक २०१८’ लोकसभेत मंजूर करण्यात आले.
  • कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत सादर केले. यावेळी विधेयकातील सुधारणांवर मतदान घेण्यात आले.
  • लोकसभेत उपस्थित असलेल्या २५६ खासदारांपैकी २४५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर ११ खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
  • आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे.
  • यावेळी विधेयकावरील सुधारणांवर घेण्यात आलेल्या मतदानावर बहिष्कार टाकत काँग्रेस, समाजवादी पार्टी, अण्णाद्रमुकसह अनेक पक्षांनी सभात्याग केला.
  • ही एखाद्या विशिष्ट धर्माशी संबंधित संवैधानिक बाब असल्याने, या विधेयकांचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी संयुक्त निवड समितीची मागणी विरोधकांनी केली होती.
कायद्यातील ठळक तरतुदी
  • हा कायदा तिहेरी तलाकला (मग तो लिखित किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असला तरीही) घटनाबाह्य, बेकायदेशीर ठरवतो.
  • तिहेरी घटस्फोटासाठी आरोपीला ३ वर्षाच्या शिक्षेची व दंडाची तरतूद या कायद्यात आहे.
  • मूळ कायद्यानुसार हा गुन्हा अजामीनपात्र आहे. अजामिनपात्र गुन्हा असल्यामुळे पोलीस परस्पर आरोपीची सुटका करु शकत नाहीत.
  • परंतु या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर करण्याची तरतूदही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
  • परंतु पीडित महिलेचे म्हणणे ऐकल्यानंतरच आवश्यक वाटल्यास न्यायदंडाधिकारी आरोपीला जामीन मंजूर करु शकतात..
  • पीडित पत्नी, रक्ताचे नाते किंवा लग्नाच्या नात्यातील व्यक्तींनी तक्रार केल्यास पतीला अटक होऊ शकते. शेजारी किंवा अज्ञात व्यक्ती या प्रकरणात तक्रार दाखल करू शकत नाही.
  • अशा प्रकरणात फक्त पीडित पत्नीच्या संमतीनेच न्यायाधीश आपल्या अधिकाराचा वापर करुन तडजोड करू शकतात. अशावेळी गुन्हा मागे घेता येऊ शकतो.
  • याव्यतिरिक्त, पीडित पत्नी तिच्या अल्पवयीन मुलांचा ताबादेखील घेऊ शकते आणि यासाठी तिला निर्वाह भत्ता मिळविण्याचा पूर्ण हक्क असेल.
पार्श्वभूमी
  • ऑगस्ट २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक संबंधी निकाल देताना तिहेरी तलाकला घटनाबाह्य, बेकायदा ठरवले होते. तसेच केंद्र सरकारला यासंबंधी कायदा करण्यासही सांगितले होते.
  • तिहेरी तलाक मुस्लिम धार्मिक परंपरेचा अविभाज्य घटक असल्याचा युक्तिवादही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
  • तिहेरी तलाक प्रथेमध्ये मुस्लिम समाजातील पती आपल्या पत्नीला केवळ तीन वेळा ‘तलाक’ शब्द उच्चारून घटस्फोट देऊ शकतो.
  • पाकिस्तान, बांगलादेशसहित २२ मुस्लीम देशांमध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली असून तो गुन्हा समजला जातो.
  • तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक लोकसभेत डिसेंबर २०१७मध्ये मंजूर करण्यात आले होते. परंतु राज्यसभेत ते मंजूर करुन घेण्यात सरकारला अपयश आले होते.
  • त्यामुळे तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर २०१८मध्ये मंजुरी दिली होती.
  • अध्यादेश काढल्याने ६ महिन्यात सरकारला ते संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर करून, मंजूर करून घ्यावे लागणार आहे.

मिशन गगनयानला केंद्र सरकारची मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इस्रोच्या मिशन गगनयानला मंजुरी देण्यात आली.
  • या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी दिली आहे.
  • या अभियानांतर्गत २०२२मध्ये ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात ५ ते ७ दिवस मुक्काम करणार आहेत.
  • ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.
गगनयान अभियानाबद्दल
  • १५ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही योजना आखण्यात येणार आहे.
  • येत्या काही काळात हे मिशन सुरू होणार आहे. या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.
  • गगनयान उपक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय संस्था, प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग यांच्याशी इस्रो समन्वय साधेल.
  • २०२२पर्यंत गगनयान अंतराळात पाठविले जाणार आहे. त्याआधी २०२० आणि २०२१मध्ये २ मानवरहित यान इस्रो अवकाशात पाठविणार आहे.
  • गगनयान मोहीमेसाठी ३ अंतराळवीरांच्या चमूची निवड भारतीय वायुसेना व इस्रोद्वारे संयुक्तपणे केली जाईल व नंतर या चमूला २-३ वर्षे प्रशिक्षण दिले जाईल.
  • गगनयान मिशनसाठी जीएसएलव्ही मार्क-३ उपग्रह प्रक्षेपण यान वापरले जाणार आहे. हे अंतरीक्षयान आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. ते १६ मिनिटात अपेक्षित उंचीवर पोहचेल.
  • मिशन गगनयानच्या स्पेस क्राफ्टमध्ये एक क्रू मॉड्यूल आणि एक सर्व्हिस मॉड्यूल असेल. त्याचे वजन सुमारे ७ टन असेल.
  • हे अंतरिक्षयान पृथ्वी कनिष्ठ कक्षेत ३००-४०० किमीच्या उंचीवर स्थापित केले जाईल, जेथे अंतराळवीर विविध प्रयोग करतील.
  • यातील क्रू मॉड्यूलचा आकार ३.७ मीटर असेल आणि सर्व्हिस मॉड्यूलचा आकार ७ मीटर असेल. अंतराळवीरांना घेऊन जाणारे क्रू मॉड्यूल हे सर्व्हिस मॉड्यूलला जोडलेले असेल.
  • परतीसाठी मॉड्यूल्सचा वेग कमी करून त्यांना उलट दिशेने फिरवले जाईल. जेव्हा हे दोन्ही मॉड्यूल्स पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२० किमीपर्यंत पोहोचतील, तेव्हा सेवा मॉड्यूल विलग क्रू मॉड्यूलपासून केले जाईल. केवळ क्रू मॉड्यूल पृथ्वीवर पोहोचेल.
  • पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी यास सुमारे ३६ मिनिटे लागतील. इस्रो गुजरातमधील खाडीमध्ये किंवा गुजरातजवळ अरबी समुद्रात क्रू मॉड्यूल लँड करण्याची योजना आखत आहे.
  • हे मिशन भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या सुमारे ६ महिने आधी कार्यान्वित केले जाईल. यासाठी एकूण १० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
  • इस्रोच्या या मोहिमेचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या ३० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत.
  • या अभियानाची तयारी इस्रोने २००४मध्येच सुरु केली होती. मिशन गगनयानमुळे सुमारे १५००० रोजगारही निर्माण होणार आहेत.

भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर येथे राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले.
  • राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसची ही २६वी आवृत्ती आहे. २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान ओडिशामध्ये ही परिषद आयोजित केली जात आहे.
  • यंदा या काँग्रेसची मुख्य संकल्पना (थीम) ‘स्वच्छ, हरित आणि निरोगी राष्ट्रासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना’ अशी आहे.
  • ओडिशामध्ये राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन दुसऱ्यांदा केले जात आहे. या कार्यक्रमात भारत, ५ आखाती देश व आसियान देशांमधील मुले सहभागी होत आहेत.
राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस
  • हा एक राष्ट्रव्यापी विज्ञान संप्रेषण कार्यक्रम आहे. याची सुरुवात १९९३पासून झाली.
  • हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विभागांतर्गत राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संचार परिषदेचा (NCSTC) एक कार्यक्रम आहे.
  • १०-१७ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलता व नवकल्पना दर्शविण्याकरिता एक मंच प्रदान करणे, हा राष्ट्रीय बाल विज्ञान कॉंग्रेसचा उद्देश आहे.
राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संचार परिषद (NCSTC)
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचविणे हे या परिषदेचे मुख्य कार्य आहे.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ही परिषद विविध कार्यक्रमांना प्रोत्साहन देते.

सार्वजनिक उद्योग सर्वेक्षण २०१७-१८

  • अलीकडेच संसदेत सार्वजनिक उद्योग सर्वेक्षण २०१७-१८ सादर करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये विविध केंद्रीय सार्वजनिक क्षेतरतील कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले गेले.
  • हे सर्वेक्षण केंद्रीय अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाद्वारे करण्यात आले.
सर्वेक्षणाचे निष्कर्ष
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ओएनजीसी आणि एनटीपीसी हे २०१७-१८मधील सर्वात फायदेशीर सरकारी कंपन्या ठरल्या.
  • सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण नफ्यामध्ये या तीन कंपन्यांचा वाटा अनुक्रमे १३.३७ टक्के, १२.४९ टक्के आणि ६.४८ टक्के होता.
  • कोल इंडिया आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन या कंपन्या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या सर्वात फायदेशीर सरकारी कंपन्या ठरल्या.
  • सर्वात फायदेशीर टॉप १० कंपन्यांच्या यादीत यंदा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनीही सामील झाली.
  • २०१७-१८मध्ये १८४ फायदेशीर सरकारी कंपन्यांच्या एकूण नफ्यामध्ये टॉप १० कंपन्यांचे योगदान ६१.८३ टक्के होते.
  • २०१७-१८दरम्यान बीएसएनएल, एअर इंडिया व एमटीएनएल या कंपन्या सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक तोटा सहन करणाऱ्या कंपन्या ठरल्या. एकूण तोट्यामध्ये या ३ कंपन्यांचे योगदान ५२.१५ टक्के आहे.
  • एकूण ७१ तोट्यातील सरकारी कंपन्यांच्या एकूण तोट्यामध्ये टॉप १० तोटा सहन करणाऱ्या कंपन्यांचा वाटा ८४.७१ टक्के होता.
  • भारत कुकिंग कोल लिमिटेड देखील यावेळी तोट्यातील कंपन्यांच्या यादीत सामील झाली.
  • इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी तसेच ईस्टर्न कोलफील्ड या कंपन्या २०१६-१७पर्यंत नफ्यामध्ये होत्या, परंतु यावेळी या कंपन्याही तोट्यातील टॉप १० कंपन्यांच्या यादीत सामील झाल्या.
  • २०१७-१८मध्ये एकूण सार्वजनिक क्षेत्रात एकूण ३३९ उद्योग होते. ज्यापैकी २५७ कार्यरत होते तर उर्वरित ८२ उपक्रम निर्माणाधीन होते.

नागपूरमध्ये होणार ९९वे मराठी नाट्य संमेलन

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित ९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमध्ये होणार आहे.
  • मुंबईत झालेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा या संमेलनाचे आयोजन करणार आहे.
  • १९८५नंतर विदर्भात आणि नागपूरमध्ये ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली ३३ वर्षांनंतर नाट्य संमेलन होत आहे.
  • १९८५मध्ये प्रभाकर पणशीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झाले होते.

दिव्या पाटीदार जोशीला मिसेस इंडियाचा खिताब

  • मध्य प्रदेशातील रतलामच्या दिव्या पाटीदार जोशीने मिसेस इंडिया माय आयडेंटिटी सौंदर्य स्पर्धा २०१८ जिंकली.
  • या स्पर्धेत तिने २४ स्पर्धकांना पराभूत केले. आता ते मिसेस युनिव्हर्स २०१९ स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
  • या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे ३००० युवतींनी भाग घेतला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन दिल्लीत करण्यात आले होते.
  • दिव्याने या स्पर्धेतील ब्युटी विथ ब्रेन आणि कॅट वॉक या स्पर्धांमध्येही विजेतेपद मिळविले.
  • सध्या दिव्या ‘ग्रोइंग इंडिया फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहेत. हा एनजीओ बालमजुरी, महिलांच्या समस्या, कुप्रथा दूर करण्यासाठी कार्य करतो.

खालिस्तान लिबरेशन फोर्सवर बंदी

  • केंद्र सरकारने खून, बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांमधील सहभागामुळे बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खालिस्तान लिबरेशन फोर्सवर बंदी घातली आहे.
  • खालिस्तान लिबरेशन फोर्स बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आलेली ४०वी संस्था आहे.
  • अलीकडेच विविध संघटनांनी खालिस्तान लिबरेशन फोर्सचे मॉड्यूल्स पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली होती. या पार्शवभूमीवर सरकारने बंदींचा निर्णय घेतला आहे.
खालिस्तान लिबरेशन फोर्स (केएलएफ)
  • हिंसक कृत्यांद्वारे पंजाबला भारतापासून वेगळे करून स्वतंत्र खालिस्तानची स्थापना करण्याच्या उद्देशाने खालिस्तान लिबरेशन फोर्स १९८६मध्ये अस्तित्वात आली.
  • खालील घटनांमुळे केएलएफ पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या माहितीला पुष्टी मिळते:
  • पंजाब पोलिसांनी पकडलेल्या ५ सदस्यीय केएलएफ मॉड्यूलने पंजाबमधील नभ या स्थळी स्फोटके लावल्याच्या २ प्रकरणांची माहिती दिली होती.
  • गुरदासपूर जिल्ह्यात एक मॉड्यूल आढळून आले, ज्याच्या ४ दहशतवाद्यांना बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह पकडण्यात आले होते. जे पठाणकोटमधील एका राजकीय पक्षाच्या नेत्याला लक्ष्य करणार होते.
  • अमृतसर पोलिसांनी तीन अतिरेक्यांचे एक मॉड्यूल पकडले होते, जे पंजाबमध्ये सांप्रदायिक सौहार्द विस्कळीत करण्यासाठी विशिष्ट समुदायाच्या प्रमुख सदस्यांना लक्ष्य करण्याची योजना आखत होते.
  • जालंधर पोलिसांनी खालिस्तान जिंदाबाद फोर्सचा ४ दहशतवाद्यांचा एक विभाग पकडला होता. तसेच केएलएफच्या प्रमुखाला बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह अटक केली होती.
  • गृह मंत्रालयाच्या मते, केएलएफच्या भारतातील सदस्यांना परदेशातील त्यांच्या हस्तकांकडून आर्थिक मदत मिळत आहे. तसेच केएलएफ दहशतवादी कार्यात सहभागी आहे.
बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा
  • हा कायदा भारतात बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या संस्थांना प्रतिबंधित करतो.
  • तसेच भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर कारवाई करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना हा कायदा अनियंत्रित शक्ती प्रदान करते.
  • भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेत एकत्र येण्याचे स्वातंत्र्य आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या हितासाठी संघटना तयार करण्याचे स्वातंत्र्य अशा मुलभूत हक्कांवर हा कायदा वाजवी निर्बंध लागू करतो.

आसाममध्ये द्विजिंग महोत्सव सुरू

  • २७ डिसेंबर रोजी आसाममधील चिरांग जिल्ह्यामध्ये आई नदीच्या काठावर द्विजिंग महोत्सव सुरू झाला. या उत्सवाची ही तिसरी आवृत्ती आहे.
  • या महोत्सवाचे उद्घाटन आसामच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री रिहोन दैमारी यांनी केले. या महोत्सवात १५ लाख पर्यटक येण्याची शक्यता आहे.
  • द्विजिंग महोत्सव आसामचा वार्षिक नदी उत्सव आहे. यामध्ये व्यापार, अन्न, प्रदर्शन, क्रीडा, नदी मोहिमा आणि साहसी खेळ यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • या दरम्यान नवीन वर्षाच्या निमित्ताने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात.
  • या महोत्सवातून या प्रांताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. तसेच याद्वारे पुरामुळे पिडीत लोकांनाही मदत केली जाईल.
आई नदी
  • आई नदीचा उगम भुटानमधील हिमालय पर्वतात होतो. आसामच्या चिरांग आणि बोंगाईगाव जिल्ह्यातून वाहत जाऊन ही नदी ब्रह्मपुत्रा नदीला मिळते.
  • ही नदी या क्षेत्रातील अंदाजे ३०,००० कुटुंबांची जीवनरेखा आहे. या नदीतून मिळणारी पिके, मासे, दगड आणि वाळू इत्यादींवर ही कुटुंबे अवलंबून आहे.
  • या नदीवर प्रसिद्ध हग्रमा पूल स्थित आहे. ही नदी सहली आणि तत्सम कार्यांसाठीही खूप लोकप्रिय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा