छत्तीसगड विधानसभा निवडणुक २०१८
- काँग्रेस पक्षाने छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भूपेश बघेल यांची निवड केली आहे. ते छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
- भूपेश बघेल रमणसिंह यांची जागा घेणार आहेत. १७ डिसेंबर रोजी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
- अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसने छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी ६८ जागा जिंकल्या. तर भाजपाला केवळ १५ जागांवर विजय मिळवता आला.
- मध्यप्रदेशातील (आताच्या छत्तीसगड) दुर्ग येथे २३ ऑगस्ट १९६१ रोजी जन्मलेल्या बघेल यांनी ८०च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणास प्रारंभ केला.
- दुर्ग जिल्ह्यातच ते युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९३ ते २००१ या कालावधीत ते मध्य प्रदेश गृहनिर्माण मंडळाचे निदेशक होते.
- १९९३ ते १९९८ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधानसभा सदस्य होते. १९९८मध्ये त्यांना दिग्विजय सिंह यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. १९९९मध्ये ते परिवहन मंत्री बनले.
- २०००मध्ये छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विधानसभेत प्रवेश केला.
- २००३ ते २००८ दरम्यान ते विरोधी पक्षाचे उपनेते झाले. २०१४ मध्ये त्यांची छत्तीसगड काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
भारताकडून मालदीवला १.४ अब्ज डॉलर्सची मदत
- मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद इब्राहिम सोलिह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला १.४ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली.
- मालदीव भारताचा खूप जुना भागीदार देश आहे. मालदीवला भारताने दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत आहे.
- तसेच चीनचा हिंदी महासागरातील वाढता प्रभाव लक्षात घेता अशा प्रकारची आर्थिक मदतीची रणनीती भारतासाठी अत्यावश्यक आहे.
चीनचे वाढते प्रभुत्व
- चीन हिंदी महासागरात आपले प्रभुत्व निर्माण करण्यासाठी हिंदी महासागरातील देशांना (जसे मालदीव आणि श्रीलंका) आर्थिक सहाय्य व कर्ज देत आहे.
- अलीकडेच मालदीवमध्ये पहिल्या क्रॉस-सी उद्घाटन झाले. या ब्रिजचे नाव चीन-मालदीव फ्रेंडशिप ब्रिज असे ठेवण्यात आले आहे. हा मालदीवमधील चीनचा मुख्य प्रकल्प आहे.
- चीन-मालदीव फ्रेंडशिप ब्रिज या २.२ किलोमीटरच्या पुलावर ४ वाहन लेन आणि २ प्रवासी लेन आहेत.
- हा पुल मालदीवची राजधानी माले आणि जवळचे हूलहुले बेट यांना जोडतो. या बेटावर मालदीवचे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
- या पुलाच्या सहाय्याने पर्यटक आणि इतर नागरिक या दोन बेटांचा प्रवास केवळ ५ मिनिटांमध्ये करू शकतात.
- या पुलाचे बांधकाम करण्यासाठी चीनने ११६ दशलक्ष डॉलर्स अनुदान तसेच ७२ दशलक्ष डॉलर्सचे कर्जही दिले होते.
मालदीव
- मालदीव हा देश हिंद महासागरात स्थित एक लहान बेट आहे. त्याचे क्षेत्रफळ २९८ चौकिमी तर लोकसंख्या ४,२७,७५६ आहे. मालदेवची राजधानी माले येथे आहे. येथील चलन मालदीवी रुफिया आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या निदेशकपदी रामफल पवार
- रामफल पवार यांची अलीकडेच राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या (एनसीआरबी) निदेशक पदी नियुक्ती करण्यात आली.
- ते पश्चिम बंगाल कॅडरचे १९८८च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते NATGRIDमध्ये संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते.
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो
- राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोची (NCRB) स्थापना गृह मंत्रालयाकडून ११ मार्च १९८६ रोजी करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
- गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हे आणि गुन्हेगारांची माहितीचा संग्रह व स्त्रोत गुन्ह्याचा तपास करणाऱ्या यंत्रणांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली आहे.
- माहिती-तंत्रज्ञान आणि क्रिमिनल इंटेलिजन्सद्वारे पोलिस दलांना सशक्त बनवून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे, या संस्थेचा हेतू आहे.
- हा ब्युरो गुन्हे आणि गुन्हेगारांचा सुरक्षित डेटाबेस तयार करतो. तसेच गुन्हेगारांशी संबंधित माहिती संकलित करतो. यात सर्व गुन्हेगारांच्या बोटांचे ठसेही जमा केले जातात.
- हा ब्युरो देशभरात नोंद झालेल्या खटल्यांचे विश्लेषण करून ‘भारतात गुन्हेगारी’ नावाचा अहवाल दरवर्षी प्रकाशित करते.
जोशना चिनप्पाला राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेचे विजेतेपद
- जोशना चिनप्पाने राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत महिला एकेरी वर्गाचे विजेतेपद आपल्या नावावर केले. अंतिम फेरीत तिने उर्वशी जोशीला पराभूत केले.
- हे जोशना चिनप्पाचे १६वे राष्ट्रीय विजेतेपद आहे. याबरोबरच तिने भुवनेश्वरी कुमारीच्या १६ विजेतेपदांच्या विक्रमची बरोबरी केली आहे.
- पुरुष एकेरीमध्ये महेश मंगओकरने विक्रम मल्होत्राचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. महेशचे हे पहिलेच विजेतेपद होते.
- या स्पर्धेची ही ७५वी आवृत्ती होती. या स्पर्धेचे आयोजन नोएडा येथे करण्यात आले होते.
जोशना चिनप्पा
- जोशना चिनप्पा ब्रिटिश स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. हा किताब तिने २००३मध्ये १९ वर्षाखालील श्रेणीत जिंकला होता. ती भारताची सर्वात युवा स्क्वॉश चॅम्पियन आहे.
- २०१४मध्ये तिने दीपिका पल्लीकलच्या साथीने राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल खेळांमधील स्क्वॉशमधील भारताचे हे पहिलेच विजेतेपद होते.
पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद
- पी. व्ही. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर जबरदस्त मात करत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तिने ओकुहारावर २१-१९,२१-१७ अशी मात केली.
- मागच्या वर्षी झालेल्या याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात याच दोन्ही खेळाडूंमध्य़े सामना झाला होता. ज्यामध्ये ओकुहाराने सिंधुचा पराभव केला होता.
- सिंधूचे वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे हे पहिलेच विजेतेपद आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. सिंधूचे हे कारकिर्दीतील १४वे जेतेपद आहे.
- २०१८मधील सिंधूचे हे पहिलेच जेतेपद आहे. २०१८मध्ये आतापर्यंत सिंधूला ७ स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यात आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धांचाही समावेश आहे.
पी. व्ही. सिंधू
- पी. व्ही. सिंधू भारतातील सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडूंपैकी एक आहे. तिचा जन्म ५ जुलै १९९५ रोजी हैदराबाद येथे झाला.
- २०१६च्या रियो ऑलिंपिकमध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकले होते.
- याशिवाय तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१७ व २०१८मध्ये रौप्यपदक जिंकले आहे. २०१६मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बेल्जियमने पहिल्यांदाच जिंकला हॉकी विश्वचषक
- भुवनेश्वर (ओदिशा) येथील कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या १४व्या हॉकी विश्वचषकात बेल्जियमने बलाढ्य नेदरलँड्सला ३-२ असे पराभूत करून प्रथमच हॉकी विश्वचषक जिंकला.
- निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमकडून वॉन ओबेल फ्लोरेंट व वेगनेज व्हिक्टर यांनी गोल केले. तर नेदरलँड्सकडून जेरॉन हर्ट्सबर्गर व जियुस जोन्स यांनी गोल केले.
- सामना सडनडेथवर गेल्यानंतर बेल्जियमच्या वॉन ओबेल याने गोल केला तर नेदरलँड्सच्या हर्ट्सबर्गरला गोल नोंदवता आला नाही.
- स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेल्या बेल्जियमने अंतिम सामन्यात बलाढ्य नेदरलँड्सला गोल करण्यापासून रोखले.
- मागील विश्वचषक स्पर्धेत बेल्जियम ५व्या स्थानी राहिले होते. तर रियो ऑलिंपिक २०१६मध्ये बेल्जियमने रौप्यपदक जिंकले होते.
- जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सला मागील विश्वचषक स्पर्धेतदेखील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी
- तिसऱ्या स्थानासाठी (कांस्यपदक) झालेल्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ८-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले.
- ऑस्ट्रेलियासाठी टॉम क्रेगने ३, जेर्मी हेवार्डने २ तर ब्लेक गोव्हर्स, ट्रेंट मिटॉन व टिम ब्रँड यांनी प्रत्येकी १ गोल केला. इंग्लंडतर्फे बॅरी मिडलटनने एकमेव गोल नोंदवला.
- ऑस्ट्रेलियाने नोंदवलेल्या ८ गोलपैकी ५ गोल मैदानी, तर ३ गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले.
हॉकी विश्वचषक २०१८
- २८ नोव्हेंबर २०१८ रोजी पुरुष हॉकी विश्वचषक २०१८चे ओडिशामधील भुवनेश्वर येथे उद्घाटन करण्यात आले होते.
- हॉकी विश्वचषक २०१८चे मुख्य गाणे ‘जय हिंद, जय इंडिया’ गुलजार यांनी लिहिले आहे तर ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले होते.
- या स्पर्धेसाठी ओली नावाचा एक कासव शुभंकर (मॅस्कॉट) म्हणून निवडण्यात आला होता.
- ओडिशा राज्यात आढळणाऱ्या आणि सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी जागरुकता पसरविणे हा त्याचा उद्देश आहे.
- पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची ही १४वी आवृत्ती होती. २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली.
- या हॉकी विश्वचषक स्पर्धेत पुढील १६ देश सहभागी झाले होते: भारत, इंग्लंड, मलेशिया, कॅनडा, पाकिस्तान, चीन, बेल्जियम, जर्मनी, न्यूझीलँड, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, अर्जेंटिना, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका
काट्रियोना ग्रे: मिस युनिव्हर्स २०१८
- थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आयोजित ६७व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत फिलिपाइन्सची काट्रियोना ग्रे हिने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला.
- या स्पर्धेत जगभरातील ९३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. २०१७ची मिस युनिव्हर्स विजेती डेमी लेई नेल्स-पीटर्सच्या हस्ते काट्रियोनाला मिस युनिव्हर्सचा मानाचा मुकूट देण्यात आला.
- या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची तामरिन ग्रीन प्रथम रनरअप व व्हेनेझुएलाची स्टेफनी गुटेरज द्वितीय रनरअप ठरली.
- हा किताब पटकावणारी काट्रियोना फिलिपाइन्सची चौथी विश्वसुंदरी ठरली आहे. याआधी फिलिपाइन्सने १९६९, १९७३ व २०१५मध्ये हा किताब पटकावला आहे.
- संगीत सिद्धांतामध्ये पदवी प्राप्त असलेली काट्रियोना ग्रे फिलिपिनो-ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनवर सूत्रसंचालक, गायिका म्हणून प्रसिद्ध आहे.
- या स्पर्धेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच स्पेनच्या अँजेलिना पोन्स या ट्रान्सजेंडर सौंदर्यवतीनं सहभाग घेतला होता. मात्र अंतिम २० स्पर्धकांमध्ये पोहोचण्यास अँजेलिना अपयशी ठरली होती.
- यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व नेहल चुडासमा हिने केले. ती अंतिम २०मध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरली.
- २०००मध्ये लारा दत्ता यांच्यानंतर कोणात्याही भारतीय युवतीला हा किताब जिंकता आलेला नाही.
IRIGC-MTC बैठकीचे नवी दिल्लीत आयोजन
- भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी लष्करी तांत्रिक सहकार्यासाठी भारत-रशियन आंतर-सरकारी आयोगाच्या (IRIGC-MTC) बैठकीदरम्यान रशियन संरक्षण मंत्री जनरल सेर्गेई शोइगु यांची भेट घेतली. या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
- या बैठकीत यांच्यात संरक्षण उपकरणे, उद्योग आणि भारत व रशिया तांत्रिक सहकार्यासह विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
- या बैठकीत रशियन लष्करी उपकरणांच्या अपग्रेडेशन आणि विक्री सहाय्य यावर देखील चर्चा झाली.
- दोन्ही मंत्र्यांनी भारत-रशिया यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सहकार्य क्षेत्रामधील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
- या बैठकीत कामोव्ह-२२६टी हेलिकॉप्टर, नौदल फ्रीगेट्स आणि इतर प्रकल्पांच्या संयुक्त उत्पादनाबाबत देखील चर्चा करण्यात आली.
- दोन्ही देशांमध्ये मेक इन इंडिया योजनेअंतर्गत रशियन उपकरणे तयार करण्यास सहमती झाली.
- IRIGC-MTCच्या संरचनेत बदल करून, याला ‘सेना आणि लष्करी तांत्रिक सहकार्यासाठी भारत-रशियन आंतर-सरकारी आयोग’ बनविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे.
लष्करी तांत्रिक सहकार्यासाठी भारत-रशियन आंतर-सरकारी आयोग
- रशिया भारताचा सर्वात महत्वाचा शस्त्र पुरवठादार देश आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी लष्करी आणि तांत्रिक सहकार्यासाठी संस्थात्मक फ्रेमवर्क तयार केले आहे.
- IRIGC हे याच प्रकारचे एक संस्थात्मक फ्रेमवर्क आहे. IRIGC-MTCची स्थापना २००० साली झाली.
- त्याची पहिली बैठक २००१मध्ये रशियाची राजधानी मॉस्को येथे झाली होती. तिची पुढील बैठक २०१९मध्ये रशियात आहे.
वॉएजर-२ हे यान पोहोचले सौरमालेच्या शेवटच्या टोकापर्यंत
- अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे वॉएजर-२ (Voyager-2) हे यान सौरमालेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणारे इतिहासातील दुसरे अंतरीक्षयान ठरले आहे.
- नासाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, ४१ वर्षापूर्वी प्रक्षेपित करण्यात आलेले हे यान सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या (हेलियोस्फियर) बाहेर गेले आहे. यापूर्वी, वॉएजर-१ने २०१२मध्ये ही सीमा ओलांडली होती.
- असे असले तरीही अजूनही हे दोन्ही यान अद्याप सौरमालेच्या आतच आहेत आणि नजीकच्या भविष्यात ते बाहेरही जाणार नाहीत.
- यानावरील वेगवेगळ्या उपकरणांद्वारे मिळालेल्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, या वॉएजर-२ने ५ नोव्हेंबर रोजी हेलियोस्फियरचे शेवटचे टोक पार केले.
- वॉएजर-२ सध्या पृथ्वीपासून १८ अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. यावरून येणारे संदेश प्रकाशाच्या वेगाने येतात, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर पोहचण्यासाठी सुमारे १६.५ तास लागतात.
- वॉएजर-१ आणि २ यांनी भिन्न वेळी आणि भिन्न ठिकाणांपासून हेलियोस्फियरची सीमा ओलांडली आहे, त्यामुळे या दोन्हीकडून प्राप्त झालेली माहितीही भिन्न आहे.
- वॉएजर-२ हे असे एकमेव अंतरिक्षयान आहे, ज्याने सर्व ४ मोठ्या ग्रहांची (गुरु, शनि, युरेनस आणि नेपच्यून) यात्रा केली आहे.
- २० ऑगस्ट १९७७ रोजी वॉएजर-२ तर ५ सप्टेंबर १९७७ रोजी वॉएजर-१ लॉन्च करण्यात आले होते.
- वॉएजर-२ हे नासाचे मानवरहित अंतराळ यान आहे. हे नासाचे सर्वात दीर्घकाळ चाललेले मिशन आहे.
- हेलियोस्फियरचे शेवटचे टोक म्हणजेच हेलियोपॉज नावाची जागा आहे, जेथे कमकुवत, गरम सौर हवा ताऱ्यांच्या दरम्यानच्या थंड आणि घन माध्यमाला मिळते. याला सौरमालेचे शेवटचे टोकही म्हणतात.
जम्मू-काश्मीरमध्ये लैंगिक छळ रोखण्यासाठी कायदा
- जम्मू-काश्मीर विधानसभेने कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी कायदा पारित केला असून, असा कायदा करणारे जम्मू-काश्मीर देशातील पहिले राज्य ठरले आहे.
- जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रशासन मंडळाने भ्रष्टाचार प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक २०१८ आणि जम्मू-काश्मीर गुन्हे कायदा (दुरुस्ती) विधेयक २०१८ यांना मंजुरी दिली.
- या विधेयकाद्वारे अपराधिक कार्यवाही संहितेच्या कलम १५४ आणि १६१मध्ये आणि पुरावे कायद्याच्या कलम ५३मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.
- याद्वारे, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळास रणबीर दंड सहितेमध्ये (आरपीसी) नमूद गुन्ह्यांप्रमाणे अपराध म्हणून घोषित केले गेले आहे.
- यामुळे रणबीर दंड सहितेच्या कलम ३५४मध्ये आणखी एक विभाग ‘ई’ जोडण्यात आला आहे. ज्यामुळे लैंगिक छळ करणाऱ्या दोषींना ३ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
- ३५४-ई विभागात लैंगिक छळ आणि उच्चपदाचा दुरुपयोग करून जबरदस्तीने पैसे उकळणे यांचा समावेश केला आहे.
- नवीन दुरुस्तीमध्ये दुर्व्यवहाराची व्याख्या परिभाषित करण्यात आली असून, लैंगिक सुखाची मागणीला दुर्व्यवहाराच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.
रणबीर दंड सहिता (आरपीसी)
- भारतीय दंड संहिता (आयपीसी) जम्मू-काश्मीरमध्ये कार्य करीत नाही, त्याऐवजी तेथे रणबीर संहिता वापरली जाते.
- ही संहिता डोग्रा राजवटीत रणबीर सिंह यांनी १९३२मध्ये सुरू केली होती. यातील तरतुदी थॉमस मॅकॉले यांनी तयार केल्या आहेत.
युवकांसाठी राष्ट्रीय आव्हान
(National Challenge For Youth)
- अलीकडेच विद्यार्थी आणि युवकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने युवकांसाठी राष्ट्रीय आव्हान ‘Ideate for India- Creative Solutions using Technology’ या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
- माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचा राष्ट्रीय ई-गव्हर्नंस विभाग आणि इंटेल इंडियाच्या भागीदारीने आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सहकार्याने हे आव्हान सुरु करण्यात आले आहे.
- या राष्ट्रीय आव्हानाचा हेतू देशातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या समुदायांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक मंच आणि संधी प्रदान करणे आहे.
- हे आव्हान या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या ‘वापरकर्त्या’पासून तंत्रज्ञानाचे ‘निर्माते’ बनण्यासाठी सक्षम करेल.
- हे आव्हान संपूर्ण देशभरात ६वी ते १२वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. याचा उद्देश पुढील ३ महिन्यात कमीतकमी १ दशलक्ष युवकांपर्यंत पोहोचणे आहे.
- या आव्हानांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हीडियोच्या माध्यमातून समस्या जाणून घेऊन, त्यांच्या निराकरणासाठी ९० सेकंदाचा व्हीडियो बनवावा लागेल.
- यापैकी सर्वोत्कृष्ट ५० विद्यार्थ्यांची तज्ञांद्वारे निवड करण्यात येईल व त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना टेक क्रिएशन चॅम्पियन्स घोषित केले जाईल.
- यामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, डिजिटल सेवा, पर्यावरण, महिला सुरक्षा, वाहतूक, पायाभूत सुविधा, कृषी, समाजकल्याण, अपंगत्व आणि पर्यटन अशा ११ क्षेत्रांचा समावेश आहे, ज्यावर विद्यार्थी आपले विचार मांडू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा