भारताच्या जीसॅट-११चे यशस्वी प्रक्षेपण
- ५ डिसेंबर रोजी भारताच्या सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच जीसॅट-११चे युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून एरियनस्पेसद्वारे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- या उपग्रहाचे वजन ५,८५४ किलो आहे. हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल.
- या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-११चे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींमुळे हे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते.
- जीसॅट-६ए या उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी ठरल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
- जीसॅट-६ए उपग्रह २९ मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला होता. तसेच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता.
जीसॅट-११ उपग्रहाची वैशिष्ट्ये
- हा उपग्रह इस्रोने विकसित केला असून, तो १५ वर्षे कार्यरत राहील.
- हा उपग्रह इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरेल. या उपग्रहाद्वारे सेकंदाला १०० गीगाबाईटपेक्षा अधिक ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.
- या उपग्रहात ४० ट्रान्सपाँडर कू-बँड व का-बँड फ्रिक्वेंसीमध्ये आहेत. त्यामाध्यमातून हाय बँडविथ कनेक्टिव्हिटी १४ गिगाबाईट प्रतिसेकंद डेटा ट्रान्सफर स्पीड देता येणे शक्य आहे.
- या उपग्रहात अद्ययावत बीम्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या संपूर्ण क्षेत्रफळाला कव्हर करणे त्याला शक्य होईल.
- ग्रामीण भागातील इंटरनेट क्रांतीच्या दृष्टीने हा उपग्रह मैलाचा दगड ठरेल.
एरियनस्पेस
- एरियनस्पेस १९८०मध्ये स्थापन झालेली एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही जगातील पहिली व्यावसायिक प्रक्षेपण सेवा प्रदाता कंपनी आहे.
- या कंपनीचे मुख्यालय कॉरकोरोनस (फ्रान्स) येथे आहे. एरियन ५, सोयुझ २ आणि वेगा हे या कंपनीचे प्रमुख प्रक्षेपक (रॉकेट) आहेत.
- मे २०१७च्या आकडेवारीनुसार, एरियनस्पेसने २५४ मोहिमांमध्ये ५५०हून अधिक उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. वजनदार उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठीही एरियनस्पेस सेवा प्रदान करते.
- एरियनस्पेसचे वेगा रॉकेट चार टप्प्यांचे रॉकेट आहे, जे छोटे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी विकसित केले आहे. या रॉकेटची उंची ३० मीटर असून ते २५०० किलोपर्यंत भार वाहून नेण्यास सक्षम आहे.
गंगोत्री आणि यमुनोत्रीचा प्रसाद योजनेंतर्गत समावेश
- केंद्र सरकारने गंगोत्री आणि यमुनोत्री (उत्तराखंड), अमरकंटक (मध्यप्रदेश) पारसनाथ (झारखंड) या स्थळांचा समावेश प्रसाद योजनेमध्ये केला आहे.
- यामुळे प्रसाद योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण स्थळांची संख्या ४१ झाली आहे. ही ४१ स्थळे २५ विविध राज्यात पसरलेली आहेत.
- पर्यटन मंत्रालय राज्यांना पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय आर्थिक सहाय्य (सीएफए) प्रदान करत आहे. सार्वजनिक कार्यासाठी केंद्र सरकारद्वारे १०० टक्के निधी पुरविला जातो.
- पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गतदेखील कार्य केले जाऊ शकते.
प्रसाद योजना
- PRASAD: Pilgrimage Rejuvenation and Spiritual, Heritage Augmentation Drive
- ही योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने २०१४-१५मध्ये सुरू केली होती. याचा उद्देश धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण स्थळांचा योजनाबद्ध व शाश्वत विकास करणे आहे.
- या योजनेअंतर्गत धार्मिक पर्यटन स्थळांच्या सुशोभिकरणासाठी कार्य केले जाणार आहे.
या योजनेची उद्दिष्टे
- देशात धार्मिक आणि अध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे.
- धार्मिक पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देऊन रोजगाराची निर्मितीमध्ये वाढ करणे.
- धार्मिक स्थळांच्या पायाभूत सुविधांचा विकास.
- स्थानिक कला, संस्कृती, हस्तकला आणि अन्न इत्यादींना प्रोत्साहन देणे.
- या योजनेअंतर्गत पुढील पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतीलः रस्ते, रेल्वे, जलमार्ग, एटीएम, पर्यावरण अनुकूल वाहतूक मार्ग, पेयजल, पार्किंग, शौचालय, प्रतीक्षा कक्ष, प्राथमिक मदत केंद्र, नूतनीकरणक्षम उर्जा स्त्रोतांचा वापर, कॅफे, इंटरनेट सुविधा इ.
ट्रॉपेक्स २०१९: तिन्ही भारतीय सैन्यदलांचा युद्धअभ्यास
- जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यान भारतीय नौसेना थिएटर लेवल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाइज (TROPEX) आयोजित करेल.
- याचा उद्देश समुद्र किनारी भागातील सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांचे परीक्षण करणे आहे.
- ट्रोपेक्स दरम्यान, भारतीय नौसेना ‘एक्सरसाइज सी विजिल’ नावाच्या संरक्षण अभ्यासाचे आयोजनदेखील करेल.
- या अभ्यासात जहाजे, पाणबुड्या आणि विमाने यांच्यासह भारतीय तटरक्षक दल, भारतीय लष्कर आणि वायुसेना देखील सहभागी होणार आहे.
- नौसेना थिएटर लेवल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाइज हा एक समुद्री अभ्यास आहे. पश्चिमी सागरी भागात याचे आयोजन केले जाते.
- यादरम्यान, युद्धस्थिती विचारात घेऊन सराव केला जातो. यामुळे सैनिकांच्या युद्ध कौशल्यात वृद्धी होते. तसेच संयुक्त कारवाईसाठी आंतर-कार्यक्षमताही दृढ होते.
ट्रॉपेक्स २०१९
- या सरावात भारतीय नौदलाच्या पूर्व आणि पश्चिम कमांडमधून ४५ जहाज सहभागी होतील.
- यामध्ये विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्य, अणुउर्जेवर चालणारी पाणबुडी चक्र, नौदल विमान मिग २९के, हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाची जहाजे यांचा समावेश असेल.
- हा त्रि-सेवा अभ्यास असल्यामुळे यामध्ये नौदलासह भारतीय लष्कर आणि वायुसेनेचे सैनिकही सहभागी होतील.
- भारतीय हवाईदलाची सु-३०एमकेआय, जॅग्वार आणि AWACS ही विमानेदेखील यात सहभागी होतील.
साहित्य अकादमी पुरस्कार २०१८
- भारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार २०१८ची ५ डिसेंबर रोजी घोषणा झाली.
- देशातल्या विविध २४ प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.
- यंदा ७ कवितासंग्रह, ६ कादंबऱ्या, ६ लघुकथा, ३ समीक्षा आणि २ निबंध या साहित्यकृतींची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली.
- २९ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- यंदा मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रसिद्ध लेखक म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ हा समीक्षा ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. २०३ – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे.
- तर उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
- कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत तर ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे.
- डॉ. शैलजा बापट पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे.
- तसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्स’ म्हणून निवड करण्यात आली होती.
साहित्य अकादमी
- ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी स्वायत्त भारतीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी झाली. या संस्थेचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे.
- साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. तसेच साहित्य अकादमी ‘पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य’ हे हिंदी भाषा भाषेतील द्विमासिक नियतकालिक ही प्रकाशित करते.
- साहित्य अकादमीद्वारे दरवर्षी देशातल्या विविध २४ प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी पुरस्कार दिले जातात. १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- पुढील २४ भाषांमधील योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात येतो: आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
अर्जेंटीनामध्ये रशिया-भारत-चीन शिखर परिषदेचे आयोजन
- अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथे १२ वर्षांनतर आरआयसी (रशिया-भारत-चीन) शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. याचे आयोजन जी-२० परिषदेनंतर करण्यात आले होते.
- या बैठकीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, चिनी अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भाग घेतला. या परिषदेत विविध क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा करण्यात आली.
- या परिषदेत आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक शांतता आणि स्थिरता वाढवण्यासाठी, ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) व एससीओ (शांघाय सहयोग संघटना) याद्वारे सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तिन्ही देशांमध्ये सहमती झाली.
- या बैठकीत दहशतवाद आणि हवामानातील बदलासारख्या जागतिक समस्यांवरही चर्चा केली गेली आणि या समस्यांवरील शांततापूर्ण समाधानासाठी तिन्ही देशांमध्ये सहमती झाली.
जी-२० परिषद
- अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान जी-२० परिषद २०१८चे आयोजन करण्यात आले. ही दक्षिण अमेरिकेतील जी-२० देशांचे पहिलेच शिखर संमेलन होते.
- ही जी-२० गटाची १३वी बैठक आहे. यावर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्ष अर्जेंटीनाचे राष्ट्रपती मौरिसियो मक्री होते.
- चिली, जमैका, नेदरलँड, पापुआ न्यू गिनी, रवांडा, सिंगापूर आणि स्पेन यांनाही या परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आले. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
- या परिषदेत भारताने फरार आर्थिक गुन्हेगारांविषयी ९ कलमी योजना सदस्य राष्ट्रांपुढे मांडली. तसेच इतर अनेक देशांबरोबर द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय बैठकीत भाग घेतला.
- ब्यूनस आयर्समध्ये आयोजित या परिषदेची थीम Building Consensus For Fair And Sustainable Development ही होती.
- या परिषदेचे मुख्य लक्ष्य ‘फ्यूचर ऑफ वर्क (The future of work), विकासासाठी पायाभूत सुविधा आणि शाश्वत अन्न सुरक्षा’ हे होते.
यूएस-मेक्सिको-कॅनडा दरम्यान मुक्त व्यापार करार
- अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोशी व्यापार करार केला आहे. हा करार २४ वर्षे जुन्या उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार कराराला (NAFTA) पुनर्स्थापित करेल.
- अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथे जी-२० शिखर सम्मेलन २०१८ दरम्यान हा नवीन करार करण्यात आला.
- या नवीन यूएस-मेक्सिको-कॅनडा करारामध्ये (USMCA) ३४ खंड आहेत. या करारामुळे या तीन देशांदरम्यान १ ट्रिलियन डॉलर्सचा व्यापार निश्चित केला जाईल.
- या करारामध्ये वाहन उत्पादक, श्रम, पर्यावरणीय मानक, बौद्धिक संपदा संरक्षण आणि डिजिटल व्यापार इत्यादींशी संबंधित तरतुदींमध्ये काही बदलही करण्यात आले आहेत.
- या कराराच्या अंमलबजावणीसाठी तिन्ही देशांना आपआपल्या देशात यासंबंधी कायदे मंजूर करावे लागतील.
उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार
- NAFTA: North American Free Trade Agreement
- नाफ्ता करारावर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोने स्वाक्षरी केली होती. हा करार १ जानेवारी १९९४ रोजी लागू करण्यात आला.
- या कराराने १९८८च्या कॅनडा-अमेरिका मुक्त व्यापार कराराची जागा घेतली. या कराराचा उद्देश ३ उत्तर अमेरिकी देशांमध्ये मुक्त व्यापार वाढविणे आहे.
जागतिक बँकेची हवामान बदलासाठी २०० अब्ज डॉलर्सची योजना
- जागतिक बँकेने २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी २०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक योजना जाहीर केली.
- जागतिक बँकेने संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजच्या (यूएनएफसीसीसी) पोलंडमधील शिखर परिषदेत (सीओपी २४) याबाबत घोषणा केली.
- या २०० अब्ज डॉलर्सपैकी १०० अब्ज जागतिक बँकेकडून थेट उपलब्ध करुन देण्यात येतील.
- उर्वरित रक्कमेपैकी एक तृतीयांश रक्कम जागतिक बँक ग्रुपच्या दोन एजन्सींकडून गोळा केली जाईल, तर उर्वरित रक्कम जागतिक बँकेच्या खाजगी भांडवलातून मिळविली जाईल.
- विकसनशील देशांच्या सर्वात प्रभावित क्षेत्रात मदत पोहोचत राहावी यासाठी जागतिक बँक एक आराखडा तयार करू इच्छिते. जागतिक बँक स्मार्ट शेती आणि पाण्याची उपलब्धता यामध्ये गुंतवणूक करणार आहे.
- या योजनेमुळे जागतिक बँकेची पर्यावरणाशी असलेली वचनबद्धता स्पष्ट होते. जागतिक समुदायासाठी हवामान बदलाची गंभीरता दर्शविणारे हे एक महत्त्वाचे चिन्ह आहे.
जागतिक बँक
- स्थापना: जुलै १९४५
- मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी
- अध्यक्ष: जिम याँग किम
- जागतिक बँक ही आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. ती विकसनशील व अविकसित देशांना विकासासाठी कर्जपुरवठा करते. या बँकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
- विकसनशील व अविकसित देशातील सरकारांचे सबलीकरण, अर्थव्यवस्थांचा विकास, गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विशेष प्रयत्नशील आहे.
- जागतिक बँकेचे दोन प्रमुख भाग आहेत: आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय विकास संघ.
स्पेस एक्सने एकाचवेळी प्रक्षेपित केले ६४ उपग्रह
- अमेरिकेची खाजगी अंतराळ संस्था स्पेस एक्सने ६४ उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित केले. स्पेस एक्सच्या फाल्कन-९ रॉकेटच्या सहाय्याने या उपग्रहांना अवकाशात सोडण्यात आले.
- हे उपग्रह सरकारी एजन्सी, खाजगी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांचे होते. यामध्ये १७ देशांच्या ३४ विविध संस्थांचे १२ मायक्रो उपग्रह आणि ४९ क्यूबसॅट्स होते.
- एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) नावावर आहे. फेब्रुवारी २०१८मध्ये एकाचवेळी ७ देशांचे १०४ उपग्रह अवकाशात सोडत इस्रोने इतिहास रचला होता.
स्पेस एक्स
- स्पेस एक्स अमेरिकेतील एक खाजगी अंतराळ संस्था आहे. ६ मे २००२ रोजी इलॉन मस्क यांनी स्पेस एक्सची स्थापना केली. इलॉन मस्क स्पेस एक्सचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
- या अंतराळ संस्थेची स्थापना करण्याचा मुख्य हेतू म्हणजे अंतराळ प्रक्षेपणाचा खर्च कमी करणे आणि मंगळ ग्रहावर मानवी वस्ती स्थापन करणे हा होता.
- उपग्रहांच्या अवकाश प्रक्षेपणासाठी स्पेस एक्सने फाल्कन रॉकेट्सची मालिका तयार केली आहे.
- प्रक्षेपण खर्च खर्च कमी करण्यासाठी स्पेस एक्सने पुन्हा वापरण्यायोग्य रॉकेट (री-यूजेबल रॉकेट्स) तयार केले आहेत.
७ डिसेंबर: सशस्त्र सेना ध्वज दिन
- विद्यापीठ अनुदान आयोगाने ७ डिसेंबर हा दिवस सर्व विद्यापीठांना सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.
- सशस्त्र दल ध्वज दिन साजरा करण्याचा उद्देश, देशासाठी सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करणे आहे.s
- विद्यापीठ अनुदान आयोगाने याप्रसंगी विद्यापीठांना कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता पसरविण्यासाठी चर्चांचे आयोजन करण्याचेही निर्देश दिले आहेत.
- १९४९पासून दरवर्षी ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो. याद्वारे लष्कर, हवाईदल आणि नौदलातील देशाच्या सैनिकांच्या प्रति आदर व्यक्त केला जातो.
विद्यापीठ अनुदान आयोग
- विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे.
- या आयोगाची स्थापना २८ डिसेंबर १९५३ रोजी करण्यात आली. १९४४मध्ये सार्जंट समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेची शिफारस केली होती.
- १९५६च्या कायद्यानुसार यूजीसीला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्या अखत्यारीत हा आयोग येतो.
- यूजीसीच्या कार्यकारी मंडळात एकूण १२ सदस्य असतात. यात १ अध्यक्ष, १ उपाध्यक्ष, १ सचिव (शिक्षण विभाग, मानव संसाधन मंत्रालय) असतात.
- प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यूजीसीने पुणे, भोपाळ, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, गुवाहाटी या ६ प्रादेशिक केंद्रांची स्थापना केली आहे.
- उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य हा आयोग करत असतो. शैक्षणिक क्षेत्रातील खालील गोष्टींमध्ये गुणवत्ता राखणे हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्दिष्ट आहे.
- उच्च शिक्षणाचा दर्जा
- अभ्यासक्रम
- संशोधन
- प्राध्यापकांची पात्रता
- विद्यार्थ्यांचा विकास
- शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन
५ डिसेंबर: जागतिक मृदा दिवस
- दरवर्षी ५ डिसेंबर हा दिवस अन्न व कृषी संघटनेद्वारे जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला जातो.
- यावर्षी जागतिक मृदा दिनाची थीम ‘Be the Solution to Soil Pollution’ अशी आहे.
- याचा उद्देश मृदा प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना मृदा प्रदूषण रोखण्याचे (#StopSoilPollution) आव्हान करणे आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या मते, जगातील एक तृतीयांश मृदेचे क्षरण झाले आहे. मृदा प्रदूषण मातीची गुणवत्ता प्रभावित करणारा मोठा घटक आहे.
- मृदा प्रदूषणाचा अन्न, पाणी आणि हवेवरही वाईट परिणाम होतो, ज्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होतो.
- मृदा प्रदूषणाचे मुख्य कारण औद्योगिक प्रदूषण आणि अकार्यक्षम मृदा व्यवस्थापन आहे.
संयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था
- एफएओ: फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स
- स्थापना: १६ ऑक्टोबर १९४५
- मुख्यालय: रोम (इटली)
- संयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे.
- भूकनिवारणासाठी जगभर प्रयत्न करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. सध्या जगातील १९४ देश या संस्थेचे सदस्य आहेत.
गौतम गंभीरची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
- भारतीय संघाचा सलामीचा आक्रमक फलंदाज गौतम गंभीर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून ४ डिसेंबर रोजी निवृत्ती जाहीर केली.
- रणजी ट्रॉफी स्पर्धेतील आंध्रप्रदेश विरुद्धचा सामना हा त्याचा क्रिकेट विश्वातील शेवटचा सामना असेल.
- त्याने ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४१५४ धावा, १४७ एकदिवसीय सामन्यांत ५२३८ धावा आणि ३७ टी-२० सामन्यांमध्ये एकूण ९३२ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने एकूण १५,०४१ धावा केल्या आहेत.
- गंभीरने २००३मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
- आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना गौतम गंभीरने या संघाला २०१२ आणि २०१४मध्ये असे दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे.
- २०११मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध गंभीरने १२२ चेंडूंमध्ये ९७ धावा करत टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. १९८३नंतर दुसऱ्यांदा भारताने हा वर्ल्डकप जिंकला होता.
- २००७मध्ये भारत पहिल्यांदा वर्ल्ड टी-२० विश्वविजेता बनला. या सामन्यातही गंभीरने ५४ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७५ धावा केल्या होत्या.
- गंभीरने २०१६मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना खेळला होता.
- भारतीय क्रिकेटमधील अतुलनीय योगदानाबद्दल गौतम गंभीरला २००८मध्ये प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा