चालू घडामोडी : १६ डिसेंबर

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०१८

  • मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी २८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानात कॉंग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या व काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.
  • कमलनाथ यांनी १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. ते शिवराजसिंग चौहान यांची जागा घेतील. ते राज्याचे १८वे मुख्यमंत्री आहेत.
  • मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २३० पैकी ११४ जागा जिंकून कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
  • भाजपा १०९, बहुजन समाज पार्टीला २, समाजवादी पार्टीला १ आणि ४ जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या.
  • कॉंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी एकूण ११६ जागांची आवश्यकता होती. मात्र बहुजन समाज पार्टीने त्यांना पाठींबा दिल्यामुळे त्यांनी मध्यप्रदेशात सत्ता स्थापन केली.
  • मध्यप्रदेशच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल

मध्यप्रदेश विधानसभेची सद्यस्थिती
पक्ष जागा
कॉंग्रेस ११४
भाजपा १०९
स्वतंत्र उमेद्वार
बहुजन समाज पार्टी
समाजवादी पार्टी
कमलनाथ
  • कमलनाथ यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९४६ रोजी झाला होता. ते प्रथम १९८०मध्ये लोकसभेवर निवडून आले होते.
  • जून १९९१मध्ये ते केंद्रीय कॅबिनेटमध्ये पर्यावरण आणि वन राज्यमंत्री बनले होते. १९९५ आणि १९९६च्या दरम्यान ते केंद्रीय राज्य वस्त्रोद्योग मंत्री होते.
  • २००४ ते २००९ दरम्यान ते केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री होते. २००९मध्ये त्यांना केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रीपदी नियुक्त केले गेले.
  • मध्यप्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून ते ९ वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री
  • १९५६मध्ये मध्यप्रदेश राज्य अस्तित्वात आले. आतापर्यंत मध्यप्रदेशमध्ये एकूण १७ व्यक्ती मुख्यमंत्री झाले असून, त्यातील ११ कॉंग्रेस पक्षाचे आहेत.
  • मध्यप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला होते, ते फक्त ६० दिवसांसाठी मुख्यमंत्री पदावर होते.
  • मध्यप्रदेशचे पहिले गैर-काँग्रेस मुख्यमंत्री गोविंद नारायण सिंह (१९६७-६९) होते.
  • मध्यप्रदेशात २ कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री दिग्विजय सिंह होते.
  • उमा भारती मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. त्या २००३-०४ दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्री होत्या.

राजस्थान विधानसभा निवडणूक २०१८

  • राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी ७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानात कॉंग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या.
  • त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांची राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली असून, सचिन पायलट हे राजस्थानचे उपमुख्यमंत्री असतील.
  • ११ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार १९९ पैकी कॉंग्रेसने ९९ तर भाजपने ७३ जागा जिंकल्या होत्या.
  • राजस्थान विधानसभेमध्ये एकूण २०० जागा (१९९ निर्वाचित व १ नामांकित) असून, येथे सत्ता स्थापनेसाठी १०१ जागांची आवश्यकता असते.

राजस्थान विधानसभेची सद्यस्थिती
पक्ष जागा
कॉंग्रेस ९९
भाजपा ७३
स्वतंत्र उमेद्वार १३
बहुजन समाज पार्टी ०६
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी ०३
भारतीय समाजवादी पार्टी (सीपीआय-एम) ०२
भारतीय ट्रायबल पार्टी ०२
राष्ट्रीय लोकदल ०१
अशोक गेहलोत
  • अशोक गेहलोत यांचा जन्म ३ मे १९५१ राजस्थानमधील जोधपूर येथे झाला. यापूर्वी ते १९९८ ते २००३ आणि २००८ ते २०१३ या काळात राजस्थानचे मुख्यमंत्री होते.
  • सप्टेंबर १९८२ ते फेब्रुवारी १९८४दरम्यान ते केंद्रीय पर्यटन आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री होते. त्यानंतर फेब्रुवारी १९८४ ते ऑक्टोबर १९८४ दरम्यान ते केंद्रीय क्रीडा उपमंत्री होते.
  • २१ जून १९९१ आणि १८ जानेवारी १९९३ दरम्यान अशोक गेहलोत केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते.
  • अशोक गेहलोत यांनी ३ राजस्थान काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले आहे. १९८९मध्ये ते राजस्थान सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे मंत्री होते.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री
  • आतापर्यंत राजस्थानमध्ये एकूण १४ व्यक्ती मुख्यमंत्री झाले असून, त्यातील ११ कॉंग्रेस पक्षाचे आहेत.
  • राजस्थानचे पहिले मुख्यमंत्री हिरा लाल शास्त्री होते. ते १९४९ ते १९५१ दरम्यान मुख्यमंत्री पदावर होते.
  • मोहन लाल सुखाडिया राजस्थानचे सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्री होते. ते १९५४ ते १९७१ (राष्ट्रपती राजवटीचा काही कालावधी वगळता) दरम्यान या पदावर होते.
  • वसुंधरा राजे सिंधिया राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत.

देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ देशाला समर्पित

  • गुजरातमधील वडोदरा येथील देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ १५ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देशाला समर्पित केले.
  • भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच संस्था आहे. तर जगातील रशिया आणि चीननंतरची तिसरी अशी संस्था आहे.
  • या संस्थेला राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था (National Rail and Transportation Institution) असे नाव देण्यात आले आहे.
  • हे एक डीम्ड विद्यापीठ असेल, जे ट्रान्सपोर्ट नेटवर्कमध्ये व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाशी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रम प्रदान करेल.
  • रेल्वे बोर्डचे अध्यक्ष अशोक लोहानी यांना या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने मानवी संसाधन कौशल्य आणि क्षमता उभारणीसाठी २० डिसेंबर २०१७ रोजी वडोदरा येथे पहिले राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली होती.
  • या विद्यापीठाने आपले कार्य ५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरु केले होते.
  • वडोदरा येथील भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय अकादमीची (एनएआर) जमीन या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आली आहे.
  • हे विद्यापीठ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नोवो डिवीजन (मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्था) कायदा, २०१६अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठ म्हणून स्थापन करण्यात आले आहे.
  • भारतीय रेल्वेला आधुनिकीकरणाच्या मार्गावर पुढे जाण्यास या विद्यापीठाची मदत होणार आहे. तसेच ते ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासही मदत करेल.
  • हे विद्यापीठ सक्षम तंत्रज्ञान प्रदान करेल. तसेच ‘स्टार्टअप इंडिया’ व ‘स्कील इंडिया’ योजनांना पाठबळ देताना रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे.
  • या विद्यापीठासाठी रेल्वे मंत्रालयाने ४२१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या विद्यापीठात ग्रीनफिल्ड कॅँपसही निर्माणाधीन आहे.
  • या विद्यापीठातील पहिल्या बॅचसाठी एकूण १०३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यातील ६२ विद्यार्थी वाहतूक तंत्रज्ञान या विषयात बीएससी करत आहेत आणि ४१ विद्यार्थी वाहतूक व्यवस्थापन या विषयात बीबीए करत आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम ३ वर्षांचे आहेत.
  • शैक्षणिक वर्ष २०१९-२०मध्ये वाहतूक आणि सिस्टम डिझाईन, वाहतूक व्यवस्था अभियांत्रिकी, वाहतूक धोरण आणि अर्थशास्त्र यासारख्या विषयांवर मास्टर्स डिग्री कार्यक्रम सुरू करण्याची योजनाही आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये उच्च पर्वतीय औषधी वनस्पती संस्था

  • १५ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि श्रीपाद नाईक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये उच्च पर्वतीय औषधी वनस्पती संस्थेची (Institute of High-Altitude Medicinal Plants) आधारशीला ठेवली.
  • ही संस्था जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भदरवाह नावाच्या ठिकाणी बांधली जाणार आहे. यासाठी १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • या संस्थेत औषधी वनस्पतींवर संशोधनाचे कार्य करण्यात येणार आहे. तसेच औषधी वनस्पतींच्या शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल.
  • यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल आणि विदेशी बाजारपेठेत औषधी वनस्पतींचा प्रचारही होईल.
  • उच्च पर्वतीय औषधी वनस्पती संस्था औषधी वनस्पतींच्या संशोधनासाठी एक अग्रगण्य संस्था असेल.
  • याद्वारे शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या शास्त्रीय पद्धतीने शेतीसाठी मदत केली जाईल. तसेच औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल, ज्यामुळे या क्षेत्रात तरुणांना रोजगारदेखील निर्माण होईल.

श्री सैनी ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड २०१८

  • भारतीय-अमेरिकन श्री सैनी हिने मिस इंडिया वर्ल्डवाइड २०१८चा किताब जिंकला आहे. ही सौंदर्य स्पर्धा अमेरिकेतील न्यू-जर्सी येथे आयोजित करण्यात आली होती.
  • या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा साक्षी सिन्हा प्रथम रनरअप आणि युनायटेड किंग्डमची अनुशा सरीन ही दुसरी रनरअप ठरली.
  • तसेच मिसेस इंडिया वर्ल्डवाइड २०१८चा किताब हरियाणाच्या मनदीप कौर संधूने जिंकला. यात मलेशियाची जेया प्रिया पंडियन पहिली रनरअप आणि अमेरिकेची कविता मल्होत्रा पट्टानी दुसरी रनरअप ठरली.
  • मिस इंडिया वर्ल्डवाइड या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन न्यूयॉर्कस्थित भारतीय फेस्टिव्हल समितीद्वारे केले जाते. हा परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाचा सर्वात जुना कार्यक्रम आहे.
  • या स्पर्धेत भारतातील आणि इतर देशांतील भारतीय समुदायाचे सदस्य सहभागी होतात. मिस इंडिया वर्ल्डवाइडची यावर्षी ही २७वी आवृत्ती होती.
  • या कार्यक्रमात भारतीय वंशाचे स्पर्धक सहभागी होतात. यावेळी या स्पर्धेत १७ देशांतील स्पर्धक सहभागी झाले.
  • मिस इंडिया वर्ल्डवाइडच्या पुढील आवृत्तीचे आयोजन २०१९मध्ये मुंबईत होणार आहे.

भारतीय टपाल विभागाची इंटरनेट बँकिंग सुविधा सुरु

  • भारतीय टपाल विभागाने बचत खातेधारकांसाठी अलीकडेच इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू केली.
  • तसेच दळणवळण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनोज सिन्हा यांनी टपाल विभागाचे ई-कॉमर्स पोर्टलही सुरु केले.
  • या पोर्टलमुळे ग्रामीण कारागीर, बचत गट, महिला उद्योजक, स्वायत्त संस्था, राज्य आणि केंद्र सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम देशभरातल्या ग्राहकांना आपली उत्पादने विकू शकतील.
  • ग्राहक देखील पोर्टलवर ऑर्डर नोंदवून डिजिटल भरणा करु शकतील. स्पीड पोस्ट द्वारे उत्पादने घरपोच पाठवली जातील.
  • तर इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे ग्राहक ऑनलाइन आपल्या पोस्ट ऑफिस बचत खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकतात.
भारतीय टपाल
  • भारतीय टपाल विभागाची स्थापना १ एप्रिल १८५४ रोजी करण्यात आली. हा विभाग केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. भारतीय टपाल जगातील सर्वात मोठ्या पोस्टल नेटवर्कपैकी एक आहे.
  • भारताला २३ पोस्टल सर्कलमध्ये विभागण्यात आले आहे. या पोस्टल सर्कलचे नियंत्रण मुख्य पोस्टमास्टर करतात.
  • भारतीय टपाल विभागाद्वारे टपाल सेवा, सैन्य टपाल सेवा, इलेक्ट्रॉनिक भारतीय पोस्टल ऑर्डर, पोस्टल लाइफ इन्शुरन्स, पोस्टल बचत, बँकिंग, डेटा कलेक्शन, ई कॉमर्स इत्यादी सेवा पुरविल्या जातात.
  • भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटाची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये १८५२मध्ये झाली. तर १८५४पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.
पिन कोड
  • पिन कोड किंवा पोस्टल इंडेक्स नंबर कोड म्हणजे भारतातील डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक. हे क्रमांक ६ आकडी असतात. याची सुरुवात १५ ऑगस्ट १९७२ रोजी झाली.
  • या क्रमांकावरून एका विशिष्ट पोस्ट ऑफिसचा आणि पर्यायाने ते पोस्ट ऑफिस ज्या गावात आहे ते गाव किंवा ज्या गावाच्या जवळपास आहे ते नागरी किंवा ग्रामीण क्षेत्र समजते.
  • या पिन कोडमधील पहिल्या २ अंकांवरून ते पोस्ट ऑफिस किंवा ते गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते. पुढच्या २ अंकांवरून जिल्ह्याचा बोध होतो आणि शेवटचे २ अंक हेड पोस्ट, सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात.
  • भारतात एकूण ९ पिन झोन आहेत. यापैकी ८ झोनचा उपयोग भौगोलिक क्षेत्रांसाठी तर एका पिन झोनचा वापर सैन्य तापल सेवेसाठी केला जातो.

इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमला ऑस्ट्रेलियाकडून मान्यता

  • ऑस्ट्रेलियाने अलीकडेच इस्रायलची राजधानी म्हणून पश्चिम जेरुसलेमला मान्यता दिली. परंतु, आपला दूतावास तेल अवीवमधून जेरूसलेमला हलविण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने अद्याप घेतलेला नाही.
  • परंतु ऑस्ट्रेलिया जेरूसलेममध्ये एक संरक्षण व व्यापार कार्यालय उघडणार आहे. १९४८च्या अरब-इस्रायली युद्धापासून पश्चिम जेरुसलेम इस्रायलच्या ताब्यात आहे.
पार्श्वभूमी
  • ऑक्टोबर २०१८मध्ये अमेरिकेने इस्रायलमधील आपला दूतावास आणि वाणिज्य दूतावास (Consulate General) यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
  • जागतिक स्तरावरील कार्यात दक्षता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला होता.
  • त्यापूर्वी डिसेंबर २०१७मध्ये अमेरिकेने इस्रायलची राजधानी म्हणून जेरूसलेमला मान्यता दिली होती.
  • त्यानंतर, मे २०१८मध्ये अमेरिकेने तेल अवीवऐवजी जेरूसलेममध्ये दूतावासाची स्थापना केली होती.
  • या विलीनीकरणानंतर अमेरिका जेरूसलेममध्ये पॅलेस्टिनी मुद्द्यांसाठी युनिट स्थापन करेल, जे गाझा आणि जेरूसलेममध्ये आपले कार्यक्रम सुरु ठेवेल.
वाद कशावरून?
  • जेरुसलेमची समस्या इस्रायल व पॅलेस्टाईनमधील सर्वात विवादास्पद समस्यांपैकी एक आहे. जेरुसलेम आणि त्याच्या शहरी सीमांवरून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वाद आहेत.
  • पॅलेस्टाईनने आंतरराष्ट्रीय समर्थनासह पूर्व जेरुसलेमला आपली राजधानी बनवू इच्छितो.
  • या पूर्वेकडील भागावर इस्रायलने १९६७च्या युद्धामध्ये नियंत्रण स्थापित केले होते. इस्रायलदेखील जेरूसलेमला आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानते.
  • जेरुसलेम हे इस्रायलमधील ज्यूंसाठी एक पवित्र शहर आहे. त्यांची मंदिरे-स्मारके तिथे आहेत. तर पॅलेस्टिनी अरबांसाठीही जेरुसलेमचे इस्लामिक महत्त्व आहे.

रानिल विक्रमसिंघे पुन्हा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी

  • श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी १५ डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर १६ डिसेंबर रोजी रानिल विक्रमसिंघे यांनी पुन्हा श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
  • २६ ऑक्टोबर रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवून राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून महिंदा राजपक्षे यांना नियुक्त केले होते.
  • नाट्यमय घडामोडींनंतर त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यामुळे श्रीलंकेमध्ये म्प्ठा वाद निर्माण झाला होता.
पार्श्वभूमी
  • राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांचा पक्ष असलेल्या युनाइटेड पीपल्स फ्रीडम अलायन्सने (यूपीएफए) रानिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीच्या (यूएनपी) आघाडी सरकारमधून आपला पाठींबा काढून घेतला होता.
  • २०१५मध्ये या आघाडी सरकारची स्थापना झाली होती, जेव्हा मैत्रीपाला सिरीसेना रानिल विक्रमसिंघे यांच्या पाठिंब्याने राष्ट्रपती बनले होते.
  • आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजावरून सिरिसेना आणि विक्रमसिंघे यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांचा पाठींबा काढून घेत माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.
  • सिरीसेना यांनी महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान बनविल्याने श्रीलंकेमध्ये घटनात्मक पेच निर्माण झाला. श्रीलंकेच्या संविधानानुसार विक्रमसिंघे यांना बहुमताशिवाय त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकत नाही.

१६ डिसेंबर: विजय दिन

  • १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
  • या दिवसाचा निमित्ताने १९७१च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते.
  • या युद्धानंतर बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला आणि पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर विनाशर्त आत्मसमर्पण केले.
  • या युद्धात भारताचे सुमारे ३८०० सैनिक शहीद झाले. दुसरीकडे, पाकिस्तानचे या युद्धात ९००० सैनिक ठार झाले.
  • १९७१ युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती स्मारक उभारण्यात आले. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याचे लोकार्पण केले.
पार्श्वभूमी
  • १९४७मध्ये भारताच्या विभाजनानंतरचा पाकिस्तान हा नवा देश अस्तित्वात आला. पाकिस्तानचा एक महत्त्वाचा भाग ‘पूर्व पाकिस्तान’ (वर्तमान बांगलादेश) होता.
  • पूर्व पाकिस्तान भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानापासून खूप दूर होता, त्याशिवाय भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही तो पाकिस्तानपेक्षा खूप वेगळा होता. त्यामुळे, पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली.
  • १९७१चे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध दोन आघाड्यांवर लढले गेले. या युद्धाची सुरुवात ३ डिसेंबर १९७१ रोजी झाली.
  • हे युद्ध पूर्व आणि पश्चिम आघाड्यांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाले. या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला.
  • परिणामी पाकिस्तानचे लेफ्टिनंट जनरल ए. ए. के. नियाजी यांनी १६ डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले. त्यांच्यासह ९३,००० पाकिस्तानी सैन्यानेही आत्मसमर्पण केले.
  • या युद्धानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगलादेश म्हणून एक नवीन राष्ट्र स्थापन झाले.

पंजाबमध्ये महिलांच्या ३३ टक्के आरक्षणासाठी विधेयक पारित

  • पंजाब विधानसभेने संसदेत व राज्य विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विधेयक पारित केले.
  • हा प्रस्ताव पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सादर केला होता. त्यांनी केंद्र सरकारकडे याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
  • या विधेयकामुळे राजकारणामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यास मदत होईल. तसेच निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेणे शक्य होईल.
  • या विधेयकात लोकसभेतील ५४३ पैकी १८० जागा तर राज्य विधानसभांमध्ये ४१०९ पैकी १३७० जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील.
  • याशिवाय पंजाबने गुरू नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त कैद्यांची पॅरोल सुट्टी १२ आठवडयांवरून १६ आठवडयांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेतला आहे.

चक्रीवादळ फैथाई

  • चक्रीवादळ फैथाई उत्तर भारतीय महासागर चक्रीवादळ हंगामातील सहावे चक्रीवादळ आहे. पहिली ५ चक्रीवादळे सागर, मेकुनु, लुबन, तितली आणि गज आहेत.
  • या चक्रीवादळाची निर्मिती चेन्नईपासून ९०० किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झाली आहे.
  • या चक्रीवादळामुळे उत्तर तमिळनाडु, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

१२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय सार्वभौमिक आरोग्य कवरेज दिन

  • Universal Health Coverage Day 2018
  • घोषवाक्य: Health for All (Universal health coverage: everyone, everywhere)
  • उद्देश: जगात कुठेही कोणालाही परवडणारी, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी जागरुकता वाढविणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा