चालू घडामोडी : १२ ऑगस्ट
सुर्याच्या अभ्यासासाठी नासाकडून अंतराळ यानाचे प्रक्षेपण
- नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने सुर्याच्या अभ्यासासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’ या यानाचे १२ ऑगस्ट रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
- अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील केप केरनेवल या हवाई दलाच्या प्रक्षेपण केंद्रावरुन हे डेल्टा-४ या जगातील दुसऱ्या सर्वाधिक शक्तीशाली रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले.
- अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ युजीन नेवमॅन पार्कर यांच्या नावावरुन या यानाचे नाव ठेवण्यात आले आहे.
- लाखो किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता या यानामध्ये आहे. तसेच हे यान पहिले मानवविरहित यान असल्याने याला मोठे महत्व असे प्राप्त झाले आहे.
- या यानाद्वारे सोडण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमांतून सुर्याचा अधिक जवळून अभ्यास करण्यात येणार आहे.
- एका कारच्या आकाराचे हे अंतराळयान सुर्याच्या पृष्ठभागापासून ६.१६ दशलक्ष किमी (सुमारे ४० लाख मैल) अंतरावर जाणार आहे.
- यापूर्वी सोडण्यात आलेल्या यानांपैकी आजवर कोणत्याही यानाने सुर्याच्या इतक्या जवळ जाऊन त्याच्या तापमानाचा आणि उष्णतेचा सामना केलेला नाही.
- सूर्यामध्ये होणाऱ्या गुढ स्फोटांचा, त्याच्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आणि प्रकाश, तसेच सुर्यापासून निघणाऱ्या सौर लहरींचा व सूर्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे.
- सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा त्याच्या वातावरणाचे तापमान ३०० पटींनी अधिक असते. त्याचे कारण शोधून काढणे; तसेच सौर कण आणि सौरवादळांची निर्मिती कशी होते, याचा अभ्यास करण्याचा या मोहीमेचा हेतू आहे.
- पुढील ७ वर्षे हे यान सुर्याचे वातावरण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पावर नासाने १.५ बिलियन अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत.
- हे यान जेव्हा सुर्याच्या सर्वाधिक जवळून जाईल तेव्हा तिथले तापमान २५०० डिग्री सेल्सिअस इतके असेल. ते झेलण्यासाठी या यानाला आधुनिक थर्मल प्रोटेक्शन यंत्रणा बसविली आहे.
- या यानाचा ताशी वेग ४.३० लाख किमी इतका असून, सुरुवातीला हे यान शुक्राच्या कक्षेभोवती फिरणार आहे. त्यानंतर शुक्राच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत आपला निश्चित वेग गाठत, पुढे सुर्याच्या दिशेने रवाना होईल.
- त्यानंतर हे यान सुमारे ७.२४ लाख किमी प्रती तास वेगाने प्रवास करेल. कोणत्याही मानवनिर्मित वस्तूच्या गतीपेक्षा ही गती सर्वाधिक आहे.
- साधारण ७ वर्षांनी हे यान सूर्याच्या वातावरणाला स्पर्श करेल. हे यान २४ वेळा सूर्याला फेऱ्या मारणार आहे.
- ११ ऑगस्ट रोजी या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले जाणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते थांबवण्यात आले होते.
निधन : नोबेल विजेते जेष्ठ साहित्यिक व्ही एस नायपॉल
- नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक व्ही एस नायपॉल यांचे ११ ऑगस्ट रोजी लंडन येथे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
- विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांनी ३० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना २००१मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- तसेच त्यांना १९७१मध्ये बुकर पुरस्कार देण्यात आला होता. तसेच ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनी त्यांना नाइटहुड सन्मान देऊन गौरविले होते.
- १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे जन्मलेल्या नायपॉल यांच्या रचनांमध्ये त्रिनिदादपासून लंडनपर्यंतचा प्रवास आणि विविध देशांतील प्रवासाचा प्रभाव जाणवतो. भारतीय वंशाच्या नायपॉल यांनी इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले होते.
- त्यांचे शिक्षण शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफोर्ड विद्यापीठात ब्रिटीश साहित्यात झाले. त्यानंतर ते लंडनमध्येच वास्तव्यास होते.
- आपल्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये नायपॉल यांनी ज्या रचना केल्या, त्यामुळे त्यांना २०व्या शतकातील महान लेखकांच्या रांगेत नेऊन ठेवले.
- जगभरातील भ्रमंती, विविध देशांत अनेकांशी जोडलेले मित्रत्वाचे संबंध यांतून त्यांचे लिखाण समृद्ध होत गेले. कादंबऱ्या, प्रवासवृत्त हे साहित्यप्रकार त्यांनी बहुतांश हाताळले.
- इंग्रजीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. समकालीन ब्रिटिश लेखकांपेक्षाही नायपॉल यांचे इंग्रजी उत्तम होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट साहित्यामध्ये गणना होते.
- ‘अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास’ ही त्यांच्या साहित्यातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांचे अर्धआत्मचरित्रच आहे. कॅरेबियाई देशांमध्ये आलेल्या भारतीय प्रवाशांचे वर्णन या पुस्तकात आहे.
- नायपॉल यांनी लिहीलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’, ‘दि इनिग्मा ऑफ अराव्हल’, ‘फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबऱ्यांमध्ये विकसनशील देशांतील प्रत्येक नागिरकाचा संघर्ष पहायला मिळतो.
- त्यांच्या इतर प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘इन ए फ्री स्टेट’, ‘ए वे इन द वर्ल्ड’, ‘हाफ ए लाईफ’ आणि ‘मॅजिक सीड्स’ ही महत्त्वाची आहेत. त्यांचे ‘द मिस्टिक मैसर’ हे त्यांचे पहिले पुस्तक १९५१मध्ये प्रसिद्ध झाले होते.
- नायपॉल यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यासाठी त्यांना नोबेल, बुकरसह अनेक मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- भारतीय वंशाचे अशी एक प्रमुख ओळख असतानाही भारतीयांबाबतची आपली वक्तव्ये व लिखाण यांतून त्यांनी अनेकदा वादंग अंगावर ओढवून घेतले.
- १९६९साली त्यांनी लिहिलेले ‘इंडिया अॅन एरिया ऑफ डार्कनेस’ यावर भारतातून प्रचंड टीका करण्यात आली होती.
न्या. ताहिलरामानी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी
- लातूर जिल्ह्यातील न्या. विजया कापसे ताहिलरामानी यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक केली आहे.
- ताहिलरामानी यांच्या बढतीनंतर मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
- तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून न्या. ताहिलरामानी यांनी पदाची शपथ घेतली.
- डिंसेबर २०१७मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याजागी ताहिलरमानी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी बढती मिळाली होती.
- त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. विजया ताहिलरमानी यांची शिफारस मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी केली होती.
- मद्रास उच्च न्यायालयाच्या त्या तिसऱ्या महिला मुख्य न्यायमूर्ती आहेत. न्या. इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात बढती झाल्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर न्या. ताहिलरमानी यांची नियुक्ती झाली.
एचडीएफसी बँकेवरून परेश सुकथनकर पायउतार
- एचडीएफसी बँकेचे सह-व्यवस्थापकीय संचालक परेश सुकथनकर यांनी ११ ऑगस्ट रोजी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- ऑक्टोबर २०२० मध्ये एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांच्या नियोजित निवृत्तीनंतर त्यांचे वारसदार म्हणून सुकथनकर यांच्याकडे पाहिले जात होते.
- मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूटमधून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केलेल सुकथनकर हे एचडीएफसी बँकेच्या सेवेत रूजू होण्यापूर्वी, नऊ वर्षे सिटिबँकेत कार्यरत होते.
- एचडीएफसी बँकेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले सुकथनकर यांची बँकेच्या १९९४सालच्या स्थापनेपासून २४ वर्षांची कारकीर्द राहिली आहे.
- खासगी क्षेत्रातील या अग्रणी बँकेच्या घडणीत त्यांनी केलेल्या असामान्य योगदानाचा बँकेच्या संचालक मंडळाने कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.
- त्यांना मार्च २०१७मध्ये कार्यकारी संचालक ते बँकेचे सह-व्यवस्थापकीय संचालक अशी पदोन्नती देण्यात आली होता.
व्हिएतनाम ओपनमध्ये अजय जयरामला उपविजेतेपद
- भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम याला व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-विजेतेपदावरच समाधान मानावे लागले.
- अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या शेसर हिरेन रुस्तावियोने अवघ्या २८ मिनीटांमध्ये अजयवर १४-२१, १०-२१ अशी मात केली.
- या मोसमातील अजयचे हे सलग दुसरे उपविजेतेपद आहे. याआधी व्हाईट नाईट्स इंटरनॅशनल चँलेंज स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्याला हार पत्करावी लागली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा