हॉकीमध्ये महिला संघाचे सुवर्णपदकाचे स्वप्न संपुष्टात
महिला हॉकीच्या अंतिम फेरीत जपानने भारतावर २-१ अशी मात करत सुवर्णपदक जिंकले, तर भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
या विजयासह जपानच्या महिलांनी २०२०साली जपानमध्येच होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत १९८२मध्ये सुवर्णपदक तर, १९९८मध्ये रौप्यपदक पटकावले होते.
Sailingमध्ये ३ पदकांची कमाई
Sailing क्रीडा प्रकाराच्या 49er FX Women’s प्रकारात भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेर्वेगर जोडीने रौप्य पदकाची कमाई केली.
भारताच्या हर्षिता तोमरने Open Laser 4.7 प्रकारात कांस्यपदक जिंकले.
वरुण ठक्कर आणि गणपती चेंगप्पा जोडीने 40er Men’s प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
बॉक्सर विकास क्रिशनला कांस्यपदक
भारताचा बॉक्सर विकास क्रिशनला ७५ किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याने त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
विकासचं आशियाई स्पर्धांमधील हे तिसरे पदक ठरले. याआधी त्याने २०१०साली सुवर्ण आणि २०१४साली कांस्यपदकाची कमाई केली होती.
डॉ. अविनाश सुपे यांना प्रतिष्ठेचा डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल डॉ. अविनाश सुपे यांना वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानला जाणारा डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. सुपे हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत.
केईएममधून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर टाटा सोशल सायन्सेसमधून रुग्णालय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी घेतली.
अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉयस विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ प्रोफेशन एज्युकेशनची पदवी प्राप्त केली.
वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व निर्माण करणाऱ्या अमेरिकेतील ‘फिमर’या संस्थेतून त्यांनी २००२मध्ये फेलोशिप घेतली.
पालिका रुग्णालये ही प्रामुख्याने गोरगरीब रुग्णांसाठी असली तरी येथे येणाऱ्या गरीब रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी ते कायम आग्रही राहिले.
सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीतील तज्ज्ञ असलेल्या डॉ. सुपे यांच्या पुढाकारातूनच केईएम रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची सुरुवात करण्यात आली.
त्यांचे आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २६२ शोधनिबंध आणि ५ पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांचे आरोग्य विषयावरील ‘आरोग्य संपदा’ हे मराठी पुस्तक देखील प्रसिद्ध आहे.
याशिवाय जगभरातील परिषदांमध्ये अनेकदा गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विषयावर त्यांनी सादरीकरण केले आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे.
डॉ. सुपे यांनी आतापर्यंत १२० वेळा स्वत: रक्तदान केले असून यासाठी केंद्र सरकारचा शतकवीर रक्तदाता हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
त्यांनी आपले निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील छंद फोटोग्राफीच्या माध्यमातून जपले असून फोटोग्राफीतील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन ‘फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया’ने त्यांना सन्माननीय सदस्यत्वही बहाल केले आहे.
गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी: जठरांत्रमार्गाच्या रोगांचा अभ्यास
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ८.२ टक्क्यांवर
सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा एप्रिल ते जून या तिमाहीतील विकास दर (जीडीपी) ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला.
उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील दिमाखदार कामगिरीमुळेच ही उंच झेप घेता आली असून गेल्या ३ वर्षांतील हा सर्वोच्च विकासदर ठरला आहे.
याशिवाय उत्पादन, वीज, गॅस, पाणीपुरवठा, बांधकाम, संरक्षण तसेच अन्य सेवांमध्येही ७ टक्क्यांची वृद्धी नोंदवली गेली.
२०१७मध्ये जीडीपी घसरून ७.७ टक्क्यांवर आला होता. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर विकासदरात मोठी घसरण झाली होती.
भारताने विकासदराच्या बाबतीत आता शेजारी देश चीनला मागे टाकले आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत चीनचा विकास दर ६.७ टक्के होता.
इरम हबीब: काश्मीर खोऱ्यातील पहिली मुस्लिम महिला वैमानिक
इरम हबीब या ३० वर्षीय तरुणीने काश्मीर खोऱ्यातील पहिली मुस्लिम महिला वैमानिक होण्याचा मान पटकावला आहे.
कमर्शियल पायलट लायसन्स मिळवण्यासाठी इरम सध्या दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेत असून वैमानिकाचे प्रशिक्षण तिने अमेरिकेतील मायामी येथे घेतले आहे.
काश्मीरमधल्या अत्यंत धार्मिक मुस्लीम वातावरणात तरूणीने वैमानिक होणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. पुढील महिन्यात इरम खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून रूजू होईल.
२०१६मध्ये तन्वी रैना या काश्मिरी पंडित कुटुंबातील मुलीने एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून रुजू होत काश्मीरमधली पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता.
तर एप्रिल २०१७मध्ये आयेषा अझीज या २१ वर्षीय तरूणीने काश्मीर खोऱ्यातील पहिली महिला प्रशिक्षणार्थीवैमानिकहोण्याचा मान मिळवला होता. याशिवाय ती भारतातील सर्वात तरूण विद्यार्थी वैमानिकही ठरली होती.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे नवे अध्यक्ष: हाजी अरफात शेख
तिहेरी उडीमध्ये अरपिंदर सिंगने भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. त्याने १६.७७ मी. लांब उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील हे भारताचे दहावे सुवर्णपदक आहे.
भारताने आशियाई स्पर्धेतील तिहेरी उडीत ४८ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी महिंदर सिंग याने १९७०मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये भारताच्या स्वप्ना बर्मनने ६०२६ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे ११वे सुवर्णपदक आहे.
पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने ८०० मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वप्नाला १० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले असून सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या ७ प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये २०० मी. आणि ८०० मी. धावण्याची शर्यत होते. तसेच १०० मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.
अॅथलेटीक्स: द्युती चंदला २०० मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये रौप्य
भारताची धावपटू द्युती चंदने महिलांच्या २०० मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये रौप्यपदक जिंकले. तिने २०० मी. अंतर २३.२० सेकंदांमध्ये पूर्ण केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक ठरले. याआधी द्युतीने १०० मी. शर्यतीमध्येही रौप्यपदक जिंकले आहे.
एकाच आशियाई स्पर्धेत १०० मी. व २०० मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. याआधी लेव्ही पिंटो, आर. ज्ञानसेखरण, पी.टी.उषा यांनी हा विक्रम केला होता.
आयएएएफने २०१४मध्ये आपल्या हायपरअँड्रोगेनिझम नियमांअंतर्गत दुतीला निलंबित केले होते. यामुळे तिला राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते. या निर्णयाविरुद्ध न्याय मागितल्यानंतर तिचे पुनरागमन झाले.
टेबल टेनिस: भारताला मिश्र दुहेरीमध्ये कांस्यपदक
भारताची मिश्र दुहेरी जोडी मनिका बत्रा व अचंथा शरथ कमल यांना उपांत्य फेरीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.
गेल्या ६० वर्षांतील भारताचे टेबल टेनिसमधील हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी भारताच्या पुरुष संघाने याच स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.
उपांत्य सामन्यात भारतीय जोडीला चीनकडून ४-१ ने पराभव स्विकारावा लागला, यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागले.
हॉकी: भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकी संघाने २० वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. याआधी १९९८साली भारतीय महिला हॉकी संघाने ही कामगिरी केली होती.
भारतीय संघाने चीनचा १-० ने पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केलं. अंतिम फेरीत भारताचा सामना जपानसोबत होणार आहे.
नोटाबंदीमुळे बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा आरबीआयकडे जमा
नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्याची माहिती आरबीआयच्या २०१७-१८च्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे.
याचा अर्थ नोटाबंदीमुळे चलनातून बाद झालेल्या १५.४४ लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी १५.३१ लाख कोटी रुपये आरबीआयमध्ये परत आले आहेत. केवळ १३ हजार कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आल्या नाहीत.
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेला ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईसाठी ७,९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले होते.
काळा पैसा संपुष्टात यावा, दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद व्हावी, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ व्हावी व रोखीचे प्रमाम कमी व्हावे अशा बहुउद्देशीय कारणासाठी नोव्हेंबर २०१६मध्ये मोदी सरकारने नोटाबंदीचे पाऊल उचलले होते.
नोटाबंदीमुळे मोठ्या प्रणाणात काळा पैसा बँकेत परत येणार नाही, असा दावा करण्यात येत होता. मात्र ९९ टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्याने नोटाबंदीच्या निर्णयाचा नेमका फायदा काय झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आरबीआयच्या वार्षिक अहवालातील ठळक मुद्दे:
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा.
देशात गुंतवणूक व उत्पादनाचे प्रमाण वाढले असून महागाई काही प्रमाणात कमी झाली आहे.
अप्रत्यक्ष कर प्रणालीत जीएसटी मैलाचा दगड ठरला.
मार्च २०१८ अखेरीस भारतीय बाजारपेठेमध्ये १८ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात.
आधीच्या वर्षाच्या तुलनेत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य ३७.७ टक्क्यांनी वाढून १८.०४ लाख कोटी रुपये झाले.
जास्त किमतीच्या म्हणजे २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्यामुळे प्रत्यक्ष नोटांच्या संख्येतील वाढ फक्त २ टक्क्यांची आहे.
१८ लाख कोटी रुपयांमध्ये ५०० व २००० रुपयांच्या नोटांचा वाटा ७२.७ टक्के. तर २०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण २.१ टक्के.
२०१८-१९मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ७.४ टक्क्यांनी होईल असा अंदाज.
निधन: ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते नंदमुरी हरिकृष्णा
ज्येष्ठ अभिनेते आणि तेलगू देसम पार्टीचे नेते नंदमुरी हरिकृष्णा यांचे अपघाती २९ ऑगस्ट रोजी निधन झाले.
हरिकृष्णा हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे मेहुणे आणि माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एन. टी. रामाराव यांचे पुत्र होते.
हरिकृष्णा यांचे दोन मुलगे ज्युनिअर एनटीआर आणि नंदमुरी कल्याणराम हे तेलुगू चित्रपट सृष्टीमधील आघाडीचे नट आहेत.
नलगोंडा जिल्ह्यातील नरकटपल्ली-अदांकी महामार्गावरून जात असताना हरिकृष्णा यांच्या वाहनाला अपघात झाला होता.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
निधन: अमेरिकेचे लोकप्रिय नाटककार नील सायमन
अमेरिकेचे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय नाटककार तसेच पटकथा लेखक नील सायमन यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
त्यांचा जन्म ४ जुलै १९२७ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. ‘कम ब्लो युअर हॉर्न’ (१९६१) हे त्यांचे पहिले नाटक. याचे ६८० हून अधिक प्रयोग झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एकूण ३० नाटके लिहिली.
त्यांना अमेरिकी नाटकांना दिले जाणारे ‘टोनी पुरस्कार’ तीनदा आणि १९७५साली ‘टोनी कारकीर्द गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
अमेरिकन रायटर्स गिल्डतर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९९१सालच्या ‘लॉस्ट इन याँकर्स’ या नाटकासाठी ‘पुलित्झर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांना चारवेळा ऑस्करसाठी नामांकनही मिळाले होते.
वाजपेयींचे राजघाटाजवळ समाधीस्थळ उभारणार
दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे भव्य स्मारक महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ असलेल्या राजघाटाजवळ उभारण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला आहे.
याच ठिकाणी १७ ऑगस्ट रोजी वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या समाधी स्थळाचे काम १५ सप्टेंबरपासून सुरू होईल.
या समाधी स्थळाची उभारणी २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. २५ डिसेंबरला वाजपेयी यांची ९४वी जयंती आहे.
८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजीत सिंह आणि जिनसन जॉन्सन यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. मनजीतने १:४६:१५, तर जिनसनने १:४६:३५ अशी वेळ नोंदवली.
४ बाय ४०० मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी रौप्यपदक जिंकले. ४ बाय ४०० मी. अंतर पार करण्यासाठी भारतीय संघाने ३:१५:७१ मिनिटे एवढा वेळ लागला.
मिश्र रिले शर्यतीचा या एशियाडमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत बहारिनच्या संघाने सुवर्णपदक तर कझाकस्तानच्या संघाने कांस्यपदक पटकावले.
तिरंदाजी: पुरुष व महिला संघाला रौप्यपदक
पुरुष तिरंदाजी संघाने अटीतटीच्या लढतीत रौप्यपदकाची कमाई केली आहे. दक्षिण कोरियाच्या संघाने भारतीय संघावर मात करत सुवर्णपदक पटकावले.
भारतीय पुरुष संघाचे खेळाडू: अभिषेक वर्मा, रजत चौहान, अमन सैनी
महिलांनाही सांघिक तिरंदाजी प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांचाही पराभव दक्षिण कोरियाच्या महिला संघाने केला.
भारतीय महिला संघाच्या खेळाडू: मुस्कार किरार, मधुमिता कुमारी, ज्योती सुरेखा वेन्नाम
अत्यंत निकराची झुंज देऊनही भारतीय पुरुष आणि महिलांना दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव सहन करावा लागला.
२०१४च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष संघाने या प्रकारात सुवर्ण पटकावले होते, तर महिला संघाने याच प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.
टेबल टेनिस: भारतीय संघाला कांस्यपदक
भारताच्या टेबल टेनिस संघाला दक्षिण कोरियाने ०-३ असे पराभूत केल्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय संघ: जी. सत्ययन, मानव ठक्कर, हरमीत देसाई, अचंता थरथ कमाल आणि ए. अमलराज
आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसमधील भारताचे हे पहिले पदक ठरले.
बॅडमिंटन: रौप्यपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर मात केली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी तसेच रौप्यपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला आहे.
भारताने यावेळी प्रथमच एकाच आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये २ पदके जिंकली आहेत. यापूर्वी साईना नेहवालने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले आहे.
कुराश: भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक
कुराश या अभिनव खेळप्रकारात ५२ किलो वजनी गटात भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य तर मलप्रभा जाधव हिने कांस्यपदकाची कमाई करून भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.
अंतिम फेरीत पिंकीला उझबेकिस्तानच्याच सुलयमॅनोवा गुलनोरने थेट १० -० असे मोठ्या फरकाने पराभूत केले.
कुराश हा कुस्तीप्रमाणेच खेळला जाणारा एक खेळ आहे.
एस. के. अरोरा यांना तंबाखू विरोधी दिन २०१८ पुरस्कार
दिल्ली सरकारचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक एस. के. अरोरा यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या मानाच्या तंबाखू विरोधी दिन २०१८ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
तंबाखू नियंत्रणाच्या कामामध्ये अमूल्य योगदानाबद्दल अरोरा यांना या मानाच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
अरोरा यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून तंबाखूचे सेवन व धूम्रपान यावर नियंत्रण मिळवले. दक्षिण व आग्नेय आशियातून हा पुरस्कार जिंकणारे अरोरा हे एकमेव व्यक्ती आहेत.
जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार दिल्लीमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण २७ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याच्या तुलनेत देशभरातील तंबाखू सेवनाचे सरासरी प्रमाण १७ टक्क्यांनी कमी झाले आहे.
अशाच प्रकारे दिल्लीतील धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण ३५ टक्क्यांनी घटले आहे. तर देशभरातील हेच प्रमान २३ टक्क्यांनी कमी झाले आहे.
गेल्या सहा वर्षात दिल्लीतील तंबाखूचे सेवन ६.५ टक्क्यांनी कमी झाले आहे. ही टक्केवारी उर्वरित देशातील सरासरीपेक्षाही जास्त आहे.
हे साध्य करण्यासाठी अरोरा यांनी दिल्लीत तंबाखू व सिगारेटच्या छुप्या जाहिरातींवरही नियंत्रण ठेवले.
त्यांनी सीबीएसई व एनसीईआरटी यांना पत्रे पाठवून तंबाखू नियंत्रणाचे पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास सांगितले. सहावी ते बारावी या वयोगटातच मुलांना तंबाखूविरोधी धडे दिले तर ते परिणामकारक ठरते असा त्यांचा अनुभव आहे.
रुग्णालये, शाळा, सरकारी कार्यालये येथे त्यांनी तंबाखूविरोधी मोहीम जोरात राबवली. त्यांच्याच प्रयत्नांतून तंबाखू कंपन्या व त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करणारे अभिनेते यांना नोटिसा देण्यात आल्या.
दिल्लीतील हुक्का पार्लरवर त्यांनी कठोर कारवाई केलीच; शिवाय ई-सिगारेटवरही बंदी घातली. ई-सिगारेटवर एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार होते, तेही त्यांनी हाणून पाडले.
देशाच्या २०१७च्या आरोग्य धोरणानुसार तंबाखू सेवनाचे प्रमाण २०२०पर्यंत १५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वॉरेन बफेट यांच्याकडून पेटीएममध्ये गुंतवणूक
ख्यातनाम उद्योगपती वॉरेन बफेट भारतातील आघाडीची डिजिटल वॉलेट कंपनी पेटीएममध्ये गुंतवणूककरणार आहे.
या गुंतवणुकीबाबत वॉरेन बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे आणि पेटीएममध्ये बोलणी सुरू असून येत्या २ ते ३ आठवड्यांमध्ये याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
बर्थशायर हॅथवे पेटीएममध्ये २,४४८ कोटी रुपयांची गुंतवणूककरत सुमारे ३ ते ४ टक्के समभाग खरेदी करणार आहेत.
त्यामुळे बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे या कंपनीची गुंतवणूक असलेली पेटीएम ही भारतातील पहिली कंपनी ठरणार आहे.
पेटीएममध्ये या आधीच चीनच्या अलीबाबा आणि जपानच्या सॉफ्टबँकच्या वन-९७ कम्युनिकेशन या कंपनीची सुमारे १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.
जपानच्या सॉफ्टबँकेने गेल्या वर्षी सुमारे ९ हजार कोटी रुपयांना पेटीएममधील २० टक्के भांडवल विकत घेतले होते.
या गुंतवणूकीमुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पेटीएमला अधिक बळ मिळणार आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि ई-व्यापार क्षेत्रात पुढे जाणेही शक्य होणार आहे.
पेटीएमने भारतातील पेमेंट सुविधेत व आर्थिक सेवेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. देशातील ५० कोटी नागरिकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणणे हे पेटीएममचे उद्दिष्ट आहे.
पेटीएमचे सीईओ: विजयशेखर शर्मा
ओडिशामध्ये विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय
बिजू जनता दलाची सत्ता असलेल्या ओडिशा राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय तेथील राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची राजकीय सोय लावण्याकरिता हा निर्णय घेतलाचे स्पष्ट आहे.
देशात सध्या ७ राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात असून, ओडिशा हे विधान परिषद असलेले आठवे राज्य ठरेल.
विधान परिषद अस्तित्वात असलेली राज्ये : महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवेमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पडसलगीकर सेवाज्येष्ठतेनुसार ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते.
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधीत डाव्या विचारसरणींच्या विचारवंतांवर देशभरात महाराष्ट्र पोलिसांकडून सध्या छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. यांपैकी ४ जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पडसलगीकर यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली आहे.
द्रमुकच्या अध्यक्षपदी एम के स्टॅलिन
एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या (द्रमुक) अध्यक्षपदी त्यांचे पुत्र एम के स्टॅलिन यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्टॅलिन यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. एम. करुणानिधी यांच्यानंतर ते पक्षाचे दुसरे अध्यक्ष बनले आहेत.
या बैठकीत दुरई मुरुगन यांची पक्षाच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच करुणानिधी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचा ठरावही मंजूर करण्यात आला.
स्टॅलिन हे दीर्घकाळापासून करुणानिधींसोबत पक्षाचे कामकाज पाहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची डीएमकेचे कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
स्टॅलिन यांनी तमिळनाडूचे उपमुख्यमंत्रिपद, २ वेळा चेन्नईचे महापौरपद सांभाळले आहे. तसेच डीएमके सत्तेत असताना त्यांनी अनेक मंत्रीपदेही भूषविली आहेत.
तमिळनाडूतील विधानसभा निवडणूकीत त्यांनी करूणानिधींच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे ७ ऑगस्ट रोजी निधन झाले होते.
करुणानिधी हयात असतानाच त्यांचे पुत्र स्टॅलिन आणि अलागिरी यांच्यात पक्षातील वर्चस्वावरुन वाद निर्माण झाला होता. अलागिरी यांची २०१४मध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
भारताच्या पहिल्या जैव इंधनावर (बायो फ्युएल) चालणाऱ्या विमानाचे २७ ऑगस्ट रोजी चाचणी उड्डाण यशस्वी झाले.
स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने बम्बार्डियर क्यू ४०० या विमानाची जैविक इंधनावर यशस्वी चाचणी घेतली.
डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले.
या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल (जैव इंधन) वापरण्यात आले होते.
डेहराडूनस्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने जेट्रोफा वनस्पतींच्या बियांपासून या विमानात वापरण्यात आलेल्या जैवइंधनाची निर्मिती केली होती.
नागरी हवाई वाहतूक संचलनालय (डीजीसीए) व स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांसह एकूण २० जणांनी या विमानातून प्रवास केला. सुमारे २५ मिनिटे हे विमान आकाशात होते.
या यशस्वी चाचणीबरोबरच जैविक इंधनावर विमानाचे यशस्वी उड्डाण करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीला जगातील पहिल्या जैविक इंधनावर चालणाऱ्या विमानाने लॉस एंजेलिसपासून मेलबर्नपर्यंत उड्डाण केले होते.
आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या विकसित देशांनीच जैविक इंधनावर विमान उड्डाण करण्याचे तंत्र विकसित केले होते. त्यानंतर आता भारतानेही हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे.
जैविक इंधनावर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. तसेच जैव इंधनावर विमान उड्डाण करणारा भारत हा पहिला विकसनशील देश ठरला आहे.
या इंधन प्रकाराची विमानोड्डाण चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो.
आशियाई क्रीडा स्पर्धा: नववा दिवस
भालाफेक: भारतीय चमूचा ध्वजधारक नीरज चोप्राला सुवर्णपदक
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ८८.०६ मीटरची सर्वोकृष्ट फेक करत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले.
याबरोबरच आशियाई स्पर्धांमध्ये भालाफेक या क्रीडाप्रकरात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी भारताला या स्पर्धेत भालाफेक कधीही कमावता आले नव्हते.
याशिवाय या फेकीमुळे त्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ठरली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक आहे.
२०१६मध्ये नीरजने २० वर्षांखालील विश्व कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक मिळवले होते.
त्यानंतर त्याने २०१७मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत व गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.
हरयाणातील पानिपत येथे जन्मलेल्या नीरजला यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय चमूचा ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला होता.
अॅथलेटीक्स: नीना, सुधा आणि अय्यास्वामी यांना रौप्यपदक
महिला लांबउडीपटू नीना वरकिलने ६.५२ मी. एवढी लांब उडी मारत भारताला रौप्यपदक जिंकवून दिले.
नीनाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले पदक आहे. यापूर्वी नीनाने २०१७साली भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.
भारताची युवा धावपटू सुधा सिंगने स्टीपलचेस ३००० मी. या प्रकारात सुधाने दमदार कामगिरी करत देशाला आज रौप्यपदक पटकावून दिले.
हे अंतर ९ मिनिटे ४० सेकंद एवढ्या वेळेत पूर्ण केले. तिचे सुवर्णपदक फक्त चार सेकंदांनी हुकले.
सुधाने यापूर्वी २०१०साली झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत २०१७साली रौप्यपदक पटकावले होते.
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. धरुणने ४८.९६ सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले.
धरुणने मार्च २०१८मध्ये फेडरेशन कपमध्ये ४९.४५ सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम रचला होता.
बॅडमिंटन: सायना नेहवालला कांस्यपदक
बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सायना नेहवालने कांस्यपदक पटकावले. उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या चीनी ताइपेच्या ताइ जू यिंगने तिचा पराभव केला.
१९८२नंतर आशियाई स्पर्धांमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये पदक मिळवून देणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १९८२मध्ये सय्यद मोदीला एकेरीत कांस्यपदक मिळाले होते.
याशिवाय आशियाई स्पर्धांमध्ये बॅडमिंटनच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय ठरली आहे. तिने जपानच्या यामागुचीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
रिलायन्स जिओचा महसुली उत्पन्नाच्या बाबतीत देशात दुसरा क्रमांक
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने दूरसंचार क्षेत्रात महसुली उत्पन्नाच्या बाबतीत व्होडाफोनला मागे टाकत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
ग्रामीण भागात केलेली दमदार कामगिरी आणि कमी किमतीत दिल्या जाणाऱ्या सेवांमुळे जिओच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
जिओने २ वर्षांपूर्वी ४जी सेवा देण्यास सुरुवात केली. दोनच वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओने महसुली उत्पन्नाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे.
देशातील दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांचा महसूल लक्षात घेता, त्यातील रिलायन्स जिओचा वाटा २२.४ टक्के इतका आहे.
महसुलाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारती एअरटेलचा महसुली उत्पन्नातील वाटा घसरला असून, तो सध्या ३१.७ टक्के इतका आहे.
व्होडाफोनचा महसुली उत्पन्नातील वाटा १९.३ टक्के, तर कुमार मंगलम बिर्ला यांच्या आयडियाचा वाटा १५.४ टक्के आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरटी ऑफ इंडियाने (ट्राय) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
लवकरच आयडिया आणि व्होडाफोनच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कंपन्या एकत्र आल्याने नव्याने तयार होणारी कंपनी देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरणार आहे.
या नव्या कंपनीचे एकूण महसुली उत्पन्न ३५ टक्के असेल. त्यानंतर एअरटेल दुसऱ्या आणि जिओ तिसऱ्या क्रमांकावर जाईल.
निधन: अमेरिकेचे युद्धनायक जॉन मॅक्केन
व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेचे हिरो मानले गेलेले आणि अमेरिकेचे विद्यमान सिनेटर जॉन मॅक्केन यांचे दीर्घ आजारानंतर २७ ऑगस्ट रोजी वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले.
मॅक्केन यांना युद्धनायक (वॉर हीरो) म्हणून ओळखले जाते. ५ वर्षे ते व्हिएतनाममध्ये तुरुंगात होते. तेथे त्यांच्यावर अन्ववित अत्याचार करण्यात आले होते.
व्हिएतनाम युद्धात त्यांनी अमेरिकेसाठी बाजूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या युद्धतंत्रामुळेच त्यांना अमेरिकेत हिरो मानले गेले होते.
मॅक्केन दोनवेळा अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार राहिले होते. २००८च्या निवडणुकीत मॅक्केन हे बराक ओबामा यांच्याकडून पराभूत झाले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे ते टीकाकार मानले जायचे. अमेरिकेच्या प्रभावशाली सिनेटर्सपैकी एक असलेले मॅक्केन हे भारतमित्र होते.
त्यांची कारकीर्द नौदलातून सुरू झाली. ॲरिझोनातून पहिल्यांदा १९८६मध्ये त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. शेवटपर्यंत ते सिनेटर होते इतका लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास होता.
लोकशाही मूल्यांचा खंदा पुरस्कर्ता, लढवय्या राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी युद्ध, शांतता, देशाची स्थिती या मुद्यांवर उघडपणे मत मांडले.
डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना ‘आयर्नमॅन’ हा किताब
फ्रान्समधील विची येथे पार पडलेल्या ‘आयर्नमॅन २०१८’ या स्पर्धेचा किताब ५२ वर्षीय नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पटकावला.
सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग अशा तीनस्तरावर होणारी अत्यंत खडतर व अवघड अशी ही स्पर्धा जागतिक स्तरावर मानाची समजली जाते.
यामध्ये स्पर्धकाला निर्धारित १६ तासांच्या कालावधीमध्ये १८० किमी अंतराची सायकलिंग, त्यानंतर ४ किमी अंतराचे पोहणे (स्विमिंग) आणि त्यानंतर ४२ किमी अंतर धावावे (रनिंग) लागते.
यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी १५ तास १३ मिनिटांमध्ये अंतर पार करीत ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकावला.
या स्पर्धेसाठी जगभरातून सुमारे १३०० स्पर्धक सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र पोलीस दलातून डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे एकमेव आयपीएस अधिकारी सहभागी झाले होते.
मेजर गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई
श्रीनगरमधील एका हॉटेलबाहेर तरुणीसोबत असताना अटक करण्यात आलेल्या मेजर लितुल गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
कर्तव्यावर असताना गोगोई त्यांना नेमून देण्यात आलेल्या हद्दीच्या बाहेर होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.
याशिवाय मेजर गोगोई यांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांविरोधात जाऊन स्थानिकांनी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केल्यानेही न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.
२३ मे रोजी त्यांना श्रीनगरमधील हॉटेलमध्ये एका तरुणीसोबत जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आले होते.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आली होती.
या समितीने त्यांना दोषी मानत लष्कराला शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. चौकशीदरम्यान, संबंधित दस्ताऐवजांची तपासणी केल्यानंतर इतर लष्करी अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात आले होते.
मेजर गोगोई दोषी ठरल्याने त्यांच्यावर आर्मी अॅक्टनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा कोर्ट मार्शल होण्याची शक्यताही आहे.
यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या एका स्थानिक तरुणाला लष्कराच्या जीपला बांधल्याने मेजर गोगोई वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
इक्वेस्ट्रीयन (घोडेस्वारी): भारताला ३६ वर्षांनंतर वैयक्तिक रौप्यपदक
भारताने ‘इक्वेस्ट्रीयन’ या घोडेस्वारीच्या प्रकारात २ रौप्यपदके पटकावली. यापैकी एक पदक हे वैयक्तिक स्वरूपाचे तर एक सांघिक प्रकारातील ठरले.
भारताला ३६ वर्षांनंतर या क्रीडाप्रकारात वैयक्तिक पदक मिळाले. यापूर्वी रघुवीर सिंग यांनी १९८२ साली नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत वैयक्तिक गटातील दोन सुवर्णपदके जिंकली होती.
वैयक्तिक प्रकारात घोडेस्वार फौवाद मिर्झा याने हे यश संपादन केले. त्याने आणि त्याचा घोडा सिगनूर मेडिकोट याने २२.७० या वेळेत शर्यत पूर्ण केली.
या स्पर्धेत जपानच्या ओइवा योशीआकी याला पहिला क्रमांक मिळाला. तो आणि त्याचा घोडा बार्ट एल ज्रा यांनी ही शर्यत २२.६० एवढ्या वेळेत पूर्ण केली.
याशिवाय, भारताने सांघिक प्रकारातही इक्वेस्ट्रीयन जम्पिंगमध्येही रौप्यपदक मिळवले. जपान व थायलंड यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले.
भारतीय संघात राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व फौवाद मिर्झायांचा समावेश होता.
ॲथलेटिक्स: हिमा, द्युति आणि अनासला रौप्यपदक
४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महिलांच्या गटात भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली. तिने ५०.७९ सेकंदात शर्यत पार करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार करत राष्ट्रीय विक्रम रचला.
धावपटू द्युति चंदनेही १०० मीटर शर्यतीमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले. १०० मी. अंतर तिने ११.३२ सेकंदात पार केले. तिचे सुवर्णपदक अवघ्या २ सेकंदाच्या फरकाने हुकले.
महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २० वर्षांनंतर भारताने प्रथमच पदक मिळवले. भारताच्या रचिता मिस्रीने या प्रकारात शेवटचे १९९८मध्ये मिळवले होते.
भारताच्या लक्ष्मणन गोविंदनने १० हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. पण पाऊल बाहेर पडल्यामुळे त्याला हे कांस्यपदक गमवावे लागले.
ब्रिज: पुरुष आणि मिश्र सांघिकमध्ये भारताला कांस्यपदक
ब्रिज या खेळाचा आशियाई स्पर्धांमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुरुष आणि मिश्र सांघिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळाले.
उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाला सिंगापूरने पराभूत केले. तर मिश्रमध्ये भारताला थायलंडकडून पराभव पत्करावा लागला.
पुरुष संघात जे. शिवदासानी, राजेश्वर तिवारी, अजय खरे, राजू तोलानी, डी. मजूमदार आणि सुमीत मुखर्जीचा समावेश आहे.
मिश्र संघात किरण नादार, हेमा देओरा, हिमानी खंडेलवाल, बी. सत्यनारायणा, गोपीनाथ मन्ना आणि राजीव खंडेलवालचा समावेश आहे.
केरळमधील पूरग्रस्तांना अॅपलकडून सहाय्य
अॅपल या अमेरिकन कंपनीने केरळमधील पूरग्रस्तांना ७ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.
घरे, शाळा यांच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अॅपलकडून हा निधी देण्यात आला.
याशिवाय अॅपलने आपले होम पेज, अॅपस्टोअर आणि आयट्यून स्टोअर याठिकाणी ग्राहकांना केरळवासीयांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे.
याबरोबरच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक असलेल्या बिल गेट्स यांच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे केरळमधील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, केरळमधील पूरप्रकोपात आतापर्यंत ३५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख नागरिक बेघर झाले आहेत.
केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळच्या पूरग्रस्तांना जगभरातील लोकांनी मदतीचा हात दिला आहे.
भारत-पाकिस्तान सैन्याचा पहिल्यांदाच संयुक्त युद्धसराव
रशियातील चेबर्कुल येथे ‘शांतता मिशन २०१८’ अंतर्गत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये (एससीओ) सहभागी असलेल्या सर्व देशांचा संयुक्त युध्दसराव २४ ऑगस्ट रोजी सुरु झाला.
यामध्ये सीमा रेषेवरील तणावपूर्ण वातावरणात एकमेकांसमोर उभे ठाकणाऱ्या आणि एससीओचे सदस्य असलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने पहिल्यांदाच संयुक्त सराव केला.
दहशतवादविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण देण्यसाठी या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ६ दिवसांचा सराव २९ ऑगस्टपर्यंत असेल.
या प्रशिक्षणादरम्यान, औपचारिक चर्चा, कारवाईदरम्यान आपापसातील ताळमेळ, संयुक्त कमांडची स्थापना, कंट्रोल स्ट्रक्चर आणि दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्याबाबतच्या मॉक ड्रिलसारखा अभ्यास करण्यात येणार आहे.
यात रशियाचे १७००, चीनचे ७००, भारताचे २००, पाकिस्तानचे ११० सैनिक सहभागी झाले आहेत. यात भारताच्या राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे.
दहशतवादाविरोधाच्या लढ्यातील आधुनिक तंत्र आणि इतर क्लुप्त्या शिकण्याची संधी या सरावातून मिळणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८: सातवा दिवस
गोळाफेक: तजिंदर पाल सिंग तूरला सुवर्णपदक
भारताच्या गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने २०.७५ मीटरची विक्रमी फेक करत गोळाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली.
पंजाबमधील मोगा गावचा रहिवासी असलेल्या तूरने ओमप्रकाश करहानाच्या नावे असलेल्या २०.६९ मीटर गोळाफेकीचा सहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
चीनच्या लियू येंगने १९.५२ मीटर गोळा फेकत रौप्य, तर कझागस्तानच्या इवान इवानोव्हने कांस्य पदक पटकावले.
२०१७मध्ये भुवनेश्वर येथे पार पडलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप्स स्पर्धेत तूरने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
२०१७च्या आशियाई इनडोअर अजिंक्यपद स्पर्धेत तूरने १९.७७ मीटरसह रौप्यपदक जिंकले होते. अवघ्या ०.०३ मीटरने त्याचे सुवर्णपदक हुकले होते.
५७व्या राष्ट्रीय आंतरराज्यीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप्स २०१८ या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. तूर सध्या आशियाईतील अव्वल स्थानी विराजमान आहे.
स्क्वॉश: दिपीका पल्लिकल, जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांना कांस्यपदक
स्क्वॉशमध्ये भारताच्या दिपीका पल्लिकल आणि जोशना चिनप्पा यांनी महिला एकेरीमध्ये तर सौरव घोषालने पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक जिंकले. भारताने स्क्वॉशच्या एकेरीत एका एशियाडमध्ये प्रथमच तीन पदके पटकावली.
दिपीका पल्लिकलला उपांत्य सामन्यात मलेशियाच्या निकोल अॅन डेव्हिडकडून पराभव पत्करावा लागला. दिपीकाचे आशियाई खेळांमधील हे चौथे पदक ठरले.
आशियाई खेळांच्या २०१०मधील कांस्यविजेत्या आणि २०१४मधील रौप्यविजेत्या संघात दीपिकाचा समावेश होता. तसेच, २०१४ एशियाडमध्ये दीपिकाने एकेरीत कांस्यपदक मिळविले होते.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात जोशना चिनप्पाचा मलेशियाच्या सिवासंगरी सुब्रमण्यमने पराभव केल्यामुळे तिलाही कांस्यपदकावर समाधान मानवे लागले.
कांस्यपदकासाठी अतिरिक्त सामना नसल्यामुळे उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक दिले जाते.
आशियाई स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला स्क्वॉशपटूंनी एकेरीत दोन पदक जिंकण्याचा पराक्रम केला.
सौरव घोषालचे आशियाई स्पर्धांमधील हे सहावे पदक ठरले. त्याने २००६ आणि २०१०मध्ये एकेरीचे कांस्य आणि २०१४मध्ये एकेरीचे रौप्यपदक मिळविले होते.
तसेच, २०१४मध्ये सुवर्णविजेत्या भारतीय संघात; तसेच २०१०मध्ये कांस्यविजेत्या भारतीय संघांत सौरवचा समावेश होता.
नौदलासाठी लष्करी सामग्री खरेदी प्रस्तावाला मंजुरी
संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी ४६ हजार कोटी रुपयांच्या लष्करी सामग्री खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
संरक्षण अधिग्रहण परिषदेतच्या (डीएसी) बैठकीत घेण्यात आला. डीएसी ही लष्कराशी संबंधित खरेदीबाबत निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था आहे.
याद्वारे नौदलासाठी १११ बहुउद्देशीय हेलिकॉप्टर, तसेच सुमारे १५० आर्टिलरी गनखरेदी केली जाणार आहे.
यापैकी १११ हेलिकॉप्टर खरेदी करारावर २१ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. धोरणात्मक भागीदारीअंतर्गत संरक्षण मंत्रालयाचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उद्देश ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला चालना देणे हा आहे.
या खरेदी व्यवहारामधून लष्करासाठी १५५ मिमीच्या १५० आर्टिलरी गन खरेदी करण्यात येतील. यासाठी ३,३६४ कोटी रक्कम खर्च करण्यात येईल.
डिफेन्स आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओ) या गन भारतातच डिझाइन आणि विकसित केल्या जातील.
तसेच १४ व्हर्टिकल लॉन्च होणारी शॉर्ट रेंज मिसाईल प्रणाली खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन
ऑस्ट्रेलियाच्या लिबरल पक्षामध्ये पंतप्रधान माल्कम टर्नबल यांच्याविरोधात बंड झाल्यानंतर, पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीमध्ये मॉरिसन यांनी माजी गृहमंत्री पीटर डटन यांचा पराभव केला. ऑस्ट्रेलियात गेल्या ११ वर्षात ६ पंतप्रधानाची निवड झाली आहे.
टर्नबल यांनी गेल्या आठवड्यामध्ये उर्जा कपातीसाठी एक ठराव आणला होता. यामध्ये विजेचे दर कमी करतानाच, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कार्बन उत्सर्जनामध्ये कपात करण्याचे उपाय होते.
त्यावरून पक्षामध्ये त्यांच्याविरोधात बंड झाले आणि बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी त्यांच्याऐवजी अन्य नेत्याची निवड करण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर टर्नबल यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून, त्यामध्ये मॉरिसन पक्षाचे नेतृत्व करणार आहेत.
‘मोरूची मावशी’ या नाटकातील मावशी अजरामर करणारे प्रसिद्ध अष्टपैलू अभिनेते विजय चव्हाण यांचे २४ ऑगस्ट रोजी वयाच्या ६३व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.
रंगभूमीसोबतच सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून रसिकांना खळखळून हसवणारे विजय चव्हाण गेली ४० वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत होते.
विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाल्यावर त्यांनी रूपारेल कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.
कॉलेजमध्ये असल्यापासून ते एकांकिकांमध्ये भाग घेत असत. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टुरटुर’ नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर सुणारे १५ व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.
मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मावशीचे स्त्री पात्र अतिशय ताकदीने रंगवले होते, ते प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले.
‘मोरूची मावशी’ हे नाटक आचार्य अत्रेंनी लिहिले. इंग्रजी नाटक ‘चार्लीज आंट’चा हा स्वैर अनुवाद होता.
नाटकातून आपल्या अभिनयाच पाया पक्का केलेल्या चव्हाण यांनी १९८५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
त्यांनी सुमारे ४०० चित्रपटांमध्ये दर्जेदार काम केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत जत्रा, माहेरची साडी यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
विजय चव्हाण यांना एप्रिल २०१८मध्ये राज्य सरकारने चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
तसेच २०१७चा ‘संस्कृती कलादर्पण’च्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
त्यांची गाजलेली नाटके: कशात काय लफड्यात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खोली नं. ५, झिलग्यांची खोली, जाऊ बाई हळू, टुरटूर, देखणी बायको दुसऱ्याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हयवदन, श्रीमंत दामोदर पंत, तू तू मी मी, अशी ही फसवा फसवी, नवरा म्हणू नये आपला, ती तिचा दादला आणि मधला
काही गाजलेले चित्रपट: वहिनीचा माया, घोळात घोळ, धुमाकूळ, शेम टू शेम, माहेरची साडी, बलिदान, शुभमंगल सावधान, एक होता विदूषक, माझा छकुला, चिकट नवरा, धांगडधिंगा, पछाडलेला, अगंबाई अरेच्चा, जत्रा, चष्मे बहाद्दर, इश्श्य, जबरदस्त बकुळा, नामदेव घोटाळे, वन रुम किचन, श्रीमंत दामोदर पंत, पछाडलेला, झपाटलेला.
मालिका: असे पाहुणे येती, येऊ का घरात, माहेरची साडी, रानफूल, लाइफ मेंबर.
आशियाई क्रीडा स्पर्धा : सहावा दिवस
टेनिस: रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीला सुवर्ण
भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीने टेनिस पुरुष दुहेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
अंतिम फेरीत भारतीय जोडीने कझाकिस्तानच्या डेनिस येवस्येव आणि अलेक्झांडर बब्लिक या जोडीवर ६-३, ६-४ अशी मात केली.
नौकानयन: भारताला १ सुवर्ण आणि २ कांस्यपदक
भारताने नौकानयन स्पर्धेत १ सुवर्ण पदक आणि २ कांस्यपदकांची कमाई केली.
नौकानयनमधील क्वाडरपल स्कल्स सांघिक प्रकारात स्वर्ण सिंह, दत्तू भोकनळ, ओमप्रकाश आणि सुखमीत सिंग यांच्या चमूने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
भारतीय संघाने ६ मिनिटे १७ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे पाचवे सुवर्णपदक ठरले.
याशिवाय रोईंग लाइटव्हेट सिंगल स्कल्स प्रकारात एकेरीमध्ये दुष्यंत चौधरीने तर दुहेरीत रोहित कुमार आणि भगवान सिंह यांनी कांस्यपदक पटकावले.
दुष्यंतने ७:१८:७६ अशी वेळ नोंदवली. त्याने यापूर्वी २०१४च्या इंचेऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक सुद्धा जिंकले होते.
कबड्डी: भारतीय महिला संघाला रौप्यपदक
कबड्डीमध्ये भारताला पुरुषांपोठापाठ महिला संघालाही सुवर्णपदक मिळविण्यात अपयश आले.
महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत इराणने भारताला २७-२४ असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्रात बऱ्याच कबड्डीपटूंना घडवणाऱ्या शैलजा जैन या इराणच्या सुवर्णपदक विजेत्या संघाच्या प्रशिक्षिका त्यांच्या विजयाच्या शिल्पकार आहेत.
नेमबाजी: हिना सिद्धूला कांस्यपदक
भारताची नेमबाज हिना सिद्धूने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले.
सिद्धूने २१९.२ गुणांसह तिसरे स्थान पटकावत कांस्यपदकाची कमाई केली. तर याच प्रकारात मनू भाकर पाचव्या स्थानावर राहिली.
जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादी प्रसिद्ध
जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-१० अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूड अभिनेते अक्षयकुमार आणि सलमान खान यांना स्थान मिळाले आहे.
फोर्ब्स या नियतकालिकाने जारी केलेल्या या यादीत अक्षयकुमार सातव्या, तर सलमान खान नवव्या स्थानी आहे.
फोर्ब्सने १ जून २०१७ ते १ जून २०१८ या काळातील अभिनेत्यांनी केलेल्या एकूण कमाईच्या आधारे ही यादी तयार केली आहे.
जगातील टॉप-१० अभिनेत्यांची एकत्र कमाई ७४८.५ दशलक्ष डॉलर इतकी आहे. या यादीत हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लुनी सर्वोच्च स्थानी आहे.
अभिनेता अक्षयकुमारची कमाई ४०.५ दशलक्ष डॉलर, तर सलमान खानची कमाई ३८.५ दशलक्ष डॉलर आहे.
या यादीत नेहमी स्थान मिळविणाऱ्या शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा मात्र यंदा या यादीत समावेश नाही.
गेल्या महिन्यात जारी झालेल्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या १०० अभिनेत्यांमध्येही अक्षयकुमार (७६) आणि सलमान खान (८२) या दोघांनी स्थान मिळविले होते.
स्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान
ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्याविरोधातील स्वपक्षीयांच्या बंडानंतर त्यांच्याजागी स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीत माल्कम टर्नबुल यांचे जवळचे सहकारी स्कॉट मॉरिसन यांचा ४५ मतांनी विजय झाला. ऑस्ट्रेलियात गेल्या ११ वर्षात ६ पंतप्रधानाची निवड झाली आहे.
गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्तावानंतर लेबर पार्टीने पुन्हा सिनेटमध्ये माल्कम टर्नबुल यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून, पुन्हा निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे.
निधन: ज्येष्ठ पत्रकार, लेखक मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर
ज्येष्ठ पत्रकार, लेखक, शांततेसाठी काम करणारे मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे २२ ऑगस्ट रोजी दिल्लीत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.
देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते.
कुलदीप नय्यर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला. लाहोरमध्ये त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नालिझममधून त्यांनी शिष्यवृत्तीवर पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
‘अंजाम’ नावाच्या एका उर्दू वृत्तपत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी इंग्रजी पत्रकारितेकडे आपली वाटचाल केली.
दिल्लीतील ‘द स्टेट्समन’या इंग्रजी वृत्तपत्रात संपादक म्हणून काम केल्यानंतर ते ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये रुजू झाले आणि तेथेही संपादकपदही भूषवले.
ते पत्रकारितेच्या १९७५च्या आणीबाणी विरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली त्यावेळी तुरुंगात टाकण्यात आले होते.
१९९६मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट त्यांची १९९७ साली राज्यसभेवर खासदार म्हणूनही नियुक्ती झाली होती.
१९९०मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
इंडियन एक्स्प्रेससह डेक्कन हेराल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यूज तसेच पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन अशा १४ भाषेतील ८०हून अधिक वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते.
इंडिया आफ्टर नेहरु, इमर्जन्सी रिटोल्ड अशा राजकीय, सामाजिक विषयावरील विविध १५ पुस्तकांचे लेखन नय्यर यांनी केले आहे.
‘बिटविन द लाइन्स’ हा त्यांचा सर्वांधिक वाचला जाणारा कॉलमही त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू होता.
२०१५साली पत्रकारितेतील त्यांच्या देदीप्यमान कार्यासाठी इंडियन एक्स्प्रेस समूहाने रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.
सत्तेच्या दबावापुढे कधी मान न झुकविणारे, भारत-पाक शांतीपर्वासाठी अव्याहतपणे संघर्ष करणारे मानवतावादी, व्यासंगी आणि निर्भीड पत्रकार म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
नय्यर यांची काही पुस्तके : बियाँड द लाइन्स, इंडिया - द क्रिटिकल इयर्स, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, द जजमेंट - इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग.
भामला फाऊंडेशनच्या ‘प्लास्टीक जनजागृती’विषयक मोहिमेला संयुक्त राष्ट्र संघटनेकडून ‘जागतिक स्तरावरील प्लास्टीक जनजागृतीविषयक मोहिम’ म्हणून घोषित करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या न्यूयार्क (अमेरिका) येथील मुख्य कार्यालयात बोलावून भामला फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर या प्रभावी सांगितिक मोहिमेला युनोने आपल्या पर्यावरण विषयक मोहिमेतही सामील करून घेतले आहे.
‘टिक, टिक, प्लास्टिक टिक ना पाए रे…’ या यूटय़ूबवर गाजत असलेल्या गाण्याची निर्मिती भामला फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती.
या गाण्याचे ५ जून या पर्यावरण दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या गाण्याला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
गाण्याच्या माध्यमातून प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृतीचा संदेश देण्यासाठी यामध्ये संगीत आणि बॉलीवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते.
शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळा आणि एका वेळेसच वापराच्या दर्जाच्या प्लास्टिकवर बंदी घाला, असा महत्त्वपूर्ण संदेश घेऊ न भामला फाऊंडेशनने या गाण्याची निर्मिती केली होती.
प्रसिद्ध संगीतकार शान यांनी या गाण्याला संगीत दिले असून गीतरचना स्वानंद किरकिरे यांनी केली आहे. तर शामक दावर यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
शंकर महादेवन, सोनू निगम, अरमान मलिक, सुनिधी चौहान, आयुषमान खुराणा, कनिका कपूर, नीती मोहन, शेखर रावजियानी आदी मान्यवर गायकांनी या गाण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
या सांगितिक मोहिमेला याआधी राष्ट्रीय पुरस्कारानेही (नॅशनल ग्रीन अवॉर्ड) सन्मानित करण्यात आले होते.
तसेच भारताच्या पर्यावरण खात्यानेही याच गाण्याला आपल्या पर्यावरणविषयक जनजागृती मोहिमेत सामील करून घेतले आहे. विविध राज्यांमध्ये आणि शाळांमध्ये ही सांगितिक मोहिम यशस्वी झाली आहे.
भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष: आसिफ भामला
आशियाई क्रीडा स्पर्धा: पाचवा दिवस
नेमबाजी: १५ वर्षीय शार्दुल विहानला रौप्यपदक
भारताचा १५ वर्षीय युवा नेमबाज शार्दुल विहानला पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.
दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे विहानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
यासह शार्दुल विहान आशियाई स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा तो भारताचा सर्वांत युवा नेमबाज ठरला आहे.
११ जानेवारी २००३ रोजी जन्मलेला शार्दूल मूळ मेरठचा (उत्तर प्रदेश) आहे. सध्या तो नववी इयत्तेत शिकत आहे. आशियाई स्पर्धेत २ सुवर्णपदके जिंकलेल्या अन्वर सुलतान यांचा तो शिष्य आहे.
गेल्यावर्षी राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेच्यावेळी शार्दूल अवघा १४ वर्षांचा होता. त्या स्पर्धेत त्याने चार सुवर्णपदके पटकावली होती.
२०१७मध्ये पार पडलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या ज्युनियर संघाचा तो सदस्य होता.
त्याने जर्मनी येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर ग्रांप्रीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
टेनिस: अंकिता रैनाला कांस्यपदक
भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने महिलांच्या एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. यासह ती टेनिसमध्ये पदक मिळवणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
यापूर्वी २००६साली सानिया मिर्झाने दोहा आशियाई स्पर्धेत रौप्य तर २०१०गोंझाऊ आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
अंकिता रैनाला उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या झ्यँग शुईकडून ४-६, ७-६ अशा पराभवाचा सामना करावा लागला.
कबड्डी: भारताचा धक्कादायक पराभव
सातवेळा आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारताला इराणने उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला.
भक्कम बचावाच्या आधारावर इराणने भारतावर २७-१८ अशी ९ गुणांच्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
आशियाई स्पर्धेतील भारताचा हा ऐतिहासिक पराभव ठरला. कारण यापूर्वी भारताने सर्व आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीला १९९०साली सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत भारताने ७ सुवर्णपदके पटकावली होती.
झुलन गोस्वामीची टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
भारतीय महिला संघाची अनुभवी क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
झुलनने आतापर्यंत ६८ टी-२०, १६८ वन-डे आणि १० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
झुलनने ६८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामनन्यांमध्ये ५६ विकेट घेतल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये झुलनच्या नावावर १६९ सामन्यांत २०० विकेट जमा आहेत.
महिला वन-डे क्रिकेटच्या इतिहासात झुलनच्या नावावर सर्वाधिक बळींची नोंद आहे. २०१७साली इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकातही झुलनने महत्वाची कामगिरी बजावली होती.
२००७साली झुलनने आयसीसीचा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता.
याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कार, पद्मश्री यासारखे मानाचे पुरस्कार झुलन गोस्वामीच्या खात्यात आहेत.
रिलायन्सचे बाजार भांडवल सुमारे ८ लाख कोटी
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल सुमारे ८ लाख कोटींवर पोहोचले.
हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप २१ हजार कोटींनी मागे आहे.
रिलायन्सच्या जवळ असलेली कंपनी आयटी क्षेत्रातील टीसीएस ही एकमेव आहे. मात्र, रिलायन्स वेगाने पुढे सरकत आहे. टीसीएसचे बाजार मुल्य ७.७९ लाख कोटी रुपये आहे.
या आधी भारताला २००६मध्ये १ कांस्य, २०१०मध्ये १ कांस्य व १ रौप्यपदक व २०१४च्या इंचिऑन स्पर्धेमध्ये दोन कांस्यपदक मिळाले होते.
वुशू चिनी मार्शल आर्ट्सचा एक प्रकार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन
राज्य सरकार पुरस्कृत ‘सेंद्रीय शेती विषमुक्त शेती’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच किटकनाशकांचा अति आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे.
या मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसाराबरोबरच त्यातील शेती मालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.
पहिल्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येईल.
यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सेंद्रिय शेती - विषमुक्त शेती या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद केली होती.
त्यानुसार केंद्र शासनाच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सेंद्रिय शेतीसाठी राज्य पुरस्कृत स्वतंत्र योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.
परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी खुल्या प्रवर्गाबरोबरच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून त्यांना राज्य सरकार शिष्यवृत्ती देणार आहे.
राज्य सरकारने यापूर्वी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली आहे.
त्याच धर्तीवर आता खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षांपासून ही योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेसाठी अंदाजे २० कोटी रुपये खर्च येणार आहे.
या योजनेअंतर्गत दरवर्षी २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यापैकी १० विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील असतील, तर उर्वरित १० विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचे असतील. मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएचडी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीचा कमाल कालावधी पीएचडीसाठी चार वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्षे आणि पदव्युत्तर पदविकेसाठी एक वर्ष इतका आहे.
खुल्या प्रवर्गातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व प्रकारचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट घालण्यात आली आहे.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उन्नत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परदेशातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा फायदा राज्य सरकारला व्हावा या उद्देशाने शासन निर्णयामध्ये तशी तरतूद करण्यात येणार आहे.
निधन: काँग्रेस नेते गुरुदास कामत
काँग्रेसमधील अभ्यासू नेते गुरुदास कामत यांचे २२ ऑगस्ट रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते. राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा.
गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. त्यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली.
त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले असून, ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे.
२००३-२००८ या काळात ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. २०१३मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली.
गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.
कामत यांनी १९७२मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६मध्ये त्यांनी एनएसयूआयचे (कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा) अध्यक्षपद भूषवले.
२००९ ते २०११ या कालखंडातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहमंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सांभाळले. त्यांच्याकडे माहिती-तंत्रज्ञान खात्याची अतिरिक्त जबाबदारीही होती.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास त्यांचे वर्चस्व होते. ईशान्य मुंबई मतदारसंघातून १९८४मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
त्यानंतर १९९१, १९९८, २००४ व २००९मध्येही निवडून ते गेले होते. २०१४मधील निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला होता.
२०१७मध्ये मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.
फोर्ब्सच्या यादीत पी व्ही सिंधूला सातवे स्थान
२०१८सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला सातवे स्थान मिळाले आहे.
पहिल्या १० जणांमध्ये सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. जाहीराती व इतर माध्यमातून सिंधूने २०१८मध्ये अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत.
अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने या यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. सेरेनाने यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून १०२ कोटी रुपये कमाई केली आहे.
बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव
उत्तर प्रदेश सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील काही योजनाही अटलजींच्या नावाने राबविण्याचे जाहीर केले आहे.
याशिवाय छत्तीसगडने नव्याने बांधलेली राजधानी नया रायपूरला अटलजींचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या राजधानीचे नाव आता ‘अटलनगर’ असे करण्यात येणार आहे.
१९९८साली पोखरण येथे अणूचाचणी यशस्वी करण्यामध्ये वाजपेयी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ‘छत्तीसगड आर्म्ड फोर्सेस’ (सीएएफ) बटालियनला पोखरण बटालियन असे नाव देण्यात येणार आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय बिलासपूर विद्यापीठ, राजनांदगाव येथे बांधण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय, जांगिर चम्पा जिल्ह्यातील मारवा औष्णिक प्रकल्प व रायपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एक्स्प्रेस मार्गालाही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरचा काव्यपुरसकार देण्यात येणार आहे.
याशिवाय मध्यप्रदेश शिक्षण मंडळाकडून येथील शाळांच्या पाठ्यपुस्तकात वाजपेयी यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात आला आहे.
चंद्रावर पाणी असल्याच्या माहितीला नासाकडून दुजोरा
भारताकडून १० वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-१ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेले पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
‘पीएनएएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे.
शास्त्रज्ञांनी मून मिनरेलॉजी मॅपरकडून (एम३) प्राप्त झालेल्या आकड्यांचा वापर करत चंद्रावर गोठलेले पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
हे संशोधन ‘रिमोट डिटेक्शन ऑफ वाईडस्पेस इंडिजिनस वॉटर इन लुनार पायरोक्लास्टिक डिपोझिट’ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आले आहे.