भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी जयंती विशेष
- माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ (२५ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०० रुपयांचे नाणे जारी केले.
- या १०० रुपयांच्या नाण्याच्या पुढील भागात अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिले आहे.
- नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि रोमन अक्षरांत INDIA असे लिहिले आहे. प्रतिक चिन्हाच्याखाली १०० असे नाण्याचे मुल्य लिहिले आहे.
- नाण्याच्या दुसऱ्या बाजूला माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आणि देवनागरी व रोमन लिपीमध्ये त्यांचे नाव लिहिलेले आहे. तसेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूचे वर्ष १९२४-२०१८ लिहिले आहे.
- वाजपेयींचा जन्मदिन २५ डिसेंबर हा दिवस देशभरात केंद्र सरकारकडून ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
सदैव अटल स्मारक
- २५ डिसेंबर रोजी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाचे उद्घाटन करणायत आले. या स्मारकाचे नाव ‘सदैव अटल’ ठेवण्यात आले आहे.
- या स्मारकाचे व्यवस्थापन लोकसभेचे सभापती यांच्या अध्यक्षतेखालील ट्रस्टद्वारे केले जाईल. हे स्मारक सुमारे १.५ एकर क्षेत्रात पसरलेले आहे.
- या स्मारकासाठी स्मृती ट्रस्ट सोसायटीकडून निधी देण्यात आला आहे. तर याचे बांधकाम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. यासाठी सुमारे १०.५१ कोटी रुपये खर्च आला आहे.
अटल बिहारी वाजपेयी
- अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे वडील कृष्णबिहारी वाजपेयी हे उत्तम कवी आणि शिक्षक होते.
- ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून (सध्याचे लक्ष्मीबाई महाविद्यालय) अटल बिहारी यांनी पदवी संपादित केली.
- त्यांना हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयांत प्रावीण्य मिळाले होते. त्यानंतर त्यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवी मिळवली.
- १९३९ साली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. त्यांच्यावर बाबासाहेब आपटे यांच्या शिकवणीचा विशेष प्रभाव होता.
- १९४२मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनात २३ दिवस कारावास भोगला होता. १९४७साली वाजपेयी संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम करू लागले.
- श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रभावामुळे ते जनसंघाचे काम करू लागले. १९५७साली बलरामपूर मतदारसंघातून ते लोकसभेत निवडून गेले. दीनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर ते जनसंघाचे प्रमुख म्हणून काम पाहावे लागले.
- १९७७साली जनसंघ जनता पार्टीत विलीन झाल्यावर मोरारजी देसाई यांचे सरकार केंद्रात सत्तेत आले होते. या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते.
- १९८०साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. या पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले.
- १९९६साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने टिकले.
- १९९९साली त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी या २२ पक्षांच्या सरकारचे नेतृत्व स्वीकारले. या सरकारने आपला ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला.
- वाजपेयी हे संसदेचे ४० वर्षे सदस्य राहिले. लोकसभेत ते १० वेळा, तर राज्यसभेत २ वेळा खासदार होते.
- भाजपाचे पहिले पंतप्रधान असलेल्या वाजपेयी तीनवेळा देशाचे पंतप्रधान झाले. मात्र यापैकी केवळ एकदा त्यांना ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला.
- वाजपेयी देशाचे असे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत, ज्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. याआधी कोणत्याही नेत्याला अशी कामगिरी करता आलेली नव्हती.
- २०१५मध्ये वाजपेयींना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न (२०१४ या वर्षासाठी) प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत पंडित मदनमोहन मालवीय यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.
- २७ मार्च २०१५ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
- त्यापूर्वी १९९२साली भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. १९९३साली त्यांना कानपुर विश्वविद्यालयाची डि.लीट पदवीही प्रदान करण्यात आली होती.
- १९९४साली उत्कृष्ट संसदपटू (भारतरत्न पंडित गोविंद वल्लभपंत पुरस्कार) व लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
२५ डिसेंबर: सुशासन दिन
- माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिन देशात २०१४पासून ‘सुशासन दिन’ (गुड गव्हर्नंस डे) म्हणून साजरा केला जातो.
- श्री अटलबिहारी वाजपेयी यांना भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जाते.
आसाममधील बोगीबिल पुलाचे लोकार्पण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी भारतरत्न दिवंगत श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आसाममध्ये बोगीबिल पुलाचे लोकार्पण केले.
- रेल्वे आणि रस्ता अशी दुहेरी वाहतुकीची व्यवस्था असणारा ४.९४ किमी लांबीचा हा पूल देशातील सर्वात लांब तर आशियाती दुसरा सर्वधिक लांब पूल आहे.
- २२ जानेवारी १९९७ रोजी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते या पूलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता.
- दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २१ एप्रिल २००२ रोजी या पूलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यांनतर आता सुमारे १६ वर्षांनी या पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
- हा देशातील एकमात्र संपूर्ण वेल्डेड पूल आहे. याच्या बांधकामासाठी पहिल्यांदाच युरोपियन कोड आणि वेल्डिंग मानकांचे पालन केले गेले आहे. त्यामुळे या पुलाचे आयुर्मान १२० वर्षे आहे.
- ४.९४ किमी लांबीच्या या पूलासाठी ५,९२० कोटी रुपये खर्च आला आहे. आधी ४.३१ किलोमीटरच्या या पूलासाठी ३,२०० कोटी रुपयांचे बजेट होते.
- या दुमजली पुलाच्या या पुलाच्या खालच्या बाजूला २ समांतर रेल्वे मार्ग आहेत. वरच्या बाजूला ३ पदरी रस्ता मार्ग आहे. रस्त्यावरची तसेच रेल्वेच्या माध्यमातून सातत्याने चालणारी वाहतूक पेलण्यास हा पूल सक्षम आहे.
- हा पूल आसामच्या दिब्रूगड जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीचा दक्षिण तट व अरुणाचल प्रदेशाच्या सीमावर्ती धेमाजी जिल्ह्यातील सीलापाथरला जोडणार आहे.
- या पूलामुळे आसाम ते अरुणाचल प्रदेशामधील प्रवासाचा वेळ ४ तासांनी कमी होणार आहे तर अंतर १७० किमीने कमी होईल. याशिवाय या पुलामुळे दिल्ली ते दिब्रूगडमधील रेल्वे प्रवासाचा वेळही ३ तासाने कमी होणार आहे.
- या पुलामुळे आसाममधील तिनसुकिया आणि अरुणाचल प्रदेशमधील नाहरलागून या शहरामधलं अंतर १० तासांनी कमी होणार आहे.
- चीनच्या सीमेजवळ असलेला हा पूल भारतीय लष्करासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आहे.
- रणगाडे सुद्धा सहज जाऊ शकतील इतकी या पूलाची बांधणी भक्कम आहे. तसेच या पूलाच्या तिन्ही मार्गावर एअर फोर्सची लढाऊ विमाने सुद्धा उतरु शकतात.
- ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या प्रदेशात प्रचंड पाऊस पडतो तसंच हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. हा पूल ७.० रिश्टर स्केलच्या भूकंपाचा सामना करू शकतो.
- या पुलाला ‘आसामची जीवनरेखा’ संबोधले जात आहे. आसामसह पूर्वांचलातील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने हा पूल महत्वाचा मानला जात आहे.
तामिळनाडूमध्ये स्थापन होणार देशातील पहिले संगीत संग्रहालय
- तामिळनाडूने केंद्र सरकारच्या मदतीने थिरूवैयारू येथे देशातील पहिले संगीत संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- कर्नाटक संगीतांच्या त्रिमुर्तींपैकी एक असलेले संत त्यागराज यांचे थिरूवैयारू हे जन्मस्थान आहे. कर्नाटक संगीतांचे त्रिमुर्तींचे अन्य दोन सदस्य मुतुस्वामी दिक्षितर आणि श्याम शास्त्री आहेत.
- संत त्यागराज कर्नाटक संगीतचे प्रसिद्ध रचनाकार होते. त्यांनी भगवान श्रीरामांची स्तुती करणारी हजारो भजने तेलगू भाषेत रचली.
- त्यांनी तुलज दुसरा (१७६३-१७८७), अमरसिंग (१७८७-१७९८), सेर्फोजी दुसरा (१७९८-१८३२) आणि शिवाजी दुसरा (१८३२-१८५५) या मराठ्यांच्या ४ राजांची राजवट पाहिली. परंतु त्यांनी यापैकी कोणात्याही राजासाठी कार्य केले नाही.
संत मुतुस्वामी दिक्षितर
- हे दक्षिण भारतीय कवी आणि रचनाकार होते. त्यांच्या रचनांमध्ये हिंदी देवदेवता आणि मंदिरांचे तपशीलवार वर्णन आहे.
- त्यांच्या बहुतेक रचना संस्कृतमध्ये आहेत. तर काही रचना मणिप्रवालममध्येही (संस्कृत आणि तमिळचे मिश्रण) आहेत.
संत श्याम शास्त्री
- संत श्याम शास्त्री हे संगीतकार व रचनाकार होते. कर्नाटक संगीतच्या त्रिमूर्तीतील ते प्रथम व्यक्ती होते.
- त्यांना त्यांच्या रचनांच्या उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते. त्यांनी तेलगू आणि तमिळ भाषेत रचना केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक रचनांमध्ये देवी कामाक्षीचे प्रबोधन आहे.
आयएनएचएस संधानी भारतीय नौदलात सामील
- नौदल इस्पितळ जहाज ‘आयएनएचएस संधानी’ला भारतीय नौदलाने महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील करंज नौदल स्टेशन येथे आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले.
- वेस्टर्न कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वाइस एडमिरल गिरीश लुथ्रा यांनी आयएनएचएस संधानीला हिरवा कंदील दिला.
- या इस्पितळाची स्थापना १९५५मध्ये एक लहान प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून करण्यात आली होती.
- गेल्या काही दशकात करंज नौदल स्टेशनचा झालेल्या विस्तार बघता, येथे अशा आरोग्य केंद्राची गरज भासत होती. म्हणूनच संरक्षण मंत्रालयाने सप्टेंबर २०१६मध्ये याला मंजुरी दिली.
- हे इस्पितळाची क्षमता १६ खाटांवरून वाढवून ३० खाटा करण्यात आली आहे. येथे नौदल कर्मचाऱ्यांसाठी औषधे, सर्जरी, गायनॉकॉलॉजी, ऍनेस्थेशिया, पेडियाट्रिक्स तसेच दंतचिकित्सेची सुविधा उपलब्ध असेल.
- आयएनएचएस संधानी हे अशा प्रकारचे १०वे हॉस्पिटल आहे. भारतीय नौदलाचे नवव्या इस्पितळाचे नाव आयएनएचएस नवजीवनी होते. ते केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीमध्ये कार्यरत आहे.
संगीता वर्मा: भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या सदस्य
- माजी भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) अधिकारी संगीता वर्मा यांची भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या नवीन सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- त्या पुढील ५ वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत या आयोगाच्या सदस्य म्हणून कार्यरत राहतील.
- याबारोबच भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाची सर्व रिक्त पदे भरली आहेत. एप्रिलमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या सदस्यांची संख्या ६ वरून कमी करून ३ केली होती.
- सध्या अशोक कुमार या आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर संगीता वर्मा, ऑगस्टीन पीटर आणि यु. सी. नाहता हे या आयोगाचे सदस्य आहेत.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोग
- CCI: Competition Commission of India
- मुख्य उद्दिष्ट: प्रतिबद्धता आणि अंमलबजावणीद्वारे स्पर्धा संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि ती टिकवून ठेवणे, जी व्यवसायांना निष्पक्ष, स्पर्धात्मक आणि नाविन्यपूर्ण बनविण्यास प्रोत्साहित करणे; ग्राहक कल्याण व आर्थिक विकासाला चालना देणे.
- भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाची ही एक अर्ध-न्यायिक घटनात्मक संस्था आहे. याची स्थापना भारतीय प्रतिस्पर्धा कायदा २००२ अन्वये करण्यात आली होती.
- ऑक्टोबर २००३मध्ये हा आयोग स्थापन झाला, तर मे २००९मध्ये या आयोगाने पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सुरवात केली.
- हा आयोग देशात निष्पक्ष स्पर्धा निर्माण करणे व टिकवून ठेवणे आणि ग्राहक कल्याणसाठी जबाबदार आहे.
- भारतीय प्रतिस्पर्धा कायदा २००२नुसार या आयोगात १ अध्यक्ष आणि किमान २ व कमाल ६ सदस्य असतात. सध्या या आयोगात १ अध्यक्ष व ३ सदस्य आहेत.
- कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाच्या अंतर्गत हा आयोग कार्य करतो. हा आयोग सुरूवातीपासून एक कॉलेजिअमच्या स्वरूपात कार्य करीत आहे.
- स्पर्धेवर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांना प्रतिबंध करणे, ग्राहकांच्या हिताची रक्षा करणे आणि मुक्त व्यापार सुनिश्चित करणे, ही सीसीआयची उद्दिष्टे आहेत.
- या आयोग एखाद्या घटनात्मक संस्थेला स्पर्धात्मकतेविषयी सल्ला देण्याचे तसेच स्पर्धात्मकतेबाबत जागरुकता पसरवण्याचेही कार्य करतो.
पी. व्ही. भारती: कॉर्पोरेशन बँकेच्या नव्या एमडी व सीईओ
- २४ डिसेंबर रोजी कार्मिक मंत्रालयाने पी. व्ही. भारती यांची कॉर्पोरेशन बँकेच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली.
- त्या १ फेब्रुवारी २०१९पासून या पदांवर कार्यरत होतील आणि ३१ मार्च २०२०पर्यंत या पदावर कायम राहतील. सध्या त्या कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालक आहेत.
- याशिवाय कार्मिक मंत्रालयाने कॉर्पोरेशन बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे कार्यकारी संचालक म्हणून अनुक्रमे बिरुपक्ष मिश्रा आणि बालकृष्ण आल्से यांची नियुक्ती केली आहे.
- सध्या बिरुपक मिश्रा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तर बालकृष्ण अल्से कॉर्पोरेशन बँकेच्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.
- याशिवाय के. रामचंद्रन यांची अलाहाबाद बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या कॉर्पोरेशन बँकेच्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.
निधन: माकपचे ज्येष्ठ नेते निरुपम सेन
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री निरुपम सेन यांचे २४ डिसेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
- सेन पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे माजी सदस्य होते. तसेच पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या मंत्रिमंडळात ते वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री होते.
- भट्टाचार्य आणि सेन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकीकरण मोहीम आणि खाजगी गुंतवणूकीची प्रक्रिया सुरू केली.
- भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सेन यांनी औद्योगिक पुनर्निर्माण, योजना आणि ऊर्जा मंत्रालयाचा कारभार पाहिला.
- ते १९८७, २००१ आणि २००६ असे ३ वेळा बंगाल विधानसभेसाठी दक्षिण बर्दवान येथून निवडून आले होते. पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या सरकारमध्ये त्यांची मोठी भूमिका होती.
- सेन यांना बंगालच्या औद्योगिक सुधारणांचे जनक मानले जाते. त्यांनी सिंगूर आणि नंदीग्राममध्ये अनेत औद्योगिक युनिटची स्थापना केली होती.
- २००६मध्ये सिंगूर येथील टाटा नॅनो कारच्या प्रकल्पासाठीच्या भूमीअधिग्रहण अभियानावरून डाव्यांच्या सरकारला मोठे नुकसान झाले.
- यामुळेच २०११मध्ये ३४ वर्षांचे डाव्यांचे सरकार उलथून टाकण्यास तृणमूल काँग्रेस पक्ष यशस्वी ठरला.
निधन: आसामच्या गानकोकिळा दीपाली बोरठाकूर
- सुप्रसिध्द गायिका आणि ‘आसामच्या गानकोकिळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपाली बोरठाकूर यांचे २१ डिसेंबर रोजी निधन झाले.
- दीपाली बोरठाकूर यांचा जन्म ३० जानेवारी १९४१ रोजी आसाममधील शिवसागर जिल्ह्यत झाला.
- त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात १९५८मध्ये ऑल इंडिया रेडीओ, गुवाहाटी येथे ‘मोर बोपाई लाहोरी’ या गाण्याने केली होती.
- त्यांच्या जोबोन अमोनी कोरे (यूथ बॉदर्स मी) व सुनोर खारे नेलगे मुक ( आय डोन्ट वॉन्ट गोल्डन बँगल्स) या गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले.
- भारत सरकारने १९९८मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले. आसाम सरकारने त्यांना २०१०मध्ये सिलीपी बोटा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
- १९८४मध्ये गुवाहाटी येथे हजारिका यांनी लता मंगेशकर रजनीचे आयोजन केले होते. त्यात त्यांचा सत्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केला होता.
मातृत्व वंदन योजनेतील राज्यांच्या कामगिरीचा आढावा
- केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या मते मातृत्व वंदन योजनेमध्ये आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांची कामगिरी सर्वोत्तम आहे.
- प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजणा म्हणून ओळखली जात होती. ही एक मातृत्व लाभ योजना आहे.
- ही योजना २०१६मध्ये भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आली. ही योजना केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाद्वारे कार्यान्वित केली जाते.
- या योजनेअंतर्गत १९ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या गरोदर स्त्रीला आर्थिक सहाय्य, सुरक्षित प्रसूती, पोषण इत्यादी सुविधा प्रदान केल्या जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा