चालू घडामोडी : १० ऑगस्ट

दिल्लीच्या सुरक्षेसाठी स्वॅट महिला कमांडो पथक तैनात

  • दिल्लीच्या सुरक्षेसाठी स्वॅट महिला कमांडो पथक तयार करण्यात आले आहे. स्वॅट महिला कमांडो पथक असलेले दिल्ली हे देशातील पहिले पोलीस दल ठरणार आहे.
  • पुरुषांच्या बरोबरीने आता या महिला स्वॅट कमांडो दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी संभाळणार आहेत.
  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत १० ऑगस्ट रोजी स्वॅट महिला कमांडोंचा दिल्ली पोलीस दलात अधिकृत समावेश करण्यात आला.
  • ईशान्य भारतातील ३६ महिलांचा या युनिटमध्ये समावेश आहे. भारतीय आणि परदेशी तज्ञांच्या देखरेखीखाली या महिलांना अत्यंत कठोर, खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • या पथकामध्ये आसाममधील १३, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूरमधील प्रत्येकी ५, मेघालयमधील ४, नागालँडमधील २ तर मिजोरम आणि त्रिपुरामधील प्रत्येकी १ महिलांचा समावेश आहे.
  • या स्वॅट कमांडोंचे अत्यंत कठीण प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा सामना करण्यासाठी त्या सक्षम आहेत.
  • बस, मेट्रो, हॉटेल यात ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांची सुटका करणे, उंच इमारतींवर चढणे, जंगलातील ऑपरेशन, विनाशस्त्र लढणे यासाठीचे प्रशिक्षण या कमांडोंना देण्यात आले आहे.
  • एमपी-५ सबमशिन गन आणि ग्लॉक २१ पिस्तुलने या महिला कमांडो सुसज्ज असतील. इतर अनेक हत्यारेही सहजतेने वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.
  • २००८साली झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर अशा पथकाची आवश्यकता भारताला भासली. इतर अनेक देशांकडे अशी पथके अगोदरपासूनच आहे.
  • पुरुषांप्रमाणे महिलांचे अशा पद्धतीचे विशेष कमांडो युनिट उभारण्याची मूळ कल्पना दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांची आहे. दिल्लीतील दहशतवादी कारवाया रोखण्याची मुख्य जबाबदारी या पथकावर असेल.
  • मध्य आणि दक्षिण दिल्लीतील महत्वाच्या स्थळांवर या महिला कमांडोंना तैनात करण्यात येईल.
  • अनेक प्रगत पाश्चिमात्य देशांनी अजून महिलांचे स्वॅट कमांडो पथक उभारलेले नाही. त्यामुळे भारतासाठी ही मोठी उपलब्धी आहे.

आशियाई स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा भारताचा ध्वजवाहक

  • इंडोनेशियामध्ये होणाऱ्या १८व्या आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून भालाफेकपटू नीरज चोप्रायाची निवड करण्यात आली आहे.
  • नीरज चोप्राने पोलंड येथे २०१६मध्ये झालेल्या आयएएफ २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते.
  • २०१७च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतही त्याने ८५.२३ मीटर भालाफेक करीत सुवर्णपदक पटकविले होते.
  • नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही नीरजने सुवर्णपदक जिंकले होते.
  • आशियाई स्पर्धा २०१८ इंडोनेशियातील जकार्ता व पालेमबांग येथे १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. यामध्ये भारताचे ५७२ खेळाडू सहभागी होणार आहेत.
  • याआधी झालेल्या २०१४च्या आशियाई स्पर्धेत भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंह ध्वजवाहक होते.
  • कोरियाच्या इंचियोनमध्ये झालेल्या या आशियाई स्पर्धेत भारताने ११ सुवर्ण, १० रौप्य आणि ३६ कांस्य पदकासह एकूण ५७ पदकांची कमाई केली होती.
  • भारतीय ऑलम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष: नरिंदर बत्रा

ट्रायच्या अध्यक्षपदी रामसेवक शर्मा यांची फेरनियुक्ती

  • रामसेवक शर्मा यांची टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
  • ट्रायच्या २० वर्षांच्या इतिहासात त्याच्या अध्यक्षाला मुदतवाढ देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
  • शर्मा यांची जुलै २०१५मध्ये ट्रायच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली होती. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपत होता. मात्र शर्मा यांना मुदतवाढ देण्यात असून त्यांचा कार्यकाळ आता ३० सप्टेंबर २०२०पर्यंत असेल.
  • अॅपल आणि फेसबुकवर कारवाईचे पाऊल उचलणारे रामसेवक शर्मा यांनी नेट न्युट्रीलिटीचा निर्णय घेतला होता.
  • तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असलेल्या निवडक आयएएस अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
  • बिहारमधील १९७८च्या केडरचे आयएएस अधिकारी असलेले शर्मा ट्रायचे अध्यक्ष बनण्याआधी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते.
  • ते युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) पहिले महासंचालक होते.
  • ट्रायचे अध्यक्ष म्हणून शर्मा यांनी केलेल्या काही सूचना वादग्रस्त ठरल्या. कॉल ड्रॉप झाल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकाला प्रति कॉल १ रुपया द्यावा, असे त्यांनी म्हटले होते. त्याविरोधात या कंपन्या न्यायालयात गेल्या.

शिवसेना देशातील सर्वात धनाढ्य प्रादेशिक पक्ष

  • आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकेसह (मुंबई) राज्य आणि केंद्रातील सत्तेत सामील असलेला शिवसेना हा देशातील सर्वात धनाढ्य प्रादेशिक पक्ष ठरला आहे.
  • असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) आकडेवारीनुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात शिवसेनेला २५.६५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.
  • देशभरातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारावर एडीआरने हा अहवाल तयार केला आहे.
  • शिवसेनेनंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला सर्वाधिक २४.७५ कोटी रुपयांची देणग्या मिळाल्या आहेत.
  • त्याखालोखाल पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाला २०१६-१७ या आर्थिक वर्षात १५.४५ कोटी रुपयांची रक्कम देणगी स्वरुपात मिळाली आहे.
  • शिवसेना सर्वात श्रीमंत प्रादेक्षिक राजकीय पक्ष ठरला असला तरी, २०१५-१६ च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या देणग्यांच्या रकमेत ७० टक्क्यांची घट झाली आहे.
  • २०१५-१६ मध्ये शिवसेनेला ६१.१९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. तर २०१६-१७मध्ये शिवसेनेला २५.६५ कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत.

तमाशासम्राज्ञी शांताबाई काटे यांचे निधन

  • स्वातंत्रपूर्व काळातील तमाशाच्या एकमेव साक्षीदार तमाशासम्राज्ञी शांताबाई काटे (वय ९७) यांचे ५ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • तमाशाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या तुकाराम खेडकर यांच्या प्रेरणेने त्या तमाशा या लोककलेच्या चरणी रुजू झाल्या.
  • स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते ८०च्या दशकापर्यंत शांताबाई यांनी तमाशात काम केले. १२ वर्षांच्या असतानाच सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातल्या एका तमाशात १० वर्षे शांता काटे यांनी काम केले.
  • नंतर त्या मुंबईत आल्या व माधवराव नगरकर यांच्या तमाशात काम करू लागल्या. नगरकर आणि शांताबाई यांच्या जोडीने सुमारे ३० वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
  • शांताबाई आणि नगरकरांचे महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, संत तुकाराम अशी वगनाट्ये बघायला रसिक गर्दी करायचे.
  • माधवराव नगरकर यांच्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक, कांताबाई सातारकर यांच्या नावाजलेल्या तमाशांमध्ये त्यांनी फड गाजवले.
  • एकेकाळी लोकांचे मनोरंजन करून त्यांची वाहवा मिळवणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या या तमाशासम्राज्ञीचे अखेरचे दिवस अत्यंत हलाखीचे होते.
  • ५०-६० वर्षांच्या कलासेवेनंतर त्या शेवटी अकोले तालुक्यातील नातसुनेकडे राहत होत्या. शेवटी मानलेल्या मुलीनेही त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे लोकांनाच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायची वेळ आली.

कन्नड कवी डॉ. सुमथिंद्र नाडिग यांचे निधन

  • कन्नड साहित्यक्षेत्रातील विख्यात कवी डॉ. सुमथिंद्र नाडिग यांचे ७ ऑगस्ट रोजी वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले.
  • कन्नड साहित्याच्या साठोत्तरी कालखंडातील अत्यंत महत्त्वाचे कवी असलेल्या नाडिग यांचा जन्म ४ मे १९३५ रोजी चिकमंगळूर जिल्ह्य़ातील कलासा गावात झाला.
  • तरुणपणापासूनच साहित्याची गोडी त्यांना लागली. कन्नड ही तर त्यांची मातृभाषा होती आणि इंग्रजी साहित्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली होती. याशिवाय मराठी, कोंकणी, हिंदी आणि बंगाली भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
  • १९६०मध्ये कर्नाटकात आधुनिक साहित्य चळवळ सुरू झाली. याच काळात त्यांचा ‘पंचभूत’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आधुनिक कन्नड काव्यात तो खूपच महत्त्वाचा मानला गेला. नंतर त्यांनी अनेक कविता लिहिल्या.
  • ‘दाम्पत्य गीता’ या त्यांच्या काव्यसंग्रहात प्रेम आणि विवाह याविषयीच्या कविता आहेत. समीक्षकांनी या काव्यसंग्रहाचीही आवर्जून दखल घेतली.
  • लघुकथांबरोबरच मुलांसाठीही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. रवींद्रनाथ टागोरांची काही पुस्तके त्यांनी कन्नडमध्ये अनुवादित केली.
  • अखंड शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या नाडिग यांनी म्हैसूर विद्यापीठ तसेच अमेरिकेतील टेम्पल विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली.
  • गोवा विद्यापीठासह देशभरातील अनेक विद्यापीठांत अतिथी प्राध्यापक म्हणून ते जात. तीन वर्षे ते नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्षही होते.
  • हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी विद्यापीठाने ‘शब्द मार्तण्ड’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. कर्नाटक सरकारचा व काही खासगी पुरस्कार त्यांना मिळाले. मात्र साहित्य अकादमीसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून ते वंचित राहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा