भारताच्या सौरभ चौधरीने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळाले.
सौरभच्या या कामगिरीसाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने ५० लाखांचे इनाम घोषित केले.
प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या १६व्या वर्षीय सौरभने २४०.७ गुणांची कमाई करत सुवर्णपदक जिंकले.
जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सौरभने विश्व विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदक नावावर केले होते.
नेमबाजी: संजीव राजपूतला रौप्यपदक
५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदक जिंकले. त्याने ४५२.७ गुणांची कमाई केली.
चीनच्या हुई झिचेंगने ४५३.३ गुणांसह सुवर्ण, तर जपानच्या मात्सुमोटो टाकायुकीने ४४१.४ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
चौथ्यांदा आशियाई स्पर्धेत सहभागी झालेला ३७ वर्षीय संजीव हा भारतीय चमूतील वयस्कर नेमबाज आहे.
राजपूतने यापूर्वी २००६च्या आशियाई स्पर्धेत ५० मी. रायफल थ्री पोझिशन सांघिक गटात कांस्य, तर २०१०मध्ये १० मीटर एअर रायफल सांघिक गटात रौप्यपदक जिंकले आहे.
कुस्ती: दिव्या काकरानला कांस्यपदक
भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने ६८ किलो वजनी गटातील फ्री स्टाइलमध्ये दमदार कामगिरी करत कांस्यपदकावर नाव कोरले.
कांस्य पदकासाठी झालेल्या मुकाबल्यात तिने चीनची कुस्तीपटू चेन वेनलिंग हिचा १०-० असा सहज पराभव केला.
सेपाक टकरॉ: भारतीय संघाला कांस्यपदक
सेपाक टकरॉ (Sepak Takraw) या खेळात भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच कांस्यपदक पटकावले.
गतविजेत्या थायलंडकडून ०-२ असा पराभव झाल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
५० मी. फ्रिस्टाईल जलतरण प्रकारात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला अवघ्या ०.०१ सेकंदाच्या फरकामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
वीरधवलने २२.४७ सेकंदांचा वेळ घेतला तर कांस्यपदक जिंकणाऱ्या जपानच्या सुनिची नाकाओने २२.४६ सेकंदात ५० मीटरचे अंतर कापले.
याआधी त्याने गुआंझाऊ येथे २०१०साली झालेल्या स्पर्धांमध्ये कांस्यपदक पटकावले होते.
सात राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील ४ राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल केले असून, ३ नवीन राज्यपालांची नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार .......
बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेले सत्यपाल मलिक हे एन एन वोहरा यांची जागा घेणार आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये साडे तीन दशकांनंतर राजकीय राज्यपाल मिळाला आहे.
१९८४मध्ये जगमोहन यांनी जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी शपथ घेतली होती. तेव्हापासून आजपर्यंत काश्मीरमध्ये राजकीय व्यक्तीला हे पद देण्यात आले नाही.
दहशतवाद्यांनी ग्रासलेल्या या स्वर्गभूमीला नेहमीच सैन्य अधिकारी किंवा सेवानिवृत्त सनदी अधिकारीच राज्यपालपदी नियुक्त करण्यात येत होता.
लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय आणि उत्तर प्रदेशचे मंत्री राहिलेले आहेत.
गंगाप्रसाद यांची मेघालयाच्या राज्यपालपदावरुन बदली करीत सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांची मेघालयाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हरयाणाचे राज्यपाल कप्तान सिंग सोलंकी यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सत्यदेव नारायण आर्य यांची हरयाणाच्या राज्यपालपदी, बेबी राणी मौर्य यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चीनचा पाकिस्तानमध्ये रहिवासी प्रकल्प
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर (सीपीइस) अंतर्गत चीन पाकिस्तानमधील ग्वादार येथे आपल्या नागरिकांसाठी एक शहर वसवत आहे.
ग्वादर बंदर बांधण्यासाठी, त्याच्या विकासासाठी व पुढील व्यापारासाठी चीन व पाकिस्तान यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे.
त्याअंतर्गत चीनने पाकिस्तान इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडून ३६ लाख चौरस फुटाचे आंतरराष्ट्रीय पोर्ट शहर खरेदी केले आहे.
यावर १५ कोटी डॉलरमध्ये एक रहिवासी प्रकल्प राबवला जाणार आहे. येथे २०२२पासून ५ लाख कर्मचारी राहायला येतील.दक्षिण अशियातील चीनचे अशाप्रकारचे हे पहिले शहर असेल.
चीनच्या योजनेनुसार, हे लोक पाकिस्तानच्या ग्वादार बंदरात होत असलेल्या शहरात काम करतील. या रहिवासी भागात फक्त चीनचे नागरिक राहतील.
चीनने यापूर्वी मध्य आशियातील देशांमध्ये आणि आफ्रिकन देशांमध्ये प्रकल्पावर काम करणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी अशा वसाहती बांधल्या आहेत.
चीनने पाकिस्तानच्या पाइपलाइन, रेल्वे, महामार्ग, ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रात आणि मोबाइल नेटवर्कमध्ये गुंतवणूक केली आहे. चीनने २०१५पासून या प्रकल्पांवर १८.५ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.
चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीइसी) योजनेत ३९ प्रकल्पांचा समावेश असून त्यातील १९ प्रकल्प पूर्ण झालेले आहेत किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या कोसळण्य़ाच्या बेतात आहे. परकीय चलनाचा साठा झपाट्याने कमी होत असून कर्जाचा डोंगरही पाकिस्तानवर आहे.
यामुळे पाकिस्तान सध्या वारंवार चीनकडे मदतीची मागणी करतो. चीननेही दक्षिण आशियातील आपले वर्चस्व वाढविण्यासाठी पाकिस्तानला वारंवार मदत देऊ केली आहे.
सीपीइसी हा चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ धोरणाचा एक भाग असून आशियातील विविध देशांमध्ये आपला प्रभाव वाढीस लागावा यासाठी चीन प्रयत्न करत आहेत.
भूतान आणि भारत वगळता दक्षिण आशियातील सर्व देशांचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. सीपीइसी हा पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्यामुळे भारताने या प्रकल्पास विरोध केला आहे.
व्हेनेझुएलाच्या चलनाचे प्रचंड अवमूल्यन
आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलाच्या चलनाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांनी प्रचंड अवमूल्यन केले आहे.
त्यासाठी नवीन चलन आणण्याचा व त्याचे नावही वेगळे ठेवण्याचा प्रयत्न तेथील सरकार करत आहे. सध्याच्या २ लाख बोलिवरची किंमत नवीन २ बोलिवर इतकी क्षुल्लक असणार आहे.
यामुळे आधीच प्रचंड हाल सोसत असलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांना आता महागाईची झळ आणखी बसणार आहे.
सध्या व्हेनेझुएलाच्या बोलिवर या चलनाची किमत एका डॉलरला २,८५,००० असून ती नजीकच्या काळात आणखी घसरण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम व्हेनेझुएलाच्या महागाईवर झाला असून ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार देशातील महागाईच्या वाढीचा दर एका वर्षात १ लाख टक्के इतके झाला आहे.
१ किलोची एखादी वस्तू घेण्यासाठी येथे टोपल्यांमधून नोटा द्याव्या लागत आहेत. चलनाला काहीच किंमत न राहिल्याने येथील लोक या नोटा कचऱ्यात फेकून देत आहेत.
जगातले सगळ्यात जास्त तेलाचे साठे असलेला व्हेनेझुएला लॅटिन अमेरिकेतला एकेकाळचा सगळ्यात समृद्ध देश होता.
परंतु अनेक वर्षांची चुकीची धोरणे व भ्रष्टाचार यामुळे सध्या या देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून लाखो लोक स्थलांतर करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा