चालू घडामोडी : ३० डिसेंबर

राष्ट्रीय आयोग विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी

  • भारतीय वैद्यकशास्त्र पद्धतीसाठी राष्ट्रीय आयोग विधेयक २०१८च्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • पारदर्शकतेसाठी सध्याची नियामक संस्था केंद्रीय भारतीय वैद्यकशास्त्र परिषदेऐवजी नवी संस्था स्थापन करण्यासाठी हे विधेयक आहे.
  • विधेयकामध्ये ४ स्वायत्त मंडळांसह राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेची तरतूद आहे.
  • यानुसार आयुर्वेदाशी संबंधित संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आयुर्वेद मंडळावर असेल.
  • तसेच युनानी, सिद्ध व सोवारिग्पाशी संबंधित संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीयुनानी, सिद्ध व सोवारिग्पा मंडळावर असेल.
  • याखेरीज २ सामायिक मंडळे आहेत. भारतीय वैद्यकशास्त्र पद्धतीच्या शैक्षणिक संस्थांच्या मंजुरी आणि मूल्यांकनासाठी, मूल्यांकन आणि मानांकन मंडळ असेल.
  • तर भारतीय वैद्यकशास्त्र पद्धतीच्या व्यवसायींचे नैतिक व नोंदणी मंडळ, भारतीय वैद्यकशास्त्र पद्धतींशी संबंधित मुद्यांसाठी नॅशनल रजिस्टरचे व्यवस्थापन करेल.
  • विधेयकातील तरतुदीनुसार सामायिक प्रवेश परीक्षा आणि दीक्षांत परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक ठरेल. परवाना मिळवण्यासाठी ते आवश्यक असेल.
  • याखेरीज नियुक्ती आणि बढतीसाठी शिक्षकांच्या मूल्यांकनाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा विधेयकात प्रस्तावित आहे.
  • भारतीय वैद्यकशास्त्र शिक्षणात सुधारणा करणे, हा प्रस्तावित विधेयकाचा उद्देश आहे.
  • प्रस्तावित नियामक व्यवस्थेमुळे पारदर्शकतेबरोबर सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणाची जबाबदारी निश्चित होईल.
  • भारतीय वैद्यकशास्त्र पद्धती, राष्ट्रीय आयोगामुळे देशाच्या सर्व भागात परवडणारी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास चालना मिळेल.

राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग (NCH) विधेयक २०१८च्या मसुद्याला मंजुरी दिली.
  • हे विधेयक सध्याच्या केंद्रीय होमिओपॅथी परिषदेच्या ऐवजी पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी एका नव्या संस्थेची स्थापना करेल.
  • विधेयकाच्या मसुद्यात राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याचा उल्लेख आहे. या आयोगांतर्गत ३ स्वायत्त परिषदा असतील.
  • होमिओपॅथी शिक्षण परिषदेद्वारे देण्यात येणाऱ्या होमिओपॅथी शिक्षणाच्या संचलनाची जबाबदारी स्वायत्त परिषदांवर असेल.
  • मूल्यांकन आणि योग्यता निर्धारण परिषद, होमिओपॅथीच्या शैक्षणिक संस्थाचे मूल्यांकन करेल आणि त्यांना मंजूरी प्रदान करेल.
  • नीति आणि नोंदणी परिषद होमिओपॅथीच्या डॉक्टरांची नोंदणी करेल आणि एक राष्ट्रीय रजिस्टर तयार करेल.
  • मसुद्यामध्ये एक प्रवेश परीक्षा आणि एक्जिट परीक्षेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी सर्व पदवीधरांना या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतील.
  • याशिवाय शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा प्रस्तावित्त आहे, याद्वारे शिक्षकांची नियुक्ति आणि पदोन्नति पूर्वी त्यांच्या योग्यतेचे मूल्यांकन केले जाईल.
  • राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ॲलोपॅथी वैद्यकीय प्रणाली स्थापनेचा प्रस्ताव दिला असून त्याच धर्तीवर होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणात सुधारणा करणे हा या मसुद्याचा उद्देश आहे.

देशातील पहिला व्हर्टिकल-लिफ्ट ब्रिज

  • रामेश्वरमला देशाच्या मुख्य भूमीशी जोडण्यासाठी भारतीय रेल्वे देशातील पहिला व्हर्टिकल-लिफ्ट ब्रिज (पूल) बनवित आहे.
  • या नवीन पुलाच्या बांधकामानंतर जहाजे आणि स्टीमर येथून सहज जाऊ शकतील.
  • हा नवीन पुल १०४ वर्ष जुन्या पांबन पूलाची जागा घेईल. येत्या ४ वर्षांत हा नवीन पूल तयार होणार आहे.
  • हा नवीन पूल ६३ मीटर लांब असेल. यात लिफ्ट-अप प्रणालीचा वापर करण्यात येईल, ज्यामुळे सागरी जहाजांना मार्ग दिला जाऊ शकेल. लिफ्टिंगसाठी दोन्ही बाजूंना सेन्सर वापरले जातील.
  • नवीन पुलामध्ये इलेक्ट्रो-मॅकेनिकल कंट्रोल सिस्टमचा वापर केला जाईल, जे ट्रेन नियंत्रण प्रणालीसह जोडले जाईल.
पांबन पूल
  • हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे.
  • मन्नारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी या हिंदी महासागराच्या उपसमुद्रांवर बांधला गेलेला ६,७७६ फूट (२,०६५ मी) लांबीचा हा पूल पांबन बेटावर स्थित रामेश्वरम नगरला मुख्य भारतीय भूमीसोबत जोडतो.
  • १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या रामेश्वरम गावामध्ये फक्त या पुलाद्वारेच प्रवेश शक्य आहे.
  • २४ फेब्रुवारी १९१४मध्ये वाहतुकीस खुला केला गेलेला पांबन रेल्वे पूल भारतातील सर्वात पहिला सागरी पूल आहे.
  • मुंबईमधील वांद्रे-वरळी सागरी महामार्ग २०१०मध्ये बांधून पूर्ण होण्याआधी हा देशातील सर्वात लांब सागरी पूल होता.
  • या जुन्या पुलाच्या शेजारी १९८८साली मोटार वाहतूक पूल बांधला गेला, जो रेल्वे पूलाला पूर्णपणे समांतर धावतो. या दोन्ही पुअलांना एकत्रितपणे पांबन पूल संबोधले जाते.

हरितगृह वायू उत्सर्जनावर भारताचा द्वितीय द्वैवार्षिक अहवाल

  • संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत भारताच्या द्वितीय द्वैवार्षिक अद्ययावत अहवाल सादरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • द्वितीय द्वैवार्षिक अद्ययावत अहवालात ५ प्रमुख घटक आहेत: राष्ट्रीय परिस्थिती, राष्ट्रीय हरितगृह वायू, शामक कृती; वित्त, तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणी गरजा व प्राप्त साहाय्य आणि देशांतर्गत देखरेख; पडताळणी व्यवस्था.
  • राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या अभ्यासानंतर द्वैवार्षिक अद्ययावत अहवाल तयार करण्यात आला आहे.
  • राष्ट्रीय हरितगृह वायू आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
भारताचे २०१४मध्ये हरितगृह वायू उत्सर्जन
  • भारतात २०१४मध्ये २६,०७,४८८ गीगाग्रॅम (सुमारे २.६०७ अब्ज टन कार्बन डायऑक्साईडच्या समकक्ष) हरितगृह वायूंचे उत्सर्जन केले गेले.
  • भारताचे नेट राष्ट्रीय हरितगृह वायूंचे उत्सर्जन २०१४मध्ये २३,०६,२९५ गीगाग्रॅम (सुमारे २.३०६ अब्ज टन कार्बन डायऑक्साईडच्या समकक्ष) होते.
  • एकूण हरितगृह वायू उत्सर्जनात ऊर्जा क्षेत्राचा वाटा ७३ टक्के, औद्योगिक प्रक्रिया आणि उत्पादनाचा वाटा ८ टक्के, कृषी क्षेत्राचा वाटा १६ टक्के आणि कचरा क्षेत्राचा वाटा ३ टक्के होता.
पॅरिस हवामान करारांतर्गत भारताची प्रतिबद्धता
  • २०३०पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन २००५च्या पातळीच्या ३३-३५ टक्के खाली आणणे.
  • भारतातील ४० टक्के ऊर्जा क्षमता अजीवाश्म इंधन स्त्रोतांपासून निर्माण केली जाईल.
  • अतिरिक्त वन क्षेत्राद्वारे २०३०पर्यंत २.५ ते ३ अब्ज टन कार्बन डायऑक्साइडचे ‘कार्बन सिंक’ तयार करणे.

रशियाची हायपरसॉनिक अण्वस्त्र प्रणाली ‘अवनगार्ड’

  • रशियाने अलीकडेच हायपरसॉनिक अण्वस्त्र वितरण प्रणाली ‘अवनगार्ड’ची दक्षिण युराल पर्वतातील दोम्बारोव्सकी मिसाइल बेसमध्ये यशस्वी चाचणी केली.
  • या चाचणी दरम्यान या क्षेपणास्त्राने ६००० किमी अंतरावरील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
  • अवनगार्ड हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगाच्या २७ पट वेगाने आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करते.
  • याची निर्मिती नवीन कम्पोझिट पदार्थापासून करण्यात आली आहे, त्यामुळे ते २००० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करण्यास सक्षम आहे.
  • अवनगार्ड जमिनीपासून कितीतरी किलोमीटरवर उंचीवर वातावरणात जाऊ शकते, ज्यामुळे ते क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेला चुकवू शकते.
  • अवनगार्डची लांबी सुमारे ५.४ मीटर आहे, तसेच हे क्षेपणास्त्र १ मेगाटनपर्यंत अण्वस्त्रे व पारंपरिक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

पॅलेस्टाईन युएनच्या पूर्ण सदस्यत्वासाठी अर्ज करणार

  • पॅलेस्टाईन जानेवारी २०१९मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पूर्ण सदस्यत्वासाठी अर्ज करणार असल्याची घोषणा पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद-अल-मालिकी यांनी केली आहे.
  • पूर्ण सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १५ पैकी किमान ९ सदस्यांच्या सहमतीची आवश्यकता आहे.
  • पॅलेस्टाईन पश्चिम आशियामध्ये स्थित देश आहे. त्याचे क्षेत्रफळ ६,०२० चौकिमी आहे.
  • पॅलेस्टाईनची घोषित राजधानी जेरुसलेम आहे, परंतु सध्या त्यांची प्रशासकीय राजधानी रामल्लाह येथे स्थित आहे.
  • पॅलेस्टाईनने १५ नोव्हेंबर १९८८ रोजी स्वातंत्र्य घोषित केले होते. सीमेवरून या देशाचा इस्राईलसह दीर्घकाळापासून वाद आहे.
  • पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांच्या १३६ सदस्यांनी मान्यता दिली आहे. तसेच हा देश अरब लीग, इस्लामिक सहयोग संघटना, जी-७७ इत्यादी संघटनांचा सदस्य आहे.
  • पॅलेस्टाईन २०१२पासून संयुक्त राष्ट्र संघटनेचा पर्यवेक्षक सदस्य आहे.

एन. बिरेन सिंग यांना ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्कार

  • मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्काराने सन्मानित केले.
  • मणिपूरमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
  • त्याशिवाय केंद्रीय अन्न मंत्रालयाचे मंत्री साध्वी निरंजन ज्योती, आदिवासी व्यवहार मंत्री सुदर्शन आणि खासदार निशिकांत दुबे यांनाही सन्मानित करण्यात आले.
  • हा पुरस्कार ११५ आकांक्षित जिल्ह्यांमधील प्रगतीसाठी स्थापन करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील विकास कार्यांच्या प्रगतीचे अवलोकन नीती आयोगाद्वारे केले जात आहे.

लुका मोड्रिचला बाल्कन अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार

  • क्रोएशियाच्या लुका मोड्रिचने टेनिसपटू नोव्हाक जोकाविचला मागे टाकत ‘बाल्कन अॅथलीट ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला.
  • हा पुरस्कार जिंकणारा तो दुसराच फुटबॉलपटू ठरला. यापूर्वी १९९४मध्ये बल्गेरियन फुटबॉलपटू हृस्तो स्तोयीचकोव्हने हा खिताब जिंकला होता.
  • महिला गटामध्ये हा पुरस्कार रोमानियाची टेनिसपटू सिमोना हालेपने जिंकला.
ल्युका मॉड्रीच
  • ल्युका मॉड्रीच हा क्रोएशियाचा फुटबॉलपटू असून, तो क्रोएशियाच्या राष्ट्रीय फुटबॉल टीमचा चा कर्णधार व मिडफिल्डर आहे.
  • या दर्जाची कामगिरी करणारा तो क्रोएशियाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तो सध्याच्या काळातील सर्वोत्तम मिडफिल्डरपैकी एक असल्याचे मानले जाते.
  • मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्यात मात्र फ्रान्सने त्यांचा पराभव केला.
  • याशिवाय लुका मॉड्रिचने गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल माद्रिदला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
  • विश्वचषक स्पर्धेत त्याला चांगल्या कामगिरीसाठी गोल्डन बॉलने गौरविण्यात आले. याशिवाय यावर्षी त्याने युएफाचा सर्वोत्तम खेळाडू, फिफाचा सर्वोत्तम खेळाडू आणि बॅलोन डि ओर असे मानाचे पुरस्कार पटकावले.
  • फुटबॉल इतिहासात एकाच वर्षात हे चारही पुरस्कार जिंकणारा मॉड्रिच पहिलाच खेळाडू ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा