ब्रेक्झिट प्रस्तावास युरोपियन युनियनची मान्यता
- ब्रुसेल्समध्ये (बेल्जियम) २५ नोव्हेंबर रोजी आयोजित युरोपियन युनियनच्या विशेष परिषदेत २७ देशांच्या नेत्यांनी ब्रिटनच्या ‘ब्रेक्झिट’ प्रस्तावास मान्यता दिली.
- त्यामुळे आता २९ मार्च २०१९ रोजी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. या कराराला आता ब्रिटनच्या संसदेची मान्यता लागणार आहे.
- युरोपियन युनियन आणि ब्रिटन यांच्यात गेले २० महिने सुरू असलेल्या वाटाघाटीचा हा सर्वात महत्वाचा परिणाम आहे.
ब्रेक्झिट काय आहे?
- ब्रेक्झिट हा शब्द ब्रिटन आणि एक्झीट या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनला आहे. याचा अर्थ ब्रिटनचे बाहेर पडणे असा आहे.
- युरोपियन युनियन मधून बाहेर पडावे कि पडू नये यासाठी युनायटेड किंगडममध्ये जून २०१६मध्ये सार्वमत घेण्यात आले होते. यात अत्यंत थोड्या फरकाने लोकांनी युरोपियन युनियन पासून बाहेर बाजूने कौल दिला.
- या निर्णयामागे ब्रिटनचे सार्वभौमत्व, संस्कृती आणि ओळख टिकवून ठेवण्याचा युक्तिवाद देण्यात आला.
- ग्रेट ब्रिटनमध्ये इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलँड या ३ देशांचा समावेश होतो. तर युनायटेड किंगडमची चर्चा करताना या तिघांमध्ये उत्तर आयर्लंडचाही समावेश होतो.
मुद्दा काय आहे?
- यूकेमधील बऱ्याच लोकांना असे वाटते की युरोपियन युनियनमध्ये (ईयु) सामील झाल्यानंतर, युकेमध्ये ईयुचा हस्तक्षेप लक्षणीयरित्या वाढला आहे.
- ब्रेक्झिटचे समर्थक असे मानतात की युरोपियन युनियन पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही आणि ते ब्रिटीशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे.
- ब्रेक्झिटवर यूकेमध्ये सध्या अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यापूर्वी यूके सरकारला संसदेत यावर मतदान द्यावे लागणार आहे.
युरोपियन युनियन
- स्थापना : २५ मार्च १९५७
- मुख्यालय : ब्रुसेल्स (बेल्जियम)
- ध्येय : United in diversity (विविधतेमध्ये एकता)
- युरोपियन युनियन हा युरोपमधील देशांचा राजकीय-आर्थिक संघ आहे. १ नोव्हेंबर १९९३ रोजी हा संघ स्थापन झाला. सध्या युरोपियन युनियनचे युनायटेड किंगडमसह २८ सदस्य देश आहेत.
- या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयुक्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो) अस्तित्वात आणणे हे आहे.
- युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले आहे. याची एकूण लोकसंख्या ४९ कोटी ३० लाख आहे.
- युरोपियन युनियनचे सदस्य देश: युनायटेड किंगडम, बेल्जियन, फ्रान्स, इटली, लक्झमबर्ग, नेदरलँडस्, जर्मनी, डेन्मार्क, आयर्लंड, ग्रीस, पोर्तुगाल, स्पेन, ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, इस्टोनिया, लॅटव्हिया,लिथुनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हकिया, स्लोव्हकिया, बल्जेरिया, रूमानिया, क्रोएशिया.
ग्रीनहाउस गॅस बुलेटिन रिपोर्ट
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत हवामान संबंधित आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र संघटनेने (डब्ल्यूएमओ) अलीकडेच ग्रीनहाउस गॅस बुलेटिन नावाचा वार्षिक अहवाल जारी केला आहे.
- अहवालानुसार सद्यस्थितीत पृथ्वीच्या वातावरणामध्ये हरितगृह वायूंच्या प्रमाणाने विक्रमी पातळी गाठली आहे.
- हा अहवालामध्ये जगातील विविध देशांद्वारे हरितगृह वायूसाठी करण्यात आलेले उपाय, गरजा, कमतरता आणि आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
- कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडचा स्तर पूर्वीच्या औद्योगिक पातळीपेक्षा खूप जास्त आहे आणि यामध्ये घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
- कार्बन डायऑक्साईड व इतर हरितगृह वायू उत्सर्जनात लक्षणीय घट न झाल्यास हवामानातील बदलामुळे पृथ्वीवरील जीवनावर विनाशकारी प्रभाव पडेल.
- वातावरणातील आवश्यकतेपेक्षा अधिक असलेला कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचा कोणताही प्रभावी उपाय सध्या उपलब्ध नाही.
- कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात घट करणे, हा वातावरणातील बदलाच्या समस्येचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग आहे.
जागतिक हवामानशास्त्र संघटना
- ही एक हवामानशास्त्र संघटना असून, तिची स्थापना २३ मार्च १९५० रोजी झाली आहे.
- ही संघटना पृथ्वीच्या वातावरणातील परिस्थिती व वर्तन, महासागराशी त्याचा संबंध, जलस्रोतांच्या वितरणाबद्दल माहिती देणारी संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकृत संस्था आहे.
- या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. जगभरातील १९१ देश या संघटनेचे सदस्य आहेत.
हरितगृह वायूंची स्थिती
- कार्बन डायऑक्साइड: २०१५ आणि २०१६च्या तुलनेत वातावरणात कार्बन डाय- ऑक्साईडचे प्रमाण २०१७मध्ये खूप वाढले आहे. २०१७मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ४०५.५ पीपीएमपर्यंत पोहोचले आहे, जे औद्योगिक क्रांती पूर्वीच्या प्रमाणाच्या अडीच पट आहे. २०१६मध्ये वातावरणात कार्बन डाय- ऑक्साईडचे प्रमाण ४०३.३ पीपीएम आणि २०१५मध्ये ४००.१ पीपीएम होते.
- मिथेन: २०१७मध्ये वातावरणात मिथेन १८५९ पीपीबी (पार्ट पर बिलियन) या नवीन उच्च पातळीवर पोहोचले आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण २५७ टक्के जास्त आहे.
- नायट्रस ऑक्साईड: वातावरणात नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण २०१७मध्ये ३२९.९ पीपीबी आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण १२२ टक्के जास्त आहे.
देशातील ८ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतपुरवठा
- देशातील प्रत्येक घरापर्यत वीज पोहोचवणाऱ्या महत्वाकांक्षी सौभाग्य योजनेअंतर्गत ८ राज्यांमध्ये सर्व घरात विद्युतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
- यात८ राज्यांमध्ये मध्यप्रदेश, त्रिपुरा, बिहार, जम्मू-कश्मीर, मिझोराम, सिक्कीम, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.
- यामुळे देशात सध्या १०० टक्के घरगुती विद्युत पुरवठा असणाऱ्या राज्यांची संख्या १५ झाली आहे.
- देशातील सर्व घरांमधे वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर २०१७मध्ये ‘प्रधानमंत्री सहज बीजली हर घर योजना’ म्हणजेच सौभाग्य योजनेची सुरुवात झाली.
- या योजनेंतर्गत संपूर्ण देशाला २४ तास वीज पूरवण्याचे उद्दिष्ट ३१ मार्च २०१९पर्यंत पूर्ण करणे सरकारचे ध्येय आहे.
- आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत २.१ कोटी घरांमधे वीज जोडणी देण्यात आली आहे.
- राज्यातल्या वीज वितरण कंपन्यांमधे स्पर्धा निर्माण करण्यासाठी या योजनेअंतर्गत विविध गटात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या राज्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
नांदुर-मध्यमेश्वर अभयारण्याचा रामसार यादीत समावेश
- महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नांदुर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ‘रामसार’ यादीत समाविष्ट होणार आहे.
- अभयारण्यात दरवर्षी २० हजारांहून अधिक पक्ष्यांचे आगमन होणे, हा ‘रामसार’च्या यादीत समाविष्ट होण्यासाठी असलेला मुख्य निकष नांदुर-मध्यमेश्वरने पूर्ण केला आहे.
- या यादीत देशातील २६ पाणथळ क्षेत्रांचा समावेश आहे. नांदुर-मध्यमेश्वर या यादीत समाविष्ट होणारे महाराष्ट्रातील पहिलेच पाणथळ क्षेत्र आहे.
- नांदुर-मध्यमेश्वरला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्यानंतर पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे पाणथळ क्षेत्र अधिक संरक्षित होण्यास हातभार लागणार आहे.
- गोदावरी व कादवा नदीच्या संगमावरील नांदुर-मध्यमेश्वर बंधारा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे.
- वर्षांनुवर्षे नदीच्या प्रवाहात गाळ साचल्याने तयार झालेले मातीचे उंचवटे, जलाशयातील उथळ पाणी, जलचर, पाणवनस्पती, वृक्षराई, शेती ही पोषक स्थिती पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासास उपयुक्त ठरली.
- येथे २४० हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. ४००पेक्षा अधिक वनस्पतींची विविधता असणाऱ्या या भागात पक्ष्यांबरोबर कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटय़ा, साप, कासव आदी वन्यचर आहेत. जलाशयात २४ प्रकारचे मासे आहेत.
- ‘रामसार’चे मानांकन लाभल्यास नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल. पाणथळ क्षेत्र संरक्षित होईल.
- आंतरराष्ट्रीय पातळीवरून संवर्धन, विकासासाठी निधी मिळेल आणि त्यावर देखरेख, नियंत्रणही राहील.
- रामसारच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर हे अभयारण्य आंतरराष्ट्रीय पक्षीमित्र आणि अभ्यासकांपर्यंत पोहचेल.
रामसार करार
- महत्वाच्या आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्रांसाठीचे ‘रामसार करार’ हा पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे.
- या कराराला ‘Convention on Wetlands’ असेही म्हंटले जाते. इराणमधील रामसार शहरात हा करार करण्यात आला होता, त्यामुळे या कराराला ‘रामसार करार’ नाव देण्यात आले.
- महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्रांच्या यादीमध्ये मे २०१८मध्ये २,३३१ रामसार स्थळांचा समावेश होता. ही यादी रामसार यादी म्हणून ओळखली जाते.
निधन: प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक उस्ताद इमरत खान
- प्रसिद्ध सतार आणि सूरबहार वादक उस्ताद इमरत खान यांचे २२ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत हृदयविकाराने निधन झाले.
- महान सतारवादक उस्ताद विलायत खान यांचे इमरत खान हे कनिष्ठ बंधू होत. इमरत खान स्वत: एक श्रेष्ठ सतारवादक आणि आपल्या जमान्यातील एक महान सूरबहार वादक होते.
- पुरस्कार देण्यास फार उशीर झाल्याचे सांगत त्यांनी गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता.
- सुमारे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या इटावा या घराण्याचे ते कलाकार होते. इमरत खान यांच्या आजोबांच्या नावावरून इटावा घराण्याला इमदाद घराणे म्हणून ओळखले जाते.
- इमदाद घराण्याने सतारीमध्ये बदल करून सूरबहार या वाद्याची निर्मिती केली. सूरबहारला बास सतार असेही म्हटले जाते.
- उस्ताद इमरत खान यांना इंग्लंडमध्ये १९६८ ते १९७० या काळात डार्टिग्टन कॉलेज ऑफ आर्ट्स येथे संगीत अध्यापनाची संधी मिळाली.
- १९७१मध्ये लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये कला पेश करण्याची संधी मिळालेले ते पहिले भारतीय संगीतकार होते.
- संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी असलेल्या उस्तादजींनी सत्यजित राय यांच्या ‘जलसाघर’ या चित्रपटासाठी संगीत दिले होते.
- जेम्स आयव्हरीचा ‘द गुरू’, मायकेल केन व सिडनी पॉटियर यांचा ‘दी विल्बी कॉन्सपिरसी’ या चित्रपटांचे संगीत संयोजनही उस्तादजींनी केले.
डॉ. मुरहरी केळे: त्रिपुराच्या वीज मंडळ नवे अध्यक्ष
- वीज वितरणाच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करणारे महाराष्ट्राचे डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा राज्याच्या वीज मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे.
- मूळचे उस्मानाबादचे असलेले केळे विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर १९९१मध्ये तेव्हाच्या वीज मंडळात नोकरीला लागले.
- खासगी कंपनीच्या माध्यमातून वीज वितरणाची पद्धत राज्यात सर्वप्रथम भिवंडी व नागपूरमध्ये अमलात आणली गेली. त्यात केळेंचे योगदान मोलाचे आहे.
- त्यांनी वीज वितरणाचे खासगीकरण या विषयावर नागपूर विद्यापीठातून आचार्य ही पदवीसुद्धा मिळवली आहे.
- वितरण कंपनीत मुख्य अभियंता झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वीज प्रशिक्षण संस्थेत बराच काळ काम केले.
- त्यांच्या कार्याची दखल घेत मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालकपद केळे यांना दिले.
- केळे यांनी संपादित केलेली ‘अहिल्यादेवी होळकर’ व ‘संतवाणी’ ही दोन पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी अनेक वृत्तपत्रांत स्तंभलेखनसुद्धा केले आहे.
- ‘नानी’, ‘शब्दशिल्प’ अशा पुस्तकांसोबतच त्यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले ‘जगी ऐसा बाप व्हावा’ हे चरित्रात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
- अखेपर्यंत वारकरी म्हणून वावरणाऱ्या वडिलांवर लिहिलेल्या या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
- मराठवाडा भूषण, तसेच कवी नारायण सुर्वे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळवणारे केळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्यही आहेत.
विजय औटी: महाराष्ट्र विधानसभेचे नवे उपाध्यक्ष
- शिवसेनेच्या विजय औटी यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
- महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्त होते.
- विजय औटी यांची आमदारकीची ही सलग तिसरी टर्म आहे. २००४पासून ते सातत्याने शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडून जिंकत आहेत.
- २००२साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर निवडणूक जिंकली होती.
- सभागृहातील संख्याबळ पाहता विजय औटी यांनी विधानसभा उपाध्यक्षपदी निवड निश्चित होती.
फोर्ब्सची औद्योगिक क्षेत्रातील टॉप ५० महिलांच्या यादी
- फोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१८च्या औद्योगिक क्षेत्रातील टॉप ५० महिलांच्या यादीत ४ भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश असून त्यातील एक महिला मराठी आहे.
- नेहा नारखेडे या मराठमोळ्या तरुणीने यांनी या यादीत ३५वे स्थान पटकावले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्या कोफ्लूएंट या कंपनीच्या सहसंस्थापक आहेत.
- सुरुवातीला त्यांनी लिंक्डइन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले. अपाची काफका हे सॉफ्टवेअर विकसित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
- नेटफ्लिक्स, गोल्डमॅन सॅशे आणि उबर यांसारख्या कंपन्या नारखेडे यांच्या कंपनीच्या ग्राहक कंपन्या आहेत. नारखेडे
- याशिवाय या यादीत उबेर कंपनीच्या संचालक कोमल मंगतानी यांनीही स्थान पटकावले आहे.
- त्या उबेर कंपनीच्या बिझनेस इंटेलिजन्स विभागाच्या प्रमुख असून त्या वूमन हू कोड नावाची एक स्वयंसेवी संस्थाही चालवतात.
- कामाक्षी शिवरामकृष्णन यांची या यादीत ४३व्या क्रमांकावर वर्णी लागली आहे. त्यांची Drawbridge कंपनी आर्टीफीशियल इंटेलिजन्स विषयात काम करते.
- तर पद्मश्री वारियर या भारतीय महिलेने या यादीत नाव पटकावले असून अमेरिकेतील NIO या चायनीज कंपनीच्या त्या सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
- याआधी त्यांनी Cisco आणि Motorola यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्येही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा ग्लोबल सस्टेनेबल सिटीज २०२५ उपक्रम
- संयुक्त राष्ट्रसंघाने ‘वैश्विक शाश्वत शहरे २०२५’ (Global Sustainable Cities 2025) उपक्रमामध्ये भागीदारीसाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडा या शहरांची निवड केली आहे.
- ग्लोबल सस्टेनेबल सिटीज २०२५ उपक्रमांतर्गत ५ श्रेण्यांमध्ये निवडण्यात आलेल्या एकूण २५ शहरांमध्ये या दोन शहरांचा समावेश आहे.
- याअंतर्गत ही शहरे दुसऱ्या शहरांशी स्पर्धा करणार आहेत. राजधानी लगतच्या या दोन शहरांना युनिव्हर्सिटी सिटी श्रेणीमध्ये निवडले गेले आहे.
- या उपक्रमाद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात वित्तसहाय्य प्रदान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि शहर प्रशासनामध्ये एक करार करण्यात येईल.
- आपल्या संशोधनाद्वारे या योजनेमध्ये योगदान देणाऱ्या नोएडातील ५१ विद्यार्थ्यांना संयुक्त राष्ट्रसंघ पीएचडीसाठी आर्थिक सहाय्यदेखील देणार आहे.
बुद्धिबळपटू कार्लसनला सलग चौथ्यांदा जगज्जेतेपद
- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या फॅबियानो करुआनावर ३-० अशी मात करून सलग चौथ्यांदा बुद्धिबळ स्पर्धेचे जगज्जेतेपद मिळविले आहे.
- क्लासिकल लढतीतील १२ डाव बरोबरीत सुटल्यानंतर जलद प्रकाराच्या ‘टाय-ब्रेकर’मध्ये सामन्याचा निकाल लागला. १२ डावांत एकही विजय नसणे, हासुद्धा एक विक्रम ठरला.
- जलद बुद्धिबळमध्ये वरचढ समजल्या जाणाऱ्या कार्लसनने ‘टाय-ब्रेकर’वर पूर्णपणे वर्चस्व गाजवत बुद्धिबळातील सर्वात प्रतिष्ठेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
- २७ वर्षीय मॅग्नस कार्लसनचे हे चौथे जगज्जेतेपद ठरले. २०१३ आणि २०१४मध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदला तर २०१६मध्ये सर्जी कार्याकिनला हरवून कार्लसनने जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता.
- बॉबी फिशर यांनी १९७२मध्ये अमेरिकेला अखेरचे जगज्जेतेपद मिळवून दिले होते. पण ४६ वर्षांनंतर फिशर यांच्यानंतरचा अमेरिकेचा जगज्जेता होण्याची संधी करुआनाला साधता आली नाही.
क्वाड्रीसायकल गैर-परिवहन वाहन श्रेणीत समाविष्ट
- भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ‘मोटार वाहन अधिनियम १९८८’च्या अंतर्गत ‘क्वाड्रीसायकल’ या वाहनाला ‘गैर-परिवहन’ वाहन श्रेणीत समाविष्ट केले आहे.
- क्वाड्रीसायकल एक असे वाहन आहे, ज्याचा आकार तीन-चाकी वाहनाप्रमाणेच आहे. परंतु तिच्यामध्ये चार चाके आहेत आणि ते पूर्णपणे कारसारखे झाकलेले असते.
- यात तीन-चाकी वाहनाचे इंजिन आहे. हे वाहन स्वस्त आणि सुरक्षित वाहतूकीचे साधन आहे.
- कायद्यानुसार, क्वाड्रिसाकिलला केवळ वाहतुकीसाठी वापरण्याची परवानगी होती परंतु आता ते गैर-परिवहन वाहतुकीसाठी पात्र ठरले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा