गुरूग्राममध्ये माहिती एकत्रीकरण केंद्राचे उद्घाटन
- भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी २२ डिसेंबर रोजी हिंदी महासागर क्षेत्रासाठी माहिती एकत्रीकरण केंद्राचे (IFC-IOR: Information Fusion Centre – Indian Ocean Region) उद्घाटन केले.
- हे केंद्र हरियाणामधील गुरूग्राम येथील माहिती व्यवस्थापन आणि विश्लेषण केंद्रामध्ये (IMAC) स्थापन करण्यात आले आहे.
- हिंदी महासागराच्या क्षेत्राचे निरीक्षण करणे हा या केंद्राचा प्राथमिक उद्देश आहे.
- हिंदी महासागर क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती, चोरी, दहशतवाद आणि तस्करी, इ घटना अधिक प्रमाणत होतात. या आव्हानांना तोंड देण्यासाठी माहिती एकत्रीकरण केंद्राची भूमिका महत्वाची असेल.
- हे केंद्र हिंदी महासागर क्षेत्रातील देशांसह व्यापारी शिपिंगवर माहिती गोळा करेल. यामुळे समुद्री सुरक्षा बळकट होईल.
- हे हिंदी महासागर क्षेत्रामध्ये सागरी माहितीचे केंद्र बनेल आणि माहितीच्या आदान-प्रदानामुळे सर्व हिंदी महासागर क्षेत्रातील देशांना याचा लाभ होईल.
- हे केंद्र फक्त त्याच देशांसाठी माहिती गोळा करेल, ज्यांनी भारतासोबत व्हाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंज करारावर स्वाक्षरी केली आहे.
- गुरूग्राम येथील माहिती व्यवस्थापन व विश्लेषण केंद्राच्या (IMAC) स्थापनेला मार्च २०१२मध्ये मंजूरी देण्यात आली होती व नोव्हेंबर २०१४मध्ये हे केंद्र कार्यान्वित झाले.
- देशासाठी IMACमधील IFC-IOR केंद्र भारताच्या सागर किनाऱ्यावरील रडार नेटवर्ककडून आवश्यक माहिती प्राप्त करते.
- आंतरराष्ट्रीय माहितीसाठी भारताने ३६ देश आणि तीन बहुराष्ट्रीय एजन्सीसह व्हाइट शिपिंग करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यांच्याकडून भारताला त्यांच्या क्षेत्रातून जाणाऱ्या वाणिज्यिक जहाजांची व बंदरांची माहिती प्राप्त होते.
- याशिवाय IMAC आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेअंतर्गत दीर्घ पल्ल्याच्या ट्रॅकिंग आणि आयडेण्टीफिकेशन यंत्रणेद्वारेही माहिती गोळा करते.
- ही वेगवेगळ्या स्रोतांद्वारे प्राप्त झालेली माहिती सॉफ्टवेअरच्या मदतीने एकत्रित केली जाते.
- यासाठी सध्या वापरात असलेले IMACचे सॉफ्टवेअर परदेशातून खरेदी करण्यात आले आहे. परंतु लवकरच या सॉफ्टवेअरची जागा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)द्वारे विकसित स्वदेशी ‘संग्रह’ सॉफ्टवेअर घेणार आहे.
- जगातील एकूण सागरी व्यापारापैकी ७५ टक्के व्यापार हिंद महासागरात क्षेत्रातून होतो. जागतिक वापराच्या ५० टक्के खनिज तेलाचे वहनही याच प्रदेशातून होते.
- त्यामुळे या क्षेत्राची सुरक्षा फार महत्वाची आहे आणि त्यासाठी विविध देशांमध्ये समन्वय अतिशय महत्वाचा आहे.
ओडिशामध्ये आयआयटी भुवनेश्वरचे उद्घाटन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ डिसेंबर रोजी ओडिशामध्ये आयआयटी भुवनेश्वरसह १५ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यावेळी उपस्थित होते.
- हे विकास प्रकल्प ‘मिशन पुर्वोदय: नवभारताच्या उभारणीसाठी समृध्द पूर्व’ (Mission Purbodaya: a prosperous East for building a new India) या अभियानाचा भाग आहेत.
- हे प्रकल्प आरोग्य, रस्ते आणि महामार्ग, उच्च शिक्षण आणि संस्कृतीशी संबंधित आहेत.
मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प
- अरगुल येथे आयआयटी भुवनेश्वरच्या नवा कॅम्पस. (खर्च: १६६० कोटी रुपये)
- भुवनेश्वर येथे ESIC (कर्मचारी राज्य विमा निगम) हॉस्पिटल. (खर्च: ७३.५ कोटी रुपये)
- बुद्ध आणि बौद्ध देवतांच्या विशाल मूर्ती असलेले ललितगिरी पुरातत्त्व संग्रहालय.
- पाईक विद्रोहाच्या २००व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ एक नाणे आणि एक पोस्ट स्टॅम्प यांचे अनावरण.
- उर्जा गंगा योजनेंतर्गत २ पाईपलाईन. १. इंडिअन ऑईलची तेलाची पारादीप ते हैदराबाद पाईपलाईन (खर्च: ३८०० कोटी रुपये) आणि २. GAILची अंगुल ते बोकारो गॅस पाईपलाईन (खर्च: ३४३७ कोटी रुपये).
आयआयटी भुवनेश्वर
- २३ जुलै २००८ रोजी आयआयटी भुवनेश्वरने आयआयटी खरगपूरच्या कॅम्पसमध्ये कार्य सुरु केले. नंतर जुलै २००९मध्ये त्याला भुवनेश्वर येथे हलविण्यात आले.
- २४ डिसेंबर रोजी आयआयटी भुवनेश्वरच्या स्थायी कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
- ओडिशा सरकारने आयआयटी भुवनेश्वरसाठी ९३६ एकर जमीन दिली आहे. १० हजार विद्यार्थी आणि ११०० शिक्षकांची या कॅम्पसची क्षमता आहे.
- १४ ऑगस्ट २०११ रोजी या कॅम्पसचे बांधकाम कार्य सुरू झाले. ही अशी पहिली आयआयटी संस्था आहे जिथे समुद्री शिक्षणासाठी मरीन कॅम्पस तयार करण्यात आला आहे.
उर्जा गंगा योजना
- देशाच्या पूर्वेकडील क्षेत्रातील नागरिकांना स्वयंकासाठी पीएनजी गॅस आणि वाहनांसाठी सीएनजी गॅस उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- २०१८पर्यंत जगदीशपूर (उत्तर प्रदेश) आणि हल्दीया (पश्चिम बंगाल) यांना २०५० किमी लांब गॅस पाईपलाईनने जोडण्याची सरकारची योजना आहे.
- याद्वारे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांना जोडले जाईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी GAIL करत आहे.
आयुष्मान भारत
- आयुष्मान भारत - राष्ट्रीय आरोग्य विमा योजना ओडीशामध्ये सुमारे १० कोटी गरीब आणि असुरक्षित कमकुवत कुटुंबांना (सुमारे ५० कोटी लाभार्थी) वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा देईल.
- आयुष्मान भारत - राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेमध्ये सध्या सुरु असलेल्या केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (RSBY) आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना (SCHIS) अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय एकीकरणासाठी सरदार पटेल पुरस्कार
- गुजरातमध्ये आयोजित डीजीपी/आयजीपीच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकीकरणासाठी सरदार पटेल पुरस्कार स्थापन करण्याची घोषणा केली.
- राष्ट्रीय एकीकरणासाठी योगदान देणाऱ्यांना सरदार पटेल पुरस्कार प्रदान केला जाईल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या देशाचे एकीकरण करण्यासाठी समर्पित केले.
- देशाच्या नागरिकांच्या वतीने सरदार पटेल यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावे हे पुरस्कार सुरु करण्यात येत आहेत.
- हा पुरस्कार अधिकाधिक लोकांना भारताच्या एकतेसाठी व राष्ट्रीय एकत्मतेसाठी कार्य करण्यास प्रेरित करेल.
सरदार वल्लभभाई पटेल
- सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी तर मृत्यू १५ डिसेंबर १९५० रोजी झाला. ते भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांना भारताचे बिस्मार्क म्हणूनही ओळखले जाते.
- त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले.
- वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे ते पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले.
- या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.
- फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. भारतातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय.
- मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.
- तसेच, ते आधुनिक अखिल भारतीय सेवा स्थापन करण्यासाठी भारताच्या नागरी सेवांचे प्रेरणा दूत (Patron Saint) म्हणून देखील ओळखले जातात.
- त्यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणून गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे.
- १९९१साली त्यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- २०१४पासून सरदार पटेल यांचा जन्मदिन देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.
क्रेडिट रजिस्ट्रीच्या निर्मितीसाठी ६ आयटी कंपन्यांची निवड
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीच्या निर्मितीसाठी ६ आघाडीच्या आयटी कंपन्यांची निवड केली आहे. आता आरबीआय या ६ कंपन्यांकडून प्रस्ताव मागवेल.
- निवड झालेल्या ६ कंपन्या: टीसीएस, विप्रो, कॅपजेमिनी टेक्नोलॉजी सर्व्हिसेस इंडिया, आयबीएम इंडिया, डन अँड ब्रॅडस्ट्रीट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इंडिया आणि माइंडट्री लिमिटेड.
पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर)
- पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर) कर्जदारांची व सहेतुक कर्जबुडव्यांची (विलफुल डिफॉल्टर्स) प्रमाणित डिजिटल रजिस्ट्री (नोंदवही) असेल.
- यामुळे कर्जदारांविषयी माहिती यंत्रणा मजबूत होईल. हे एक आर्थिक माहिती इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कार्य करेल.
- यामध्ये सेबी, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय, जीएसटी नेटवर्क व इंडियन इंसॉल्वंसी अँड बैंकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया इत्यादी संस्थांकडील माहितीचा समावेश असेल.
- पीसीआरमध्ये सहेतुक कर्जबुडवे आणि प्रलंबित न्यायालयीन खटल्यांबद्दलही माहिती उपलब्ध असेल.
- याद्वारे बँक आणि वित्तीय संस्था जुन्या अथवा नव्या कर्जदारांबद्दल संपूर्ण माहिती त्वरित मिळवू शकतात.
- पीसीआरद्वारे कर्जदार स्वतःच्या कर्जांबद्दलची माहितीही मिळवू शकतात आणि आवश्यक असल्यास त्यात सुधारणा सुचवू शकतात.
- पीसीआरच्या स्थापनेपासून माहितीचा अभाव दूर होईल, कर्जाच्या उपलब्धतेला चालना मिळेल आणि आणि कर्जसंस्कृती बळकट केली जाईल.
- वाय. एम. देवस्थली समितीच्या शिफारशीनुसार जून २०१८मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ पीसीआरच्या स्थापनेची घोषणा केली होती.
- भारतात सध्या बऱ्याच क्रेडिट रेपॉजिटरी आहेत, परंतु त्यांचा उद्देश आणि आवाखा भिन्नभिन्न आहे.
भारतातील कर्ज व्यवस्थापन
- रिझर्व्ह बॅंकेमध्ये CRILC (Central Repository of Information on Large Credits) ही कर्जदारांवर देखरेख ठेवणारी माहिती प्रणाली आहे, जी ५ कोटी आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या कर्जांची नोंद ठेवते.
- भारतात सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपिरियन आणि हाय मार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या ४ खाजगी मालकीच्या पत माहिती कंपन्या (CIC: Credit Information Company) आहेत.
- आरबीआयद्वारे नियमन केल्या जाणाऱ्या सर्व संस्थांना कर्जे व कर्जदारांबद्दलची माहिती या चारही खाजगी कंपन्यांना पुरविणे बंधनकारक आहे.
२३ डिसेंबर: राष्ट्रीय शेतकरी दिन
- भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
- हा दिवस चरण सिंग यांचा जयंती दिन म्हणूनही साजरा केला जातो. २३ डिसेंबर १९०२ रोजी संयुक्त प्रांतातील नुरपूर (सध्याचे उत्तर प्रदेश) येथे चौधरी चरण सिंह यांचा जन्म झाला होता.
- चौधरी चरण सिंग हे शेतकऱ्यांचे नेते होते. भारतीय शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक धोरणे सुरु केली.
- चौधरी चरण सिंह भारताचे पाचवे पंतप्रधान होते. ते २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० दरम्यान देशाचे पंतप्रधान होते.
- गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १९३७ साली संयुक्त प्रांताच्या विधानसभेच्या सदस्य म्हणून काम केले.
- १९६७-७७ दरम्यान ते भारतीय लोक दलाचे सदस्य होते. १९७७ ते १९८० दरम्यान ते जनता पार्टीत होते. त्यानंतर १९८० ते १९८७ दरम्यान ते लोकदलाचे सदस्य होते.
- एप्रिल १९६७ ते फेब्रुवारी १९६८ दरम्यान ते उत्तर प्रदेशचे पहिले बिगर-कॉंग्रेसी मुख्यमंत्री होते. त्यानंतर मार्च १९७७ ते जुलै १९७८ दरम्यान ते केंद्रीय गृहमंत्री होते.
- जानेवारी १९७९ ते जुलै १९७९ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. २९ मे १९८७ रोजी नवी दिल्लीत त्यांचे निधन झाले. नवी दिल्लीमधील त्यांच्या समाधी स्थळाला किसान घाट असे नाव देण्यात आले आहे.
२४ डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिन
- दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
- १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क संरक्षण कायदा १९८६ला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
- ग्राहक चळवळीचे महत्व आणि ग्राहकांचे मूलभूत अधिकार व जबाबदाऱ्या यांचा प्रसार करण्याची संधी हा दिवस प्रदान करते.
- केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाद्वारे हा दिन साजरा केला जातो.
- यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ग्राहक तक्रारींचे वेळेवर निवारण’ (Timely Disposal of Consumer Complaints) या थीमसह साजरा केला जात आहे.
- ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला पुढील ६ हक्क मिळाले आहेत: सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा हक्क, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार करण्याचा व निवारण करून घेण्याचा हक्क आणि ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा हक्क.
ग्राहक संरक्षण कायदा १९८६
- भारतातील ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा खूप महत्वाचा आहे. या कायद्यामुळे खराब वस्तू व सेवा यापासून ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकते.
- ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्यात येते.
- तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग तर जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन करण्यात येतो.
- टीप : १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
गुगलने न्यूज इनिशिएटिव्हसाठी १० भारतीय वृत्तसंस्थांची निवड
- गुगलने न्यूज इनिशिएटिव्ह अंतर्गत निधी पुरविण्यासाठी जगभरातील २३ देशांमधील ८७ वृत्तसंघटनांना निवड केली आहे यामध्ये १० भारतीय वृत्तसंस्थांचाही समावेश आहे.
- व्हिडिओ पत्रकारितेमध्ये कुशलता आणण्यासाठी आणि नवीन प्रयोग करण्यासाठी या संस्थाना सहाय्य करणे, हा या निधीचा उद्देश आहे.
- निवड झालेल्या भारतीय वृत्तसंस्था: फॅक्टली, एशियानेट न्यूज मीडिया अँड एंटरटेनमेंट, NDTV, इंडिया टुडे, भारतीय डिजिटल पार्टी, न्यूज़ आणि व्हीडियो वॉलेन्टीयर्स इत्यादी.
- न्यूजरूम विडियो ऑपरेशन विस्तारासाठी आणि व्हिडीओद्वारे पत्रकारितेच्या नव्या पद्धती शोधण्यासाठी गूगल या वृत्तसंस्थांना मदत करणार आहे.
गुगल न्यूज इनिशिएटिव्ह
- गुगल विविध मुद्दे आणि बातम्यांसाठी एक अग्रगण्य प्लॅटफॉर्म आहे. लोक मोठ्या संख्येने गुगल आणि युट्यूबचा (गुगलची उपकंपनी) बातम्यांच्या प्रसारणासाठी वापर करतात.
- पण अलिकडच्या काळात फेक न्यूजमध्ये (खोट्या बातम्या) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि फेक न्यूज गुगलसाठी मोठे आव्हान ठरले आहे.
- आपली विश्वासार्हता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी गुगलला फेक न्यूजची समस्या सोडविणे अत्यावश्यक आहे.
- गुगल न्यूज इनिशिएटिव्हद्वारे गुगल वृत्तसंस्थांच्या सहाय्याने गुणवत्तापूर्ण बातम्या प्रदान करू शकेल.
- प्रमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि डिजिटल युगात पत्रकारिता टिकवून राहावी यासाठी न्यूज इनिशिएटिव्हच्या माध्यमातून गुगल न्यूज इंडस्ट्रीसह भागीदारी करीत आहे.
गुगल न्यूज इनिशिएटिव्हची उद्दिष्टे
- उच्च दर्जाच्या पत्रकारितेस प्रोत्साहन देणे आणि ते बळकट करणे.
- शाश्वत विकासास चालना देण्यासाठी व्यवसाय मॉडेल विकसित करणे.
- तांत्रिक नवकल्पनांद्वारे वृत्त संघटनांना सशक्त करणे.
सशस्त्र सीमा बलाचा ५५वा वर्धापन दिन
- २४ डिसेंबर २०१८ रोजी सशस्त्र सीमा बलाचा ५५वा वर्धापन दिन नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला.
- सशस्त्र सीमा बल (एसएसबी) भारताच्या ५ निमलश्करी दलांपैकी एक आहे. नेपाळ आणि भूतानसोबतच्या भारताच्या सीमेची सुरक्षा करणे हे एसएसबीचे कार्य आहे.
- एसएसबीची स्थापना इन्डो-चीन युद्धानंतर १९६३मध्ये स्पेशल सर्व्हिस ब्यूरोच्या रूपात झाली. जानेवारी २००१मध्ये त्याचे नामांतर सशस्त्र सीमा बल असे करण्यात आले.
- एसएसबी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ‘सेवा, सुरक्षा आणि बंधुता’ हे एसएसबीचे ब्रीदवाक्य आहे.
इंडोनेशियात आलेल्या त्सुनामीची कारणे
- इंडोनेशियात अनॅक क्रॅकोटाऊ या ज्वालामुखीच्या उद्रेकाने आलेल्या त्सुनामीमुळे ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
- ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर दक्षिण सुमात्रा आणि पश्चिम जावाजवळ समुद्राच्या उंच लाटा किनाऱ्याला पार करून पुढे सरकल्या. यात शेकडो घरे नष्ट झाली.
- या उद्रेकातून बाहेर आलेला लाखो टन कचरा समुद्रात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे विस्थापन झाले. परिणामी त्सुनामीच्या विशाल लाटा तयार झाल्या.
त्सुनामी
- त्सुनामी म्हणजे महासागरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत झाल्याने निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यामुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात.
- त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ ‘बंदरातील लाटा’ (त्सु: बंदर, नामी: लाटा) असा आहे. हा शब्द कोळ्यांमध्ये प्रचलीत होता.
- इतर नैसर्गिक आपत्तींप्रमाणे त्सुनामीचे अनुमान काढणे कठीण असले तरी, भूकंपाच्या प्रक्रियांमुळे त्सुनामीचे पूर्वानुमान काढता येऊ शकते.
- २००४मध्ये सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये ९.१ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे उद्भवलेल्या लाटांमुळे त्सुनामी निर्माण झाली होती.
- या त्सुनामीने इंडोनशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. ही नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वात नुकसानकारक व भयानक आपत्ती ठरली.
अनॅक क्रॅकोटाऊ
- इंडोनेशिया ‘रिंग ऑफ फायर’वर स्थित असल्यामुळे येथे भूकंप आणि ज्वालामुखीचा धोका सदैव असतो.
- इंडोनेशियामध्ये सुमारे १२९ सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यापैकी अनॅक क्रॅकोटाऊ एक आहे.
- १९२७मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्मिती झालेला अनॅक क्रॅकोटाऊ हे एक ज्वालामुखीय बेट आहे. यापूर्वी जून २०१०मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.
रिंग ऑफ फायर
- रिंग ऑफ फायर प्रशांत महासागरात स्थित एक क्षेत्र आहे, ते सुमारे २५,००० मैलांपर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रात जगातील ७५ टक्के ज्वालामुखी आहेत.
- या क्षेत्रात यूरेशियन, उत्तर अमेरिकन, जुआन डी फुका, नाजका, कोकोस, कॅरेबियन, अंटार्कटिक, भारतीय, ऑस्ट्रेलियन इत्यादी अनेक टेक्टॉनिक प्लेट्स एकत्र येतात. यामुळे या परिसरात ज्वालामुखी आणि भूकंपाच्या घटना होतात.
- यामुळे प्रशांत महासागरात अनेक खोल गर्ते/दऱ्या तयार झाले आहेत, त्यापैकी एक मरियाना गर्ता आहे. हा जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
रियाल माद्रिद फिफा क्लब विश्वचषक विजेता
- रियाल माद्रिदने अबू धाबीमध्ये संयुक्त अरब अमीरातचा क्लब अल आईनला ४-१ अशा गोल फरकाने पराभूत करत चौथ्यांदा फिफा क्लब विश्वचषक जिंकला.
- या विजयासह रियाल माद्रीद क्लबने फिफा क्लब विश्वचषक ३ वेळा जिंकण्याचा बार्सिलोनाचा विक्रम मोडीत काढला.
- या सामन्यात लुका मॉड्रिच, मार्कोस लोरेंते आणि कर्णधार सर्जीओ रामोस यांनी रियाल माद्रिदसाठी गोल केले.
फिफा क्लब विश्वचषक
- फिफा क्लब विश्वचषकाचे सर्वप्रथम आयोजन २०००मध्ये फिफा संघटनेकडून करण्यात आले होते. २००५पासून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जात आहे.
- ब्राझील, जपान, संयुक्त अरब अमीरात आणि मोरक्को या देशांनी फिफा क्लब विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविले आहे.
- रियाल माद्रिदने ही स्पर्धा सर्वाधिक ४ वेळा जिंकली आहे. यापूर्वी २०१४, २०१६ आणि २०१७ रियालने ही स्पर्धा जिंकली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा